मरणात खरोखर जग जगते

Submitted by प्रकाश घाटपांडे on 23 July, 2024 - 08:01

तुम्हाला एखाद्या निवांत वेळी कालकुपीत जायचय का? नसेल जायचं तरी जाउन पहा.तारा भवाळकरांच मरणात खरोखर जग जगते हे पुस्तक वाचताना मला तो अनुभव आला. तस मी ललित कथा कादंबर्‍या या गोष्टीत फारसा रमत नाही. पण परवा सकाळी फिरायला गेल्यावर जवळ दामलेकाकांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मोफत खुल्या लायब्ररीत मात्र डोकावतो. तिथे मला हे पुस्तक दिसलं. डोक्यात जरा गोंधळ झाला. कारण या नावाचं बाळ सामंत यांचे एक पुस्तक आहे. मला ते पुस्तक हवं होतं.तारा भवाळकर माझ्या फेसबुक फ्रेंड आहेत म्हणून मी अधून मधून शायनिंग ही मारत असतो. लोकसंस्कृती स्त्री साहित्य हा त्यांचा प्रांत . पण कथा संग्रह म्हटल्यावर मला जरा विशेष वाटल. मग वाचायला आणलं. तसा मी नेट ऎडिक्ट आहे. त्याला उतारा म्हणून अधून मधून जाणीवपुर्वक छापील वाचतो. नेटवर फारच भरकटायला होत.
मरणात खरोखर जग जगते
पहिला फर्जी डाव
पूजा
भूताचे भूत मनी
उत्तर
तडीपार
नात्यांचा अर्थ
चला ऽऽ
उडदामाजी काळे गोरे
वाळवी
दत्तक वारस नामंजूऽर
ऋणानुबंध
स्वानुभव
सगळ्या "चाळीशा" संपल्या
अंतर
साधना
या सर्व कथांमधे मरण ही संकल्पना या ना त्या स्वरुपात येते. व्यक्ति व समाज यांचा एक कॅलिडिस्कोप या कथासंग्रहात दिसतो. कदाचित ज्या ग्रामीण पार्श्वभूमीवर मी वाढलो त्याचा परिणाम म्हणुन मला या पुस्तकातील व्यक्तिचित्रे व समाजचित्रे अधिक जवळची वाटत असतील. मानवी नात्यांमधील कंगोरे,गुंतागुंत ज्या आर्थिक व्यावहारिक, भावनिक, सांस्कृतिक, पातळ्यांवर चित्रित केल्या आहेत त्या पाहिल्या की माणसांचे परस्परावलंबन अधोरेरिखित होते. तडीपार कथे मधे आई या नात्याची भावनिक गरज जी सुप्तावस्थेत दडलेली आहे ती बाहेर येते. दत्तक वारस नामंजूर मधे एखादी दीर्घकाळ मनात असलेली घुसमट, नाराजी, विद्रोह कसा बाहेर पडतो
याचे चित्रण आहे. उडदामाजी काळेगोरे मधे भानावर आणणारे गॉसिप आहे.नात्यांचे अर्थ मधे दिसणारे "अर्थकारण" आपल्याला अर्थस्य पुरुषो दास: ची एक छटा दाखवतो. "उत्तर" मधे या पसार्‍यात माझं स्थान काय? हा वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात पडणार्‍या प्रश्नांचा कोलाहल आहे.प्रश्नांचा शोध घेता घेता अंतर्मनाचा ठावच घेतला आहे. मरणात खरोखर जग जगते ते झाकल्या मुठीतच याचा प्रत्यय त्या कथेत येतो. कथासंग्रहातले हे नाव पुस्तकाला दिलयं ते अगदी समर्पक. एखाद्याचा मृत्यु त्याला झिरोचा हिरो करुन टाकतो. मानवी नातेसंबंधात माझा उपयुक्तता गुणांक फारच कमी आहे त्यामुळे मरताना मला इहलोकात जागा नाही व मेल्यावर स्वर्गात जागा नाही असं मला नेहमी वाटत आलय म्हणूनच या कथेतल्या मृत्युविषयी मला आकर्षण वाटले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users