पाऊस-कविता झाली पाडून

Submitted by अनन्त्_यात्री on 19 July, 2024 - 02:17

पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले

जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा

दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी

"स्वांत:सुखाय सारी धडपड"
जरी हे जगास कथितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? Happy

Group content visibility: 
Use group defaults

अन्तजी...
या विषयावर कविता आधी लिहिली असेल आणि त्या प्रसंगानुरूप ती प्रकाशित करणे मला गैर वाटत नाही...
दुसरे दिवाळी, पाऊस,वारी या वा अशा विषयांवर लिहिलेल्या कविता तेवढ्या पाडलेल्या आणि इतर कविता तेवढ्या प्रतिभा आविष्कार असे म्हणायचे काय? कधी काय लिहावं याचे नियम नाहीत. तुम्ही अनुभवलेला पाऊस उन्हाळ्यातही बरसून जाईल परंतु जास्त उत्कट, ताजा पावसाळ्यात बरसेल तुमच्या कवितेतून. शेवटी अनुभुती महत्वाची ती कधी चितारावी हे गौण आहे असं मला वाटतं. वातावरणाची साथ एखादी भावना उद्दिपित करायला पोषक असते. तसं गीतकार कुठलंही गाणं कधीही लिहितात.

द. सा.

आपण प्रतिसादात लिहिलेले मत/ केलेली तुलना मला अजिबातच अभिप्रेत नाही. मात्र नियमितपणे ऋतुनुसार/ प्रसंगानुसार कविता लिहिणे हे कवितेच्या अभिव्यक्तीतील प्रातिभ/उत्स्फूर्त घटकांना मारक आहे असे मला वाटते. पाडगावकरांसारख्या प्रतिभावंताला ठणठणपाळांनी पापडगावकर म्हटले ते बहुधा यामुळेच.
प्रातिभ अविष्कारापलिकडे जे काही आहे त्याची अनुभूती दुष्प्राप्य असल्याचे कळल्यावर वाटणारे वैफल्य शेवटच्या कडव्यात मांडले आहे.

>>>पाडगावकरांसारख्या प्रतिभावंताला ठणठणपाळांनी पापडगावकर म्हटले ते बहुधा यामुळेच.>>> पण याच पाडगावकरांची "श्रावणात घन निळा बरसला" हि कविता कशी जन्मली त्याचा किस्सा ....
विख्यात संगीतकार श्रीनिवास खळे आणि कविवर्य मंगेश पाडगावकर, दोघेही मुंबई आकाशवाणीत कार्यरत होते. मुंबई आकाशवाणीत जाण्यासाठी खळेअण्णा निघत चेंबूरहून आणि पुढे त्याच गाडीत पाडगावकर सायनला चढायचे... व्हीटी स्टेशन येईपर्यंत मस्त गप्पा व्हायच्या इकडच्या तिकडच्या अर्थात कवितेच्या आणि संगीताच्या...
असाच मे महिन्यातला दिवस! घामाच्या धारांनी बेजार झालेले कवी मंगेश पाडगावकर, गर्दीनं फुललेले प्लॅटफॉर्म्स आणि लोकलचे डबे... एका डब्यात ही गीतकार-संगीतकाराची जोडी... आपल्याला वाटतं की म्हणाले असतील ‘काय वैताग आहे, किती ही गर्दी... कसला हा उकाडा!!’ हातातल्या पेपरानं वारा घेत हाश्शऽहुश्शऽ करत प्रवास करत असतील ते; पण छे! असं काहीच घडलं नाही... उलट घामाच्या धारा कविवर्यांना पाऊसधारा वाटू लागल्या. त्यांनी खिशातून एक चिटोरं बाहेर काढलं, पेन हातात घेतलं, कवितेच्या ओळी लिहिल्या... आणि ते चिटोरं खळेअण्णांच्या हातात दिलं... खळेअण्णांनी न वाचताच पुन्हा पाडगावकरांना दिलं, म्हणाले ‘वाचून दाखवा तुम्हीच.’ पाडगावकरांनी कविता वाचून दाखवली त्यांच्या खास शैलीत.

अशा कविनं केवळ लिज्जतच्या जाहिरातीत द्यायला पावसाच्या कविता लिहिल्या असा अर्थ लावून
त्यांना पापडगावकर म्हणणं निश्चित चूक आहे. त्यांनी या व्यतिरिक्त ही पावसावर कविता लिहिल्यात.

तुमच्या मताचा आदर आहे पण मी माझ्या मताशी ठाम आहे.
पावसाळी कविता इतरवेळी जशी सुचू शकते तशी पावसाळ्यातही सुचू शकते....

शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? >>> बहुतेक कवींचा हाच ध्यास असतो / असावा.... Happy