आजच्या वर्तमानपत्रात दोन बातम्या वाचल्या, पहिली उत्तर प्रदेशमधल्या गाझीपुरातील : प्रेयसीला भेटायला विरोध करतात म्हणून एका 15 वर्षीय मुलाने, दारूच्या नशेत आपल्या आई, वडील आणि मोठ्या भावाचा ते झोपले असताना खुरपीने गळा चिरून खून केला. तद्नंतर खुरपी शेतात फेकून देऊन जवळच सुरू असलेला ऑर्केस्ट्रा पाहायला गेला, आणि तेथून परत आल्यानंतर रडारड, आरडाओरड असा गोंधळ घालून गर्दी जमवून नाटक केले. धक्कादायक…
दुसरी बातमी त्रिपुरातील, त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्रिपुरा राज्यात एका वैद्यकीय तपासणीत तब्बल 828 विद्यार्थ्यांना एड्सची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये, आणि या 828 विद्यार्थ्यांपैकी मागील 17 वर्षांत 47 जणांचा मृत्यू झालाय. यापैकी बरीच मुलं सधन घराण्यातली आहेत. हा रोग विद्यार्थ्यांमध्ये पसरण्याची दोन मोठी कारणं म्हणजे :ड्रग्स इंजेक्शनद्वारे शरीरात टोचून घेण्यासाठी एकच सुई बऱ्याच जणांत वापरणे आणि असुरक्षित शारीरिक संबंध. टी ए सी एस ने 220 शाळा आणि 24 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय चाचणीनंतर ही माहिती जगासमोर आणली. हे झालं अंधकारकडे पडणाऱ्या तरुण पावलांचे आणखी एक उदाहरण.
एन सी आर बी च्या डाटानुसार मागील वर्षी 30,555 गुन्हे अल्पवयीनांद्वारे झाले. 2020 मध्ये हीच संख्या 2,643 होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे देशातील अल्पवयीनांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या यादीत पुरोगामी महाराष्ट्र 4,406 या आकड्यासोबत अव्वल स्थानी आहे, त्याच्या खालोखाल मध्य प्रदेश (3,795) आणि राज्यस्थान(3,063) चा क्रमांक लागतो.
जर कारणांचा मागोवा घेतला तर, सोशल मीडिया आणि चित्रपटांमधून चुकीच्या गोष्टींचा आदर्श घेणे, अयोग्य समवयीनांची संगत व पियर प्रेशर, अति आर्थिक अनुकूलता किंवा प्रतिकूलता, समाज माध्यमांद्वारे दारू, ड्रग्स, व इतर व्यसने, गुन्हेगारी, मल्टीरिलेशनशिप्स यांना मिळत असलेला अप्रत्यक्ष पाठिंबा, मुलगा अथवा मुलीकडून घरातून मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा गैरवापर, दोन्ही पालक नोकरी करत असल्याने मुलांकडे होणारे दुर्लक्ष, एकटेपणा, बदललेल्या प्रेमाच्या आणि रिलेशनशिप्सच्या व्याख्या, अशी एक ना अनेक कारणं या गुन्ह्यांपाठी आहेत.
यापैकी अल्पवयीनांद्वारे होणाऱ्या बहुतांशी चोरीच्या गुन्ह्यांमागे-आर्थिक चणचण प्रेयसीची, हौस मौज, चैनी, ही कारणे आहेत. बलात्कारांमागे, अयोग्य समवयीनांची संगत, लैंगिक इच्छा चाळवणाऱ्या पॉर्न्सचा भडीमार, तर खुनांमागे- फोफावणारी गुन्हेगारांची गँग संस्कृती, चुकीची संगत, नशा,एकतर्फी प्रेम इत्यादींचा समावेश आहे.
बरं फक्त गुन्हेगारीच नव्हे भारतातील किशोरवयीन आणि तरुणांच्या आत्महत्यांमध्ये सुद्धा सध्या लक्षणीय वाढ झाली आहे. एनसीआरबीच्याच एका अहवालानुसार 2022 मध्ये भारतातील तब्बल 1.71 लाख तरुणांनी आत्महत्या केली ज्यांमागे मानसिक आरोग्याच्या समस्या ( 54%), कौटुंबिक समस्या ( 36%), शिक्षण व करिअरचा ताण (23%), सामाजिक व जीवनशैली विषयक घटक (20%), हिंसा (22%), समस्या (9.1%), रिलेशनशिप मधील अपयश (9%), ही कारणे होती.
का बरं होत असेल हे? कधीकाळी आपल्या पवित्र चारित्र्यासाठी, बल आणि सहसासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय युवकाची आज ही दयनीय अवस्था कशी झाली? नको तितकी स्वीकारलेली पाश्चात्य संस्कृती, बदललेली विषारी जीवनशैली, विवेकाचा अभाव, घरातून मिळणारे अति स्वतंत्र्य, व्यसने, चुकीची संगत, ही सगळी कारणे भारतीय युवकाला कुरतडत आहेत. चित्रपट आणि समाज माध्यमातून होणाऱ्या विकृत गोष्टींच्या उदात्तीकरणाचा फार मोठा वाटा यामध्ये आहे.
मुलांच्या पालकांकडून त्यांना नको तितकं स्वातंत्र्य दिलं जातंय का? त्यांचे नको तितके लाड केले जातायेत का? आज आपल्याला अवलोकन करण्याची गरज आहे. मूल जे काही मागेल ते देण्यामागे ‘आपल्याला मिळालं नाही ते निदान आपल्या मुलांना तरी मिळू दे!’ ही पालकांची भाबडी इच्छा असते, पण आपल्या लहानपणी ती प्रतिकूलता होती म्हणून ते सारं जे आपल्याकडे त्यावेळी नव्हतं ते आज प्राप्त करण्याची क्षमता आपल्यात विकसित झाली हे मात्र पालक विसरतात.
जेव्हा दुबईचे संस्थापक शेख रशीद यांना त्यांच्या देशाच्या भविष्याबद्दल एका पत्रकाराकडून विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले, “माझे आजोबा उंटावरून प्रवास करायचे, माझे वडीलसुद्धा उंटावरून प्रवास करायचे, मी मर्सिडीज मधून प्रवास करतो, माझा मुलगा लँड रोव्हर मधून प्रवास करतो, माझ्या नातू सुद्धा आता काही दिवसांनी लँड रोव्हर मधून प्रवास करेल, पण माझ्या पणतूला मात्र पुन्हा उंटावरून प्रवास करावा लागेल.” “का बरं?” पत्रकाराने त्यांना विचारलं. त्यावर रशीद म्हणाले- “कठीण काळ बलवान माणसे बनवतो, बलवान माणसे सुखकर काळाची निर्मिती करतात, सुखकर काळ पुन्हा दुबळ्या माणसांना बनवतो आणि दुबळी माणसे पुनश्च कठीण काळाची निर्मिती करतात. अनेक लोकांना कदाचित माझं हे बोलणं समजणार नाही, पण तुम्ही योद्धांना जन्माला घातलं पाहिजे बांडगुळांना नाही.”
प्रत्येक जण जरी अनुकूलतेसाठी झगडत असला तरी ती प्रतिकूलता त्याच्या मनगटात त्याला हवी असलेली अनुकूलता निर्मिण्यासाठीचं बल घडवत असते.पालकांनी जर अति अनुकूलता देऊन ते बल मुलांच्या मनगटात घडूच दिलं नाही तर पुढे थोड्याशा प्रतिकूलतेमुळेसुद्धा ती भ्याडपणा दाखवून उन्मळून पडणारच ना? तुम्ही इतिहास धुंडाळा, प्रत्येक यशस्वी माणसाची एक प्रतिकूलतेने परिपूर्ण अशी कहाणी असते, एखादा मनुष्य जितक्या जास्त प्रतिकूल परिस्थितीवर मात करतो, त्याला तेवढंच महान मानलं जातं.
दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे किशोरवयीन आणि युवकांच्या नासलेल्या चारित्र्याचा. “हेच वय असतं हे सगळं करण्याचं. आता करणार नाहीत तर कधी करणार?” असं बोलून कधी कधी तर समाजाकडूनच युवकांच्या रंगेलपणावर पांघरून घातलं जातं. मोबाईल व रिलेशन्स, यांना पालकांनी मुलांना तोपर्यंत परवानगी देऊ नये जोपर्यंत त्यांना आपलं पाल्य परिपक्व झाल्याची खात्री पटत नाही. प्रेम संबंध, जीवनसाथीची निवड ही क्रिया एखाद्या मॅच्युअर व्यक्तीसाठी असते जो आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याच्या पात्रतेचा असतो, पण ज्या वयात चांगल्या वाईट कळायची समजच नसते, त्या वयात जर हा निर्णय घेण्याची जबाबदारी किशोरवयीन, युवकांनी पेलण्याचा प्रयत्न केला तर ते अपयशी होणारच ना? तसंच मोबाईलचंही आहे. आठव्या नवव्या वर्षापासून मुलाला त्याचा स्वतंत्र फोन दिला जातो. मोबाईल हा शस्त्राप्रमाणे असतो, त्याचा योग्य वापर करण्याची कुवतच ज्या वयात नसते, त्या वयात हे आत्मघातक शस्त्र त्याच्या हाती दिलं जातं. आणि परिणाम?
मध्यंतरी एक घटना घडली आई-वडील वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचे त्यामुळे मुलगा गावी आजीकडे राहायचा, सततच्या एकटेपणामुळे त्याला हळूहळू मोबाईल वर पबजी खेळण्याचं व्यसन लागलं. पालकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्याने शाळेला जाणंही बंद केलं. पालकांनी अजूनही दुर्लक्षच केलं. एके दिवशी आजीने त्याचा फोन काढून घेतला त्यावर त्या मुलाने रागात येऊन त्याच्या आजीचा गळा चिरून तिचं मुंडकं धडा वेगळं केलं आणि वडिलांना फोन करून आपला प्रताप ऐकवला. तत्काळ वडिलांनी घरी धाव घेतली घरात त्यांना टेबलवर मुलाने त्याच्या आजीचं ठेवलेलं मुंडकं,आणि कोपऱ्यात पडलेलं धड दिसलं.
ज्या भारत मातेच्या कुशीत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव,आझाद, विवेकानंद, सावरकर यांसारखे युवक जन्माला आले, त्याच भारतमातेच्या कुशीत आजची अशी संस्कारपतित दुबळी पिढी का जन्माला यावी? ज्या भारतभूमीवर सोळा वर्षांच्या वयात अभिमन्यु चक्रव्यूह भेदायचं सामर्थ्य ठेवायचा, आणि ज्ञानेश्वर कैवल्यप्रदायिनी ज्ञानेश्वरी लिहिण्याची क्षमता बाळगायचे, आज त्याच वयातले अभिमन्यु का नाना व्यसनांच्या आणि दुर्बलतेच्या चक्रव्यूहात अडकलेत? का साऱ्या ज्ञानेश्वरांचे ज्ञान विवेक-अविवेकाचा निवाडा करण्यात अपूरं पडतंय? कुठे चुकतंय? भारतीय युवक कुठे कमी पडतोय? अजून कुठवर हे चालणार? सगळेच प्रश्न अनुत्तरीत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळोत वा ना मिळोत पण भारतीय युवक वेळीच सावरला नाही, तर येणारं संभावित अंधकारमय भविष्य भारताचा उंबरठा ओलांडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.
तुम्ही विचारलेला प्रश्न जरी
तुम्ही विचारलेला प्रश्न जरी बरोबर असला तरी त्यावर जे काही विचारमंथन केलेले आहे ते काही पटले नाही. मोबाईल हा एक घटक असू शकतो पण जेव्हा मोबाईल नव्हते त्यावेळेस ८० -९० च्या दशकांत सुद्धा ड्रग्ज आणि एड्स चे संकट होते. आणि तरुणांमध्येच होते.
नक्कीच होते पण मोबाईल मुळे
नक्कीच होते पण मोबाईल मुळे ड्रग्स आणि एडस् च्या समस्या झाल्या असं माझं म्हणणं नाहीये. मोबाईल चुकीच्या वयात हाती दिल्याने किशोरवयीनांकडून, लहान मुलांकडून अगदी स्वैर वापर केला जातो. PUBG सारखे गेम्स फक्त आनंद मिळतोय म्हणून वाट्टेल तितका वेळ लहान मुलांकडून खेळला जातो याच्या अतिवापराचा काय परिणाम होईल याचा विचार करण्याची कुवत त्यांच्यात नसते. CCO च्या अहवालानुसार जगभरातील नऊ वर्षापर्यंतच्या मुलांपैकी 10% मुले पॉर्न पाहतात. नऊ ते 11 या वयोगटातील 27% मुले पॉर्न पाहतात आणि पाहिलेला कंटेंट विवेक बुद्धीने ग्रहण करण्याची क्षमता नसल्याने त्यांचे अत्यंत विकृत परिणाम मुलांच्या मनावर होतात. नुकतीच यूएसए मध्ये अति प्रमाणात पॉर्न पाहिल्याने एका आठ वर्षीय बालकाने आपल्यात लहान बहिणीवर अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली आहे.
विद्यालयीन अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक अधोगतीचे कारण विचारले असता ,जवळपास 70% विद्यार्थी मनावर ताबा ठेवता येत नसल्याने होणारा सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्यायोगे अभ्यासाकडे दुर्लक्ष हे कारण देतात.