परबची अजब कहाणी---२

Submitted by केशवकूल on 12 August, 2024 - 08:05

फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत मी कार्जाच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे हा गजानन सदावर्ते नावाचा मच्छर मॅनेजर होता.
“साहेब, मला पैशाची गरज आहे, लोन पाहिजे आहे.” मी त्याला विनम्रपाने सांगितले.
माझ्याकडे लक्ष न देता तो फायलीत डोकं खुपसून बसला होता.
“लोन माझ्याकडून पाहिजे आहे कि बँकेकडून? माझ्या कडून म्हणाल तर मी कुणाशीही उधार उसनवारी करत नाही. कुणाकडून घेत नाही कुणाला देत नाही. बँकेकडून पाहिजे असेल तर चार नंबरच्या मोने बाई आहेत, त्यांना भेटा. मला माझे काम करू द्या.”
“सर मोने बाईंनीच मला आपल्याकडे पाठवलं आहे.”
त्याने टेबलावरच्या इंटरनकॉमची बटणे दाबली.
“मोने बाई, तुम्ही ह्या इसमाला...”
“सर इसम नाही. मी परब आहे. परब.” मी मधेच बोललो.
“तेच ते. बाई, तुम्ही ऐकताय ना. तुम्ही या परब नावाच्या इसमाला माझ्याकडे का पाठवलय? तुमच्या लेवलला तुम्हाला असली कामे निपटता येत नाहीत? प्रत्येक वेळेला माझी गरज का पडतेय? बँकेन तुम्हाला कशासाठी ठेवलय? ऑं? नुसता पगार खाऊन खुर्ची गरम करायला? ... बघतो मी.” आता माझ्याकडे बघून, “बाई म्हणतात कि तुमच्याकडे आधार कार्ड नाहीये म्हणून. जा आधार कार्ड घेऊन या आणि मग चार नंबरला भेटा. जा आता.”
“त्याचं काय आहे सर, आधार कार्डला माझा तात्विक विरोध आहे. माझ्याकडे व्होटर आयडी आहेना आणि आरबीआयच्या सर्क्युलरप्रमाणे...”
“वा वा. आमचा पण तुम्हाला कर्ज देण्यास तात्विक विरोध आहे. तुम्ही असं करा. आरबीआयकडूनच कर्ज घ्या ना. बघा देतात का. आता जा माझा वेळ खाऊ नका. मला माझे काम करू द्या.”
क्षणभर वाटले कि ह्या खत्रूड झुरळाला इथेच मनोबलाने चिरडून टाकावे का? ह्याला जगायचा काय हक्क आहे? हा असला काय आणि नसला काय, कुणाला काय फरक पडणार आहे?
पण त्याचे काय आहे ना कि माणूस म्हणजे किल्ल्यांचा जुडगा नाही कि फौंटनपेन नाही. तो सजीव आहे, tयाला भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे. त्याला बायकापोरे असतात, नाते वाईक असतात, जिथे काम करतो तिथे संबंध असतात. समाजात बांधिलकी असते. ह्या सर्व “बंधना”तून त्याला “मुक्ति” द्यायची झाली तर मनोबला बरोबरच शाररीक बलाचाही वापर करावा लागणार.
आज ते “शाररीक बळ” माझ्या पाशी नव्हते. म्हणून मी हतबल होतो.
दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याला भेटायला गेलो. सरळ त्याच्या केबिनमध्येच घुसलो.
“अरे तू पुन्हा आलास?” आता तो अरे-तुरे वर आला होता.
“सर, आपल्यासाठी भेट वस्तू आणली आहे.”
त्याची अधाशी नजर माझ्या बॅगकडे गेली.
“तू काय मला लाच द्यायचा प्रयत्न करतोयस काय? बरं, बघू काय आणलं आहेस?”
“बघा ना सर. खास तुमच्यासाठीच आणली आहे.” मी बॅगमधून पिस्तुल काढून त्याच्यावर रोखले, “आवडली का गिफ्ट, सर?”
गजाचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. मला वाटत त्याने ओरडायचा प्रयत्न केला असावा पण आवाज बाहेर पडला नाही. फक्त जबड्याची उघड झाप झाली.
“ही गिफ्ट तुमच्या हृदयाला भिडेल.” एव्हढे बोलून मी त्याच्या हृदयावर नेम धरून पिस्तुल झाडले.
अशा प्रकारे श्री गजानन सदावर्ते, मॅनेजर, खारमहाल ब्रँच, फनजॉब बँक याचे अस्तित्व संपुष्टात आले होते. मी संपुष्टात आणले होते.
मी थोडा वेळ तिथेच थांबलो. माझे सामान आवरून मी शांतपाने केबिनच्या बाहेर पडलो. जणू काही झालेच नव्हते.
दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा ब्रँचमध्ये जाऊन मोने बाईच्या समोर उभा राहिलो.
“मला सदावर्ते साहेबांना भेटायचे आहे.”
“सदावर्ते? कोण सदावर्ते?”
“अहो बाई, तुमचे ब्रँच मॅनेजर! मी परब. कालच मी त्यांना लोनसंबंधात भेटलो होतो. त्यांनी मागितलेले कागद घेऊन आलो आहे.”
“मिस्टर परब, तुमचा काहीतरी गोंधळ होतो आहे. इथे कोणी सदावर्ते फिदावर्ते नाहीयेत. गेली दोन वर्षे झाली. लोटलीकर ब्रँच मॅनेजर आहेत.”
“ओह माय. माझी ब्रँच चुकली असणार. एनिवे थँक यू हं मॅडम.”
मी समाधानाने बाहेर पडलो. सदावर्ते त्याच्या सर्व कनेक्शन्ससह विस्मृतीत गेला होता. म्हणजे असं कि ह्याने कधीतरी बोर्डाची परिक्षा पास केली असणार, पदवी परिक्षा पास केली असणार पण आज जर तुम्ही ह्याचे रेकॉर्ड शोधायचा प्रयत्न कराल तर तुमच्या हाती शष्प देखील लागणार नाहीये.
सो आय वाज राईट!
(पुन्हा एकदा सॉरी, टू डिस्टर्ब. हे सर्व माझ्या समोर घडलं. आता सांगताना लाज शरम वाटते. कि माझ्या मित्राला मी ह्या पासून परावृत्त केले नाही. तेव्हा परावृत्त केले असते तर हे आजचे रामायण झाले नसते. मित्र म्हणवून घ्यायची मला लाज वाटते.
विथ ग्रेट पॅॉवेर्स कम्स ग्रेट रिस्पॉन्सीबिलीटीज! हे आम्ही दोघेही विसरलो. शेम ऑन मी)
पण माझ्या प्रयोगांमुळे विश्वाचा समतोल ढासळला असावा. कुणीतरी माझ्या प्रयोगांची दखल घेतली असावी. जर लोकांना सत्य समजले तर विश्वाचा डोलारा कोसळला असता. सदवर्तेच्या (आणि इतरही) प्रयोगाचे पडसाद उमटायला सुरवात झाली.
माझ्यावर नजर ठेवली जात असावी अशी तीव्र जाणीव मला झाली. माझा पाठलाग केला जात होता. माझा पाठलाग करणारे दिसत नव्हते पण त्यांची कुजबुज ऐकू येत होती. माझा “सिक्स्थ सेन्स” जागृत झाला होता. विचार करत होतो, कोण असावेत हे लोक?
त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न मी सुरु केला.
मला माहित होते कि आता फक्त काही दिवसांचा प्रश्न होता. “ते लोक” लवकरच स्वतःहून पुढे येतील. स्वतःला रीवील करतील. अशी माझी खात्री होती. कदाचित माझ्याशी समझोता करायची त्यांची इच्छा असावी. आणि अगदी तसेच झाले. पहिली हालचाल त्यांनीच केली.

Zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz

फ्रेनी, मी तुम्हाला सांगितले का? नाही? माझा बिल्डींग मटिरिअल सप्लाय करायचा बिझिनेस आहे. पोटापुरतं कमावतो. एक छोटसे ऑफिस आहे. त्या ऑफिसातच माझ्याशी संपर्क साधला गेला. त्यांचा प्रतिनिधी माझी भेट घ्यायला आला होता.
तो साधारण चाळीशीतला असावा. किंचित स्थूल. बोलणे गोड आर्जवी. ह्याला मी दोन चार वेळा पाहिला होता. पण हा “त्यांचा” माणूस होता अशी कल्पनाही कधी आली नव्हती.
“मी गजानन सदावर्ते.”
मला हसू आले. ह्याला काय वाटतंय कि मी लगेच हादरून जाईन, कबुलीजबाब देईन.
हे नाव वापरून झाले आहे. दुसरे काही नाव घ्या. असं त्याला सांगावेसे वाटलं. पण सांगितले नाही.
त्याचे माझ्या चेहऱ्यावर बारीक लक्ष होते.
पण मी निर्विकार! मख्ख.
“मिस्टर सदावर्ते, ग्लॅड टु मीट यू.” मी “सदावर्ते” वर जोर देत बोललो, “बोला काय काम काढल्यात?”
“ओह येस. मी “श्री होम्स” कडून आलो आहे. आम्ही डेवलपर आहोत. मी त्या कंपनीचा परचेस मॅनेजर. आमच्या कैक योजना सध्या कार्यान्वित आहेत. आम्हाला खडी, वाळू, पीओपी सारखा कच्चा माल तर दारे, खिडक्या, सॅनिटरी फिटीग्स यू नो व्हाट आय मीन. तुम्ही यातले वा या सारखे काय पुरवू शकाल? बल्क मध्ये. मार्केटपेक्षा कमी भावात आणि वेळेवर हा. गुणवत्ता आणि वक्तशीरपणा इज द इसेन्स. त्याबाबतीतील तुमची कीर्ति ऐकून मला इथे पाठवले गेले आहे. आमचे साहेब तुमच्यावर बेहद खूष आहेत बरका. तुमचं आणि त्यांचं छान जमेल. तेव्हा काय बोलता? हे माझे बिझिनेस कार्ड. आमचे ऑफिस? सध्या आम्ही साहेबांच्या बंगल्यातच थाटले आहे. तो वीस मजली टॉवर बनतो आहे ना तिथे ऑफिस स्पेस बुक केली आहे.”

साला इतका खोटा आणि नाटकी माणूस मी आयुष्यात कधी बघितला नव्हता. गुणवत्ता आणि वक्तशीरपणा! माझी कीर्ति. माय फूट! ही मोठी लिस्ट देतोय मला. दोन चार आयटेम मध्ये थोडा बहुत धंदा करणारा मी. हा मला गळ टाकतोय. धोका परब धोका. सांभाळून रहा रे बाबा. पण सत्त्याला सामोरे जायची संधी आपणहून माझ्या समोर उभी ठाकली होती, ती मी का बरे सोडावी? हे श्री होम्स वाले कोण लोक आहेत? त्यांनी माझ्यासारख्या नगण्य माणसाशी का बरे संपर्क केला असावा?
माझ्या डोक्यात विचार घोळू लागले. पुढे जाण्यात किती धोका आहे? का हे निव्वळ माझ्या मनाचे खेळ आहेत?
“सदावर्ते, घाई नाहीये ना? म्हणजे मला थोडा विचार करावा लागेल. एक म्हणजे मी ह्या व्यवहारात पडावे कि कसे. आणि पडायचेच झाले तर तुम्हाला कोटेशन द्यायच्या आधी होमवर्क करायला पाहिजे. त्याला वेळ लागणार नाही का? तेव्हा मी काय म्हणतो...”
“मान्य, अगदी मान्य. तुमच्या ऑफरची आम्ही वाट बघू पण जरा लवकर येऊ द्या.”
अशी बोलणी करून त्याने काढता पाय घेतला.
त्यानंतर पहिल्या प्रथम मी काय केले असेल तर आत्तापर्यंत मी केलेले खून, त्या मागील माझी भूमिका इत्यादी गोष्टींचा उहापोह करणारा एक प्रबंध स्वहस्ते लिहून तो एका लेखकाकडे (टीप: म्हणजे माझ्याकडे ) आणि “हा लिफाफा एका वर्षाने उघडावा” अशी वर नोट लिहून पाठवला, उद्देश एव्हढाच होता कि माझे काही बरे वाईट झाले तर माझे संशोधन विद्वतजनांपर्यंत पोचावे. मृत्युच्या छायेत वावरणारा माणूस जशी निरवानिरव करतो तसेच मी करत होतो. “त्यांना” भेटायला जायचे तर नावापुरते काही कोटेशन बनवले. त्यात काही दम नव्हता. दिलेल्या नंबर वर फोन केला.
“हलो, श्री होम्स चे ऑफिस का? मला सदावर्तेंशी बोलायचेय.”
“काय नाव म्हणून सांगू?” गोड आवाजाच्या मुलीने विचारणा केली.
“मी परब.”
थोड्या वेळाने सदवर्तेचा आवाज आला.
“बोला परब, झाली तयारी?”
“हो हो. भेटायला केव्हा येऊ?”
“केव्हाही या. आम्ही तुमचीच वाट पहात आहोत. आत्ता येताय? या.”
अशा तऱ्हेने मी स्वतःच्या पावलांनी चालत चालत सिंहाच्या गुहेत गेलो. तिथेच मला सारिका भेटली.
“सारिका ये अशी. ओळख करून देतो. हे परब. उभरते उद्योजक आहेत. आपल्या बरोबर त्यांना सहयोग करायचा आहे. परब, सारिका आमची स्टेनो आहे बरका. आपण जी चर्चा करू, त्याचा गोषवारा ती लिहील. पुढे मागे आपल्याला उपयोगी पडतील. तुमची काही हरकत नसणारच. काय बोलता?”
मी काय बोलणार? “उभरते उद्योजक” वगैरे आरती ओवाळून हा मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता.
माझा असा ग्रह होता की हा मला कोणाची तरी सुपारी देणार असावा. पण त्या मूर्खाला हे समजत नव्हते कि मी काही भाडोत्री खुनी नव्हतो. विश्वाचे कोडे सोडवण्याच्या मिशनवर निघालेला मी.
मानव हजारो वर्षापासून निरनिराळ्या मार्गांनी सत्याच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहे. तो मार्ग तत्वाज्ञानाचा असो वा भौतिकी शास्त्राचा. ध्येय एकच.
इकडे सदावर्ते जिलब्यावर जिलब्या टाकत होता. इकॉनॉमी कशी गाळात चालली आहे. सिमेंट, वाळूचे भाव कसे गगनाला भिडले आहेत, साईटवरचे हरामी कामगार कसे कामचोर झाले आहेत, सप्लायर लोक मालात कशी भेसळ करतात, वजनात कसे मारतात...
“परब, माझी खात्री आहे कि तुम्ही त्यांच्यापैकी नाही...”
“अर्थातच नाही, मी धंदा करतो तो केवळ पोटापुरता. आपला नित्याचा खर्च निघाला कि बास. बाकी वेळ मी कोडी सोडवण्यात घालवतो.”
“कोडी? कसली कोडी?”
“हीच. म्हणजे वारा का वाहतो, फुले का फुलतात. पक्षी का गातात. नद्या का वाहतात, समुद्र का गरजत असतो. सदावर्ते साहेब, तुम्हाला म्हणून सांगतो, आपला देह ज्या मूळद्रव्यांपासून बनला आहे म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ह्यांचा उगम त्या बिग बँग मध्ये झाला आहे. त्या बिग बँग मधेच आपली कुंडली लिहिली गेली.”
“परब, मी सांगू का एक? बघा पटतंय का. तुम्ही हे खूळ डोक्यातून काढून टाका. अरे खाओ पिओ, मझा लुटो. चार दिनकी जिंदगानी. माझ्याकडे पहा. आपण कोडी सोडवत नाही, दुसऱ्यांना कोडी घालतो. क़्विझमास्टर!”
एकूण गोळी लागू पडली. सदावर्ते साहेब, या असे खुल्या मैदानात या.
पण सदावर्तेने स्वतःला सावरले. आपण फार लवकर फार जास्त बोललो ह्याची त्याला जाणीव झाली असावी,
“परब, यू मस्ट एक्स्क्यूज मी. आता मला मुंबईला जायचं आहे. पुढच्या आठवड्यात भेटू या का? आमच्या कंपनी तर्फे मी आपल्याला आज रात्री डिनरचे आमंत्रण देतो. मी नसणार. पण आमची प्रतिनिधी म्हणून सारिका आपल्याला कंपनी देईल.”
मी मनात म्हणालो, “चालेल.”
आणि उघड म्हणालो, “कशाला उगच तिला त्रास?

Group content visibility: 
Use group defaults