बनियाकुंड हा आमचा पुढचा आणि शेवटून दुसरा टप्पा होता. पहाटे उठून का खाजतंय म्हणून पाय बघितला तर जळवा लागलेल्या दोन ठिकाणी लालेलाल झालं होतं आणि किंचीत सुजलं होतं. जळू लागलेली दिसली मात्र नव्हती म्हणून लिडरकडून जळूचंच आहे ना हे फक्त कन्फर्म केलं आणि निवांत झाले. त्या दिवशी नाष्त्याला पोहे आणि डोसे असं ठेवून आयोजकांनी मला आणि माझ्या बँग्लोरी मैत्रिणींना एकाच वेळी खुश करून टाकलं. भरपेट नाष्ता करुन निघालो होतो.
पहाटे सूर्य डोंगराच्या मागे उगवत होता, आम्हाला त्याची फक्त फाकलेली किरणं दिसत होती. याचा छान फोटो मात्र नाहिये.
सूर्य अजुन वर आल्यावर
स्यालमी ते बनियाकुंड हा टप्पा बघायला गेलं तर अगदी छोटा वाटतो, कारण ट्रेकचं अंतर निव्वळ साडे पाच किलोमीटर! पण बर्यापैकी असेंट होता. दमायला होत होतं. बनियाकुंड ८५२० फूट उंचीवर आहे.
साधारण एका पेसचा चमु एकत्र चालतो आणि २-३ ग्रुप्स टप्प्याटप्प्यात पोचतात, असं ठरवून नाही तरी आपोआप घडत जातं. आजच्या ट्रेक मधे मला अगदी तंतोतंत माझ्याच गतीची मैत्रीण मिळाली. बँग्लोरवासी स्वप्ना अंदाजे माझ्याच वयाची आणि माझ्याच पेसची असल्याने जरा जास्त गप्पा झाल्या. त्यात तिही आयटी आणि मीही! मग तुझं काम माझं काम, तुझा मुल माझं मुल असे बेसिक टॉपिक्स झाले. मी आतापर्यंत फक्त ऑफिससाठी आणि ऑफिसची भाषा म्हणूनच इंग्लिशकडे बघत आलीय. तिथे या दक्षिणेकडच्या स्वप्ना आणि इतरजणांमुळे इंग्लिशमधून वायफळ गप्पाही मारल्या.
जाताना जंगलात एका झाडावर या अस्वलाच्या नखांच्या खुणा बघायला मिळाल्या. नंतरच्या ब्रेकमधे लगेच मनोजजींकडून असे स्थानिकांचे अशा स्वापदांशी सामने झाल्याचे एक दोन किस्से ऐकले.
दमणूक होणारा असला तरी अशक्य सिनिक होता. घनदाट जंगल हे तर रोजच असायचं इथे जोडीला मधे एक मस्त नदी ओलांडली. नदीच्या नावासकट सगळं मोहक! नदीचं नाव आकाश कामिनी! तिची झलक बघा
नदी ओलांडण्यासाठी छोटा जुगाड पूल बांधलेला आहे. अतिवृष्टी झाल्यास हा पूल वाहूनही जातो. पण पाण्याची पातळी कमी असते तेंव्हा पाण्यात उतरूनही नदी पार करता येते. नदी पार केल्यावर थोडं चढण चढल्यावर एक कुरण लागलं. इथे दगडांपासून बनवलेल्या मेंढपाळांच्या झोपड्या दिसल्या. उन्हाळ्यात, स्थानिक लोक त्यांच्या गायी, शेळ्या, मेंढ्यांना घेऊन इथेच रहातात. इथून थोडे पुढे गेलो की औषधी वनस्पतींची नर्सरी लागते. साईटच्या अगदी जवळ आल्याची महत्वाची खूण!
आणि इथून जरासं चढून पुढे गेलो तिथे अचानक एक मॅगी पॉईंट आणि पुढे रस्ता दिसला. हा केदारनाथकडे जाणारा रस्ता! किती दिवसांनी रस्ता बघतोय असं वाटत होतं.
इथून जवळच असलेल्या आमच्या कँप साईट्ला पोचलो.
जोरदार हसण्या-खिदळण्याचे आवाज आले. आमच्या आधीचा ग्रुप त्यांचा समिट होऊन परत आला होता. त्यांना परत ऋषिकेशला घेऊन जाण्यासाठी गाडी येत होती, तिची वाट बघत ते थांबले होते. दमून येऊन त्यांना बघून, CBSC ची वार्षिक परीक्षा आधी व्हायची आणि आम्ही SSC वाले आमची परीक्षा संपण्याची वाट बघायचो तेच आठवलं. अर्धे लोकं आले होते, अर्धे यायचे होते. दुपारच्या जेवणाला भरपूर अवकाश होता. आमच्यातल्या गुज्जुने भरपूर खाऊ आणलेला, तो बराच शिल्लक होता.होऊन जाऊद्या म्हणून त्याचे, आमचे एक एक खाऊचे पुडे सोडले. हळीव लाडू, पौष्टिक लाडू संपले. गुज्जुचे खाकरे संपले आणि त्याने ठेपले काढले. त्याला ठेपल्यांबरोबर तोंडी लावायला लोणचं हवं होतं ते मिळेना. खाऊ परत घरी न्यायचा नव्हता (बायकोने ताकिद दिली असेल ) पण कोरडे ठेपले संपणं कठिण होतं. इतक्यात परेशला त्याचा कांलम (कांदा लसूण मसाला) आठवला आणि ठेपले प्रश्न सुटला. गुजराती ठेपल्यांवर महाराष्ट्रियन कांलम घालून ठेपल्याचेही wrap बनवून आम्ही बरोबरच्या दक्षिणेच्या मंडळींनाही खाउ घातले. सगळेच ह्या fusionने काय खुष झाले म्हणून सांगु!
साइटचा दुसर्या बाजूने उंचावरून फोटो
या साईटवर आम्ही सगळ्यांत कमी वेळ होतो पण होतो तो सगळा वेळ अगदी हॅपनिंग होता. आमचं वेळापत्रक आता पूर्ण बदलणार होतं. त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता जेवून ७ वाजता झोपायचं होतं. रात्री ११-११:१५ ला उठून, आवरू,, नाष्ता करून १२-१२:३० वाजता समिटसाठी निघायचं होतं. ६ वाजता जेवणं, ७ वाजता झोपणं आणि रात्री ११-११:१५ उठणं सगळं एकापेक्षा एक कठिण होतं त्यात थोडा थोडा पाऊस पडायला लागला. ७:३०-८ वाजता झोप झोप असं स्वतःला समजावत होते. पाऊस वाढला. तुफान कोसळत होता. टेंटवर थेंबांचा आवाज अजुनच मोठा येत होता. मला झोप लागत नव्हती. पाऊस थांबून आकाश स्वच्छ होणार याची गाइडला खात्री होती पण तरीही worst case मधे समिट रद्द करणे हाच पर्याय होता. कधीतरी मला झोप लागली आणि ११:३० वाजता उठले तेंव्हा पाऊस पूर्ण थांबला होता.
वाचतोय नदी फोटो अतिसुंदर आहे
वाचतोय
नदी फोटो अतिसुंदर आहे
फोटो सुरेख आहेत
फोटो सुरेख आहेत
ट्रेक अफलातून सुंदर झाला असणार
भारी !
भारी !
या शृंखलेतला सर्वोत्तम लेख!
या शृंखलेतला सर्वोत्तम लेख!
वाह, तुझ्यासोबत चालले.
वाह, तुझ्यासोबत चालले.
अस्वलाच्या खुणा, खळाळती नदी, केदारनाथकडे जाणारा रस्ता, सगळ्च मोहून टाकणारे.
जळू किस्सा भितीदायकच. खरच कळलच नाही? नंतर काही त्रास झाला का ग?
बंगलोरवासी हे मी चक्क
बंगलोरवासी हे मी चक्क बांगलादेशी असं वाचलं?? !!!
अस्वलाच्या नखोड्या डेंजर एकदम !!
खरच कळलच नाही? नंतर काही
खरच कळलच नाही? नंतर काही त्रास झाला का ग? >> खरंच काही कळत नाही. या आधीही जळू लागलीय मला. नंतरचा त्रास म्हणजे खाज सुटत रहाते. पुढचे किमान ३-४ महिने. आधी लागलेल्या जळूचा डाग अजुन मिरवतेय, तोवर या नविन खुणा!
बंगलोरवासी हे मी चक्क बांगलादेशी असं वाचलं?? !!!>> हा हा , नव्हतं कुणी
एक युके वासीय डॉ होता. आमच्यापेक्षा जास्त भारत फिरून झाला होता. हिंदी शिकत होता