पॉझ..अनपॉझ

Submitted by कविन on 3 July, 2024 - 06:30

दिवस कुठचातरी. मेडीटेशनचा ऑनलाईन वर्ग मध्यात आलाय. प्रि रेकॉर्डेड व्हिडीओ समोरच्या स्क्रिनवर सुरु आहे. पार्श्वसंगीत म्हणून हरिप्रसाद चौरसियांची बासरीची धून वाजतेय.

व्हिडीओमधे प्रशिक्षक पद्मासनात बसून सुचना देतोय, "डोळे मिटा…अंग सैल सोडा"

प्रि रेकॉर्डेड व्हिडीओ बघताना एकाचवेळी कनेक्टेड आणि डिसकनेक्टेड वाटतं मला, no strings attached type काहीसे. पण ते चांगलं आहे की नाही हे मात्र अजून कळले नाहीये.

बासरीच्या धूनच्या मध्येच आत्ता विश्राम सूचीत करणारा असा एक बेलचा आवाज ऐकू आला कानाला. माझ्या विंडचाईमचाही एक बारीकसा आवाज त्यातच मिक्स झाला. तंद्री भंगायला इथे कोणी मेनका असायची गरजच नाही कारण मुळात इतकी खोल तंद्री लागायला मी विश्वामित्र नाही.

डोळे उघडायच्याच बेतात होते मी पण त्याआधीच प्रशिक्षकाचा आवाज कानावर पडला,"सगळ्या नकारात्मक भावनेला उच्छ्वासावाटे बाहेर सोडा" "त्रासदायक घटना, नकोशा आठवणी यावर पांढरा रंग फासा आणि मनाचा कॅनव्हास कोरा करा."

माझा हात मात्र आपोआपच पॉझकडे गेला.
मी पहिल्या पावलावरच थबकलेय. हे अंग सैल सोडा म्हणून सुटत नाही इथे आणि म्हणे कॅनव्हास कोरा करा!

आठवणी म्हणजे काय अशी चिमटीत पकडता येणारी गोष्ट आहे का, धरुन बाहेर सोडता यायला?

हे मेडीटेशनच एक फार्स आहे च्यायला. असं काही सोडलं म्हणून सुटत नसतं. त्वचेसारखं ते चिकटलेलं असतं आपल्याला. खरवडून काढायला जावं तर सालटं निघतात. आतली गुलाबी त्वचा बराच काळ हुळहूळत राहते. कालांतराने पुटं चढतात पण बदलत मात्र काहीच नाही. नुसता बदलल्याचा भास होतो.

गीता मावशी म्हणतात, "तो विठोबा आहे ना माझा, तो लक्ष ठेवून असतो. त्याला काळजी जास्त."
माझ्या देवघरात असा एक विठोबा हवाय मला. मागचं सोडून, पुढच्याचा विचार टाळून निर्धास्त जगायला मदत करेल का तो?

पॉझ काढल्या काढल्या प्रशिक्षकाचं वाक्य कानावर पडलं "grounding is important" आणि इथे माझं मन आज जमिनीवर थांबायचंच नाव घेत नाहीये.

परत हात पॉझकडे…स्वयंपाक घरात चहाचं आधण चढलय. आलं ठेचण्याचाही आवाज आज जाणवतोय. नाक बरोब्बर चहाचा गंध टिपून घेतय. गीता मावशीच्या चहाची वेळ झाली म्हणजे आता पाण्याचीही वेळ झाली असणार. मांडीला रग लागलेय इतका वेळ बसून. पण मेडीटेशन सारखं पॉझवरच जातय. पुर्ण कधी होणार अशाने?

प्रयत्नपूर्वक करावा का प्रयत्नं? काढावा का पॉझ?

पॉझ काढला तर आता दीर्घ श्वास घ्यायला सांगतोय प्रशिक्षक. दीर्घ म्हणजे इतका की तो सगळ्या श्वसनमार्गाला स्पर्श करत बेंबीच्या देठापर्यंत पोहोचला पाहीजे.

मी दीर्घ श्वास घेतला खरा पण नुसता श्वास आत नाही आला, त्यासोबत आठवणीतला वाफाळत्या चहाचा गंध आत आत खोल झिरपला. आईचा स्पेशल टच असलेला चहा. चहाचा गंध आणि श्वासाला जाणवलेला आईचा स्पर्श. "या जगात शाश्वत फक्त अशाश्वतता आहे मनु. जगणं सोपं करायचं तर नुसतं स्विकारुन नाही चालत. नकोसं, बोचरं अस सारं गंगार्पण म्हणून सोडूनही द्यावं लागतं." आईचा कातर स्वर. स्पर्शासोबत आवाजही आठवणीतून झिरपत जातो का आत खोल खोल? की तो असतोच आत कुठेतरी रुतून बसलेला?

"हळूहळू उच्छ्वास सोडा. त्यासोबत साचून राहिलेलं बाहेर पडूदेत त्याद्वारे नकारात्मकता बाहेर पडूदेत." प्रशिक्षक एका मागून एक सुचना देतोय.

साचलं तर बरच काही असतं ना? राग, चिडचिड,अश्रू, प्रेम, लोभ .. तळ दिसत नाही इतकं काहीबाही साचलेलं असतं. त्यातून नकारात्मकाताच तेव्हढी जाईल बाहेर की आत्ता आत जाणवलेला आईचा स्पर्शही जाईल सोबत, आई गेली तसा? मी सतरा वर्षाची होते आई गेली तेव्हा.

आई जाणं महागात पडतं. प्रत्येकालाच पडतं ते. पण माझ्यासारख्या आपल्याच कोशात राहणाऱ्या, जगात वावरायला बुजणाऱ्या मुलीला तर दहापट महागात पडतं.

गर्दीत मी भांबावते. मला संभाषण रेटता येत नाही. म्हणजे मेंदूत तयार होतं संभाषण पण ते बाहेर पडताना ट्रेनचे डबे विस्कळीत व्हावेत रुळावरून तस होतं. कळपाने सामावून घ्यावे म्हणून फोल धडपड करणाऱ्या, वाट हरवलेल्या कोकरासारखी माझी अवस्था होते

अशा मुलीची आई गेली तर ती मुलगी जवळच्या म्हणाव्या अशा सख्ख्या नातेवाईकांसाठीही जबाबदारीच्या ओझ्याचा गुणाकार असते. महाग पडत आईच जाणं, इतरांच्या डोळ्यात फक्त काळजी आणि ओझं होऊन रहाणं, टर उडवली जाणं आणि हळूहळू आत्मविश्वासाचं पार पोतेरं होणं. हे सगळं बाहेर पडेल का उच्छ्वासासोबत?

प्रत्येक आठवण कृष्णविवरात खोल आत खेचत नेते. याला टाळणं हाच काय तो उपाय पण यावर कायमच क्लोजर नाही, परिसमाप्ती नाही याला. आणि मी क्लोजरच्या शोधात वेड्यासारखी भटकतेय.

माझी समुपदेशक मला दरवेळी सांगते, "स्वीकार करायचा असेल स्वतःचा तर काहीच नाकारुन चालत नाही. प्रत्येक जमून आलेली,बिघडलेली, हवीशी अनुभूती आणि नकोशीही जखम आधी स्वच्छ मनाने बघता यायला हवी. उन्हाळी भागात काम करायचेय तर सुर्याला दोष देऊन त्रास कमी होतो का? त्रास कमी करायचा तर ऊन असणं स्विकारुन सनग्लासेस सनकोट आणि अजून काहीबाही लागेल ते उपाय स्वतःचा बचाव करायला करावेच लागतात." तसच असतं म्हणे नकोशा परिस्थितीचं.

"माफ करायला शिका, दुसऱ्याला आणि स्वतःलाही. घटना, क्षण, माणसं सगळं एकदा डोळ्यासमोर आणा. राग,चीड, गिल्ट सगळ्याला सामोर जा. हळूहळू सगळ विरघळत जाईल." मेडिटेशन प्रशिक्षक सांगत रहातो. त्याचा स्वर आता आईच्या स्वरात भिजून आत झिरपत जातोय. पार्श्वभागी आईच्या आवडते बासरीचे स्वर आहेतच. खरतर हे पुरेसे जड आहे पाय घट्ट रुतायला पण मन बारीकशा फटीतूनही पळतय वेगाने इथे तिथे.
काय काय आठवतय त्याला. इतकं काही बाही बारीक सारीक तपशीलांसकट आठवतय की हे याआधीही होतं इथे? यावर माझाच विश्वास बसत नाहीये. सगळंच काही वाईटसाईट नाहीये यात खरतर. मधेच हलका सुगंध जाणवावा नाकाला, हलके स्मित यावे ओठावर, आणि एखादी लकेर गिरक्या घेत मनात फेर धरुन जावी आणि मधेच सॅंड पेपर घासत जातानाच्या आवाजाने कान बंद व्हावेत, थंडीने फुटलेल्या ओठांवर साधे पाणीही झोंबावे तसे सगळेच बरे वाईट कडू गोड क्षण मन परत परत जगून फिरून येतय.

"सोडून द्यायला शिका. Be in the present" प्रशिक्षकाच्या वाक्याने मन परत जागेवर आल असलं तरी मधल्या वेळेत बरच काही सुटून गेलेय हे जाणवतेय. व्हिडीओ आता शेवटच्या सत्रात पोहोचलाय. पण मला काही लक्ष केंदीत करायला जमत नाहीये.

लिंक सारखी तुटतेय. मी व्हिडीओ पॉझ करुन पाय जवळ घेऊन हाताचा विळखा देऊन बसून राहिले तशीच. बाजुला ठेवलेला पाण्याचा ग्लास रिओच्या पायाने कलंडला म्हणून भानावर आले.

काय झाले असावे याचा बरोब्बर अंदाज येऊन गीता मावशी फडकं घेऊनच आल्या पुसायला.

रिओ नाक घासून जवळ घे म्हणत होता. गीता मावशी त्यालाही उचलायला गेल्या तर छोट्याश्या पंजाने त्यांच्या हाताला बाजुला करुन दामटून माझ्या मांडीवर येऊन बसला. इतकुस्सा जीव. कापसाच छोट बंडलच जणू. आईच दूधही मिळाल असेल नसेल बिचाऱ्याला. आठवत असेल का त्याला इथे येण्याआधीच आयुष्य? त्याची आई, त्याची भावंडं? कसा काय पडला असेल हा एकटा?, वाट चुकला असेल कि याला कोणी मुद्दाम सोडला असेल? याला कधी आठवत असेल का पुर्वीचं? डोळे बोलतात त्याचे, पण कधी दिसत नाहीत त्यात पुर्वीचे व्रण.
दु:खद आठवणी त्याच्या वर्तमानाला कधीच झाकोळत नसतील का?

आला तेव्हा हडकुळा होता एकदम. पोटभर खाणही मिळाल नसाव कधी. दोन दिवस सारखी खा-खा सुरु होती नुसती. मग कळलं त्यालाच, इथलं अन्न संपत नाही. मिळतं भूक लागली की. मग जास्तीच अन्न सोडून द्यायला शिकला आपसूक. आता तर तोच वर्षानुवर्ष घराचा मालक आहे अशा रुबाबात वावरतो. परिस्थितीप्रमाणे पटकन बदलता कसं येत याला? हाच असेल का स्वीकार? हेच असेल का गंगार्पण?

"Count your blessings" समुपदेशक म्हणते. गीता मावशी म्हणतात, "विठोबा कुणालाच रिक्तहस्ते पाठवत नाही. ओंजळीतल अमृत ओळखता मात्र आलं पाहीजे ज्याच त्याला". मेडीटेशन प्रशिक्षक म्हणतोय,"अंग सैल सोडा. आत्ता आत घेतलेला श्वास, हा उच्छ्वास होऊन बाहेर पडणारच आहे. त्याचा ताल ओळखायला शिका. वर्तमानात जगायची सवय लावून घ्या." रिओ तर आत्ता सुरु असलेल्या क्षणात आरामात जगतोय. ना भूतकाळाचा दाह ना भविष्याची टोचणी. 'आज आत्ता' बस संपला त्याच्यासाठी विषय.

पर्र पर्र करुन आनंद व्यक्त करुन रिओ महाशयही आता गादीवर त्याच्या जागी जाऊन स्वतःला चाटत बसलेत निवांत.

हीच ती ट्रॅक्विलिटी. हे जमवायला हवं. गंगार्पण म्हणा वा श्रद्धा म्हणा किंवा नकारात्मकतेचा निचरा करणं म्हणा जमवायला हवं हे मात्र खरं.

आई म्हणायची तसं प्रत्येकजण युनिक असतो मग प्रत्येकाचा मार्गही युनिकच असेल का? असेल तर माझा मार्गही मिळेलच ना मला, आज ना उद्या!. मार्ग मिळत नाही हे अपयश नाहीच. मार्ग शोधायचा प्रयत्न सोडला तर ते अपयश असेल ना!. पण हे आधी स्वतःला शिकवायला हव. त्यासाठी स्वत:लाच तपासत चालत मात्र रहायला हवं. त्यासाठी पॉझ काढून चालत रहायला हवे, प्रवाही व्हायला हवे.

मगाशी पॉझ केलेली लिंक अजूनही पॉझ मोडवरच आहे. मी सुरु करेपर्यंत ती सुरु होणार नाही. पण बंद करेपर्यंत ती बंदही होणार नाही. एक पॉझ काढायची तेव्हढी खोटी आहे.

स्वयंपाकघरातून येणारा गरम फुलक्याचा गंध, स्वतःमधे रमलेला रिओ, मधूनच जाणवणारा विंडचाईमचा नाद आणि हे अनुभवत या खोलीत मेडीटेशन साधायचा प्रयत्न करणारी मी. आत्ता या घडीला यात जाणवत असलेला ताल माझ्यासाठी ट्रांक्विलायझिंग आहे, प्रसन्न निश्चल शांत परिपूर्ण आणि आश्वासकही आहे.

परत एकदा डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन ही ट्रॅंक्विलिटी आत खोल पसरत नेऊ पहावी वाटत आहे. परत एकदा 'अनपॉझ' करायला हात पुढे सरसावला आहे. मेडीटेशनचा व्हिडीओ आता संपतच आला आहे. बासरीचा सूर हळूहळू कमी होत गेला आहे. प्रशिक्षकाचा आवाज तेव्हढा कानामनात झिरपत आहे. "ॐ शांती शांती शांती |" शांती मंत्राचा जागर श्वास उच्छ्वास दोन्हीत आहे. पॉझकडून अनपॉझकडे - प्रवास आता प्रवाही झाला आहे.

Group content visibility: 
Use group defaults

छान.
मेडिटेशनच्या विडिओत मागे वाजणार्‍या मंद संगीतासारखंच लेखन.
उपमा म्हणून विठोबाचा वापर केलेला आवडला.
---
(ओंजळीतलं अमृत >>> घरी स्वयंपाकाला येणारी बाई इतकं छापील बोलते? Proud )

धन्यवाद Happy

घरी स्वयंपाकाला येणारी बाई इतकं छापील बोलते? Proud )>>> Lol माफी सरदार. लिबर्टी घेतली Wink

फार मस्त मांडलाय तिचा मानस-प्रवास. तिचे विचार. आई गेली की असाच स्वतः विचार करायला, समजूत काढायला शिकली असेल ती.