दारावरची थाप भाग 2

Submitted by रुद्रदमन on 30 August, 2024 - 02:48

दारावरची थाप भाग 2

आम्हाला ते घर विकून बरीच वर्ष झाली होती. परंतु त्या जुन्या घरात घडलेल्या घटनांची छाया माझ्या मनावर कायमची कोरली गेली . त्या घरात अचानक प्रकट झालेली ती भयानक, रहस्यमयी शक्ती जणू काही पुढे कायमची माझ्या आयुष्यात उतरली होती. गॅलरीमध्ये उभी ती स्त्री, तिचा तो किळसवाणा चेहरा, डोळ्यांतील भीतीदायक चमक, तिच्या ओठा मधून गळणारे रक्त, आणि परत ये अशा इशाऱ्याने केलेली खूण.आजही माझ्या डोळ्यांसमोर उभी राहत होती.

रात्र झाली की तिचा चेहरा माझ्या स्वप्नात दिसायचा.ती मला घेऊन जाण्यासाठी येत आहे असे जाणवायचे. तिचे हळुवार पाऊल, थंड श्वास, मला घाबरवून सोडायचे.मी घरात एकटा असताना मला वाटायचे ती मागेच उभी आहे. दरवाजे, खिडक्या उघडत असताना वाटायचे ती बाहेर तर उभी नसेल ना.. . हे आजवर प्रत्येक दिवशी मी अनुभवले होते. आम्ही ते घर सोडले जरी असले तरी त्या स्त्रीची सावली माझ्या सोबत आली होती. दिवसेंदिवस तिची आठवण मला त्रास देत होती. मी खूप प्रयत्न करत होतो विसरण्याचा, नवीन आठवणी निर्माण करण्याचा, पण त्या रात्री ची सावली माझ्या मनावर कायमची कोरली गेली होती.

त्यातच अचानक ती गोष्ट घडली...

एक दिवस मी कामावरून घरी आलो. संध्याकाळचे सात वाजले होते. दरवाजा उघडा पाहून अनु आज लवकर आली असल्याचे कळले..

"अनु... अनु..." करत मी घरात शिरलो.

"आलात का तुम्ही? हातपाय धुऊन घ्या, मी चहा टाकते," अनु चा प्रेमळ आवाज घरभर पसरला.

मी घाईने जाऊन सर्व गोष्टी उरकल्या आणि हॉलमध्ये येऊन बसलो. आम्ही एका बंगल्या च्या आऊट हाऊस मध्ये भाड्याने राहत होतो.. आमच्या या नवीन घराला बाल्कनी नव्हती, त्यामुळे आमचे सर्व बसणे बोलणे हॉलमध्येच असायचे. थोड्याच वेळात अनु वाफाळते चहाचे कप घेऊन हसतमुखाने येताना दिसली.

"रोहनलाही चहा ठेवला आहेस ना, अजून कसा आला नाही? एव्हाना यायला हवा होता.." मी चहाचा कप घेत दरवाजा कडे बघत, आमचा मुलगा रोहन विषयी विचारले. तो आता तिसऱ्या कक्षेत शिकत होता.

"तुम्ही घ्या, येईलच तो आता. मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे," अनु आनंदात असल्यासारखी बोलली.

"अरे वा, फारच खुश दिसतेस! नक्की काय कारण आहे आनंदाचे? काही खुशखबरी आहे की काय?" मी मिश्कीलपणे तिला छेडण्यासाठी तिच्या पोटावर हात फिरवत विचारले.
"जाऊ द्या हो, इतकी वर्ष झालीत लग्नाला पण तुमचा फाजील पना काही बंद होत नाही." लटक्या रागात अनु बोलली..
तिचे ते बोलणे, ती घटना आजही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी आहे. खरे तर झाले असे की...

अनुला प्रमोशन मिळाले होते. बातमी ऐकून मी खूपच खुश झालो होतो. पण, तिने जेव्हा ऑफिस शिफ्ट झाल्याचे सांगितले, तेव्हा मी विचारात पडलो. अनुला दुसऱ्या शहरात जावे लागणार की काय? तिला सोडून मी कधीच राहिलो नव्हतो. एकदा राहिलो होतो, तर काय घडले होते, तुम्ही मागच्या भागात वाचलेच असेल.

पण पुढच्या बातमीने माझा जीव भांड्यात पडला. ऑफिस याच शहरात होते; फक्त एरिया बदलला होता. पण माझा आनंद जास्त काळ टिकला नाही. तिने एरिया चे नाव सांगितले, कलानगर.

"काय? कलानगर? म्हणजे तोच आपला जुन्या घराचा एरिया? म्हणजे अनु रोज त्या भागात जाणार?" या विचाराने मी चिंतातुर झालो.

"अनु, तू नोकरी सोड," मी गंभीरपणे म्हणालो.

"काय? कशी सोडू?" तिने डोळे विस्फारून पुढे विचारले. "तुला माहिती आहे ना, आपली आर्थिक स्थिती ठीक नाही. मला काम केल्याशिवाय पर्याय आहे का?"

"पण ती जागा... ते सर्व मला अजूनही आठवते. त्या स्त्रीची भीती... तिने तुला काही केल तर?" मी काळजीत बोलत होतो हे समजून तिने मला हळूच जवळ घेतले. माझ्या केसांमधून हात फिरवत तिन समजावणीच्या सुरात म्हणाली,
"फक्त तुला आठवते ते, राजा. असे किती दिवस घडून गेलेल्या घटनांना आठवत राहणार आहेस? आणि ते सर्व तेव्हाच संपले आहे. माझी चिंता करू नकोस, मी काळजी घेईन. त्या घरा समोरूनही जाणार नाही. मग तर झाले ना?"

मी पण माझे विचार बाजूला ठेवून तिच्या निर्णयाला संमती दर्शवली. अनु आता दिवसभर त्याच भागात जाऊ लागली. मला नाही म्हणून थोडी थोडी काळजी वाटायचीच...

तो दिवस उजाडला , मला सुट्टी होती. रोहन अभ्यास करत बसलेला होता. अनु घाईघाईने दुपारीच घरी शिरली आणि सोफ्यावर येऊन बसली. तिचा चेहरा शिनलेला दिसत होता.
उन्हा मधून आल्या मुळे थकली असेल म्हणून,
मी किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन आलो. पाणी पिऊन झाल्यावर तिला काय झाले, इतक्या लवकर घरी कशी आलीस, याविषयी विचारले.

अनु बोलू लागली, "आज मला ऑफिसच्या कामासाठी आपल्या त्या जुन्या घराच्या एरियात जावे लागले होते."

मी तर उडालोच.. "काय? तू नाही गेलीस ना तिकडे? तू ठीक आहेस ना?" मी आशेने विचारले.

मला शांत राहण्याची खूण करत ती पुढे बोलू लागली, "हो, मी ठीक आहे. मी गेले होते तिकडे. त्या घरासमोरून जाताना समोरच्या इस्त्री वाल्याने मला ओळखले."

मी ते दुकान आठवण्याचा प्रयत्न केला आणि अनु पुढे काय सांगते आहे ते ऐकू लागलो..

"मी समोरून जातच होते, तर पलीकडून आवाज आला. मी वळून पाहिले तर इस्त्रीवाले काका होते. त्यांनी मला आत बोलावले. त्यांचे घर मागेच आहे ना. मी तिथे गेल्यावर त्यांनी आत त्यांच्या बायकोला आवाज दिला. त्यांची बायको मला बऱ्याच वर्षांनंतर पाहून खूप खुश झाली होती. दोघा दांपत्यांनी मला चहासाठी बळजबरीने घरात नेले. चहा दरम्यान बऱ्याच अनौपचारिक गप्पा झाल्या. चहा पिऊन झाल्यावर मी कप खाली ठेवला आणि निघण्यासाठी उठायला लागले. मला खर तर त्या भागात थांबायची इच्छा नव्हती. पण तेवढ्यात त्या दोघांनी एकमेकांकडे बघून काहीतरी खुणावले आणि मला खाली बसवले. तुमच्या नवऱ्या बरोबर झालेल्या त्या भूत स्त्री च्या घटने विषयी महत्त्वाचे बोलायचे आहे. असे बोलत त्यांनी तुमच्या बरोबर घडलेली प्रत्येक गोष्ट सांगितली..

"अजून काय म्हणाले ते? पुढे सांग?" मी उत्सुकतेने विचारले. "पण अनु, माझ्या बरोबर घडलेली घटना तर फक्त मला, तुला आणि तुझ्या घरच्यांनाच माहीत होती. मग त्यांना कशी कळली?"

माझ्या प्रश्नाचा रोख समजून अनु पुढे बोलायला लागली, "मलाही हाच प्रश्न पडला. त्यांनी ती घटना इतकी तपशीलवार सांगितली कशी, हे मला पण कोडे पडले. त्यांनी ती घटना इतकी तपशीलवार सांगितली, की एक क्षणासाठी मला वाटले की ती घटना त्यांनीच अनुभवली आहे. मग ते पुढे बोलू लागले. ते म्हणाले की, त्या बिल्डिंगमध्ये कोणत्याही स्त्रीचे भूत नव्हते. ते तर एक नाटक होते... तुमच्या त्या शेजारच्या काकांनी तुमच्याबरोबर ते नाटक रचले होते."

अनु पाणी पिण्यासाठी थांबली. माझे तर काळीजच फाटले होते. हा माझ्यासाठी आश्चर्याचा खूप मोठा धक्का होता.

"काय म्हणजे? मग मी बघितले ते नक्की काय होते?" मी शंका उपस्थित करत विचारले.

"अहो, नाटक होते, फक्त एक नाटक होत ते. आपल्याला त्या फ्लॅट मधून बाहेर काढण्यासाठी बनाव होता तो. ते पुढे म्हणाले की, तुमच्या समोरचे शेजारी होते ना, त्यांच्या भावाला त्या फ्लॅटची खूप गरज होती. त्यांच्या भावाला तो फ्लॅट मिळावा, म्हणूनच त्यांनी हे भूताचे नाटक केले . इस्त्रीवाले काका म्हणाले की, त्या शेजाऱ्यांच्या बहिणीनेच तो भयानक सीन तयार केला होता.. मेकअप, फेक रक्त, सगळे. आणि त्यांनीच तिला स्ट्रीट लाईट खाली उभे केले. तुझे लक्ष वेधले जावे म्हणून स्ट्रीट लाईट चालू बंद केली.. त्या क्षणी तुला ते सर्व खरे वाटेल असे अगदी नेमके रचले होते."

हे ऐकून मी एकदम स्तब्ध झालो. माझे मन सुन्न झाले होते. मला काय बोलावे तेच सुचत नव्हते. "ती स्त्री, जी मी इतके दिवस खरी समजत होतो, ती सर्व खोटे होते? एक छान नियोजित योजना होती?" माझ्या मनात तेवढच सुरू होते...

"म्हणजे मी जे बघितले, जे अनुभवले ते सर्व फक्त एक नाटक होते ?" मी अजूनही धक्क्यात होतो.

"हो," अनु हळुवार स्वरात म्हणाली. "काका म्हणाले की, त्यांनी त्या शेजाऱ्यांना हे नाटक करायला मदत केली होती. कारण त्यांना त्या वेळेस पैसे मिळणार होते, आणि आपल्याला घाबरवून घर सोडायला भाग पाडायचे असे त्यांचे ठरले होते."

अनुला थांबवत मी शंका उपस्थित केली," अग पण तो रात्री मोडलेला दरवाजा तिसऱ्या दिवशी परत व्यवस्थित कसा होता?"
" अहो, तुम्ही दुसऱ्या दिवशी घाबरून घर सोडून माझ्या कडे आले तेव्हा ते तुमच्या पाळती वर होते.. तुम्ही निघाल्या निघाल्या एका सुतारा कडून त्यांनी तो व्यवस्थित करून घेतला.. सर्व घर व्यवस्थित करून ठेवले...
आपल्याकडे नंतर ती प्रॉपर्टी विकायची आहे का म्हणून विचारायला आलेला एजंट दुसरा कोणी नसुन त्यांचा भाऊच होता.. तो फ्लॅट त्यानेच आपल्याला ग्राहक नाही लागत म्हणून कमी किमतीत बळकावला... आता आले का लक्षात तुमच्या, किती नीच लोकांशी आपला संबंध आला होता तो.." ती बोलायचे थांबली तेव्हा रागाने लाल झाली होती..
मी पण रागाने थर थर कापत होतो.. माझे रहाते घर मला विकावे लागले, त्या भयावह प्रसंगाने आज पर्यंत भोगलेली दयनीय स्थिती.. त्याला कारणीभूत ती पाताळयंत्री माणसे.. त्यांना धडा शिकवायचा च हा निर्धार मी मनात निश्चित केला.. आणि अनु ला बोलून दाखविला.. अनु देखील त्या गोष्टीस तयार झाली..
आम्ही सर्वात आगोदर त्या इस्त्री वाल्या काकांच्या घरी गेलो.. त्या संध्याकाळ नंतर आज प्रथमच मी माझ्या घराच्या बाल्कनी ला बघत होतो.. माझे मन तिथे थोडेसे रेंगाळले .. माझ्या मनातील तिचे रूप आता पूर्ण पालटले होते.. ती आज पण मला बोलवत होती पण आज चे तिचे बोलावणे वेगळे होते , सुखदायक होते.. आमचा तिथेच सुरू झालेला संसार तिला तिच्या सानिध्यात फुलताना बघायचा होता..
आम्ही काकांच्या घरी गेलो.. त्यांना बघितल्यावर मला त्यांचा चेहरा आठवला.. ओळख जाणवली.. त्यांनी सर्वात आगोदर त्यांनी केलेल्या अपराधाची क्षमा मागितली... आणि अतिशय आदरतिथ्य पूर्वक आमचे स्वागत केले.. बराच वेळ आम्ही त्या विषया वर गप्पा मारल्यात.. अगदी हसत हसत.. त्यानंतर त्यांना आम्ही पोलिसांकडे जाणार आहोत हे सांगितले व त्यांनी आम्हाला साथ द्यावी अशी विनंती केली..
त्यांनी केलेल्या चुकीचे चे परिमार्जन करण्यासाठी ते लगेच तयार झाले.... त्यांनी शेवट पर्यंत साथ देण्याचे वचन दिले..
त्यांचा निरोप घेऊन आम्ही समोरच्या गॅलरी कडे बघत तिथल्या पुढील आयुष्याची स्वप्न रंगवत बाहेर पडलो.. आम्ही पोलीस स्टेशन ला चाललो होतो.. पुढील लढाई लढण्यासाठी.. अनुने चालताना हळूच माझा हात हातात घेतला.. तिच्या त्या स्पर्शाने अन्याया विरुध्द लढण्याची ताकत मला दिली. आता आम्ही कोणत्याही परिस्थीती मध्ये आमच्या घरा साठी लढाई लढण्यासाठी सज्ज झालो होतो..
आणि आम्ही ती जिंकणारच...

लेखक: रुद्रदमन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मजा आली.चांगला फुलवला आहे हा भाग.
फक्त काकांना स्ट्रीट लाईट चालू बंद कसे करता आले कळलं नाही.ही जबाबदारी मनपा कडे असते ना?

mi anu
आता मनपा च्या एखाद्या कर्मचाऱ्याला पण शामिल करून पून्हा लिहितो हवे तर.

व्वा छानच की.
पण मला एकूण असे वाटतय की अजून एक भाग येणार आहेच.

@केशवकुल
तुम्ही म्हणताय तर लिहू की...
तुमच्या सारखा इतक्या कथा लिहिनारा लेखक जर म्हणतोय तर लिहायला हवे

Just forget all that. लेखन स्वान्तःसुखाय.
लिहा हो तुम्ही. आम्ही वाचू.