आजा मेरी जान - काडेपेटीतील तिसरी मंझिल

Submitted by rmd on 9 July, 2024 - 00:20

खूप वर्षांपूर्वी काकांनी पिक्चर काढला 'तिसरी मंझिल'. त्यानंतर २७ वर्षांनी पुतण्याला क्रिशन कुमारला घेऊन पिक्चर करायचा होता. पण तो चालणार कसा? म्हणून पुतण्याने मनोमन 'काका मला वाचवा' म्हटलं आणि 'तिसरी मंझिल' ला तस्करीची फोडणी देऊन तयार केला 'आजा मेरी जान'.

गोव्यातल्या एका गावात आधी एका पुजार्‍याचा आणि नंतर नवीन आलेला पुजार्‍याच्या मोठ्या मुलीचा - रागिणीचा - खून होतो. रागिणीच्या खुनाचा आळ येतो गावात आलेल्या चांदवर जो गावातल्या एका मोठ्या पण जुन्या पुजार्‍याच्या खुनामुळे डबघाईला आलेल्या हॉटेलच्या मालकाचा पुतण्या आहे. नवीन पुजार्‍याची धाकटी मुलगी सोनू आधी चांदला खूनी समजते पण मग तो निर्दोष आहे हे समजल्यावर ती त्याच्या प्रेमात पडते. हे दोघं एका दुबे नामक प्रामाणिक पोलिसाच्या आणि एका अंडरकव्हर सीबीआय अधिकार्‍याच्या ( जो रोमिओ नावाने डान्सर म्हणून आला आहे ) मदतीने रागिणीच्या खुन्याला पकडतात. हे करतानाच एका तस्करी करणार्‍या गँगचा पर्दाफाश होतो आणि समजतं की गावातला एक प्रतिष्ठीत, एक पोलिसप्रमुख आणि एक व्यापारी यात गुंतलेले आहेत. दुष्टांचा खातमा होतो आणि सुष्ट लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. कथा आहे ती इतकीच. पण मजा इथली संपत नाही.

आता या सगळ्यात काडेपेटीचा काय संबंध? तर हे तस्कर नावांऐवजी नंबराने एकमेकांना ओळखत असतात आणि त्यासाठी (हाताने) नंबर लिहीलेल्या काडेपेट्या वापरत असतात. या काडेपेट्यांचा बराच काळ सुळसुळाट चालतो. आणि फार उशीरा लोकांच्या लक्षात येतं की अरे या काडेपेट्यांचं उगमस्थान शोधायला हवं. क्रिशनकुमार म्हणजेच चांद सिनेमाचा हिरो असल्याने अश्या सगळ्या आयडियाज फक्त त्याला येत असतात ( आणि पिक्चरमधल्या सगळ्या पोरी त्याच्या मागे लागलेल्या असतात. हे 'गुंतता हृदय हे' मालिकेतल्या संदीप कुलकर्णीच्या मागे लागलेल्या बायकांच्या संख्येइतकंच अनाकलनीय प्रकरण आहे ) आणि सीबीआय वाला रोमिओ आणि दुबे तो सांगेल ते फक्त अमलात आणत असतात. त्यात पुन्हा नंबर लिहीलेल्या काडेपेट्या आणि बिना-नंबरच्या असा एक घोळ आहे. बिना नंबराच्या काडेपेट्या सर्वसामान्य माणसं वापरत असतात. गंमत म्हणजे पिक्चर सगळा गोव्यात घडत असताना या काडेपेट्या मात्र मुंबईतल्या एका मॅचर्स क्लब मधून येत असतात. तस्करांचं मी एकवेळ समजू शकते पण हॉटेलमधे येणारे कस्टमर पण त्याच क्लबच्या काडेपेट्या का वापरत असतात हे काही समजलं नाही. एका शोधाशोध सीन मधे चांद आणि रोमिओ एका जोडप्याची बॅग उचकताना दाखवले आहेत, त्या बॅगच्या तळाशी त्यांना नंबर नसलेली साधी काडेपेटी सापडते. आता काडेपेटी सुटकेसच्या तळाशी कोण ठेवतं? पण ते असो.

पिक्चरचं प्रमुख पात्र ( क्रिशनकुमार नव्हे. तो अपात्र आहे ) - गाणी. या पिक्चरमधे प्रत्येक सिच्युएशनला गाणी आहेत. इतकंच नव्हे तर कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून एकेक गाणं आहे - हॉटेलमधे गेस्ट नाहीत? म्हण गाणं. चांदला निरोप द्यायचाय? म्हण गाणं. काडेपेटीवर लिहीलेल्या नंबरचा प्रॉब्लेम सोडवायचाय? म्हण गाणं. इतकंच काय, पण रोमिओला जेव्हा हे शोधायचं असतं की अशी काडेपेटी त्याने त्या गावात कोणाकडे पाहिली आहे तेव्हा चांद त्याला म्हणतो - दो दुनी चार, चार दुनी सोला! म्हणजे काय? महाभारतातला यक्ष कूटप्रश्न विचारत होता तसा हा कूट उत्तरं देतो. पण याचा अर्थ असतो बीचवर सगळ्यांनी दिवसभर गाणं म्हणायचं. त्याचा उपयोग काय कप्पाळ? आख्ख्या गाण्यात फक्त चांद आणि सोनू दिसत राहतात. त्यातही चांद पॅराग्लायडिंग करताना, वॉटरबाईक चालवताना, रस्त्यावरून बाईक पळवताना आणि सोनूला अंगठी देताना दिसत राहतो. काडेपेटी इन क्वेश्चन बद्दल गाणं संपल्यावर माफक मंडळी बीचवर उरल्यावर मग समजतं.

काही गोष्टी सिनेमात पेरून माणसं त्यांना पाणी घालायला विसरली आहेत. उदाहरणार्थ - सोनू मुंबईत चांदचा शो पहायला जाते. त्याच्या सोबत स्टेजवर गाणंही म्हणते. पण दुसर्‍या दिवशी तो तिला पटवायचा ( फालतू ) प्रयत्न करतो तेव्हा मात्र ती त्याला विचारते तुम्हारा नाम क्या है? अगं पोरी, काल ज्याचा शो पहायला गेलीस त्याचं नाव नाही माहिती तुला? किंवा - नवीन आलेला पुजारी कसला तरी जलसा करण्याकरता मंदिराच्या ट्रस्टीकडे पैसे मागतो. पण तो जलसा काही शेवटपर्यंत होताना दिसत नाही. म्हणजे मला आपलं वाटलं की काही सत्संगटाइप असेल. पण या सीन नंतर चांदचं एक गाणं होतं फक्त. तीच गोष्ट डान्स कॉम्पिटीशनची. चांदच्या काकांचं हॉटेल चालावं म्हणून तो सुचवतो की आपण गावात डान्स कॉम्पिटीशन ठेवू, म्हणजे भरपूर लोकं इथे येतील. मग गणपतीसाठी गाड्या भरभरून कोकणी माणूस कोकणात गावी जातो तसंच बोटी भरभरून माणसं गात-नाचत डान्स कॉम्पिटिशनसाठी येतात. या डान्स कॉम्पिटिशनची आपण पिक्चरभर वाट पाहतो पण ती ही कधीच होत नाही! त्याऐवजी सुरू होतं 'इश्क में हम तुम्हे क्या बताये'. हे गाणं काही कॉम्पिटिशनचा भाग नाही, यात दिसणारं स्टेज पण हॉटेलचं नाही. गाणं अगदीच ठिगळासारखं जोडलेलं वाटतं. त्यात पुन्हा क्रिकुचा कायिक-वाचिक अभिनय! आजही हमने बदले है कपडे म्हणताना तो कपड्यांना हात लावतो तर मला वाटलं आजही हम नहाये हुए है साठी शॉवर नाहीतरी गेलाबाजार डोक्यावर तांब्या ओतून घेतल्याचा तरी अभिनय करणारच हा!

या सिनेमात काही बेस्ट(!) सीक्वेन्सेस आहेत :

सीक्वेन्स १ - सोनू चांदला कुठल्यातरी रोमँटिक जागी पिकनिकला जाऊ म्हणून सांगते. तो म्हणतो चल ब्रिगँझा टापूला जाऊ. जाताना बोटीत ही बया त्याला नशीली कॉफी (म्हणजे काय?) पाजते. लॉजिक (!) असं की ते पिऊन तो नशेत खरं सांगेल. तर त्यामुळे चांदला दिसेनासंच होतं म्हणे. मग बोट हलायला लागते आणि दोघं पाण्यात! कसेबसे टापूवर पोचतात तर तिथे फक्त एक कबरस्तान असतं. इथे पिकनिक करणार होते हे? बरं सोनूला वाचवलंय तर गाणं हवंच. लगेच स्वप्नातलं गाणं ( गाण्यात चांदने एक मोठ्ठा चमकदार क्रॉस गळ्यात घातला आहे. बहुतेक कबरस्तानातल्या भुतांपासून वाचण्याकरता असावा ). तो दिवस संपतो. दुसर्‍या दिवसाची सकाळ होते. चांद म्हणतो चल कुठल्यातरी मछुआरेच्या बोटीतून परत जाऊ. अरे मग हे काल करायचं की! काल दिवसभर इथे टाइमपास कशाला केलात?

सीक्वेन्स २ - रोमिओला अंतर्ज्ञानाने समजलेलं असतं की चांद बेकसूर आहे आणि तो त्याला मदत करणार आहे. रोमूला त्याचं सीबीआय ऑफीसर असणं सिक्रेट ठेवायचं असतं. म्हणून दुबे त्याला म्हणतो 'हितं नको तितं जाऊ'. आणि कोण्णाला काही ऐकू जाऊ नये म्हणून ते तिघं एका भरलेल्या रेस्टॉरंट मधे जातात आणि बांबूची पार्टिशन्स लावलेलं टेबल पकडून बसतात. आपल्याकडे बांबू साऊंडप्रूफ असल्याने रोमूचं सिक्रेट सेफ राहील ना? पण मराठी मालिकांमधल्या दुष्ट नणंद/बहिण/भावजय वगैरे कशा पालीसारख्या दाराआड लपून लोकांचं बोलणं चोरून ऐकतात तसं या पिक्चरमधले बावळट्ट व्हिलन करत नसल्याने तेवढं पार्टिशन पुरेसं ठरतं ( अर्थात त्या 'सिक्रेट' च्या स्वतःच चिंध्या करत रोम्या लगेच एका टॅक्सी ड्रायव्हरकडे चांद आणि दुबेसोबत चौकशीला जात असल्याने पार्टिशनला कशाला दोष द्यायचा? ).

सीक्वेन्स ३ - रोमूला सगळे सापडलेले पुरावे गुपचुप पहायचे असतात तर श्रीयुत चांद म्हणतात मी तुला गुपचुप पोलिस चौकीत घुसवतो. शाळेची वेळ संपल्यावर शाळेच्या स्टोअररूम मधे घुसावं तेवढ्या सहज हे दोघं रात्री चौकीत घुसतात. चौकीत कोणीही नसतं. सगळे पोलिस टेबलं आवरून काम बंद करून घरी गेलेले असतात.

सीक्वेन्स ४ - चांद मॅचर्स क्लबच्या मॅनेजरला गाठून माहिती मिळवायचा प्रयत्न करतो. पण नेमकं तेव्हाच खिडकीतून मॅनेजरच्या डाव्या बाजूने कोणीतरी गोळी मारतं आणि ती गोळी टार्गेट वर लॉक केलेल्या मिसाईलसारखी आपली आपण वळून तात्या विंचू टाइप बरोब्बर मॅनेजरच्या भुवयांच्या मधे लागते.

पण सगळ्यात केक, बेकर अँड बेकरीवाला सीक्वेन्स आहे क्लायमॅक्सचा. ब्रिगँझा टापू, तेच कबरस्तान ( भरीस भर उगाच हॉरर टाइपचं म्युझिक पण आहे ). कोणी मास्कवाली दोन माणसं बिना नामवाली कबर शोधून कबरीमागच्या पॅनेलवर कसलीशी बटणं दाबतात. 'कौन?' आवाज येतो. "५०३". "सबूत?" इथे परवलीचं वाक्य आहे - माचिस जला माचिस बुझा! तर उत्तर येतं की ठिक आहे आम्ही १० मिनीटांत येतो ( १० मिनीटं काय करणार? ) . चांद या दोघांना मारून स्वतः ५०३ म्हणून मास्क लावून कबरीसमोर उभा राहतो. तर लाल हिरवे दिवे लागतात, टूं टूं आवाज येतो, कबर उघडते आणि कबरीतून बाहेर येतो व्यापारी - म्हणतो बॅग दे इकडे. चांद विचारतो तू कोण? तर म्हणे ४०२. इथे अगदी तो 'हीच का तुझी कुर्‍हाड फेम' लाकूडतोड्या - जलदेवता टाइप सीन होतो. चांद म्हणतो तू ७६० नाहीस तर मी बॅग देणार नाही. मग बाहेर येतो पोलिसप्रमुख. पण ही ११२ नंबरची कुर्‍हाड असते म्हणून ती पण रिजेक्ट होते. फायनली ७६० येतो. या ७६० चा मास्क आयत्यावेळी पांढरा पुठ्ठा आणून डोळ्यांच्या जागी कसेही वेडेवाकडे आकार कापून बनवलाय. हे कसले तस्कर? चांद म्हणतो माल कुठाय? तर तो मूर्तीयोंमें है. मग पोलिसप्रमुख एक मूर्ती आणून तिच्याखालचं झाकण काढतो. आतून अजिबात चमक नसलेली, पारले जी पेक्षा छोट्या आकाराची सोन्याची (!) बिस्कीटं खाली पडतात. आता बॅग उघडली जाते. आतून नवभारत टाइम्स निघतो.

उल्लेखनीय बाबींमधे प्रामुख्याने हॉटेलमधल्या डान्सर रूबीचा 'जलसा' च्या गाण्यात घातलेला ड्रेस. तिने टॉप आणि लेगिंग्ज वर अक्षरशः ऑप्टिकल फायबर लाईट्सच्या शंभरेक माळा पांघरलेल्या / सोडलेल्या आहेत. त्यापुढे 'सारा जमाना' मधलं अमिताभचं गाणंच काय पण चिमण्या गणपतीची आरास सुद्धा फिकी वाटावी. तीच गोष्ट शेवटच्या गाण्यातल्या तिच्या मेकपची. तिला नेमकं साप दिसायचंय, घुबड दिसायचंय की वाघ हे नीटसं समजत नाही. मेकप चालबाजच्या श्रीदेवीने केलेला असावा. या गाण्यात एक अजगर पण आहे. ते सतत तिला घाबरून पळत असावंसं वाटतं.

बाकी बाबी म्हणजे क्रिकुचे भुवया उंचावून बोललेले बोबडे संवाद, प्रेम चोप्राचा 'सायलेन्स सायलेन्स' असा तकिया कलाम, आणि शम्मी कपूरचं प्रत्येक वाक्यात 'ट्युनिंग' म्हणणं. शिवाय 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मधल्या "माया साराभाई भी वहाँ थी" वाक्यासारखे - विजू खोटे, सतीश शहा आणि राकेश बेदी भी वहाँ थे. असंख्य उत्तम कलाकारांची मांदियाळी असूनही बहुधा क्रिकुमुळे हा पिक्चर फ्लॉप झाला असावा. ट्रिविया च्या मते पिक्चर फ्लॉप झाल्यावर गुलशन कुमारने केतन आनंद आणि रमण कुमारला ऑफिसात बोलावून झापले असता केतनने फाटकन् विचारले की क्रिशन च्या चेहर्‍याकडे पाहता तुला पिक्चर हिट होईल असं का वाटलं होतं? असो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कबरीमध्ये व्हीलन्सचा गुप्त अड्डा हे 'जागीर'मध्ये पण आहे. कदाचित 'There's a grave danger! (किंवा dangerous grave)' हे कळवण्याचा तो एक प्रयत्न असावा.

पायस, तुला दंडवत आहे! एफआयआर मी पण रेग्युलर बघायचे पण हे मला अजिबातच आठवलं नाही मूळ लेख वाचताना.

Happy

धनि, श्रद्धा >> Happy एफ आय आर माझीही खूप आवडती सीरियल आहे. तकिया कलामचा विश्वकोश!

There's a grave danger! >> Rofl

एफ आय आर मला टोटल बाउन्सर होते पण पायस ने शोधलेला संदर्भ महान आहे Happy त्यामुळे दंडवत माझ्याकडूनही Happy

तसेच ज्या अ‍ॅक्टरचे व्हिलन म्हणून अस्तित्वच नाही तोच या सिनेमाचा व्हिलन >>> हे फाइन्डिंगही टोटल रिस्पेक्ट आहे Happy
एकूण पिक्चर पाहता त्यांनी एवढं डोकं लावलं असेल असं वाटत नाही. But I like the way you think >>> टोटली.

कदाचित 'There's a grave danger! (किंवा dangerous grave)' हे कळवण्याचा तो एक प्रयत्न असावा. >>> Lol

रागिणीचा खून होतो कारण ती ४०२, ११२ आणि ७६० ला तस्करी बिझनेस एक्स्पान्शनच्या गोष्टी करताना ऐकते. >>> Lol पूर्वी जसा अमजद खान दिसला की लोक "अरे हा गब्बर" असे म्हणायचे, तसे ते अ‍ॅक्टर्स इतर पिक्चर्स मधे दिसले की रमड आता "अरे हा तर ४०२" असे ओळखेल आणि बाकीचे चक्रावून जातील Happy

आता मूळ लेख परत वाचताना:
प्रामाणिक पोलिसाच्या >> Lol हिंदी पिक्चर्स मधल्या पोलिसांबद्दल लिहीताना "प्रामाणिक" हे विशेषण वेगळे वापरावे लागते याचा बॉलीवूडने गंभीर विचार करणे गरजेचे आहे Happy
आपल्याकडे बांबू साऊंडप्रूफ असल्याने >>> Lol
एक पुजारी जलसा करतो, एक तस्करीत सामील असतो. ते निदान अधूनमधून पूजा वगैरे करतात का? Happy

या काडेपेट्यांचा बराच काळ सुळसुळाट चालतो. फार उशीरा लोकांच्या लक्षात येतं की अरे या काडेपेट्यांचं उगमस्थान शोधायला हवं >>> हे काय लॉजिक आहे पिक्चरमधले? काडेपेट्यांचा सुळसुळाट हा काय सीबीआय लेव्हलचा प्रॉब्लेम आहे काय? Happy

खुनाचा आळ यायला चांदने काही केलेले असते का? की त्याने बॉलीवूड प्रथेप्रमाणे चाकू हातात घेउन पाहिलेला असतो पोलिस यायच्या वेळेस? आणि पुजार्‍याचा खून झाला तर गावातले हॉटेल डबघाईला येण्याचे काय कारण? चांद हा त्या मालकाचा आवर्जून पुतण्या करण्याचे काय कारण? मुलगा का नाही? हा अगदी मायनरातील मायनर पॉइंट असला, तरी पटकथा लेखकाने हे आवर्जून का केले असावे असा विचार आला Happy जनरली कथेत अशी नाती रचली जातात ती कथेची जेन्युइन गरज म्हणून (इथे तसे काही वाटत नाही) किंवा हीरोपासून हिरॉइनपर्यंत लाइन क्लिअर असावी म्हणून. इथे मुला ऐवजी पुतण्या होण्याने त्या चांदला काहीच फायदा दिसत नाही. त्यामुळे व्हाय पुतण्या रॅण्डमली. हा प्रश्न सोडवायला पिक्चर बघावाच लागेल.

कॉलेजमधल्या पोरांचे पिक्चर्स किंवा नेपोकिड्सचे लाँच मूव्हीज सोडले तर असे कोण गावांमधे रॅण्डमली एक डान्स कॉंपिटिशन ठरवतात? आणि आपल्याच गावात येता जाता गाणी म्हणणार्‍या क्रिकू चे गाणे/नाच वाला "शो" बघायला त्या सोनूला मुंबईला कशाला जावे लागते?

आजही हम नहाये हुए है साठी शॉवर नाहीतरी गेलाबाजार डोक्यावर तांब्या ओतून घेतल्याचा तरी अभिनय करणारच हा! >>> Lol हे चपखल आहे. कारण तेव्हा असे अनेक पिक्चर्स आले होते की त्यात प्रत्येक ओळीला त्या अर्थाप्रमाणे अ‍ॅक्ट करणे सक्तीचे असे. जीना तेरी गली मे वगैरे.

Rofl फा, तू पिक्चर पाहशीलच पण तरी इथे उत्तरं द्यायचा प्रयत्न करते.

ते निदान अधूनमधून पूजा वगैरे करतात का? >>> छे. मंदिर पण १-२ वेळाच दाखवलं आहे. मुळात जे गाव / शहर 'माजोर्दा गोवा' आहे. ते देवी माँ के मंदिर के लिए फेमस का असेल. पण तसंच असतं म्हणे. आणि इथे तुझ्या दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर आहे - खुनामुळे लोकं देवळात दर्शनाला येईनासे होतात म्हणून हॉटेल डबघाईला येतं Uhoh

खुनाचा आळ यायला चांदने काही केलेले असते का? >>> Proud ती एक गम्मतच आहे. रागिणी स्वयंघोषित प्रेमिका असते चांदची. म्हणजे टू द लेव्हल की ती त्याची प्रेमिका आहे असं परस्पर बहिणीला पत्रातून कळवते. चांद जेव्हा गावात येतो तेव्हा त्याला गाठून ती सांगते की माझ्याशी लग्न कर आणि माझ्या होणार्‍या मुलांचा बाप हो Rofl हे असलं प्रपोजल ऐकलं नव्हतं कधी. शिवाय तो स्टेजवर गाणं गात असतो तेव्हा ते गाणं तिच्याचसाठी आहे असा समज करून घेऊन ती मुरकते वगैरे. हे गाणं चालू असताना एक चार्ली नामक टकलू तिला एका रूममधे बोलावणारा मेसेज लिहीलेली काडेपेटी देतो. त्या मेसेज खाली लिहीलेलं असतं 'च'. यानंतर लगेच तिचा खून होतो. आख्ख्या दुनियेत चांद हाच एक 'च' असल्याने ( Proud ) त्याच्यावर संशय.

व्हाय पुतण्या रॅण्डमली >>> हे नाही माहिती. कदाचित शम्मीचा मुलगा म्हणून क्रिकु शोभणार नाही म्हणून असेल.

कॉलेजमधल्या पोरांचे पिक्चर्स किंवा नेपोकिड्सचे लाँच मूव्हीज सोडले तर असे कोण गावांमधे रॅण्डमली एक डान्स कॉंपिटिशन ठरवतात? >>> Rofl सही सवाल!

आपल्याच गावात येता जाता गाणी म्हणणार्‍या क्रिकू चे गाणे/नाच वाला "शो" बघायला त्या सोनूला मुंबईला कशाला जावे लागते? >>> ती आणि चांद आधी मुंबईतच असतात. आणि हीच ती किंवा तोच हा टाईप माहिती एक्मेकांना नसते.

तसे ते अ‍ॅक्टर्स इतर पिक्चर्स मधे दिसले की रमड आता "अरे हा तर ४०२" असे ओळखेल >>> Lol अगदी अगदी. अ‍ॅडीशनली त्यासोबत पायसची पोस्ट पण आठवेल आता.

जीना तेरी गली मे वगैरे >>> Lol हा पिक्चर मला पहायचा आहे. याच्या टायटल साँग मधे हाताने अ‍ॅक्चुअल जिन्याची अ‍ॅक्शन केली आहे का ते बघायला हवं.

त्या मेसेज खाली लिहीलेलं असतं 'च'. यानंतर लगेच तिचा खून होतो. आख्ख्या दुनियेत चांद हाच एक 'च' असल्याने ( Proud ) त्याच्यावर संशय. >>> Lol मग तो "च" कोण निघतो नंतर. आणि ती चिठ्ठी "च च्या भाषेत" लिहीलेली असते का?

या पिक्चर बद्दल जितके प्रश्न विचाराल तितकी नवीन इस्टर एग्ज बाहेर येत आहेत Happy

त्याला गाठून ती सांगते की माझ्याशी लग्न कर आणि माझ्या होणार्‍या मुलांचा बाप हो Rofl हे असलं प्रपोजल ऐकलं नव्हतं >>> Lol पण इथे आहे बघ साधारण असेच प्रपोजल Happy

हे गाणं चालू असताना एक चार्ली नामक टकलू तिला एका रूममधे बोलावणारा मेसेज लिहीलेली काडेपेटी देतो. >>> इथेही काडेपेटी! एकाच वस्तूचा इतका बहुउद्देशीय उपयोग फार क्वचित झाला असेल. तिरंगाचा रिमोटही तसा आहे असे त्यावरच्या एका प्रतिक्रियेत होते.

बाय द वे, तस्करीची माहिती कळाल्याने रागिणीची हत्या होते. तर मग तो अशा वेळेस दिसणारा जागतिक दर्जाचा बिनडोक सीन यातही आहे का - ज्यात व्हिलनच्या अड्ड्यातच हिरॉइन किंचाळते आणि क्लिअरली "अ‍ॅडव्हांटेज व्हिलन" सिच्युएशन असताना "मै ये सब पुलिसको बताऊंगी" आव्हान देते Happy

व्हिलनच्या अड्ड्यातच हिरॉइन किंचाळते आणि क्लिअरली "अ‍ॅडव्हांटेज व्हिलन" सिच्युएशन असताना "मै ये सब पुलिसको बताऊंगी" आव्हान देते >>> चक्क नाहीये असं Lol

अश्या वेळी इतकं साधं व्याकरण वालं वाक्य न म्हणता 'मै पुलीस के पास जाऊंगी और तुम्हारी इन काली करतूतो का पर्दाफाश करुंगी' अशी अलंकारिक भाषा वापरायची असते Happy

लोकहो, त्या ‘आजही हम नहाये हुए है’ला मृताला घातलेली शेवटची आंघोळ असा रेफरन्स आहे. या ओळीचा शॉट घेताना डिरेक्टरने क्रिकुला सांगितले असेल ‘कश्शाला अभिनयाच्या भानगडीत पडतोस? नेहमीसारखा वावर. हाय काय, नाय काय.’ म्हणून नो तांब्या ऑन डोकं.

मग तो "च" कोण निघतो नंतर. आणि ती चिठ्ठी "च च्या भाषेत" लिहीलेली असते का? >>> Rofl च म्हणजे चंदर नावाचा टॅक्सी ड्रायव्हर असतो. त्याचं रागिणीवर प्रेम असतं.
चिठ्ठी च च्या भाषेत लिहीली असती तर वेगळे प्रॉब्लेम झाले असते Wink

इथे आहे बघ साधारण असेच प्रपोजल >>> अरे देवा! Rofl

mi_anu आणि माझेमन : मस्त अ‍ॅडीशन्स Lol

धमाल चालू आहे Lol
फारेण्ड, रमड, अनु, श्रद्धा जबरदस्त फटकेबाजी चालू आहे.
( हा प्रतिसाद मघाशी उमटलाच नाही का ?)

>> Lol पण इथे आहे बघ साधारण असेच प्रपोजल Happy>> मला वाटले की हसीना मान जाएगी मधले असेल - माफ कर माँ ... माँ बोले तो मेरे होने वाले बच्चे की माँ Lol

आणि पुजार्‍याचा खून झाला तर गावातले हॉटेल डबघाईला येण्याचे काय कारण?
<<<<<<
यालाच इंग्रजीत 'बटरफ्लाय इफेक्ट' अशी संज्ञा आहे.

कहर प्रतिसाद Lol

Btw, मुलांचे वरून आद्य प्रपोजल राजकपूर ह्यांनी जीस देश मे गंगा बेहती है मध्ये दिले आहे की.
विसरलात की काय? हे घ्या

https://youtu.be/pnxSGeSjp7I?feature=shared

प्रोपोजल नंतरचे म्युजिक देखिल एन्जॉय करा.

यालाच इंग्रजीत 'बटरफ्लाय इफेक्ट' अशी संज्ञा आहे. >>> ओह ते इकडे फुलपाखराने पंख फडफडवले की तिकडे वादळ होते वगैरे? पिक्चरचे लॉजिक डीप दिसते एकदम Happy नाहीतर अशा पिक्चर मधले हॉटेल चालत नाही याला फार फार तर बटरचिकन फ्लाय इफेक्ट म्हणता येइल Happy

च म्हणजे चंदर नावाचा टॅक्सी ड्रायव्हर असतो. त्याचं रागिणीवर प्रेम असतं. >>> आणि तरीही नुसत्या "च" वरून चांद वर डायरेक्ट आळ? आख्ख्या गावात किती च असतील? इथे तर या एका प्रसंगातच तीन आहेत - ते ही अमर अकबर अँथनी स्टाईल - चंदर, चाँद आणि चार्ली!

mi_anu आणि माझेमन : मस्त अ‍ॅडीशन्स >> हो Happy

प्रोपोजल नंतरचे म्युजिक देखिल एन्जॉय करा. >>> Lol झकास हो हा सीनतर मधे बराच फिरत होता. ती सतार का काय ते अशा प्रसंगात अनेक वेळा वाजले आहे पिक्चर्स मधे.

बाय द वे, असे प्रपोजल अगदी आत्तापर्यंत अनेकदा आले आहे. "कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई" वगैरे.

Pages