लंडन मधील दोन आयकॉनिक पुलांची एकमेकात गुंतलेली ही गोष्ट नक्की वाचा.
दोन पूल... लंडन ब्रीज आणि टॉवर ब्रीज
थेम्स किनारी वसलेलं लंडन हे अंदाजे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेलं आणि हा ऐतिहासिक वारसा नीटपणे जपलेलं एक खुप जुनं शहर आहे. लंडन ब्रीज हा त्या पैकीच एक मौल्यवान वारसा.
लंडन हे नदीकाठी वसलेलं असल्याने पैलतीरावर जाण्यासाठी थेम्स वर आज जरी अनेक ब्रीज असले तरी फार पूर्वी जेव्हा एक ही पुल नव्हता तेव्हा ओहोटीच्या वेळी नदीच्या उथळ पात्र असलेल्या भागातून लोक चालत नदी ओलंडत असत आणि भरतीच्या वेळी बोटीतून. पण अंदाजे दोन हजार वर्षापूर्वी लंडन जेंव्हा रोमन साम्राज्याचा भाग होतं तेव्हा सैन्याच्या आणि इतर युद्ध सामानाच्या वाहतुकीसाठी साधारण आत्ता आहे त्याच ठिकाणी थेम्स वरचा पहिला ब्रीज “ लंडन ब्रीज “रोमन लोकांनी बांधला अशी इतिहासात नोंद आहे. पाण्यात हलणाऱ्या लाकडी फळ्या शेजारीच नांगरलेल्या होड्या तोलून धरतायत असं त्याचं स्वरूप होत
असं म्हणतात. लोकं त्या हलणाऱ्या फळ्यांवरूनच नदीपार होत असत.
ह्या पुलाची आतापर्यंत तीन वेळा पुनर्बांधणी झाली आहे. पैकी बाराव्या शतकात बांधलेला पुल एवढा मजबूत होता की तो अंदाजे सहाशे वर्ष टिकला. त्यावेळी लंडन शहरात जागेची फारच टंचाई निर्माण झाली होती म्हणून लोक ह्या पुलावर घरे बांधून राहू लागले. तसेच लंडन ब्रीज हा एक प्रमुख शॉपिंग स्ट्रीट ही होता कारण शहरातली सगळी मोठी मोठी दुकाने ह्याच पुलावर होती. अश्या तऱ्हेने एखाद्या पुलावर कायम स्वरुपी घरे, दुकाने, चर्च आणि इमारती असणारा लंडन ब्रीज हा एक वैशिष्ट्यपूर्ण ब्रीज आहे. हळु हळु तिथे ही गर्दी वाढू लागली. तसेच ह्या पुलाला असणाऱ्या अरुंद प्रवेशद्वरामुळे ही तेथे कायमच ट्रॅफिक जॅम होऊ लागला. शेवटी अठराव्या शतकात म्युन्सीपालटीने सगळी घरं जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आणि पूल फक्त वाहतुकीसाठीच खुला ठेवला.
तिसऱ्यांदा पुनर्बांधणी केलेला सध्या वापरात असलेला लंडन ब्रीज फारच तरुण म्हंजे अवघे “पन्नास वयमान “ आहे. बघता क्षणी जरा ही नजरेत न भरणारा, काही ही वेगळेपण आणि स्थापत्य सौंदर्य नसणारा असा हा एक फारच नॉर्मल सिमेंटचा ब्रीज आहे. ना त्याला कमानी, ना शोभिवंत कठडे , ना सुंदर दिवे…मी पहिल्यांदा बघितला तेव्हा माझा थोडा भ्रमनिरासच झाला होता. अर्थात काही वेगळेपण आणि स्थापत्य सौंदर्य नसलं तरी त्याचं जगभरातील महात्म्य आणि ऐतिहासिक मूल्य मात्र जरा ही कमी होत नाही. ( कसे ते कळण्यासाठी शेवटपर्यंत वाचा ).
मॉडर्न लंडन ब्रीज
एका बाजूला हा ब्रीज जिथे लाखो लोक रोज कामासाठी येतात त्या लंडनची आर्थिक सत्ता एकवटलेल्या सिटी ऑफ लंडन ला आणि दुसऱ्या बाजूला लंडन ब्रीज ह्याच नावाचं मोठ ट्रेन आणि बस टर्मिनल, खाण्या पिण्याची चंगळ असलेलं बरो मार्केट आणि बहुमजली शार्ड ह्यांना जवळ असल्याने ह्या पुलावर कायम वाहनांची, पादचाऱ्यांची ही खूप गर्दी असते. ह्याच कारणासाठी पुलाचे फुटपाथ थोडे जास्तच रुंद ठेवले आहेत असं माझं निरीक्षण आहे.
हया ब्रीजवरून लंडनची स्काय लाईन फार सुंदर दिसते. नदीच्या दोन्ही काठावर ह्या शहराचा इतिहास सांगणाऱ्या शेकडो वर्ष जुन्या गॉथिक शैलीतील इमारती आणि त्याच वेळी लंडनच्या अधुनिकतेची ही ग्वाही देणाऱ्या शार्ड, गर्किन, वॉकी टॉकी अश्या गगनचुंबी इमारती हातात हात घालून उभ्या असलेल्या आपल्याला दिसतात. कधी कधी तर समोरच्या ब्लॅक फ्रायर पुलावर संथ गतीने जाणारी ट्रेन, लंडन ब्रीज वर जाणाऱ्या गाड्या आणि बसेस, नदीपात्रातून जाणाऱ्या बोटी, आणि आकाशात लँडिंग साठी घिरट्या घालणारं विमान हे आपण एकाच वेळी पाहू शकतो पुलावरून. तरी ही ह्या पुलावरून सर्वात सुन्दर काय दिसत असेल तर तो म्हंजे टॉवर ब्रीज.
लंडनची जणू ओळखच असलेला टॉवर ब्रीज “टॉवर ऑफ लंडन” ह्या किल्ल्याच्या जवळ असल्याने ह्या ब्रीजला “ टॉवर ब्रीज “ हे नाव दिलं असलं तरी पूल मधोमध दुभंगणाऱ्या मोटर्स जिथे बसवल्या आहेत ते त्याचे दोन टॉवर ही त्याच हे नाव सार्थ करतातच.
वॉकी टॉकी च्या वरच्या गॅलरीतून काढलेला ... Btw ही गॅलरी फुकट व्हिझिट करता येते हे महत्वाचे.
लंडनच्या पूर्व भागात वस्ती वाढत होती आणि त्या भागात थेम्स वर एक ही पूल नसल्याने लोकांची फार गैरसोय होत होती. परंतु तिथे पूल बांधण्यात पुलाची उंची हा मोठाच अडसर होता. कारण तेव्हा त्या भागातून मोठ्या मोठ्या मालवाहू जहाचांची कायम ये जा सुरू असे. शेवटी सरकारने ब्रीजच्या डिझाईन साठी एक स्पर्धा जाहीर केली. गरज पडेल तेव्हा मधोमध दुभंगून मोठ्या जहाजांना वाट मोकळी करून देण्याचं तसेच शेजारीच असलेल्या किल्ल्याला ही शोभून दिसेल अस गॉथिक शैलीतील डिझाईन पास केलं गेलं. सात वर्षात बांधकाम पूर्ण होऊन साधारण सव्वाशे वर्षापूर्वी अश्या तऱ्हेचा जगातला पहिला पुल जनतेच्या सेवेत रुजू झाला.
मुळातच सुंदर असलेला हा ब्रीज कायम रंगरंगोटी करून सुस्थितीत ठेवल्याने तो टुरिस्ट लोकांच आकर्षण बनला नाही तरच नवल. लंडन पहायला आलेला प्रत्येक जण हा पूल पहातोच. ख्रिसमसची सजावट म्हणून मंद निळ्या रंगाच्या छोट्या छोट्या दिव्यांच्या रोषणाईने सजलेला, अनेक वर्षापूर्वी पाहिलेला टॉवर ब्रीज आज ही माझ्या डोळ्यासमोर आहे.
आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा पुल बघितला तेव्हा त्याचे टॉवर बघणे, पुलावरून रमत गमत चालणे, तिथे लिहिलेली माहिती वाचणे, पुल जिथे दुभंगतो तिथली एक दोन इंचाची गॅप निरखून पाहणे, पुलावरून दिसणारा समोरचा किल्ला पाहणे, फोटो काढणे ह्यात इतके दंग होतो की “ पूल रिकामा करा “ हे सांगणारा सायरन मागे वाजतोय हे माझ्या ध्यानात ही आलं नव्हत. सायरन जेव्हा फारच जोरात वाजायला लागला तेव्हा मागे वळुन बघितलं तर सगळा पूल रिकामा होत होता आणि तो थोड्याच वेळात दुभंगायला ही सुरवात होणार होती. मग आम्ही ही धावत धावत खाली आलो. तो कसा दुभंगतो, कशी मोठी जहाज पार होतात आणि पुन्हा एकसंध होऊन वाहतूक कशी सुरु होते हे अगदीच अनपेक्षितपणे आम्हाला पहायला मिळालं.
पूल दुभंगताना
पूलावरच्या एका कर्मचाऱ्याने अंदाजे सत्तर एक वर्षापूर्वी पूल दुभंगतोय हे सांगणारा सायरन न वाजवताच पुल वर उचलला जाणारं बटण दाबलं . नेमकी त्याच वेळी एक डबल डेकर पुलाच्या अर्ध्या पर्यंत आली होती. अचानक समोरचा रस्ता गायब झालेला बघून काय झालंय हे ड्रायव्हरच्या क्षणात लक्षात आलं. त्याने प्रसंगावधान राखून अफाट वेगाने त्या थोड्या वर वर उचललेल्या भागावरून बस पलीकडच्या अर्ध्या भागावर नेली जे फारच धोकादायक होतं. नशिबाने पुलाचा तो भाग वर जायला सुरवात झाली नव्हती त्यामुळे बस तिथे जाऊन थांबली. विशेष म्हणजे सगळ्या प्रवाशांचे प्राण तर वाचलेच पण कोणाला ही फार कुठे इजा ही झाली नाही . हा ब्रीज आणि डबल डेकर बस दोन्हीना लंडन करांच्या मनात खास स्थान. त्यांची ही काळजाचा ठोका चुकवणारी कहाणी.
लंडन ब्रीजशी लंडन करांच नातं अधिक जवळीकीच आणि अधिक मुरलेलं आहे. सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात लंडन ब्रीजला महत्वाचे स्थान आहे. “लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन “ हे मुलांचे गाणं प्रसिद्ध आहेच. असं असलं तरी लंडनच आयकॉन होण्याचा मान लंडन ब्रिजला न मिळता टॉवर ब्रीज ला मिळाला आहे. लंडनची ओळख म्हणून फोटो असतो तो टॉवर ब्रीज चा, लंडन ब्रीज चा नाही. त्यामुळे लोकांचा ह्या दोन पूलांमध्ये खुप गोंधळ होतो. अनेक वेळा टॉवर ब्रीजच लंडन ब्रीज समजला जातो.
साधारण पन्नास एक वर्षांपूर्वी हा ब्रीज जेव्हा तिसऱ्यांदा बांधला तेव्हा जुन्या आधीच्या पुलाचा दगड अन् दगड एका अमेरिकन बिझनेसमन ने दाम दुप्पट किमतीला विकत घेतला आणि त्यावर भरमसाठ वाहतूक खर्च करून तो अमेरिकेतल्या अरिझोना राज्यात एका नदीवर पूल बांधायला वापरला. त्यावेळी अमेरिकन लोकं कसे मूर्ख आहेत, त्यांनी टॉवर ब्रीज म्हणून लंडन ब्रीजच कसा दाम दुप्पट किंमत मोजून त्यांच्या देशात नेला अशी ही कंडी इंग्रजांनी पिकवली होती. असो. अश्या तऱ्हेने लंडन ब्रीज आज एका वेगळ्याच देशात वेगळ्याच ठिकाणी वास्तव्यास आहे .
लंडन ब्रीज ने अमेरिकेला जाताना ही इंग्लंड ला मालामाल तर केलंच पण ह्या सगळ्या प्रकारामुळे म्हणा किंवा लंडन ब्रीज चा परीस स्पर्श झाल्याने म्हणा अमेरिकेतील ते छोटंसं गाव जिथल्या नदीवर लंडन ब्रीज चे दगड वापरून पुल बांधण्यात आला ते ही प्रसिद्ध झालं आणि बघता बघता त्याची ही भरभराट झाली.
हेमा वेलणकर
पावसाळ्यात हा पुल पाण्याखाली
पावसाळ्यात हा पुल पाण्याखाली जातो का?
नै जात तर काय मजा.
पुण्यातला भिडे पुल बारा की.
गम्मत हा.
झकासराव, एकदम सिक्सर मारलीत
झकासराव, एकदम सिक्सर मारलीत हो...
पण ह्या सगळ्यांपेक्षा आमच्या नाडणातला साकव लय भारी हो ... नुसत साकवावरूनच पाणी जातं असं नाहीये तर साकव गदागदा हलू ही लागतो पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे.
Pages