जय संतोषी मा हॉटेल, मोर्चा, जव्हार

Submitted by ब्लू कोलंबसे on 2 August, 2024 - 05:43

जव्हारला मी पहिल्यांदा ऑगस्ट मध्ये वयम् संस्थेचे काम समजून घ्यायला आलो. दिवस धावपळीचा होता. संध्याकाळी सर्व भेटी संपल्या की, दिपाली ताई मला या हॉटेल मध्ये घेऊन गेल्या. जव्हार गावाबाहेर (तो भाग आता चांगलाच डेव्हलप झाला आहे सध्या) असणाऱ्या मोर्चा अर्थात एका क्लॉक टॉवर – मनोऱ्या शेजारी असणाऱ्या या हॉटेल मध्ये घेऊन गेल्या. मी इथे असले की ‘इकडे नेहमीच चहा साठी येते,’ असं म्हणाल्या. त्याचं कारण लवकरच कळलं. ते म्हंजे इथला फक्कड चहा आणि इतर मिळणारे एकदम टेस्टी, घराची थेट आठवण करून देणारे नाश्त्याच्या पदार्थ!
1000098865.png (514 KB)

हा घरगुतीपणा तुम्हाला या हॉटेल मध्ये सापडण्याची कारणं म्हंजे घराचाच एक भाग हॉल म्हणून मालकीण काकूंनी हॉटेल म्हणून काढलेला. शेजारी छोटंसं घर! घरबाहेर त्यांची एक आजी (कदाचित त्यांची सासू असावी) कॉट वर नेहमी झोपलेली!

मालकीण काकू अतिशय बोलक्या स्वभावाच्या. सुरुवातीला आल्यावर त्यांनी त्यांच्याकडून अगदी उत्स्फूर्तपणे गप्पा मारायला सुरुवात केली. अशा लोकांचं मला खूपच कौतुक वाटतं, कारण ती जगण्याचा आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेत असतात, आजूबाजूची परिस्थिती विसरून! दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्याकडे पोहे खायला गेलो तेव्हा त्यांची बडबड सुरू झाली.
“अरे, वयम संस्थेमधून ती गायत्री जयश्री अशा मुली नेहमी यायच्या इथे. आता तू येणार!”, असं म्हणत त्यांनी मला त्यांचा कायमचा ग्राहक त्याचवेळी करून टाकलं. जव्हार तालुक्यामध्ये शहरात पोहे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे यांचं! अगदी घरच्यांसाठी आणि हॉटेलसाठी त्या एकत्रच पोहे करत असल्यामुळे ते अगदीच घरगुती असणार आणि चविष्ट असणार यात शंका नव्हती. पण मीही जमेल तेव्हा त्यांच्याकडे चहा, उसळ, मिसळ, वडा खायला जाऊ लागलो. माझा भटका खादडी स्वभाव पाहता मी पुढे सप्टेंबरला राहायला आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे ठिकाण सोडून बाकी ठिकाणी गावांमध्ये चक्कर मारून काही कुठे चांगलं खायला मिळत आहे का, हे पाहिलं. मात्र त्याच टॉप मोस्ट प्रायोरिटी राहिल्या.

एका दिवशी खूप पाऊस पडत होता तेव्हा त्या सांगू लागल्या, “मी जेव्हा छोटी होते (त्यांचं वय आता 40-45 च्या आसपास असाव). तेव्हा मे-जून मध्ये जो पाऊस सुरू व्हायचा, तो श्रावण असेपर्यंत! अजिबात थांबायचा नाही. अगदी थांबलाच, तर थोड्या वेळापुरता, नाहीतर थेंबाला थेंब लागून!” हे त्यांचं थेंबाचं वर्णन मला अगदीच आवडलं. ‘पावसाच्या 2 थेंबामध्ये जरा सुद्धा गॅप नाही’, असे म्हणून त्यांनी माझ्यासमोर मला सध्या जव्हार्मध्ये पडणाऱ्या प्रचंड पावसाला कमी ठरवून माझ्यासमोर सलग महिनोनमहिने पडणाऱ्या पावसाचे चित्र उभा केले. काकूंचे काकाही अगदी शांत स्वभावाचे. चष्मिश, थोडसं टक्कल पडलेले आणि मित भाषिक. कदाचित काकूंचा बोलका स्वभाव आणि त्यांचा अबोल स्वभाव मॅच होत असावा. नेहमी शांतपणे त्यांच्याशी बोलणार, जमेल तितकी तिला मदत करणार.

एका दिवशी संध्याकाळी कुठून तरी परतत होतो. सात वाजले होते. त्यांचं दुकान बंद व्हायलाच आलेलं. मात्र छान ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस पाहत चहा घ्यावा अशी इच्छा झाली मला. काकांना अगदी सहज विचारलं, “काका आहे का हो चहा?” “आहे की!” असं म्हणत ते पटकन आत मध्ये गेले आणि फक्कड चा चहा बनवून आणला. त्याची चव आजही जिभेवर रेंगाळत आहे यातच सगळं आलं.

अशा माणसांबद्दल लिहू वाटतं कारण त्यांच्याकडून शिकण्यासारखं जर असतंच पण त्यांचा सहवास हा फक्त ग्राहक आणि दुकानदार असा न राहता त्याच्या थोडासा पलीकडे जाऊन मानवतेचं नवीन नातं प्रस्थापित करणारा असतो आणि त्याचबरोबर तो स्वतःलाही समृद्ध करणार असतो आणि जीवनाबद्दल बऱ्याच नव्या गोष्टी शिकवणारा असतो.

तुमच्या आजूबाजूला आहेत का अशी भन्नाट आणि अतिशय समरसून आयुष्य जगणारी सामान्य माणसं??
असतील, तर लिहा की त्यांच्याबद्दल! मला वाचायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहे.कधीकधी बस ने नाशिक ला जावं लागलं तर जव्हार लागायचं मध्ये.एखाद्या वर्षी शाळेची वार्षिक ट्रिप जव्हार ला जायची.आता खूप म्हणजे खूप बदल झाले असतील.

छानच लिहीलय.
मला तर फेसबुकवरती, व्हॉअ‍ॅ च्या स्टेटसवरती ऊठसूठ सेल्फी टाकणारे लोकंही समरसून जगणारेच वाटतात. यावर मतभेद असू शकतात. पण दुनियाको मारो गोली. माय वॉल माय रुल्स!! असे लोकही आवडतात.