पट नीटस स्थळकाळाचा

Submitted by अनन्त्_यात्री on 2 August, 2024 - 03:12

निवडुंग वनांतरी फुलला
पाहील मग कुणी कशाला

धगधगली बघ शेकोटी
धुरकट मग धुनी कशाला

फड तुऱ्यावरी बघ आला
गोफण मग जुनी कशाला

मी याचक नच तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला

क्षण अगणित संभाव्यांचा
शंका मग मनी कशाला

पट नीटस स्थळकाळाचा
त्यावर मग चुणी कशाला

Group content visibility: 
Use group defaults

>>>>>>>.मी याचक नच तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला

या ओळीचे २ अर्थ निघतायत
मी याचक नच . तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला

मला न मागताच सर्व मिळतय मग मी कशाला उपकृत राहू. मी थँकलेसच रहाणार.

मी याचक. नच तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला

मी याचक असूनही तू देत नाहीस मग मी तरी ऋणी कशाला राहू

सुंदर कविता.
मी दुसरा अर्थ घेतला सामो. Happy
नंतरची कडवी वाचून इतक्या शक्यता असताना छोट्या शंकांनी दुरावणारं किंवा हिशेब ठेवणारं नातंच नाही हे..! जे होईल ते त्या अजस्र पटावर सुरूकुत्या येऊ देण्याइतकं सुद्धा अस्तित्वात नाही. असाही एक अर्थ लागतो.

आवडली.
त्यावर मग चुणी कशाला! Happy
सामोचा पहिला अर्थ वाचताना लागला न्हवता पण तो ही भावला.

rmd, पॅडी, SharmilaR, अस्मिता., अमितव आभार!
सामो विस्तृत प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद