कवितेची चिमणी गोष्ट

Submitted by पॅडी on 3 August, 2024 - 00:12

शुष्क ओठांत पेरलेस शब्द
ओल्या शब्दांवर ठेवलेस ओठ
ठीक तिथूनच सुरू झालीये
माझ्या कवितेची चिमणी गोष्ट..

नाका-तोंडात शिरले पाणी
वाटले बुडलो; आधार भेटला
पहिली वीज तिथे कडाडली
मिणमिणता एक दिवा पेटला

भरती ओहोटी फितूरले ऋतू
नाठाळ वाऱ्याने फेरली पाठ
चार दोन थेंबातच चिंबावलो
भरभरून पावलो काठोकाठ

सुरकुत्यांमधून सरली वर्ष
पापण्यांवर पेलले आभाळ
तळहातावर झेलले इंगोळ
श्रीहरी कधी झालो शिशूपाळ

युगा युगाच्या ह्या प्रदक्षिणा
अन् पिढ्यानुपिढ्यांचे कडेलोट
साठा उत्तराची सुफळ संपूर्ण
होईल कवितेची चिमणी गोष्ट..?
***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults