पान्हा
माईने आज पुरणाचा घाट घातला होता. त्याकरिता तिची लगबग चालू होती. तिने जुनीशी होत असलेली रेशमी साडी नेसली होती. केसांचा अंबाडा करुन तीत बागेतल्या फुलांचा सुनेने सकाळी केलेला गजरा माळला होता. छोट्याश्या चौकोनी स्वयंपाकघरातही तिची इकडून तिकडे धावाधाव सुरु होती. तिच्या रेशमी साडीचा दोर कोपऱ्यातील कपाटात नकळत अडकला अन पळभरासाठीची तिची गती थांबली. तिने अलगदपणे अडकलेले सुत बाजूला केले. पुन्हा स्वयंपाकसृष्टीत प्रवेश करती झाली.
डाळ शिजलेला वास घरभर पसरला. डाळ घोटता घोटता तिला मुलांचे बालपण आठवले. "पुरण झाले का ग आई" अशी कुठूनतरी आठवणीतून हाक तिला ऐकू आली. गुळाच्या चरचर वाजत असलेल्या चटक्यात नैवैद्याआधी खाल्ले म्हणून आज्जीने दिलेली शिव्यांची डागणी कितीकाळ भाजत राहिली होती. तिच्या साडीच्या निऱ्या खेचत तिच्या पायाशी असलेली नात म्हणत होती. "आज्जी पुरण झाले का सांग ना? " चित्रात जिवंत असलेली आठवण बाहुलीहुनही सजीव झालेली पाहून तिने पुरणाची वाटी चिमणीच्या हातात दिली अन गोड गोड पापा घेतला
गोड सुवासाने अण्णांचेही मन आनंदी झाले होते. खुर्चीवर पेपर वाचत बसलेले अण्णा पेपर मिटवून खुर्ची सोडून माईला मदत करण्यासाठी आले होते. पण अण्णांची मदत म्हणजे कामाचा उदंड एवढा पसारा म्हणून माईने त्यांना शिस्तीत बाजूला बसायला सांगितले.
जिवतीचा पट पुजण्याकरता माईने पाट मांडला होता. त्याकरिता हळदी कुंकवात रंगलेली बोटे स्नेह पाझरत होती. तुपात भिजलेली फुलवात अंतरंगात स्निग्ध झाली होती. जिवतीचे पूजन करत असलेली माई पाहून अण्णा त्यांच्या लहानपणात रमले होते. नऊवारी साडी नेसून चुलीपुढे फुंकणी धरलेली आई दिसली. तिच्याभोवती आई आई म्हणऱ्या चार परकरी पोरी दिसल्या.आईला पाट्यावर शिजलेली डाळ वाटून देणारा गणू दिसला. सगळ्यांची जेवण झाल्यावर एकटयाच स्वत:ला रांधून घेणाऱ्या आई काकू आज्जी दिसल्या. आईच्या स्मृतींनी डोळ्यातून झरझरणार पाणी देव घुतलेल्या तीर्थाइतके पवित्र वाटले.
स्मृतीच्या दाट वलयातही माईचा आवाज आईच्या आवाजात अण्णांना ऐकू आला.
"जय जिवती माते जिथं माझ बाळ असेल तिथं खुशाल असो"
अण्णा मनातल्या मनात या जिवतीचे मातृचिन्ह जपत होते. सहज चालता चालता तोल जाऊन पडलेल्या म्हाताऱ्या आईचे बोल आठवत होते.
"आमचं हे असच चालायचं. पडायचं धडपडायचं आता तुम्हीच आम्हाला सांभाळायचं.मी तुझी आई झाले आता मी लेकरु व्हायचं दिवस आले"
आईच्या धुवट पातळाचा अलवार स्पर्श आठवला आईच्या सुरकुतलेल्या हाताचा मऊ उबदार स्पर्श आठवला. ती लेकरु झाली तरी तिचे आईपण सरले नसल्याची खूण जाणवली.
एवढ्यात माई पुरणाचे दिवे घेऊन अण्णांपुढे आल्या. त्यांच्या डोक्यावर अक्षता रोपत म्हणाल्या
"जय जिवती माते जिथे माझ बाळ असेल तिथे खुशाल असो"
माईच्या हृदयातले ममत्व सोन्यासम ज्योतीतून प्रगट होत होते.
तसे अण्णांनी माईच्या हातातले औक्षणाचे ताट आपल्या हाती घेतले व माईच्या माथ्यावर अक्षत घालून म्हणाले.
"जय जिवती माते माझी आई पत्नी बहीण काकू मामी लेकी सूना" सगळ्या खुशाल असू दे"
तसा दोघांच्याही हळव्या काळजाला वात्सल्याचा पुर आला होता. घरातल्या राधास्वरुप कान्हाईच्या बोलाचा स्पर्श होताच पूर ओसरला. नात म्हणत होती.
"आज्जी बघ ना आपला विठ्या कसा चाटतोय त्याच्या शेरुला. मी पण अशीच करायचे ना आईला लहान असताना"
गायीच्या आचळाला वासराचा स्पर्श होताच पान्हा फुटतो ही ऐकलेली गोष्ट खरी घडतानाचे साक्षीदार तिथे उपस्थित झाले होते. दुपारी जेवायला आलेल्या लेकाची हाक माईने ऐकली होती.
"भूक लागली ग आई. जेवायला वाढ ना लवकर."
त्याला वाढताना सुखावलेला माईचा भाबडा जीव पाहून जिवती माताही आनंदली होती.
---------अनघा देशपांडे
ह्रदयस्पर्शी....
ह्रदयस्पर्शी....
हळवी आणि सुरेख
हळवी आणि सुरेख
छान
छान
छान कथा.. आवडली
छान कथा.. आवडली
छान लेखन शैली....
छान लेखन शैली....
खुप गोड लिहिलेय… आवडले.
खुप गोड लिहिलेय… आवडले.
कसलं भारी लिहिले आहेस!
कसलं भारी लिहिले आहेस!
खुप गोड लिहिलेय. सुंदर
खूप गोड लिहिलेय. सुंदर
किती सुंदर लिहलीय. पारंपारिक
किती सुंदर लिहलीय. पारंपारिक तरी आधुनिक. खूप आवडले.
खूप गोड लिहिलेय. आवडली.
खूप गोड लिहिलेय. आवडली.