पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - चंद्रशीला (५)

Submitted by साक्षी on 1 July, 2024 - 23:33

भाग ४

रात्री उठून आवरलं तेंव्हा हवेत चांगलाच गारवा होता. कचकून थंडी पडली होती. रात्री १२ वाजता त्या थंडीत कुडकुडत असताना गरमागरम उपमा खायचा अनुभव चांगला उबदार होता.

समिटच्या दिवशीचा म्हणजे रात्रीचा काय प्लॅन आहे ते आदल्या दिवशीच सांगितले होते. सुरुवातीचे १.५ किलोमीटर आम्हाला सगळ्यांनी एकत्रच जायचं होतं. अंधार असल्याने पुढे मागे असे ग्रुप्स न करता एकत्रच जायचं होतं. लिडर आणि दोघे गाईड हेच तिघांना लाईन सोडायची परवानगी होती. आम्हाला त्यांनी पेसप्रमाणे उलट्या क्रमाने लायनीत उभे केले. कुडकुडत निघालो होतो. सगळ्यांना ३ लेअर तरी घालायचेच असं सांगितलं होतं. त्या अंधारात आम्ही हेड टोर्च लावून लयनीत जाताना काजव्यांसारखे दिसले असु, पण कुणी याचा फोटो घेतलाच नाही. अंधारात अगदी सावकाश मुंगीच्या गतीने आम्हाला हे १.५ किमी पार करायला १ तास लागला. चोप्ताला पोचलो. छोटा ब्रेक घेतला आणि वर बघितलं तर चांदण्यांनी भरलेलं आकाश! नजारा डोळ्यात साठवून घ्यावा तितका कमीच! आय फोन आणि चांगले कॅमेरा वाल्यांनी अर्थात परेशने फोटो काढले, आम्ही ती दृष्य डोळ्यांतच साठवून घेतली.
Stars.jpg
इथून पुढच्या सुचना दिल्या. पुढचे ३.५ किमी ट्रेक करून आम्ही तुंगनाथ मंदिराजवळ पोचणार होतो.

उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तुंगनाथ मंदिर हे जगातील सगळ्यांत उंचावरचे शिवमंदिर आहे. इथे फक्त ट्रेकर्स नाही तर यात्रेकरूही मोठ्या प्रमाणावर जातात. याचा एक फायदा असा झाला की अंदाजे ३.५ किमीचा हा रस्ता हा सिमेंटचा बांधलेला होता. मात्र प्रचंड स्टीप होता. आम्ही रात्री चढणार असल्याने यात्रेकरूंची गर्दीही नसणार होती.

इथे आम्हाला आपापल्या पेसने चढायची परवानगी दिली हे फार बरं झालं. कारण आपल्या कपॅसिटीच्याही स्लो पेसने जाताना जास्तच दमल्यासारखं वाटलं. काही सुचना पाळायच्या होत्या. सिमेंटचा रस्ता सोडून कुठेही जायचं नाही. एकटं रहायचं नाही. गती कमी होतेय असं वाटलं तर सरळ मागे थांबून मागच्या ग्रुपला जॉईन करायचं. आपापले पेसवाले कोण आहेत बघा म्हणताच स्वप्ना आणि मी एकमेकींकडे आशेने बघितलं आणि नजरेत होकार दिसला. Happy हा महत्वाचा असा दुसरा टप्पा सुरू झाला आणि तो किती कठिण आहे ते कळत गेलं. ८५२० फूटांवारून १२००० फूट वर जाणार होतो. झिगझॅग अशी ११ वळणं पार करायची होती. प्रत्येकाकडे २ लिटर पाणी असायलाच पाहिजे असं सांगितलंच होतं. मजल-दरमजल करत अंतर पार करत होतो. मधे मधे वॉटर ब्रेक घेत होतो. गप्पा केंव्हाच बंद झाल्या होत्या. विजय आणि मनोजजी आमचे लोकल गाईड सतत पुढे मागे करत, वॉकी-टॉकीवर बोलत सगळे व्यवस्थित येत आहेत, बरोबर रस्त्यावर आहेत ना बघत होते. मानसिक बळ देत होते. थांबू नका, सावकाश पण पुढे जात रहा, दमलात तर पाच मिनिटं उभं रहा पण बसु नका असं काय काय सांगत होते. माझं आणि स्वप्नाचं ट्युनिंग मस्त जमलं होतं. आणि आम्ही तुंगनाथला पोचलो. मोठ्ठा आणि महत्वाचा टप्पा पार पडला. जरा वेळ टेकलो, पाणी प्यायलो. अंधारात अजुन एक रस्ता दिसत होता त्यामुळे जरा साशंक झालो, पण एक दोन माणसं ज्या रस्त्याने जात होती तिकडे गेलो, विचारून खात्री केली आणि हार्ट बीट्स एकदम नोर्मलला येण्याआधी पुढच्या प्रवासाला निघालो.

तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली. तिसरा टप्पा फक्त १/२ ते ३/४ किमी उरलंय. हे ऐकायला जितकं सोपं वाटत होतं तितकं पार करायला अजुन अवघड! पण आता फक्त समिट दिसत होतं आणि सूर्योदयापूर्वी तिथे पोचणं हे ध्येय! इथेही सतत वळणं येत होती. प्रत्येक वळणावर वाटे, हे शेवटचे वळण आणि आपण ध्येय गाठणार! मधे एक दोन जणं हताश होऊन बसलेले दिसले. त्यांना चला म्हणत एक एक पाऊल टाकत आम्ही पुढे जात राहिलो. मधेच एका टप्प्यावर वर बघितलं तर तर तिरका कडा दिसत होता. मागे मस्त चांदणं आणि त्या बॅकग्राऊंडवर पुढे आमच्या पुढे असलेल्या चार जणांची फक्त silhouette.. हे इतकं अमेझिंग होतं की बघतच बसावं! पण वेळ कुठे होता. स्तिमित झालेली मी क्षणात भानावर आले. फोन बाहेर काढून फोटो काढण्याइतकी एनर्जी खर्ची घालवायची नव्हती. ते बघून असंच वाटलं की हे शेवटचं वळण, पण हाय! ते वळण संपलं आणि बघितलं तर अजुन शिल्लक होतंच. पोटात किंचीत भिती वाटली. सूर्याची किरणे दिसायला लागली होती. मी जराशी निराश झाले पण स्वप्नाला काय झालं कोण जाणे. Don't worry, Let's go असं काहितरी ती म्हणाली आणि अंगात पॉपाय (म्हणजे कोण ते इथे बघा) आल्यासारखी झपझप चालु लागली. मला तिथेच पुढे गेलेले ३-४ जणंही दिसु लागले. सूर्योदय व्हायचा आहे असं कुणितरी म्हणालं आणि परत उधाण भरलं. यानंतरची १० मिनिटं खरंच कठिण होती, अंतर संपतच नव्हतं. नवरा आणि मी आता एकत्रच होतो. त्यानेही थोडासा धीर दिला आणि येस! आम्ही वर पोचलो! सूर्योदयाच्या ५-७ मिनिटे आधीच वर पोचलो!
पोचलो तेंव्हाचं दृष्य असं होतं
BeforeSunrise1.jpg
हा अजुन एक
BeforeSunrise2.jpg

यानंतर ५ मिनिटांत सूर्योदय झाला आणि निसर्गाचे आणखी अविष्कार बघायला मिळाले
Sunrise1.jpg

दूर दूर पर्यंत पसरलेल्या पर्वत रांगा
Ranges1.jpg
बर्फाच्छादित
ranges.jpg

आणि हे mandatory फोटो
Summit.jpg
ग्रुप फोटो! यात सगळा ग्रुप नाहीये. अजुन काही जण पोचले नव्हते.
Summit1.jpg
आम्ही रात्री १ वाजल्यापासून पहाटे ५:१५ पर्यंत चढत होतो. दमायला तर होतंच पण 'We Did It!' हे फीलिंग अमेझिंग असतं, आणि या फीलिंगसाठीच अजुन खूप खूप ट्रेक्स करायला मिळावेत ही इच्छा आहे. Happy

भाग ६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी, वाचतानाही श्वास फुलला. खरच ग्रेट! रात्रीचा ट्रेक हा एक अविस्मरणीय अनुभव असणार, त्या एका फोटोत अंदाज आला.
सिलहाऊटचं वर्णन इतकं जमलय की फोटो नसूनही डोळ्यासमोर आलं सगळं...
वरतून दिसणारी पर्वतराजी अन सुर्योदय तर बेस्टच. डन चा फोटो - कुडोज!

सगळ्यांचे आभार!

सिलहाऊटचं वर्णन इतकं जमलय की फोटो नसूनही डोळ्यासमोर आलं सगळं...>> हे कायमसाठी डोळ्यांत साठवून ठेवलंय Happy