पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - स्यालमी(३)

Submitted by साक्षी on 1 July, 2024 - 03:15

भाग २

सुर्यास्तानंतर तळ्यावरून परत आलो. जेवणं उरकून लवकरच टेंटमधे गेलो. ४ जणांच्या टेंट मधे ३ बँग्लोरच्या मुलींबरोबर मी होते. लवकर झोप तर लागली पण १२ वाजता टोयलेट टेंटला भेट द्यावी लागली. अर्थात सगळ्या एकत्रच गेल्याने फार त्रासदायक वाटले नाही.

इथेही पहाटे लवकरच जाग आली. ठरलेले रुटिन पाळून ८:१५ ला आजच्या मोहिमेवर निघालो. हा दुसरा दिवस होता. डिफिकल्टी लेवल थोडी वाढणार होती. पूर्ण ट्रेक ९ किमी असणार होता, पण आज उतरून जायचं होतं म्हणजे ७८१० फूटांवारून आम्ही ७६०० वर जाणार होतो.

साधारण तासभर चालून /चढून आम्ही एका टेकडीच्या माथ्यावर पोचलो. हा झंडी टॉप. लाल गुलाबी बुरांशची आठवण आल्याशिवाय राहिली नाही, उन्हाळा असल्याने त्यांची साथ नव्हती.

JhandiTopNew.png
इथे झंडी टॉपला आणि नंतरही मधे मधे पिवळे झेंडे रोवलेले दिसतात. ते पर्यटक आणि स्थानिकांनी लावलेले आहेत. आपण योग्य मार्गावर आहोत याची खात्री करण्यासाठी यांचा वापर खुणा म्हणून करतात.

झंडी टॉप नंतर सगळा उताराचा रस्ता सुरू होतो. सगळा रस्ता घनदाट जंगलातून जात होता, त्यामुळे सूर्य माथ्यावर आला तरी त्याचा त्रास अजिबात जाणवला नाही. आणखी थोडं पुढे गेल्यावरप्तीन पायवाटा/ रस्ते होते. त्यातली मधली वाट आम्ही घेतली. ही रोहिणी बुग्याल कडे जाते. ऱोहिणी बुग्याल कडे जाताना जंगल संपून मधे मस्त गवताळ सपाटी लागली. दुपारचे जेवण इथे करायचे होते. पॅक लंच मेन्यु कोबीची भाजी आणि पोळ्या होत्या. कोबी मला आवडत नाही असं नाही पण जाडजुड कापलेला कोबी आणि बहुदा सरसों तेलांत बनवलेली भाजी मला काही जाईना. नवरा आणि बरोबरच्या दोन्ही मित्रांची तोंडंपण फार काही वेगळी नव्हती. मग एक भन्नाट आयडिया केली. परेशची बायको प्रियांकाने दिलेला चिवडा पोळीवर पसरला, त्यावर थोडी भाजी पसरली आणि पोळीचा रोल करून खाल्ला. चिवड्याची क्वांटिटी जास्त ठेवली की जेणेकरून कोबीची चवच जाणवणार नाही. स्वतःच्या जबरदस्त कल्पनाशक्तीवर खुश झालो, कारण न जेवणं इथे तब्येतीला परवडणारं नव्हतं. सगळा डबा संपवला. Happy
इथेच एका झाडावर अगदी नजरेच्या टप्प्यात आम्हाला सुतार पक्षी दिसला. त्याचा काही चांगला फोटो घेता आला नाही पण त्याचं सुतारकाम मात्र बघता आलं.
woodpeaker.jpeg

जेवण झाल्यावर जरा गप्पाटप्पा करुन निघुन परत उतारावर लागलो. जंगलाच्या या बाजूला rhododendron बरोबरच जुने ओक आणि मॅपल वृक्ष भरपूर होते. मधे मधे चंद्रशीला म्हणजे आमचं टार्गेट आम्हाला दिसत होतं.(अर्थात दिल्ली अभी दूर थी| तिथे पोचायला अजुन २ दिवस होते.)
मधेच परत ३ पायवाटा लागल्या. यातली डावीकडे जाणारी पायवाट परत 'सारी' कडे आणि उजवीकडची उखींमठकडे जाणारी होती. मधली पायवाट आम्हाला आमच्या आजच्या कँपसाईटकडे घेऊन गेली.
campsite1.jpeg

इथून सूर्यास्त खूप छान दिसणार होता पण ढगाळ हवेने त्यावर पाणी फिरले, किंवा असं म्हणू की मावळतीच्या सूर्यावर ढग फिरले. (फालतू कोटी) पण तरी फोटो साठी मात्र मस्त फ्रेम्स होत्या. हे अजुन काही फोटो
आल्या आल्या इथे बसणं सुख होतं. नंतर गाइडने सांगितलं समोर जो उंच डोंगर आहे. तिथेच दुसर्‍या दिवशी जायचंय.
campsite3.jpeg
अजुन एक
SyalmiView.jpeg
थोडं खाली उतरून गेल्यावर
Syalmi1.jpeg

येऊन जरा वेळ होईतो एक फार आनंद होईल अशी गोष्ट दिसली. वरून पहाडीतून वहात आलेलं थंड पाणी आमच्या इथेच खाली एका पाइपमधून आणून बादलीत सोडलं होतं. लगेच नळावर बायका जमल्या (नंतर पुरुषही जमले) सारीच्या साईटपासून सगळीकडे पाणी जपून वापरावं लागत होतं, त्यामुळे ह्या थंड आणि मुबलक मिळालेल्या पाण्यात हात पाय धुवायला फार बरं वाटलं. बायांनी चिवचिवाट करत पाण्याचा आनंद लुटला. आज फार दमणूक झाली नव्हतीच पण पाण्यात खेळून तर अजुनच फ्रेश वाटलं. इथेच मला जळवांचा प्रसादही मिळाला पण हा प्रसाद मिळाल्याचे मला दुसर्‍या दिवशी समजले इतक्या गपचुप त्यांनी आपलं काम उरकलं होतं.

प्रत्येक ट्रेकला असा एकतरी फोटो घेणं अनिवार्य असतं
Tent.jpg

या भागाचा सुरुवात आणि शेवट एकाच विषयाने करते. या रात्रीही एक वाजता मला टॉयलेट टेंटला भेट द्यावी लागली. एकाच वेळी निरव शांततेचा आनंद आणि गडद अंधारात एक्ट्याने टॉयलेट टेंट पर्यंत जाऊन येण्याची भिती दोन्ही अनुभवलं

भाग ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ग
चिवड्याची आयडिया ढापण्यात येईल Wink
सुर्यास्ताचे फोटो फारच अफलातून,

जेवणात अजून तिखटपणा यायला सोबतीला कांदा लसूण मसाला होताच!>> अरे हो, हा महत्वाचा घटक विसरलेच. तिथे ह्या मसाल्यानेच पोळी भाजीला wrap चा दर्जा दिला.

ह्या मसाल्याने नंतर अजुन महत्वाचं काम केलं, ते येइलच पुढच्या भागात!

चिवड्याची आयडिया ढापण्यात येईल>> बिनधास्त!

छान.
फक्त ह्या भागातल्या फोटोमधले रंग अनैसर्गिक वाटले. पोस्ट प्रोसेसिंग केलं आहे का फार ?

पोस्ट प्रोसेसिंग केलं आहे का फार ?>> केलं आहे पण काय ते परेश सांगु शकेल. त्यानेच फोटो काढलेत, त्यानेच प्रोसेस केलेत Happy