पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - शेवट (६)

Submitted by साक्षी on 5 July, 2024 - 05:29

भाग ५

वर पोचलो, एक-दोन फोटो काढले आणि मला जाणवलं मला बरं वाटत नाहीये. मला मळमळायला लागलं. बोचरा वारा, त्यामुळे थंडी आणि मळमळ यामुळे मी अस्वस्थ झाले. पिंढारीला मला high altitude चा थोडासा त्रास झाला होता. असंच मळमळलं होतं, त्यामुळे तोच त्रास असं वाटलं. ट्रेक लिडरला सांगायला गेले पण 'मळमळणे' या शब्दाला हिंदी किंवा इंग्लिश मधे काय म्हणावे तेच सुचेना. कसंतरी त्याला समजलं. त्याने विचारलं काय खाल्लं आहेस आणि कधी? तेंव्हा जाणीव झाली की रात्री कुडकुडत उपमा खाल्ला त्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं. वाटेत तोंडात टाकायला दाणे-चणे-फुटाणे, सफरचंद वगैरे दिले होते पण वेळेत पोचायच्या नादात हे खायची आठवणही झाली नाही. या ५ तासाच्या मेहनतीत तो उपमा कधीच पचून गेला होता. खायची इच्छा होत नव्हती तरी सफरचंद खाल्लं आणि ५-७ मिनिटांत मळमळणं थांबलं. Happy

मग त्यानंतर परत फोटो वगैरे काढले. जिथून ३६० डिग्रीतून हिमालय बघता येतो. नंदादेवी, चौखंबा, गंगोत्री अशा कितीतरी प्रसिद्ध रेंजेस दिसतात. अगदी खरं सांगते, हे कितीही वेळ बघत बसलो तरी पुरेसं होत नाही. भानावार आल्यावर मला स्पेशल समिटसाठी ठेवलेल्या गुळपोळीची आठवण झाली. त्या थंडी, वार्‍यात गुळपोळी खायला आणि सगळ्यांना तुकडा तुकडा वाटायला मजा आली. रेसिपीचं कौतुक झाल्याने शायनिंग मारून झाली.

समिटचा दिवस नेहमीच जरा अवघड असतो. जितके वर आलोय, तितकं परत खाली जायचं असतं, तेही लगेच. आमच्यातले काही जण अजुनही पोचायचे होते. गाइड्स त्यांना घेऊन येत होते. आता सगळ्यांना उतरायची आठवण होऊ लागली. जमतंय तसं उतरायला लागा सांगितल्यावर आम्ही काहीजण परतीच्या वाटेवर लागलो. आता उतरताना स्वच्छ उजेड होता. गप्पा मारत रमत गमत उतरत होतो. काही लोक (आमच्या ग्रुपमधले नव्हते) तो दगड, सिमेंट्चा इतक्या मोठ्या वळणाचा रस्ता सोडून सरळ खाली (शोर्ट कट) येत होते. त्यात २-३ जणांच्या डोक्यात पळत उतरण्याचं कुठून आलं कोन जाणे, ते धावत उतरत असताना थांबले. त्यांच्यातल्या एकाला असा पटकन स्पीड कमी करता आला नाही, त्यात पाठीवर जड बॅग! त्याचा तोल गेला आणि आमच्या समोर तो गडगडत पुढे गेला. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याची जीवनरेषा मोठी असणार! बॅगमुळेच गडगडण्याचा स्पीड कमी होऊन तो माणूस पुढच्या खोल खड्ड्याच्या/दरीच्या जरा अलिकडेच थांबला. बरोबरचे दोघे तिघे त्याच्यापाशी गेले. तो उठून बसला पण शॉकमधे होता. सगळं ठिके बघून आम्ही पुढे गेलो. अर्थातच पुढे थोडावेळ चर्चेला तो विषय पुरला.

तुंगनाथ मंदिर उघडले होते. बरीच लोकंही आली होती. दर्शन, फोटो कार्यक्रम उरकून ठरलेल्या ठिकाणी नाष्ता केला. आलू पराठे आणि कॉफी दोन्ही छान होतं. प्रसाद, मॅग्नेट, सोवेनिअर वगैरे सगळं झालं आणि उतरायला सुरूवात केली.
तुंगनाथ मंदिर
tungnaath1.jpg
अजुन एक
tungnaath2.jpg
येताना तशी घाई नव्हती. उतरताना काय उजेड आहे, आता पटापट उतरू असं वाटलं होतं पण तुंगनाथला यात्रेकरू मोठ्या प्रमाणात येतात. ज्येष्ठ किंवा ज्यांना शक्य नाही त्यांना खेचरांच्या पाठीवर बसुन जाण्या-येण्याची सोय आहे, त्यामुळे खेचरांची भरपूर गर्दी होती. चढणारे लोकही होतेच. त्यात वाटेवर खेचरांची विष्ठा पडली होती. खेचरांचे हाल होतात यात! त्यात एक माणूस २-३ खेचरांना संभाळत असतो. त्यांना रोजचं असल्याने मालक फार लक्ष देत नाहीत, त्यामुळे एखादं खेचर उलट्या बाजूला, आपल्या अंगावर कुठेही भरकटत असतं. यामुळे आपलीही गती मंदावते. अर्थात समिटचा आनंदापुढे हे सगळं फारसं लक्षात ठेवण्यासारखं नाही. तुंगनाथ रस्त्याने उतरताना भरपूर हौशे, नवशे अजुन किती वेळ विचरतात. त्यांना नाउमेद कधीच करू नये. तुम्हाला नक्की जमेल, जात रहा असं सुचेल ते सांगत आम्ही चालत राहिलो. ट्रेक सुरू होण्याच्या आदल्या रात्रीच ट्रेक लिडरने 'अजुन किती वेळ आहे?' हा प्रश्न विचारायचाच नाही, पण सगळा ग्रुप मिळून फक्त दोनदाच ही चुक करू शकाल असं सांगितलं होत.
Happy तुंगनाथ रस्त्यावर खेचरांच्या विष्ठेची घाण होती. नंतर चोपटाला बघितलं तर रस्त्यवर कचराच कचरा. शहरातून बाहेर पडून पहाडीत शिरताना यात्री निवास आणि गोठे आहेत तिथे तर कचर्‍याचंच साम्राज्य! रात्री आम्ही इथूनच गेलो होतो. कचरा असल्याची जाणीव झाली होती तरी तेंव्हा उजेडात त्या भागाची परिस्थिती बघून हताश व्हायला झालं. indiahikes ने आम्हाला इको बॅग्स दिल्या होत्या. आमच्या कमरेला तिथेही त्या होत्या पण हा कचरा बघून त्यांचा तोकडेपणाही जाणवला. आपण माणसंच निसर्गाला कसे हानिकारक आहोत ह्याचं दर्शन झालं.

दहा वाजता आम्ही एक ग्रुप बनियाकुंडला परत आलो. दुसरा ग्रुपही पुढच्या तासाभरात पोचला. इथून खाली केदारनाथ रस्त्यावर आम्हाला घ्यायला गाड्या आल्या आणि आम्ही सारीला परत आलो. ट्रेक इथे संपतो. सारी ला म्हणजे बेस कॅम्पला indiahikes चे ट्रेक पूर्ण झाल्याचे टीशर्ट्स, मग, बोट्ल्स वगैरे घेता येतं. सारीला त्या रात्री राहून आम्ही दुसर्‍या दिवशी परत ऋषिकेशला आलो.

काही राहिलेले फोटो दाखवते
वर समिटला एक शंकराचं मंदिर आहे त्याचा फोटो दाखवायला विसरले
summit.jpg
हा पूर्ण रुटचा मॅप (यात समिट नाहीये)
fulltrekroute.jpg
हे आम्ही चौघे जे पुण्याहून ह्या ट्रेकसाठी निघालो.
मी, समीर (नवरा) , परेश, प्रणव
caughe.jpeg
हे आमचे लोकल गाईड. डावीकडचा विजय, उजवीकडे मनोजजी
VijayManoj.jpg
दोघांच्या मधे किचन क्रु
Crew.jpg
ट्रेकला जाण्या आधी ऋषिकेशला राहिलो, तेंव्हा कुठे जेवायचं बघताना जरा घाबरतच त्यांची लोकल थाळी जेवलो. ती अप्रतिम होती. थाळीचा फोटो काढायचा विसरलो पण हा मेन्यूचा फोटो काढून ठेवलाय.
Thali.jpeg
९०% फोटो काढलेत ते ह्याने..परेश
Paresh1.jpg
त्याचेही चांगले फोटो काढून दिलेत आम्ही Wink
Paresh2.jpg

मी आणि समीर
Both2.jpeg
सूर्योदय होताना
Both1.jpeg

एक गोष्ट सांगायची राहिली...ऋषिकेशला भारतातील सगळ्यांत उंच बंजी जंपिंग आहे. जाताना आणि येताना दोनदा दिसलंय आणि ते मला खुणावतंय Wink

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकामागोमग एक वाचून काढले. खत्तरनाक एकदम Happy

त्याचा तोल गेला आणि आमच्या समोर तो गडगडत पुढे गेला. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याची जीवनरेषा मोठी असणार! बॅगमुळेच गडगडण्याचा स्पीड कमी होऊन तो माणूस पुढच्या खोल खड्ड्याच्या/दरीच्या जरा अलिकडेच थांबला >>> हे वाचताना श्वास नकळत रोखला गेला होता तो वाचला हे वाचेपर्यंत

छान झाला सगळाच ट्रेक!
असं घसरून पडणं म्हणजे फारच भीतीदायक!
मी जीएमआरटीत (नारायणगावला) रहात असताना मोठा ग्रुप मिळून हडसरगडावर गेलो होतो. ऑफिसमधल्या एका मॅडमच्या ओळखीचे एकजण त्यांच्या चौथी-पाचवीतल्या मुलाला घेऊन आले होते. उतरत असताना तो मुलगा असाच खाली गडगडला.. बापरे आमचा सगळ्यांचाच अक्षरशः थरकाप झाला. तसं त्याला बऱ्यापैकी लागलं असणार. पण त्याचे वडील त्या मानाने शांत राहिले. ते धावत त्याच्यापर्यंत पोचले. लगेच त्याला उचलून घेतलं आणि ते आणि त्या मॅडमचा नवरा, असे दोघे लगेच त्याला घेऊन भराभर खाली उतरून गाडीत बसून पुढे गेले. खूप गंभीर काही घडलं नाही सुदैवाने.