माय फेअर लेडी - एक नेत्रदीपक संगीतनाट्यानुभव

Submitted by हरचंद पालव on 23 June, 2024 - 10:04

(या धाग्याचं शीर्षक मी आधी 'विथ अ लिट्ल बिट ऑफ लक' असं ठरवलं होतं. पण माय फेअर लेडी या कलाकृतीविषयी इथे सर्वांनाच चर्चा करता यावी याकरिता मी धाग्याचं शीर्षक बदललं. पण लेखाचं मूळ शीर्षक खाली लिहीत आहे.)
----------------------------------------
विथ अ लिट्ल बिट ऑफ लक

"... तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वांडात घालीन शान.
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा!
तुला शिकवीन चांगलाच धडा! ..."
मला कळेना की भाग्यश्रीताई हे असं काय बोलतेय, पण तिचं स्वगत म्हणून झाल्यावर हळदीकु़ंकवाला आलेल्या सगळ्या बायकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि तिचं खूप कौतुक केलं, त्यावरून लक्षात आलं की हे काहीतरी जबरी आहे. "भाग्यश्री यंदा कॉलेजच्या नाटकात भाग घेते आहे." - तिच्या आईने अधिकची माहिती पुरवली. त्या नाट्यछटेच्या छोट्याश्या आविष्काराने भारावलेला मी आता हळूहळू भानावर येत गेलो. या बायकांच्या गोतावळ्यात आपण, वय वर्ष सहाचे का असेना, एकटेच पुरुष आहोत ह्या विचाराने पुरुषसुलभलज्जा उत्पन्न होऊन, ती नाट्यछटा पहायला हातातले खेळ सोडून बाहेरच्या खोलीत आलेला मी, पुन्हा आतल्या खोलीत गेलो आणि खेळात डोकं घातलं. बाकी त्या कार्यक्रमात अजूनही बर्‍याच गोष्टी झाल्या, त्या काहीच आठवत नाहीत. माझ्या डोक्यात राहिला तो हा फुलराणीचा मोनोलॉग.

मग पुढे ही फुलराणी खूप ठिकाणी भेटत राहिली. शाळेत असताना आमच्यातली एक बालकलाकार हे स्वगत नेहमी हमखास वर्गासमोर करून दाखवत असे. कॉलेजात गेल्यावर कलामंडळाच्या दरवर्षीच्या ऑडिशन्समध्ये किमान एक शिकवीन चांगलाच धडा असे. मला कधी भक्ती बर्व्यांची फुलराणी बघायचा चान्स मिळाला नाही. कधीतरी टीव्हीवर त्यांचा शिकवीन चांगलाच धडा हाच एक प्रवेश दाखवला होता. युट्युबवरही तोच सापडतो. एकेका वाक्यागणिक त्यांच्या चेहर्‍यावरच्या बदलणार्‍या छटा बघून मी मंत्रमुग्ध झालो होतो. ते आख्खं नाटक बघावं अशी इच्छा फार होती. मग काही वर्षांनी अमृता सुभाषची ती फुलराणी आली, त्याची मी सीडी विकत घेतली. नाटक 'प्रतेक्ष' पहायला जमलं नव्हतं. ती सीडी बघताना पहिल्यांदा ती संपूर्ण कथा डोळ्यासमोर आली. एका तथाकथित गावंढळ फुलवालीला एक प्राध्यापक 'सुसंस्कृत' करायचा विडा उचलतो. गावंढळ शिवराळ फुलवाली, मग नव्या भाषेला आणि शिष्टाचारांना वैतागून जाणारी, अवघडलेली, मग नव्या सुखद अनुभवांना आणि भावनांना आपलंसं करणारी, तरीही निरागस आणि निखळ, आणि पुढे उन्मत्त गुरूचा माज उतरवणारी, फसव्या दिखाऊ शिष्टाचारांमागचं वैगुण्य दाखवणारी, खोटेपणा झुगारून देणारी ती... ती फुलराणी. हा जो काही आलेख आहे ना, तोच प्रेक्षक म्हणून अचंबित करून जातो. आता मी तरी खोटं कशाला बोलू? अमृता सुभाषची 'मला फ्लारी-ई-ष्टाच्या शापा-आ-मधल्या' गाणारी फुलराणी अजिबात आवडली नाही. पण ह्या पात्राला कथेत इतके कंगोरे आहेत की कुणाही अभिनेत्रीला त्याची भुरळ पडावी आणि आयुष्यात एकदातरी ती साकारायचा मोह व्हावा असंच ते नाटक आहे.

दिखाऊ सुसंस्कृतपणा आणि शिष्टाचार यांचा पुलंनाही तिटकाराच होता असं त्यांचं लेखन वाचताना जाणवतं. तुझे आहे तुजपाशीमधले काकाजी नीती - अनीतीच्या गप्पांतला फोलपणा दाखवतात. कुठलेही लौकिक शिष्टाचार न पाळणारे, पण आतून निर्मळ असलेले हरितात्या आणि रावसाहेब हे पुलंना भावतात. त्यामुळे त्यांच्या लेखणीतून ही ती फुलराणी उतरली ती एकेक अनुभवसिद्ध भावना घेऊन. अगदी आपल्या मनातलं काहीतरी सांगावं असं त्यांना ते लिहिताना वाटलं असणार. ते नाटक मुळात जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या 'पिग्मॅलियन' या नाटकावर आधारित आहे हे नंतर कळलं. मग त्यावर 'माय फेअर लेडी' ही ब्रॉडवेची संगीतिका आणि त्यावर सिनेमा होता हेही कळलं. लगोलग तो सिनेमा पाहिला आणि त्यात आकंठ बुडालो. काय सुंदर अभिनय! काय गाणी! आणि काय ती ऑड्रे हेप्बर्न! अहाहा!! (आता हे जरा 'काय झाडी काय डोंगार'च्या चालीत झालं आहे, पण माझा नाईलाज आहे. कृपया त्या चालीत वाचू नये). हे नाटक कुणी करतं का अजून हा प्रश्न सहज डोक्यात येऊन गेला होता आणि 'आपलं कुठे तेवढं नशीब' या विचारासोबत मी तो गिळून टाकला होता.

पुढे कर्मधर्मसंयोगाने अचानक ती संधी आली. त्याचं झालं असं की मी लग्नानंतर परदेशात जाऊन पुन्हा एकदा विद्यार्थीदशेत गेलो. शिष्यवृत्तीवर मिळणार्‍या पैशातून आम्ही आपला संसार काटकसरीने चालवत होतो. महिन्याची शिल्लक फार काही रहात नसे. त्यावेळी कळालं की 'माय फेअर लेडी' आमच्या शहरात आलंय. पण तिकिटं पाहिली तर कायच्या काय होती! सगळ्यात स्वस्त जे तिकीट होतं, ते अर्थात बाल्कनीमध्ये तिसर्‍या रांगेच्या मागची सिटं. ती सुद्धा दोन तिकिटं काढायची म्हणजे आमची चार महिन्यांची शिल्लक एका झटक्यात यापायी खर्च होणार होती. पण या सर्व समस्यांवर वरचढ ठरतील अशी कारणं आम्हाला तिकिटं काढायला भाग पाडणार होती. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता आणि त्या दिवशी प्रयोग होता. दुसरं कारण म्हणजे हा एक नावाजलेला नाट्यसंघ होता. याची दिग्दर्शिका होती स्वतः जूली अँड्र्युझ. होय, तीच जूली, जी साउंड ऑफ म्युझिकची नायिका/गायिका आहे, तीच पूर्वी मूळ ब्रॉडवेच्या माय फेअर लेडी म्यूझिकलची नायिका - फुलराणी होती. तिसरं कारण, हे लोक असे वरचेवर तिथे येत नाहीत. त्यावेळी आम्ही जो प्रयोग पाहिला, त्यानंतर आजतागायत पुन्हा ते नाटक तिथे झालेलं नाही. त्यापूर्वीही ते तिथे झालं नव्हतं. चौथं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हा दोघांनाही नाटक पहायला आवडतं आणि ह्या नाटकावरचा सिनेमा दोघांनाही खूप प्यारा आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करायला याहून दुसरं कारण लागणार नव्हतं. बाकी या आम्ही पाहणार असणार्‍या नाटकातला प्रोफेसर हिगिन्स झालेला नट हा डाउनटन अ‍ॅबीमध्येही होता हे मला आज कळतंय. तेव्हाच्या जाहिरातीत असं काहीतरी वाचलं असेल तरी आम्हाला गंध नव्हता कारण तेव्हा डाउनटन अ‍ॅबी हा पदार्थच आमच्या गावी नव्हता. ते असो.

शेवटी ती नवसाची तिकिटं आम्ही काढली. रिजेंट थेट्राचं तोपर्यंत फक्त नावच ऐकलं होतं. नाटकाच्या दिवशी आत पाऊल ठेवलं आणि त्या थेट्राच्या इमारतीपासूनच एक माहोल तयार होत गेला. व्हिक्टोरियन शैलीचं बांधकाम, उंच छत, त्यावर नक्षीकाम, तिथून खाली लोंबणारी झुंबरं, लांबलचक संगमरवरी पायर्‍या, बाजूला चकचकीत पितळी रेलिंग्स, दोन्ही बाजूला वरती नक्षीदार गॅलरीज - हे त्या इमारतीत शिरल्या शिरल्या दिसणारं दृश्य होतं. आजूबाजूला आलेले लोक उंची कपडे परिधान करून आलेले होते. त्या कपड्यांना 'घातले' म्हणण्यापेक्षा 'परिधान केले' म्हणणंच बरोबर होतं. उलट आम्ही घरापासून तीस किलोमीटर अंतर बस, ट्रेन आणि ट्राम असं सर्व पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरून तिथे पोहोचलो होतो. त्या उच्चभ्रू सांद्र कुंद वातावरणात आम्हाला उगीचच विदाउट तिकीट प्यासिंजर असल्यासारखं वाटत होतं. मग आम्ही भीत भीतच तिकिटाची खिडकी शोधत निघालो. खिडकी कसली! लांबलचक मोठं काउंटर होतं. त्यांनी आम्हाला आमचं तिकीट बघून गॅलरीकडे जायचा मार्ग दाखवला.

IMG-20170702-WA0035.jpgIMG-20170702-WA0048.jpg

वरच्या मजल्यावरून प्रेक्षागृहात गॅलरीत प्रवेश केला आणि आ वासून बघत राहिलो. त्या अर्धवर्तुळाकार गॅलरीच्या वरती घुमटासारखं काहीतरी, त्यावर चित्रं आणि मध्यभागी भलं मोठं झुंबर. गॅलरीच्या दोन्ही कडांना भिंतीवर आणखी काही 'पर्सनल गॅलरीज' वाटाव्यात अश्या आणि तिथे पडदे. पूर्वी राजवाड्यात कामकाज चालू असताना गोशातल्या सुंदर स्त्रिया कधीकधी अश्या ठिकाणी बसतात - असं सगळ्या मध्ययुगीन ऐतिहासिक सिनेमा/मालिकांत दाखवतात - त्या गॅलरीज इमॅजिन करा, तसल्याच ह्या होत्या, पण तिथे कुणी नव्हतं. खाली सगळीकडे गुबगुबीत कार्पेट. हे सगळं बघायला मिळालं इथेच पैसे वसून झाल्याचं आम्ही बोललो. पुढचं नाटक हे बोनस असणार होतं. आता ते पाहून काही वर्षं झाली, त्यामुळे 'तिसरी घंटा' वगैरे प्रकार होता का आठवत नाही, पण बहुधा नसावा.

IMG-20170702-WA0037.jpgIMG-20170702-WA0029.jpg

पडदा उघडला आणि दृष्टीस पडला तो भव्य दुमजली सेट. लंडनच्या गजबजलेल्या भागातल्या जुन्या दगडी इमारती. पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू या गोष्टीचा यथायोग्य वापर करून त्या सेटला त्रिमितीमध्ये भरपूर उंची असल्यासारखा आभास निर्माण केला होता. आता तो कसा ते पाहिल्याशिवाय कळणार नाही. मुळात तो सेट ब्रॉडवेच्या ऑलिव्हर स्मिथ या नामांकित आणि पुरस्कारांनी सन्मानलेल्या डिझायनरने डिझाइन केलेला आहे. त्या गजबजलेल्या ठिकाणी एलायझाची एकाशी धडक, मग तिचे ग्राम्य उच्चार, उच्चारशास्त्राचा (फोनेटिक्सला काय म्हणावं?) प्रोफेसर हिगिन्स हे सगळं वहीत नोंदवून ठेवत असतो, तिथेच कर्नल पिकरिंग हा दुसरा उच्चारशास्त्रप्रेमी भेटतो. तिथे त्यांची ओळख झाल्यावर येतं ते प्रोफेसरच्या तोंडी पहिलं गाणं - 'व्हाय कान्ट दि इंग्लिश टीच देअर चिल्ड्रन हाऊ टू स्पीक'. गाण्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतरच्या एका प्रसंगात एलायझाच्या 'ऑल आय वॉन्ट इझ अ रूम समव्हेअ-' या गाण्यावर मोठा कडकडात झाला. पुढे तो प्रत्येक गाण्यावर होत राहिला. काय आहे, की ह्या नाटकाची गाणी श्रोत्यांतल्या अनेक जुन्या मंडळींना चांगलीच परिचयाची होती. आपल्याकडे कसं 'राधाधर मधुमिलिंद', 'प्रिये पहा' वगैरे गाणी आपल्याला ऐकून ऐकून माहिती आहेत. पण संगीत सौभद्र कधी बघायला गेलो तर त्या त्या गाण्यांचा कॉन्टेक्स्ट लक्षात येऊन अजून भारावल्यासारखं होतं, तसंच ह्यांचं होत असणार. पूर्वी म्हणे शोले चित्रपटाच्या संवादांची कॅसेट मिळायची. लोकांना ते संवाद आधी पाठ असत व पिक्चर नंतर बघत, त्यांचंही तसंच होत असणार.

मी नाटकातला तो सेट बघतच राहिलो. त्या भव्य सेटमधल्या इमारतींचे मजले केवळ आभासी नव्हते; वरच्या मजल्यावर खिडकीत एक पात्र बसलं होतं. पुढच्या एका प्रसंगात एलायझा(फुलवाली)चा बाप दारूच्या अमलात रस्त्यावर ज्या गमतीजमती करतो तेव्हा तो वरती बसलेला माणूस खिडकीतून कागदी बोळे खाली फेकतो असंही त्यात होतं. इथे ह्याच प्रसंगी ते गाणं येतं 'विथ अ लिट्ल बिट ऑफ लक'. ह्या गाण्याचा ठेका खूप कॅची आहे. त्यामुळे पुढे कितीही गाणी आली तरी हे कायम डोक्यात राहतं. ते गाता गाता त्या एलायझाचा बाप आणि मित्रमंडळी जो नाच करतात, तो फार मजेशीर आहे. बाकी मी आता सगळी कथा सांगत बसत नाही. पण प्रसंग बदलायचा तसा हा सेट फिरवला जायचा आणि त्याच्या मागच्या बाजूला प्रोफेसरच्या घराचा दिवाणखाना. आपल्या डोळ्यांदेखत रंगमंचाचं रूप पालटताना बघणं हा एक चामत्कारिक (विचित्र ह्या अर्थाने नाही) अनुभव होता. प्रोफेसरच्या पैजेचा परमोच्च बिंदू म्हणजे एलायझाला एम्बसी बॉल (बॉलरूम)मध्ये एक डचेस म्हणून 'प्रेझेण्ट' करणं. डचेसला मराठीत काय म्हणावं? सरदाराची बायको - सरदारीण? छ्या! नाही सुचत आहे शब्द. ते जाऊ दे. तर त्या प्रसंगाला नाटकात डोळ्यांच्या पापण्या मिचकावेस्तोवर रंगमंचाचा कायापालट झाला. प्रोफेसरचं ड्युप्लेक्स घर विंगेत गायब होऊन तिथे जवळपास एक राजवाडा अवतरला होता. ठिकठिकाणी नक्षीदार काचेचे दिवे आणि त्यांवर मेणबत्त्या. पाठीमागे सर्व रंगमंचावर निळा प्रकाश. स्टेजच्या वरून अचानक काही झुंबरं खाली येऊन लोंबायला लागली. स्टेजवर मोठमोठ्या निरनिराळ्या आकाराचे उंची टोप घातलेली मंडळी स्टेजवर आली. हे असले टोप इतक्या मोठ्या प्रमाणात नंतर फक्त डाऊनटन अ‍ॅबीमध्येच पाहिले मी. एलायझाच्या कायापालटाने तर त्या मंचाच्या कायपालटाला मागे टाकलं. तो पूर्ण बॉलचा प्रवेश प्रेक्षकही आ वासून बघत राहिले. त्या प्रवेशानंतर लगेचच मध्यंतर झालं तरी तो आ तसाच होता.

जॉर्ज बर्नार्ड शॉचं पिग्मॅलियन हे नाव एका ग्रीक मिथकावर आधारित आहे. त्या मिथकानुसार पिग्मॅलियन नावाच्या एका शिल्पकाराला सर्वच स्त्रियांविषयी राग असतो. तो एकदा एका सुंदर स्त्रीचं शिल्प घडवतो आणि त्या शिल्पाच्याच प्रेमात पडतो ('शिल्पा' हे नाव नव्हे). प्रोफेसर हिगिन्सही तसाच आहे. 'व्हाय कान्ट अ वुमन बी मोअर लाईक अ मॅन' या गाण्यात त्याचा त्रागा आपल्याला दिसतो. पण इथे फरक असा आहे की इथे मुळात कुठलं निर्जीव शिल्प नसून एक खरोखर व्यक्ती आहे. तिला आपण 'घडवलं' हा अहंकार प्रोफेसरला होतो. त्याला प्रेमाची जाणीव अगदी नाटकाच्या शेवटाकडे होते. शॉच्या नाटकाचं नाव पिग्मॅलियन असल्यामुळे प्रोफेसर हिगिन्स हे त्याचं मध्यवर्ती पात्र आहे की काय याची मला शंका आहे. मी ते नाटक पाहिलं किंवा वाचलेलं नाही. या कथेत जरी हिगिन्स आणि एलायझा ह्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या भूमिका असल्या तरी माझ्या मते एलायझाच याची नायिका / प्रोटेगॉनिस्ट आहे. रस्त्यावर फुलं विकणारी आणि शिवराळ गावंढळ भाषेत बोलणारी गरीब फुलवाली ते डचेस म्हणून उभी राहणारी आणि तिच्या अदब आणि अदांनी राजेशाही लोकांवरही छाप पाडणारी, आणि प्रोफेसरला पुढे ठणकावून त्याच्या चुका सांगणारी, कानउघाडणी करणारी एलायझा डूलिट्ल. तिचं न्यूनगंडात्मक आडनाव हे विरोधाभास ठरावं इतकं काम तिला आहे. त्यामुळे तिचं केंद्रस्थान सार्थ करणारी 'माय फेअर लेडी' आणि 'ती फुलराणी' ही दोन्ही नावं मला योग्य वाटतात.

नाटक संपल्यावर बाहेर आलो तेव्हा सर्वजण त्या धुंदीतच होते. काही जण कलाकारांची स्तुती करत होते, काही गाणी गुणगुणत होते, तर काही त्यातल्या तांत्रिक बाबींना पाहून अचंबित झाले होते. सर्वार्थाने परिपूर्ण असा तो नाट्यप्रयोग होता. आम्हालाही एका वयस्कर गोर्‍या जोडप्याने विचारलं की कसं वाटलं म्हणून. आमच्या गप्पांत त्या काकू म्हणाल्या की त्यांनी हे त्यांच्या लहानपणी पाहिलं होतं. मी म्हणालो की हे मी पूर्वी मराठीत पाहिलं आहे. त्या काकूंना ज्या भाषेचं नावही माहीत नाही त्या भाषेत हे नाटक भाषांतरित / रूपांतरित आहे याचा फार मोठा अचंबा वाटला. परतीच्या वाटेवर पुन्हा पब्लिक ट्रान्सपोर्टने जात असताना आजूबाजूला नेहमीप्रमाणे लोक होते, गर्दी होती, पण आमच्या डोळ्यांसमोर अजूनही त्या नाटकांतली दृश्यं आणि त्यातली भव्यता तरळत होती. दुसर्‍या दिवशी माझ्या विद्यापिठातल्या प्राध्यापकाने नेहमीप्रमाणे वीकांत कसा होता ते विचारलं. यावेळी नेहमीप्रमाणे 'फाईन, नॉट टू बॅड'पेक्षा मला बोलण्यासारखं खूप काही होतं. 'माय फेअर लेडी' नाव ऐकताच प्रॉफचे डोळे चमकले. "आम्ही लहान असताना माझे काका आम्हा सगळ्या पोराटोरांना घेऊन सहलीला जायचे. त्यांच्याकडे एक रेकॉर्ड प्लेअर होता आणि त्यावर कायम ते ह्या नाटकातली गाणी लावायचे. 'विथ अ लिट्ल बिट ऑफ लक' - मी कधीच विसरू नाही शकत."

माझ्या डोक्यात विचार चालले होते - 'दोन वर्षांपूर्वी मला कुठे माहीत होतं की मी कुठल्या देशात कुठल्या शहरात असेन? तिथे कधी अशी मंडळी येतील, ज्यांची आपण केवळ नावंच ऐकून असतो, ते असं नाटक आणतील, जे इतकं भव्य दिव्य असेल, आणि ते जाऊन बघण्याची आम्हाला बुद्धी होईल...'. सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच - 'विथ अ लिट्ल बिट ऑफ लक'!

--------------------
टीपा
- 'ऑल आय वॉन्ट एझ अ रूम समव्हेअर' साधारण ह्याच अर्थाचं 'रहने को एक घर होगा' हे गाणं (तिथे लता मंगेशकरांनी गायलंय असं लिहिलंय, पण मला आवाज त्यांचा वाटत नाहीये) आहे. राजेश रोशनची चाल हे म्हणणं चुकीचं ठरेल कारण चाल मुळात ऑल आय वॉन्टचीच आहे अगदी बिट-टू-बिट. फक्त मूळ गाण्यातलं 'लॉट्स ऑफ चॉकलेट फॉर मी टु ईट'च्या जागी ज्यांनी 'खाने को हलवा होगा' लिहिलंय ना, त्यांना माझ्यातर्फे हलव्याचे दागिने उत्तेजनार्थ बक्षीस.
- १९५६च्या ब्रॉडवेच्या नाटकात रेक्स हॅरिसनने प्रोफेसरची भूमिका केली आणि गाजवली. पुढे चित्रपटातही प्रोफेसरची भूमिका ह्याच गुणवंत कलाकाराने केल्यामुळे आपल्याला त्याचा अभिनय बघता येतो. त्याने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे ती. परंतु नाटकातली एलायझा मात्र सिनेमात बदलली. कारण त्यावेळी म्हणे जूली अँड्रुझ ही प्रसिद्ध नव्हती. ऑड्रेने ती सुंदरच केली आहे यात प्रश्नच नाही, पण जूलीही खूप गुणी अभिनेत्री आहे आणि ती ती भूमिका कोळून प्यायली होती. असो. तिने कधी त्याबद्दल राग मानला नाही. दोघींमध्ये पुढेही मैत्रीचे संबंध राहिले.
- आणखी टिपा आठवतील तश्या खाली प्रतिसादांमध्ये देईन. हा धागा माय फेअर लेडी, ती फुलराणी - या नाटक, सिनेमा यांबद्दल लिहायला जरूर वापरा. तुमच्या प्रतिक्रिया, अनुभव, किंवा असेच कुठल्या वेगळ्या नाटकाचे अनुभवही वाचायला आवडतील.

ता.क. जुने फोटो सापडले. त्यांची क्वालिटी फारशी चांगली नाही, कृपया गोड मानून घ्या.

Group content visibility: 
Use group defaults

"My fair lady" all time favourite!
सुप्रिया पिळगांवकर ने केलेले "तुला शिकवीन चांगलाच धडा " हे youtube वर बघितलेलं आठवतंय.
खूप वर्षांपासून Broadway बघायची इच्छा होती.
नुकतच "The book of mormon" बघायला मिळालं.
Acting..., technically... Coordination सगळंच खूप खूप सुंदर!!!

स्वाती, ती फुलराणीचं पुस्तक काढून शोधलंच शेवटी. अरुण आठल्येंनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून -
पिग्मॅलियन - शॉ -१९१२. पहिला प्रयोग १९१४.
पहिला चित्रपट -१९३८.
शॉच्या मृत्यूनंतर माय फेअर लेडी ही संगीतिका १९५६. चित्रपट १९६४.

भारतीय भाषांत
उर्दू - इप्टा - लेखिका बेगम कुदसिया झैदी - जुलै १९७०
मराठी -विद्याधर गोखले - संगीत स्वरसाम्राज्ञी - डिसेंबर १९७२
गुजराती - इंडियन नॅशनल थिएटर -मधु राय - संतु रंगीली - जानेवारी १९७३
पु लंच्या डोक्यात पिग्मॅलियनवर मराठी नाटक करावे हे १९४९ पासून तरी घोळत होते.
ती फुलराणीचे पहिले दोन अंक १९७४ च्या जानेवारी महिन्यात दोन दिवसांत लिहून पूर्ण झाले. तिसरा अंक पुढे साडेचार महिन्यांनी पूर्ण झाला. नाटकाचा पहिला प्रयोग २९ जानेवारी १९७५ रोजी झाला. हेही नाटक इंडियन नॅशनल थिएटरने रंगमंचावर आणलं.
पुस्तकाची पहिली आवृत्ती १२ जून १९९४. मजजवळ हीच आहे.

शॉबद्दल त्यांनी प्रस्तावनेत जे लिहिलंय ते वाचताना, तुम्ही quote केलेलं चित्रपटातलं वाक्य आठवलं. - व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य, स्त्रीदास्यमुक्ती आणि स्त्रीपुरुषसमभाब, सामाजिक न्याय आणि आर्थिक समता , बुद्धिवाद आणि निरीश्वरवाद आदी विषयांचा तो आयुष्यभर धाडसी प्रचारक होता....

हो. अरुणा इराणीचा संतु रंगीली हा चित्रपट आहे. सुजाता मेहताने नाटक केले आहे आणि तिचं तुला शिकवीन चांगलाच धडा हे स्वगत तिच्या इन्स्टाग्राम पेजवर आहे. जमलेलं नाही.

लकी आहात हर्पा! मला फार आवडेल हे नाटक बघायला. भक्ती बर्वेचं 'ती फुलराणी' पाहिलेलं आहे. प्रचंड आवडलेलं आहे. त्यानंतर अमृता सुभाषचं व्हर्जन पहावंसंच वाटलं नाही. ती खूप लाऊड वाटते.
'माय फेअर लेडी' पिक्चर खूपच आवडला होता. त्याचं नाटक पाहणं सुरेख अनुभव असणार नक्कीच.

फार मस्त लिहिलंय ह पा! आमच्याइथे ( आणि लंडन मधे देखील ) नाटकं इतकी महाग असतात ! त्यात पहिल्या किंवा दुसर्‍या रांगेतूनच नाटक पाह्यचं बाळकडू मिळालेलं आहे. त्यामुळे दोन किंवा चार लोकांची तिकिटे काढायची म्हणजे टी ए चे बजेट नसले तरी थोडा विचार करावाच लागतो.

ती फुलराणी पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात पाहिलं होतं ज्ये नांनी. ते इतकं आवडलं की आम्हा सर्व चिल्लर पार्टीला दोनदा नेलंच, शिवाय वर्षभर कोणी पाहुणे आले तर त्यांना सुद्धा नेलं होतं . वर्तमानपत्रात जाहिरात पाहून लगोलग शिवाजी मंदिर पर्यंत जाऊन IRL तिकीट काढायला लागत असे त्या काळात ! पहिल्या किंवा दुसर्‍या रांगेतूनच बघायचं नाटक असा वसा होता. त्यामुळे कधी कधी तिकीटं न घेताच परत यावं लागत असे.

पण असं अगदी पुढे बसून पाहिल्यामुळे भक्ती बर्वेंचा अभिनय फार बारकाईने पाह्यला मिळालेला. त्या हौसा बाईंनी दिलेल्या 'कापडां' मधे वावरतानाचं अवघडले पण फार हृद्य होतं !

मित्र मैत्रीणींबरोबर माय फेअर लेडी पाहिला, त्याच्या गाण्यांची कॅसेट मिळवून ती झिजेपर्यंत ऐकली . पण लॉट्स ऑफ कोल्स मेकिंग लॉट्स ऑफ हीट हे फिलाडेल्फियाचे दोन -तीन हिवाळे अनुभवेपर्यंत उमजलं नव्हतं !

त्याच गाण्यात, समवन्स हेड रेस्टिंग ऑन माय नी हे मात्र माझ्या म म अनुभवाला आणि बुद्धीला अजिबात जुळले नाही. देवाच्या पायी डोके टेकणे एवढीच काय ती माझी इमेजरी होती.
पुढे अनेक वर्षांनी इथल्या मित्र मैत्रिणींबरोबर कोणाच्या तरी घरी सुपरबोल बघायला जमलो होतो. गेम फारसा ईंटरेस्टिंग नसावा कारण मंडळी सारखी इथून तिथे ये जा करत टी व्ही पहात होती. तेंव्हा काही लोक सोफ्यावर आणि काही कार्पेटवर पाय पसरून खाणे / पिणे गप्पा असे चालले होते. अचानक एका मित्राने सोफ्यावर बसलेल्या आपल्या बायकोच्या पायाशी बसून आपले डोके मागे टेकले - समवन्स हेड रेस्टिंग ऑन माय नी ! ती जी सहज जवळीक आणि आपुलकी आहे ती हिंदी सिनेमातल्या गाण्यात क्वचितच दिसते !

ह पा, हे इतकं सुंदर लिहिलंय, इतकं हृद्य, पुन:पुन्हा वाचावे असे!
Happy
मी ती फुलराणी ही पाहिलेले नाही आणि माय फेअर लेडी तर नाहीच नाही.
पण तुमच्या ह्या सुरेख लेखनाने ब्रॉडवेच्या नाटकाचा थोडासा गद्य अनुभव दिला.
असे वाटत राहिले की मी तिथे असते तर सेम असेच वाटले असते, असाच आनंद झाला असता... Happy
इतक्या वर्षांनंतरही तो अनुभव तुमच्या मनात जसाच्या तसा ताजा आहे.

. अरुणा इराणीचा संतु रंगीली हा चित्रपट आहे. सुजाता मेहताने नाटक केले आहे आणि तिचं तुला शिकवीन चांगलाच धडा हे स्वगत तिच्या इन्स्टाग्राम पेजवर आहे. जमलेलं नाही.>>>> भरत तुम्ही जी आधी लिंक दिली होतीत त्यात सविता जोशी ची संतू रंगिली कमाल आहे. नाटकाचं गुजराथी भाषांतर कोणी केलंय माहिती आहे का? चांगलं वाटलं ऐकायला.

सुंदर लेख....
मला या नाटकाचा संदेश आवडला. बाकी नट मंडळी कोण कसं काम करतं याच विश्लेषण करण्या इतपत माझी कुवत नाही.

वा!!

काही प्रतिसाद सुद्धा खूप छान आहेत.

मी सिनेमा पाहिलाय. गाण्यांची कॅसेट होती घरी. ती अगणितवेळा ऐकलीय.

मनपसंद तेव्हा आवडला होता. त्यातली गाणी मस्त होती. - सुमन सुधा रजनीगंधा

छान लेख हरपा
परक्या देशात 4 महिन्याची शिल्लक अशा प्रकारे खर्च करणे ह्यातून तुमची रसिकता दिसते.
ब्राव्हो

छान लिहील आहे. काही अनुभव अविस्मरणीय असतात बहुदा तुमचाही हा असावा.

हे वाचताना कितीतरी गोष्टी आठवल्या

हे नाटक थेटरात जाऊन ३ वेळा पाहिलंय एकदा सुकन्या कुलकर्णी, भक्ती बर्वे आणि अमृता सुभाष. पैकी अमृता सुभाष भयंकर लाऊड, किंवा अतिगोड असं काहीस कृत्रिम वाटलेलं.

महाग तिकिटं, एक दिड तासाचा वास करून नाटकाला जाणे, नाटकाला येणाऱ्यांचे पोशाख किंवा एकंदर माहोल, त्यांचं नेपथ्य यावर तुम्ही जे लिहिलंय ते वाचताना मला आम्ही इकडे पहिल्यांदा (खर तर एकदाच ) ब्रॉडवे शो बघायला गेलेलो त्याची आठवण आली. आणि नंतर कितीतरी दिवस त्याची आठवण काढण्यात, कौतुक करण्यात गेले.

आता कोविड नंतर परत जायचा प्लॅन आहे अजून जमलं नाहीये. तिकिटं जवळ जवळ तिप्पट - चौपट झाली आहेत.
विथ अ लिट्ल बिट ऑफ लक लवकरच तेही जुळून येईल !

दसा, ल-प्री, झकासराव, आणि छन्दिफन्दि, अनेक आभार. ब्रॉडवे शो बघितलात, झकासच छन्दिफन्दि. इतके जण म्हणत आहेत तर आता मनपसंद बघायलाच हवा.
या नाटकाच्या वेळचे फोटो मिळतायत का बघतो. कुठल्यातरी जुन्या डिस्कमध्ये गेलेत.

आज जुने फोटो सापडले. क्वालिटी तितकीशी चांगली नाही, पण त्यातल्या त्यात जे बरे वाटले, ते लेखात टाकले आहेत.

अमित, आपली पडद्याबाबत चर्चा झाली होती. फोटो बघताना सापडला पडदा. हे बघ - एक्झिबिट नंबर वन
IMG-20170702-WA0033.jpg

हा पडदा वर जाणारा होता ... वर म्हणजे आकाशापर्यंत?? - इति शंकर्‍या

व्वा जबरदस्त फोटो.
भव्यतेची सगळी परिमाणे लागू होतील या फोटोंना.
हे थेटर वाटत नसून महाकाय चर्च का कॅथेड्रल ? वाटतंय.
झुंबरं, छतावरील चित्रे रंगमंच आणि वर जाणारा पडदा....भव्य दिव्य.
या सगळ्यावरून तुम्हाला किती दडपण आले असेल याची कल्पना आली

येस्स! Happy
किंवा ह्म्म्म.... आणि जोरदार पिचकारी सोडतो! Proud

खूप सुंदर लेख! इतके वर्ष इथे राहून कधी इंग्लिश नाटक नाही पाहिलं. बाकी कार्यक्रमांसाठी थिएटरमध्ये गेलो आहे आणि काही काही थिएटर खरोखरच फार सुंदर असतात.

तुमचा अनुभव इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. Happy

सुरेख लिहिले आहे. हा अनुभव शब्दबद्ध केल्याबद्दल आभारच. Happy 'ती फुलराणी' दूरदर्शन वर बघितले आहे. मनपसंद आठवत नाहीये.
कौतुक वाटलं हर्पा, रसिक आहेस. Happy

लेखात मी 'रहने को एक घर होगा' गाण्याच्या शब्दांना नावं ठेवली आहेत. पण आज त्याच सिनेमातलं दुसरं एक गाणं ऐकलं आणि त्याचे शब्द फार सुंदर वाटले. शिवाय त्यात अनुप्रास अलंकाराचा सुरेख वापर केल्यामुळे जास्तीच भावलं. हे पहा -

चारु चंद्र की चंचल चितवन
बिन बदरा बरसे सावन
मेघ मल्हार मधुर मनभावन
पवन पिया प्रेमी पावन

अमित खन्ना, सॉरी. मी माझे आधीच शब्द मागे घेतो.

Pages