खूप वर्षांपूर्वी काकांनी पिक्चर काढला 'तिसरी मंझिल'. त्यानंतर २७ वर्षांनी पुतण्याला क्रिशन कुमारला घेऊन पिक्चर करायचा होता. पण तो चालणार कसा? म्हणून पुतण्याने मनोमन 'काका मला वाचवा' म्हटलं आणि 'तिसरी मंझिल' ला तस्करीची फोडणी देऊन तयार केला 'आजा मेरी जान'.
गोव्यातल्या एका गावात आधी एका पुजार्याचा आणि नंतर नवीन आलेला पुजार्याच्या मोठ्या मुलीचा - रागिणीचा - खून होतो. रागिणीच्या खुनाचा आळ येतो गावात आलेल्या चांदवर जो गावातल्या एका मोठ्या पण जुन्या पुजार्याच्या खुनामुळे डबघाईला आलेल्या हॉटेलच्या मालकाचा पुतण्या आहे. नवीन पुजार्याची धाकटी मुलगी सोनू आधी चांदला खूनी समजते पण मग तो निर्दोष आहे हे समजल्यावर ती त्याच्या प्रेमात पडते. हे दोघं एका दुबे नामक प्रामाणिक पोलिसाच्या आणि एका अंडरकव्हर सीबीआय अधिकार्याच्या ( जो रोमिओ नावाने डान्सर म्हणून आला आहे ) मदतीने रागिणीच्या खुन्याला पकडतात. हे करतानाच एका तस्करी करणार्या गँगचा पर्दाफाश होतो आणि समजतं की गावातला एक प्रतिष्ठीत, एक पोलिसप्रमुख आणि एक व्यापारी यात गुंतलेले आहेत. दुष्टांचा खातमा होतो आणि सुष्ट लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. कथा आहे ती इतकीच. पण मजा इथली संपत नाही.
आता या सगळ्यात काडेपेटीचा काय संबंध? तर हे तस्कर नावांऐवजी नंबराने एकमेकांना ओळखत असतात आणि त्यासाठी (हाताने) नंबर लिहीलेल्या काडेपेट्या वापरत असतात. या काडेपेट्यांचा बराच काळ सुळसुळाट चालतो. आणि फार उशीरा लोकांच्या लक्षात येतं की अरे या काडेपेट्यांचं उगमस्थान शोधायला हवं. क्रिशनकुमार म्हणजेच चांद सिनेमाचा हिरो असल्याने अश्या सगळ्या आयडियाज फक्त त्याला येत असतात ( आणि पिक्चरमधल्या सगळ्या पोरी त्याच्या मागे लागलेल्या असतात. हे 'गुंतता हृदय हे' मालिकेतल्या संदीप कुलकर्णीच्या मागे लागलेल्या बायकांच्या संख्येइतकंच अनाकलनीय प्रकरण आहे ) आणि सीबीआय वाला रोमिओ आणि दुबे तो सांगेल ते फक्त अमलात आणत असतात. त्यात पुन्हा नंबर लिहीलेल्या काडेपेट्या आणि बिना-नंबरच्या असा एक घोळ आहे. बिना नंबराच्या काडेपेट्या सर्वसामान्य माणसं वापरत असतात. गंमत म्हणजे पिक्चर सगळा गोव्यात घडत असताना या काडेपेट्या मात्र मुंबईतल्या एका मॅचर्स क्लब मधून येत असतात. तस्करांचं मी एकवेळ समजू शकते पण हॉटेलमधे येणारे कस्टमर पण त्याच क्लबच्या काडेपेट्या का वापरत असतात हे काही समजलं नाही. एका शोधाशोध सीन मधे चांद आणि रोमिओ एका जोडप्याची बॅग उचकताना दाखवले आहेत, त्या बॅगच्या तळाशी त्यांना नंबर नसलेली साधी काडेपेटी सापडते. आता काडेपेटी सुटकेसच्या तळाशी कोण ठेवतं? पण ते असो.
पिक्चरचं प्रमुख पात्र ( क्रिशनकुमार नव्हे. तो अपात्र आहे ) - गाणी. या पिक्चरमधे प्रत्येक सिच्युएशनला गाणी आहेत. इतकंच नव्हे तर कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून एकेक गाणं आहे - हॉटेलमधे गेस्ट नाहीत? म्हण गाणं. चांदला निरोप द्यायचाय? म्हण गाणं. काडेपेटीवर लिहीलेल्या नंबरचा प्रॉब्लेम सोडवायचाय? म्हण गाणं. इतकंच काय, पण रोमिओला जेव्हा हे शोधायचं असतं की अशी काडेपेटी त्याने त्या गावात कोणाकडे पाहिली आहे तेव्हा चांद त्याला म्हणतो - दो दुनी चार, चार दुनी सोला! म्हणजे काय? महाभारतातला यक्ष कूटप्रश्न विचारत होता तसा हा कूट उत्तरं देतो. पण याचा अर्थ असतो बीचवर सगळ्यांनी दिवसभर गाणं म्हणायचं. त्याचा उपयोग काय कप्पाळ? आख्ख्या गाण्यात फक्त चांद आणि सोनू दिसत राहतात. त्यातही चांद पॅराग्लायडिंग करताना, वॉटरबाईक चालवताना, रस्त्यावरून बाईक पळवताना आणि सोनूला अंगठी देताना दिसत राहतो. काडेपेटी इन क्वेश्चन बद्दल गाणं संपल्यावर माफक मंडळी बीचवर उरल्यावर मग समजतं.
काही गोष्टी सिनेमात पेरून माणसं त्यांना पाणी घालायला विसरली आहेत. उदाहरणार्थ - सोनू मुंबईत चांदचा शो पहायला जाते. त्याच्या सोबत स्टेजवर गाणंही म्हणते. पण दुसर्या दिवशी तो तिला पटवायचा ( फालतू ) प्रयत्न करतो तेव्हा मात्र ती त्याला विचारते तुम्हारा नाम क्या है? अगं पोरी, काल ज्याचा शो पहायला गेलीस त्याचं नाव नाही माहिती तुला? किंवा - नवीन आलेला पुजारी कसला तरी जलसा करण्याकरता मंदिराच्या ट्रस्टीकडे पैसे मागतो. पण तो जलसा काही शेवटपर्यंत होताना दिसत नाही. म्हणजे मला आपलं वाटलं की काही सत्संगटाइप असेल. पण या सीन नंतर चांदचं एक गाणं होतं फक्त. तीच गोष्ट डान्स कॉम्पिटीशनची. चांदच्या काकांचं हॉटेल चालावं म्हणून तो सुचवतो की आपण गावात डान्स कॉम्पिटीशन ठेवू, म्हणजे भरपूर लोकं इथे येतील. मग गणपतीसाठी गाड्या भरभरून कोकणी माणूस कोकणात गावी जातो तसंच बोटी भरभरून माणसं गात-नाचत डान्स कॉम्पिटिशनसाठी येतात. या डान्स कॉम्पिटिशनची आपण पिक्चरभर वाट पाहतो पण ती ही कधीच होत नाही! त्याऐवजी सुरू होतं 'इश्क में हम तुम्हे क्या बताये'. हे गाणं काही कॉम्पिटिशनचा भाग नाही, यात दिसणारं स्टेज पण हॉटेलचं नाही. गाणं अगदीच ठिगळासारखं जोडलेलं वाटतं. त्यात पुन्हा क्रिकुचा कायिक-वाचिक अभिनय! आजही हमने बदले है कपडे म्हणताना तो कपड्यांना हात लावतो तर मला वाटलं आजही हम नहाये हुए है साठी शॉवर नाहीतरी गेलाबाजार डोक्यावर तांब्या ओतून घेतल्याचा तरी अभिनय करणारच हा!
या सिनेमात काही बेस्ट(!) सीक्वेन्सेस आहेत :
सीक्वेन्स १ - सोनू चांदला कुठल्यातरी रोमँटिक जागी पिकनिकला जाऊ म्हणून सांगते. तो म्हणतो चल ब्रिगँझा टापूला जाऊ. जाताना बोटीत ही बया त्याला नशीली कॉफी (म्हणजे काय?) पाजते. लॉजिक (!) असं की ते पिऊन तो नशेत खरं सांगेल. तर त्यामुळे चांदला दिसेनासंच होतं म्हणे. मग बोट हलायला लागते आणि दोघं पाण्यात! कसेबसे टापूवर पोचतात तर तिथे फक्त एक कबरस्तान असतं. इथे पिकनिक करणार होते हे? बरं सोनूला वाचवलंय तर गाणं हवंच. लगेच स्वप्नातलं गाणं ( गाण्यात चांदने एक मोठ्ठा चमकदार क्रॉस गळ्यात घातला आहे. बहुतेक कबरस्तानातल्या भुतांपासून वाचण्याकरता असावा ). तो दिवस संपतो. दुसर्या दिवसाची सकाळ होते. चांद म्हणतो चल कुठल्यातरी मछुआरेच्या बोटीतून परत जाऊ. अरे मग हे काल करायचं की! काल दिवसभर इथे टाइमपास कशाला केलात?
सीक्वेन्स २ - रोमिओला अंतर्ज्ञानाने समजलेलं असतं की चांद बेकसूर आहे आणि तो त्याला मदत करणार आहे. रोमूला त्याचं सीबीआय ऑफीसर असणं सिक्रेट ठेवायचं असतं. म्हणून दुबे त्याला म्हणतो 'हितं नको तितं जाऊ'. आणि कोण्णाला काही ऐकू जाऊ नये म्हणून ते तिघं एका भरलेल्या रेस्टॉरंट मधे जातात आणि बांबूची पार्टिशन्स लावलेलं टेबल पकडून बसतात. आपल्याकडे बांबू साऊंडप्रूफ असल्याने रोमूचं सिक्रेट सेफ राहील ना? पण मराठी मालिकांमधल्या दुष्ट नणंद/बहिण/भावजय वगैरे कशा पालीसारख्या दाराआड लपून लोकांचं बोलणं चोरून ऐकतात तसं या पिक्चरमधले बावळट्ट व्हिलन करत नसल्याने तेवढं पार्टिशन पुरेसं ठरतं ( अर्थात त्या 'सिक्रेट' च्या स्वतःच चिंध्या करत रोम्या लगेच एका टॅक्सी ड्रायव्हरकडे चांद आणि दुबेसोबत चौकशीला जात असल्याने पार्टिशनला कशाला दोष द्यायचा? ).
सीक्वेन्स ३ - रोमूला सगळे सापडलेले पुरावे गुपचुप पहायचे असतात तर श्रीयुत चांद म्हणतात मी तुला गुपचुप पोलिस चौकीत घुसवतो. शाळेची वेळ संपल्यावर शाळेच्या स्टोअररूम मधे घुसावं तेवढ्या सहज हे दोघं रात्री चौकीत घुसतात. चौकीत कोणीही नसतं. सगळे पोलिस टेबलं आवरून काम बंद करून घरी गेलेले असतात.
सीक्वेन्स ४ - चांद मॅचर्स क्लबच्या मॅनेजरला गाठून माहिती मिळवायचा प्रयत्न करतो. पण नेमकं तेव्हाच खिडकीतून मॅनेजरच्या डाव्या बाजूने कोणीतरी गोळी मारतं आणि ती गोळी टार्गेट वर लॉक केलेल्या मिसाईलसारखी आपली आपण वळून तात्या विंचू टाइप बरोब्बर मॅनेजरच्या भुवयांच्या मधे लागते.
पण सगळ्यात केक, बेकर अँड बेकरीवाला सीक्वेन्स आहे क्लायमॅक्सचा. ब्रिगँझा टापू, तेच कबरस्तान ( भरीस भर उगाच हॉरर टाइपचं म्युझिक पण आहे ). कोणी मास्कवाली दोन माणसं बिना नामवाली कबर शोधून कबरीमागच्या पॅनेलवर कसलीशी बटणं दाबतात. 'कौन?' आवाज येतो. "५०३". "सबूत?" इथे परवलीचं वाक्य आहे - माचिस जला माचिस बुझा! तर उत्तर येतं की ठिक आहे आम्ही १० मिनीटांत येतो ( १० मिनीटं काय करणार? ) . चांद या दोघांना मारून स्वतः ५०३ म्हणून मास्क लावून कबरीसमोर उभा राहतो. तर लाल हिरवे दिवे लागतात, टूं टूं आवाज येतो, कबर उघडते आणि कबरीतून बाहेर येतो व्यापारी - म्हणतो बॅग दे इकडे. चांद विचारतो तू कोण? तर म्हणे ४०२. इथे अगदी तो 'हीच का तुझी कुर्हाड फेम' लाकूडतोड्या - जलदेवता टाइप सीन होतो. चांद म्हणतो तू ७६० नाहीस तर मी बॅग देणार नाही. मग बाहेर येतो पोलिसप्रमुख. पण ही ११२ नंबरची कुर्हाड असते म्हणून ती पण रिजेक्ट होते. फायनली ७६० येतो. या ७६० चा मास्क आयत्यावेळी पांढरा पुठ्ठा आणून डोळ्यांच्या जागी कसेही वेडेवाकडे आकार कापून बनवलाय. हे कसले तस्कर? चांद म्हणतो माल कुठाय? तर तो मूर्तीयोंमें है. मग पोलिसप्रमुख एक मूर्ती आणून तिच्याखालचं झाकण काढतो. आतून अजिबात चमक नसलेली, पारले जी पेक्षा छोट्या आकाराची सोन्याची (!) बिस्कीटं खाली पडतात. आता बॅग उघडली जाते. आतून नवभारत टाइम्स निघतो.
उल्लेखनीय बाबींमधे प्रामुख्याने हॉटेलमधल्या डान्सर रूबीचा 'जलसा' च्या गाण्यात घातलेला ड्रेस. तिने टॉप आणि लेगिंग्ज वर अक्षरशः ऑप्टिकल फायबर लाईट्सच्या शंभरेक माळा पांघरलेल्या / सोडलेल्या आहेत. त्यापुढे 'सारा जमाना' मधलं अमिताभचं गाणंच काय पण चिमण्या गणपतीची आरास सुद्धा फिकी वाटावी. तीच गोष्ट शेवटच्या गाण्यातल्या तिच्या मेकपची. तिला नेमकं साप दिसायचंय, घुबड दिसायचंय की वाघ हे नीटसं समजत नाही. मेकप चालबाजच्या श्रीदेवीने केलेला असावा. या गाण्यात एक अजगर पण आहे. ते सतत तिला घाबरून पळत असावंसं वाटतं.
बाकी बाबी म्हणजे क्रिकुचे भुवया उंचावून बोललेले बोबडे संवाद, प्रेम चोप्राचा 'सायलेन्स सायलेन्स' असा तकिया कलाम, आणि शम्मी कपूरचं प्रत्येक वाक्यात 'ट्युनिंग' म्हणणं. शिवाय 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मधल्या "माया साराभाई भी वहाँ थी" वाक्यासारखे - विजू खोटे, सतीश शहा आणि राकेश बेदी भी वहाँ थे. असंख्य उत्तम कलाकारांची मांदियाळी असूनही बहुधा क्रिकुमुळे हा पिक्चर फ्लॉप झाला असावा. ट्रिविया च्या मते पिक्चर फ्लॉप झाल्यावर गुलशन कुमारने केतन आनंद आणि रमण कुमारला ऑफिसात बोलावून झापले असता केतनने फाटकन् विचारले की क्रिशन च्या चेहर्याकडे पाहता तुला पिक्चर हिट होईल असं का वाटलं होतं? असो.
काय पेशन्स आहे!! हा पिक्चर
काय पेशन्स आहे!! हा पिक्चर पाहिला.
मी फक्त त्याचं ते बोटीवरचं शीर्षक गीत पाहिलं होतं टीव्हीवर.
स्टोरी भयंकर आहे
बहुतेक प्रेम चोप्राने याच
बहुतेक प्रेम चोप्राने याच चित्रपटात "नांगा नहायेगा क्या और नीचोडेगा क्या" हा जगप्रसिद्ध संवाद पहिल्यांदा वापरलेला आहे
बापरे हा चित्रपट एकदम
बापरे हा चित्रपट एकदम विस्मरणात गेला होता…. मस्त पिसे काढलीत पण थोडक्यात आटपले. जिथे आडातच काही नाही तिथे पोहर्यात खेचुन खेचुन कितीसे खेचायला हाती लागणार…
किशनकुमारला चंद्रकांतातल्या कृरसिन्गाचा रोल द्यायला हवा होता. खोट्या भुवया लावायचा खर्च वाचला असता.
केतनने फाटकन् विचारले की क्रिशन च्या चेहर्याकडे पाहता तुला पिक्चर हिट होईल असं का वाटलं होतं? असो.>>>>> गु कु चा गाण्यांवर जास्त विश्वास होता.. नाहीतर असली केसाळ अस्वले त्याने आणली नसती पडद्यावर. लाल दुपट्टा … मध्येही एक केसाळ अस्वल होते.
यातलं ’पागल दिल मेरा तुम से
यातलं ’पागल दिल मेरा तुम से कह रहा’ हे गाणं तेवढं आठवतंय. (एस. पी. बालसुब्रमण्यम)
पात्र-अपात्र, पेरून पाणी घालायला विसरले - याला खूप हसले
तेव्हा चांद त्याला म्हणतो -
तेव्हा चांद त्याला म्हणतो - दो दुनी चार, चार दुनी सोला!
<<<<<
गणिताच्यासुद्धा चुका??????
खतरनाक रिव्ह्यू आहे बाकी. वाचतेय अजून!
हसणे कंट्रोल होईना म्हणून
हसणे कंट्रोल होईना म्हणून अर्धा भाग ठेवून दिला.
मला असे हसताना बघून बाकीचे हसताहेत
त्यांना काय सांगायचं कप्पाळ!!
हा सिनेमा माहितीच नाही. ते ही किशनकुमार असून..
एका हाताच्या बोटाएव्हढेच तर सिनेमे असतील त्याचे. त्याला घेऊन आदिमानवांवर चित्रपट बनवूया असं ठरवलं होतं.
या दोन्ही भावांच्या कपाळावर सटवाईने लिहिलेला ललाटलेख एक बोट खाली उतरून आल्याने तिथे भिवईवन उगवले असावे.
रुमाल टाकून ठेवला आहे. येतेच
रुमाल टाकून ठेवला आहे. येतेच सावकाशीने...
बाकी ते 'अच्छा सिला दिया' म्हणून टेलरची जाहिरात करणारे गाणे यात नाही? त्यासाठी अजून एक वेगळा क्रिकु पिक्चर आहे?
ती पिक्चर बेवफा सनम.
तो पिक्चर बेवफा सनम.(का आठवतात मला या गोष्टी? )
आता काडेपेटी सुटकेसच्या तळाशी
आता काडेपेटी सुटकेसच्या तळाशी कोण ठेवतं? पण ते असो.<<<<<<
ती बायको नवऱ्याची सिगरेट सोडवायचा प्रयत्न करत असावी.
किशनकुमार चे चित्रपट सोडा ते
किशनकुमार चे चित्रपट सोडा ते चित्रहार मध्ये गाणे लागायचे त्यातही असह्य व्हायचा तो
दोन्ही भिवया चिकटलेल्या नसून
दोन्ही भि(षण)/भुवया चिकटलेल्या नसून मध्ये खैबरखिंड आहे हे आत्ता नीट पाहिलं.
तो पिक्चर बेवफा सनम>>> मला तर
तो पिक्चर बेवफा सनम>>> मला तर ते इश्क मे हम तुम्हे क्या बताए पण बेवफा सनम मधले वाटायचे. मग एकदम मध्येच इथे सुरू झाल्यावर धक्का बसला. असाही एक jump scare
मग वाचल्यावर असे कळले की ते बेवफा सनमच्या कॅसेट मध्ये पण आलेले होते
आजा मेरी जान ला आर डी चे
आजा मेरी जान ला आर डी चे संगीत होते ना ? पागल दिल मेरा आठवतेय मला फक्त सिनेमामधले. हो मी मान खाली घालून कबूल करतो कि मी पण पाहिलाय हा सिनेमा. पूर्वजन्माचे भोग असतात एक एक
इथे गायको ची ती निअँदरथळची अॅड लागते ती पाहिली कि मला नेहमी कि.कु. ची आठवण येते.
ती बायको नवऱ्याची सिगरेट
ती बायको नवऱ्याची सिगरेट सोडवायचा प्रयत्न करत असावी. >>>
आजा मेरी जान ला आर डी चे संगीत होते ना ? >>> नाही रे बाबा. आर डी चं फक्त एक गाणं होतं आणि ते ही या सिनेमात दाखवलेलं /घेतलेलं नाहीये. चित्रपटाला संगीत निखिल-विनय चं आहे.
चित्रपटाला संगीत निखिल-विनय
चित्रपटाला संगीत निखिल-विनय चं आहे >> गलत जवाब !
निखिल-विनयचं फक्त बॅकग्राऊंड स्कोअर आहे. अमर - उत्पल असे कोणी तरी आहेत संगीतकार
४ नावं आहेत. लै कन्फ्युजन
४ नावं आहेत. लै कन्फ्युजन होतं राव!
अमर उत्पल ची इतक्यातच आठवण
अमर उत्पल ची इतक्यातच आठवण निघालेली कुमार सरांच्या धाग्यावर.
अनिल विश्वासची मुलं.
किशनकुमार चे चित्रपट सोडा ते
किशनकुमार चे चित्रपट सोडा ते चित्रहार मध्ये गाणे लागायचे त्यातही असह्य व्हायचा तो
हो , त्याकाळी इतकी चॅनेल्सही नव्हती, captive audience चित्रहार वर त्याने कब्जाच केला होता.
तिसरी मंझिलचीच स्टोरी आहे.
तिसरी मंझिलचीच स्टोरी आहे. त्या सिनेमाचा रिमेक करायचा, ते ही आनंद आडनाव आहे म्हणून.
त्यातही शम्मी कपूर सारख्या देखण्या हिरोच्या जागी संपूर्ण जग पालथं घालून नेमका किशन कुमार सापडावा ?
शम्मीने कुठल्यातरी गाण्यात नकली भिवया, दाढी मिशा लावल्यात, तरीही तो इतका भयाण दिसत नाही.
तिसरी मंझिलची आठवण रहावी
तिसरी मंझिलची आठवण रहावी म्हणून यात शम्मी आणि प्रेम दोघेही आहेत
त्यातही शम्मी कपूर सारख्या
त्यातही शम्मी कपूर सारख्या देखण्या हिरोच्या जागी संपूर्ण जग पालथं घालून नेमका किशन कुमार सापडावा >>> तेच की.
captive audience चित्रहार वर
captive audience चित्रहार वर त्याने कब्जाच केला होता. >> अगदी अगदी
आणि मग रिक्षा मधल्या टेप वर पण
विकिपीडिया अनुसार फक्त "आजा
विकिपीडिया अनुसार फक्त "आजा मेरी जान" (टायटल सॉंग) हे आरडीनं संगीतबद्ध केलंय. हे ते असावं. या चित्रपटातलं माझं आवडतं गाणं.
बाकी जबरा review केलाय. पार चिरफाडच!!
किशन कुमार ला तरूण्या (तरूणी
किशन कुमार ला तरूण्या (तरूणी अ.व.) रक्ताने पत्र लिहीत. त्याच्या गाडीपुढे रस्त्यावर युवत्या आडव्या पडत.
र्म्द
र्म्द
त्या ४०२/५०३/७६० सीनच्या वर्णनाला टोटल फुटलो! पिक्चरचा सीन आहे की चित्रपटाच्या माध्यमातून मटक्याचे आकडे जाहीर करत आहेत प्रश्न पडेल.
हॉटेलमधे येणारे कस्टमर पण त्याच क्लबच्या काडेपेट्या का वापरत असतात हे काही समजलं नाही >>>
अगं पोरी, काल ज्याचा शो पहायला गेलीस त्याचं नाव नाही माहिती तुला? >>>
नशीली कॉफी (म्हणजे काय?) >>>
आता काडेपेटी सुटकेसच्या तळाशी कोण ठेवतं? >>>
मला वाटलं आजही हम नहाये हुए है साठी शॉवर नाहीतरी गेलाबाजार डोक्यावर तांब्या ओतून घेतल्याचा तरी अभिनय करणारच हा! >>>
तिला नेमकं साप दिसायचंय, घुबड दिसायचंय की वाघ हे नीटसं समजत नाही >>>
काही गोष्टी सिनेमात पेरून माणसं त्यांना पाणी घालायला विसरली आहेत >>> हे सर्वात भारी आहे
बिना नाम वाल्या कबरीची काय भानगड आहे? कबरीच्या आत आख्खी तस्करी चालवणार्यांना एक फेक नाव वरती देता आले नाही? पोलिस एखादा तपास करत आले तर पहिल्यांदा नाव नसलेली कबरच शोधतील ना? अनलेस ती डॉलर ट्रिलॉजी मधल्या "मॅन विथ नो नेम" कॅरेक्टरची किंवा गॉट मधल्या "नो वन" कॅरेक्टरची कबर असेल.
प्रेमात पडायला एखादा माणूस खुनी नाही ही एकमेव कसोटी असलेल्या हिरॉइन्स थोरच म्हणायला हव्यात. जनरल पब्लिक उगाचच नोकरी, स्वभाव, कॅरेक्टर आणि मुळात ही व्यक्ती आपल्याला आवडते का वगैरे बघत बसतात. त्यापेक्षा पिक्चर मधल्या हिरॉइन्सचे लॉजिक सोपे आहे. तू खुनी नाहीस? से नो मोअर.
मंदिराचा पुजारी "जलसा" ऑर्गनाइज करतो हे ही एक अफाट आहे बाय द वे, त्या सर्वात पहिल्या दोन खुनांचा उलगडा होतो का? आणि आजा मेरी जान नावाचा काही संबंध आहे का कथेशी?
ते सतत तिला घाबरून पळत असावंसं वाटतं. >>> पिक्चर मधे हिरॉइनला घाबरून पळणारे प्राणी यावर र्म्द एक प्रबंध लिहू शकेल आता
बिना नाम वाल्या कबरीची काय
बिना नाम वाल्या कबरीची काय भानगड आहे? >>> ती व्हॉल्डेमॉर्टची असेल
बाय द वे, त्या सर्वात पहिल्या दोन खुनांचा उलगडा होतो का? >>> होतो होतो. पहिल्या पुजार्याचा खून होतो कारण तो या तस्करीत सामील असतो आणि लोकांना ब्लॅकमेल करू पाहतो. रागिणीचा खून होतो कारण ती ४०२, ११२ आणि ७६० ला तस्करी बिझनेस एक्स्पान्शनच्या गोष्टी करताना ऐकते.
पण खरी गंमत अशी आहे की रागिणी ही चर्चा ऐकते आणि त्यांच्या हाती लागते वगैरे डिटेल्स चांद सगळ्या उपस्थितांना ऐकवतो. हे सगळं त्याला कुठून कळतं?
आणि आजा मेरी जान नावाचा काही संबंध आहे का कथेशी? >>> नावाचा कथेशी संबंध ही एक अंधश्रद्धा आहे
सहीच!
सहीच!
पिक्चर मधे हिरॉइनला घाबरून पळणारे प्राणी यावर र्म्द एक प्रबंध लिहू शकेल आता >> +१ अगदी अगदी.
हे 'गुंतता हृदय हे' मालिकेतल्या संदीप कुलकर्णीच्या मागे लागलेल्या बायकांच्या संख्येइतकंच अनाकलनीय प्रकरण आहे >> हा अशक्य उच्च कोटीचा रेफरन्स आहे _/\_
क्रिशनकुमार नव्हे. तो अपात्र आहे >> तिला नेमकं साप दिसायचंय, घुबड दिसायचंय की वाघ हे नीटसं समजत नाही >>
त्या काडेपेटी-ग्रेव्हयार्ड सीनमध्ये तो ४०२ नंबर ज्या अॅक्सेंटमध्ये मैं चार शून्य दो, फोर जिरो टू म्हणतो ती एक अलग व्हाईब आहे. - https://youtu.be/H22lDzUo-z4?t=8552
या सिनेमाचा व्हिलन अॅक्टर इतका अनपेक्षित अॅक्टर आहे की रिव्हिल नंतर प्रेक्षक थोडा वेळ श्वास रोखून बसले असतील की आणखी एक ट्विस्ट येईल आणि या व्हिलनचाही कोणीतरी बॉस दाखवतील पण तसे होत नाही. नाही म्हणायला त्या काडेपेटी सीनचे एक इंटरप्रिटेशन असे करता येईल. ४०२ स्मगलर कम व्यापारी आहे, ज्याच्याशी संबंधित कलम ४०२ आहे. भ्रष्ट पोलिस ११२ आहे आणि पोलिस खात्याच्या कामात अडथळा आणण्याशी संबंधित कलम ११२ आहे. कलम ७६० असे कोणते कलमच नाही, तसेच ज्या अॅक्टरचे व्हिलन म्हणून अस्तित्वच नाही तोच या सिनेमाचा व्हिलन!
दो दुनी चार, चार दुनी सोला >> जेव्हा एखाद्या सिनेमाचे पॉप कल्चरमध्ये रेफरन्सेस यायला लागतील तेव्हा त्याच्या फॅन फॉलोइंगवर शिक्कामोर्तब झाले असे म्हटले तर - https://youtu.be/SI4-M59Ke3A?t=449
४०२ स्मगलर कम व्यापारी आहे,
४०२ स्मगलर कम व्यापारी आहे, ज्याच्याशी संबंधित कलम ४०२ आहे. भ्रष्ट पोलिस ११२ आहे आणि पोलिस खात्याच्या कामात अडथळा आणण्याशी संबंधित कलम ११२ आहे. कलम ७६० असे कोणते कलमच नाही, तसेच ज्या अॅक्टरचे व्हिलन म्हणून अस्तित्वच नाही तोच या सिनेमाचा व्हिलन >>> दंडवत _/\_
एकूण पिक्चर पाहता त्यांनी एवढं डोकं लावलं असेल असं वाटत नाही. But I like the way you think
सिनेमाचे पॉप कल्चरमध्ये
सिनेमाचे पॉप कल्चरमध्ये रेफरन्सेस यायला लागतील>>> माझा पण दंडवत _/\_
डायरेक्ट एफ आय आर चा एपिसोड काढलास पायस!! अरे इनीस्पेक्टर चौटाला पण आणलीस इकडे
४०२ स्मगलर कम व्यापारी आहे,
४०२ स्मगलर कम व्यापारी आहे, ज्याच्याशी संबंधित कलम ४०२ आहे. भ्रष्ट पोलिस ११२ आहे आणि पोलिस खात्याच्या कामात अडथळा आणण्याशी संबंधित कलम ११२ आहे. कलम ७६० असे कोणते कलमच नाही, तसेच ज्या अॅक्टरचे व्हिलन म्हणून अस्तित्वच नाही तोच या सिनेमाचा व्हिलन
>>>
Pages