माय फेअर लेडी - एक नेत्रदीपक संगीतनाट्यानुभव

Submitted by हरचंद पालव on 23 June, 2024 - 10:04

(या धाग्याचं शीर्षक मी आधी 'विथ अ लिट्ल बिट ऑफ लक' असं ठरवलं होतं. पण माय फेअर लेडी या कलाकृतीविषयी इथे सर्वांनाच चर्चा करता यावी याकरिता मी धाग्याचं शीर्षक बदललं. पण लेखाचं मूळ शीर्षक खाली लिहीत आहे.)
----------------------------------------
विथ अ लिट्ल बिट ऑफ लक

"... तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वांडात घालीन शान.
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा!
तुला शिकवीन चांगलाच धडा! ..."
मला कळेना की भाग्यश्रीताई हे असं काय बोलतेय, पण तिचं स्वगत म्हणून झाल्यावर हळदीकु़ंकवाला आलेल्या सगळ्या बायकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि तिचं खूप कौतुक केलं, त्यावरून लक्षात आलं की हे काहीतरी जबरी आहे. "भाग्यश्री यंदा कॉलेजच्या नाटकात भाग घेते आहे." - तिच्या आईने अधिकची माहिती पुरवली. त्या नाट्यछटेच्या छोट्याश्या आविष्काराने भारावलेला मी आता हळूहळू भानावर येत गेलो. या बायकांच्या गोतावळ्यात आपण, वय वर्ष सहाचे का असेना, एकटेच पुरुष आहोत ह्या विचाराने पुरुषसुलभलज्जा उत्पन्न होऊन, ती नाट्यछटा पहायला हातातले खेळ सोडून बाहेरच्या खोलीत आलेला मी, पुन्हा आतल्या खोलीत गेलो आणि खेळात डोकं घातलं. बाकी त्या कार्यक्रमात अजूनही बर्‍याच गोष्टी झाल्या, त्या काहीच आठवत नाहीत. माझ्या डोक्यात राहिला तो हा फुलराणीचा मोनोलॉग.

मग पुढे ही फुलराणी खूप ठिकाणी भेटत राहिली. शाळेत असताना आमच्यातली एक बालकलाकार हे स्वगत नेहमी हमखास वर्गासमोर करून दाखवत असे. कॉलेजात गेल्यावर कलामंडळाच्या दरवर्षीच्या ऑडिशन्समध्ये किमान एक शिकवीन चांगलाच धडा असे. मला कधी भक्ती बर्व्यांची फुलराणी बघायचा चान्स मिळाला नाही. कधीतरी टीव्हीवर त्यांचा शिकवीन चांगलाच धडा हाच एक प्रवेश दाखवला होता. युट्युबवरही तोच सापडतो. एकेका वाक्यागणिक त्यांच्या चेहर्‍यावरच्या बदलणार्‍या छटा बघून मी मंत्रमुग्ध झालो होतो. ते आख्खं नाटक बघावं अशी इच्छा फार होती. मग काही वर्षांनी अमृता सुभाषची ती फुलराणी आली, त्याची मी सीडी विकत घेतली. नाटक 'प्रतेक्ष' पहायला जमलं नव्हतं. ती सीडी बघताना पहिल्यांदा ती संपूर्ण कथा डोळ्यासमोर आली. एका तथाकथित गावंढळ फुलवालीला एक प्राध्यापक 'सुसंस्कृत' करायचा विडा उचलतो. गावंढळ शिवराळ फुलवाली, मग नव्या भाषेला आणि शिष्टाचारांना वैतागून जाणारी, अवघडलेली, मग नव्या सुखद अनुभवांना आणि भावनांना आपलंसं करणारी, तरीही निरागस आणि निखळ, आणि पुढे उन्मत्त गुरूचा माज उतरवणारी, फसव्या दिखाऊ शिष्टाचारांमागचं वैगुण्य दाखवणारी, खोटेपणा झुगारून देणारी ती... ती फुलराणी. हा जो काही आलेख आहे ना, तोच प्रेक्षक म्हणून अचंबित करून जातो. आता मी तरी खोटं कशाला बोलू? अमृता सुभाषची 'मला फ्लारी-ई-ष्टाच्या शापा-आ-मधल्या' गाणारी फुलराणी अजिबात आवडली नाही. पण ह्या पात्राला कथेत इतके कंगोरे आहेत की कुणाही अभिनेत्रीला त्याची भुरळ पडावी आणि आयुष्यात एकदातरी ती साकारायचा मोह व्हावा असंच ते नाटक आहे.

दिखाऊ सुसंस्कृतपणा आणि शिष्टाचार यांचा पुलंनाही तिटकाराच होता असं त्यांचं लेखन वाचताना जाणवतं. तुझे आहे तुजपाशीमधले काकाजी नीती - अनीतीच्या गप्पांतला फोलपणा दाखवतात. कुठलेही लौकिक शिष्टाचार न पाळणारे, पण आतून निर्मळ असलेले हरितात्या आणि रावसाहेब हे पुलंना भावतात. त्यामुळे त्यांच्या लेखणीतून ही ती फुलराणी उतरली ती एकेक अनुभवसिद्ध भावना घेऊन. अगदी आपल्या मनातलं काहीतरी सांगावं असं त्यांना ते लिहिताना वाटलं असणार. ते नाटक मुळात जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या 'पिग्मॅलियन' या नाटकावर आधारित आहे हे नंतर कळलं. मग त्यावर 'माय फेअर लेडी' ही ब्रॉडवेची संगीतिका आणि त्यावर सिनेमा होता हेही कळलं. लगोलग तो सिनेमा पाहिला आणि त्यात आकंठ बुडालो. काय सुंदर अभिनय! काय गाणी! आणि काय ती ऑड्रे हेप्बर्न! अहाहा!! (आता हे जरा 'काय झाडी काय डोंगार'च्या चालीत झालं आहे, पण माझा नाईलाज आहे. कृपया त्या चालीत वाचू नये). हे नाटक कुणी करतं का अजून हा प्रश्न सहज डोक्यात येऊन गेला होता आणि 'आपलं कुठे तेवढं नशीब' या विचारासोबत मी तो गिळून टाकला होता.

पुढे कर्मधर्मसंयोगाने अचानक ती संधी आली. त्याचं झालं असं की मी लग्नानंतर परदेशात जाऊन पुन्हा एकदा विद्यार्थीदशेत गेलो. शिष्यवृत्तीवर मिळणार्‍या पैशातून आम्ही आपला संसार काटकसरीने चालवत होतो. महिन्याची शिल्लक फार काही रहात नसे. त्यावेळी कळालं की 'माय फेअर लेडी' आमच्या शहरात आलंय. पण तिकिटं पाहिली तर कायच्या काय होती! सगळ्यात स्वस्त जे तिकीट होतं, ते अर्थात बाल्कनीमध्ये तिसर्‍या रांगेच्या मागची सिटं. ती सुद्धा दोन तिकिटं काढायची म्हणजे आमची चार महिन्यांची शिल्लक एका झटक्यात यापायी खर्च होणार होती. पण या सर्व समस्यांवर वरचढ ठरतील अशी कारणं आम्हाला तिकिटं काढायला भाग पाडणार होती. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता आणि त्या दिवशी प्रयोग होता. दुसरं कारण म्हणजे हा एक नावाजलेला नाट्यसंघ होता. याची दिग्दर्शिका होती स्वतः जूली अँड्र्युझ. होय, तीच जूली, जी साउंड ऑफ म्युझिकची नायिका/गायिका आहे, तीच पूर्वी मूळ ब्रॉडवेच्या माय फेअर लेडी म्यूझिकलची नायिका - फुलराणी होती. तिसरं कारण, हे लोक असे वरचेवर तिथे येत नाहीत. त्यावेळी आम्ही जो प्रयोग पाहिला, त्यानंतर आजतागायत पुन्हा ते नाटक तिथे झालेलं नाही. त्यापूर्वीही ते तिथे झालं नव्हतं. चौथं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हा दोघांनाही नाटक पहायला आवडतं आणि ह्या नाटकावरचा सिनेमा दोघांनाही खूप प्यारा आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करायला याहून दुसरं कारण लागणार नव्हतं. बाकी या आम्ही पाहणार असणार्‍या नाटकातला प्रोफेसर हिगिन्स झालेला नट हा डाउनटन अ‍ॅबीमध्येही होता हे मला आज कळतंय. तेव्हाच्या जाहिरातीत असं काहीतरी वाचलं असेल तरी आम्हाला गंध नव्हता कारण तेव्हा डाउनटन अ‍ॅबी हा पदार्थच आमच्या गावी नव्हता. ते असो.

शेवटी ती नवसाची तिकिटं आम्ही काढली. रिजेंट थेट्राचं तोपर्यंत फक्त नावच ऐकलं होतं. नाटकाच्या दिवशी आत पाऊल ठेवलं आणि त्या थेट्राच्या इमारतीपासूनच एक माहोल तयार होत गेला. व्हिक्टोरियन शैलीचं बांधकाम, उंच छत, त्यावर नक्षीकाम, तिथून खाली लोंबणारी झुंबरं, लांबलचक संगमरवरी पायर्‍या, बाजूला चकचकीत पितळी रेलिंग्स, दोन्ही बाजूला वरती नक्षीदार गॅलरीज - हे त्या इमारतीत शिरल्या शिरल्या दिसणारं दृश्य होतं. आजूबाजूला आलेले लोक उंची कपडे परिधान करून आलेले होते. त्या कपड्यांना 'घातले' म्हणण्यापेक्षा 'परिधान केले' म्हणणंच बरोबर होतं. उलट आम्ही घरापासून तीस किलोमीटर अंतर बस, ट्रेन आणि ट्राम असं सर्व पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरून तिथे पोहोचलो होतो. त्या उच्चभ्रू सांद्र कुंद वातावरणात आम्हाला उगीचच विदाउट तिकीट प्यासिंजर असल्यासारखं वाटत होतं. मग आम्ही भीत भीतच तिकिटाची खिडकी शोधत निघालो. खिडकी कसली! लांबलचक मोठं काउंटर होतं. त्यांनी आम्हाला आमचं तिकीट बघून गॅलरीकडे जायचा मार्ग दाखवला.

IMG-20170702-WA0035.jpgIMG-20170702-WA0048.jpg

वरच्या मजल्यावरून प्रेक्षागृहात गॅलरीत प्रवेश केला आणि आ वासून बघत राहिलो. त्या अर्धवर्तुळाकार गॅलरीच्या वरती घुमटासारखं काहीतरी, त्यावर चित्रं आणि मध्यभागी भलं मोठं झुंबर. गॅलरीच्या दोन्ही कडांना भिंतीवर आणखी काही 'पर्सनल गॅलरीज' वाटाव्यात अश्या आणि तिथे पडदे. पूर्वी राजवाड्यात कामकाज चालू असताना गोशातल्या सुंदर स्त्रिया कधीकधी अश्या ठिकाणी बसतात - असं सगळ्या मध्ययुगीन ऐतिहासिक सिनेमा/मालिकांत दाखवतात - त्या गॅलरीज इमॅजिन करा, तसल्याच ह्या होत्या, पण तिथे कुणी नव्हतं. खाली सगळीकडे गुबगुबीत कार्पेट. हे सगळं बघायला मिळालं इथेच पैसे वसून झाल्याचं आम्ही बोललो. पुढचं नाटक हे बोनस असणार होतं. आता ते पाहून काही वर्षं झाली, त्यामुळे 'तिसरी घंटा' वगैरे प्रकार होता का आठवत नाही, पण बहुधा नसावा.

IMG-20170702-WA0037.jpgIMG-20170702-WA0029.jpg

पडदा उघडला आणि दृष्टीस पडला तो भव्य दुमजली सेट. लंडनच्या गजबजलेल्या भागातल्या जुन्या दगडी इमारती. पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू या गोष्टीचा यथायोग्य वापर करून त्या सेटला त्रिमितीमध्ये भरपूर उंची असल्यासारखा आभास निर्माण केला होता. आता तो कसा ते पाहिल्याशिवाय कळणार नाही. मुळात तो सेट ब्रॉडवेच्या ऑलिव्हर स्मिथ या नामांकित आणि पुरस्कारांनी सन्मानलेल्या डिझायनरने डिझाइन केलेला आहे. त्या गजबजलेल्या ठिकाणी एलायझाची एकाशी धडक, मग तिचे ग्राम्य उच्चार, उच्चारशास्त्राचा (फोनेटिक्सला काय म्हणावं?) प्रोफेसर हिगिन्स हे सगळं वहीत नोंदवून ठेवत असतो, तिथेच कर्नल पिकरिंग हा दुसरा उच्चारशास्त्रप्रेमी भेटतो. तिथे त्यांची ओळख झाल्यावर येतं ते प्रोफेसरच्या तोंडी पहिलं गाणं - 'व्हाय कान्ट दि इंग्लिश टीच देअर चिल्ड्रन हाऊ टू स्पीक'. गाण्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतरच्या एका प्रसंगात एलायझाच्या 'ऑल आय वॉन्ट इझ अ रूम समव्हेअ-' या गाण्यावर मोठा कडकडात झाला. पुढे तो प्रत्येक गाण्यावर होत राहिला. काय आहे, की ह्या नाटकाची गाणी श्रोत्यांतल्या अनेक जुन्या मंडळींना चांगलीच परिचयाची होती. आपल्याकडे कसं 'राधाधर मधुमिलिंद', 'प्रिये पहा' वगैरे गाणी आपल्याला ऐकून ऐकून माहिती आहेत. पण संगीत सौभद्र कधी बघायला गेलो तर त्या त्या गाण्यांचा कॉन्टेक्स्ट लक्षात येऊन अजून भारावल्यासारखं होतं, तसंच ह्यांचं होत असणार. पूर्वी म्हणे शोले चित्रपटाच्या संवादांची कॅसेट मिळायची. लोकांना ते संवाद आधी पाठ असत व पिक्चर नंतर बघत, त्यांचंही तसंच होत असणार.

मी नाटकातला तो सेट बघतच राहिलो. त्या भव्य सेटमधल्या इमारतींचे मजले केवळ आभासी नव्हते; वरच्या मजल्यावर खिडकीत एक पात्र बसलं होतं. पुढच्या एका प्रसंगात एलायझा(फुलवाली)चा बाप दारूच्या अमलात रस्त्यावर ज्या गमतीजमती करतो तेव्हा तो वरती बसलेला माणूस खिडकीतून कागदी बोळे खाली फेकतो असंही त्यात होतं. इथे ह्याच प्रसंगी ते गाणं येतं 'विथ अ लिट्ल बिट ऑफ लक'. ह्या गाण्याचा ठेका खूप कॅची आहे. त्यामुळे पुढे कितीही गाणी आली तरी हे कायम डोक्यात राहतं. ते गाता गाता त्या एलायझाचा बाप आणि मित्रमंडळी जो नाच करतात, तो फार मजेशीर आहे. बाकी मी आता सगळी कथा सांगत बसत नाही. पण प्रसंग बदलायचा तसा हा सेट फिरवला जायचा आणि त्याच्या मागच्या बाजूला प्रोफेसरच्या घराचा दिवाणखाना. आपल्या डोळ्यांदेखत रंगमंचाचं रूप पालटताना बघणं हा एक चामत्कारिक (विचित्र ह्या अर्थाने नाही) अनुभव होता. प्रोफेसरच्या पैजेचा परमोच्च बिंदू म्हणजे एलायझाला एम्बसी बॉल (बॉलरूम)मध्ये एक डचेस म्हणून 'प्रेझेण्ट' करणं. डचेसला मराठीत काय म्हणावं? सरदाराची बायको - सरदारीण? छ्या! नाही सुचत आहे शब्द. ते जाऊ दे. तर त्या प्रसंगाला नाटकात डोळ्यांच्या पापण्या मिचकावेस्तोवर रंगमंचाचा कायापालट झाला. प्रोफेसरचं ड्युप्लेक्स घर विंगेत गायब होऊन तिथे जवळपास एक राजवाडा अवतरला होता. ठिकठिकाणी नक्षीदार काचेचे दिवे आणि त्यांवर मेणबत्त्या. पाठीमागे सर्व रंगमंचावर निळा प्रकाश. स्टेजच्या वरून अचानक काही झुंबरं खाली येऊन लोंबायला लागली. स्टेजवर मोठमोठ्या निरनिराळ्या आकाराचे उंची टोप घातलेली मंडळी स्टेजवर आली. हे असले टोप इतक्या मोठ्या प्रमाणात नंतर फक्त डाऊनटन अ‍ॅबीमध्येच पाहिले मी. एलायझाच्या कायापालटाने तर त्या मंचाच्या कायपालटाला मागे टाकलं. तो पूर्ण बॉलचा प्रवेश प्रेक्षकही आ वासून बघत राहिले. त्या प्रवेशानंतर लगेचच मध्यंतर झालं तरी तो आ तसाच होता.

जॉर्ज बर्नार्ड शॉचं पिग्मॅलियन हे नाव एका ग्रीक मिथकावर आधारित आहे. त्या मिथकानुसार पिग्मॅलियन नावाच्या एका शिल्पकाराला सर्वच स्त्रियांविषयी राग असतो. तो एकदा एका सुंदर स्त्रीचं शिल्प घडवतो आणि त्या शिल्पाच्याच प्रेमात पडतो ('शिल्पा' हे नाव नव्हे). प्रोफेसर हिगिन्सही तसाच आहे. 'व्हाय कान्ट अ वुमन बी मोअर लाईक अ मॅन' या गाण्यात त्याचा त्रागा आपल्याला दिसतो. पण इथे फरक असा आहे की इथे मुळात कुठलं निर्जीव शिल्प नसून एक खरोखर व्यक्ती आहे. तिला आपण 'घडवलं' हा अहंकार प्रोफेसरला होतो. त्याला प्रेमाची जाणीव अगदी नाटकाच्या शेवटाकडे होते. शॉच्या नाटकाचं नाव पिग्मॅलियन असल्यामुळे प्रोफेसर हिगिन्स हे त्याचं मध्यवर्ती पात्र आहे की काय याची मला शंका आहे. मी ते नाटक पाहिलं किंवा वाचलेलं नाही. या कथेत जरी हिगिन्स आणि एलायझा ह्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या भूमिका असल्या तरी माझ्या मते एलायझाच याची नायिका / प्रोटेगॉनिस्ट आहे. रस्त्यावर फुलं विकणारी आणि शिवराळ गावंढळ भाषेत बोलणारी गरीब फुलवाली ते डचेस म्हणून उभी राहणारी आणि तिच्या अदब आणि अदांनी राजेशाही लोकांवरही छाप पाडणारी, आणि प्रोफेसरला पुढे ठणकावून त्याच्या चुका सांगणारी, कानउघाडणी करणारी एलायझा डूलिट्ल. तिचं न्यूनगंडात्मक आडनाव हे विरोधाभास ठरावं इतकं काम तिला आहे. त्यामुळे तिचं केंद्रस्थान सार्थ करणारी 'माय फेअर लेडी' आणि 'ती फुलराणी' ही दोन्ही नावं मला योग्य वाटतात.

नाटक संपल्यावर बाहेर आलो तेव्हा सर्वजण त्या धुंदीतच होते. काही जण कलाकारांची स्तुती करत होते, काही गाणी गुणगुणत होते, तर काही त्यातल्या तांत्रिक बाबींना पाहून अचंबित झाले होते. सर्वार्थाने परिपूर्ण असा तो नाट्यप्रयोग होता. आम्हालाही एका वयस्कर गोर्‍या जोडप्याने विचारलं की कसं वाटलं म्हणून. आमच्या गप्पांत त्या काकू म्हणाल्या की त्यांनी हे त्यांच्या लहानपणी पाहिलं होतं. मी म्हणालो की हे मी पूर्वी मराठीत पाहिलं आहे. त्या काकूंना ज्या भाषेचं नावही माहीत नाही त्या भाषेत हे नाटक भाषांतरित / रूपांतरित आहे याचा फार मोठा अचंबा वाटला. परतीच्या वाटेवर पुन्हा पब्लिक ट्रान्सपोर्टने जात असताना आजूबाजूला नेहमीप्रमाणे लोक होते, गर्दी होती, पण आमच्या डोळ्यांसमोर अजूनही त्या नाटकांतली दृश्यं आणि त्यातली भव्यता तरळत होती. दुसर्‍या दिवशी माझ्या विद्यापिठातल्या प्राध्यापकाने नेहमीप्रमाणे वीकांत कसा होता ते विचारलं. यावेळी नेहमीप्रमाणे 'फाईन, नॉट टू बॅड'पेक्षा मला बोलण्यासारखं खूप काही होतं. 'माय फेअर लेडी' नाव ऐकताच प्रॉफचे डोळे चमकले. "आम्ही लहान असताना माझे काका आम्हा सगळ्या पोराटोरांना घेऊन सहलीला जायचे. त्यांच्याकडे एक रेकॉर्ड प्लेअर होता आणि त्यावर कायम ते ह्या नाटकातली गाणी लावायचे. 'विथ अ लिट्ल बिट ऑफ लक' - मी कधीच विसरू नाही शकत."

माझ्या डोक्यात विचार चालले होते - 'दोन वर्षांपूर्वी मला कुठे माहीत होतं की मी कुठल्या देशात कुठल्या शहरात असेन? तिथे कधी अशी मंडळी येतील, ज्यांची आपण केवळ नावंच ऐकून असतो, ते असं नाटक आणतील, जे इतकं भव्य दिव्य असेल, आणि ते जाऊन बघण्याची आम्हाला बुद्धी होईल...'. सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच - 'विथ अ लिट्ल बिट ऑफ लक'!

--------------------
टीपा
- 'ऑल आय वॉन्ट एझ अ रूम समव्हेअर' साधारण ह्याच अर्थाचं 'रहने को एक घर होगा' हे गाणं (तिथे लता मंगेशकरांनी गायलंय असं लिहिलंय, पण मला आवाज त्यांचा वाटत नाहीये) आहे. राजेश रोशनची चाल हे म्हणणं चुकीचं ठरेल कारण चाल मुळात ऑल आय वॉन्टचीच आहे अगदी बिट-टू-बिट. फक्त मूळ गाण्यातलं 'लॉट्स ऑफ चॉकलेट फॉर मी टु ईट'च्या जागी ज्यांनी 'खाने को हलवा होगा' लिहिलंय ना, त्यांना माझ्यातर्फे हलव्याचे दागिने उत्तेजनार्थ बक्षीस.
- १९५६च्या ब्रॉडवेच्या नाटकात रेक्स हॅरिसनने प्रोफेसरची भूमिका केली आणि गाजवली. पुढे चित्रपटातही प्रोफेसरची भूमिका ह्याच गुणवंत कलाकाराने केल्यामुळे आपल्याला त्याचा अभिनय बघता येतो. त्याने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे ती. परंतु नाटकातली एलायझा मात्र सिनेमात बदलली. कारण त्यावेळी म्हणे जूली अँड्रुझ ही प्रसिद्ध नव्हती. ऑड्रेने ती सुंदरच केली आहे यात प्रश्नच नाही, पण जूलीही खूप गुणी अभिनेत्री आहे आणि ती ती भूमिका कोळून प्यायली होती. असो. तिने कधी त्याबद्दल राग मानला नाही. दोघींमध्ये पुढेही मैत्रीचे संबंध राहिले.
- आणखी टिपा आठवतील तश्या खाली प्रतिसादांमध्ये देईन. हा धागा माय फेअर लेडी, ती फुलराणी - या नाटक, सिनेमा यांबद्दल लिहायला जरूर वापरा. तुमच्या प्रतिक्रिया, अनुभव, किंवा असेच कुठल्या वेगळ्या नाटकाचे अनुभवही वाचायला आवडतील.

ता.क. जुने फोटो सापडले. त्यांची क्वालिटी फारशी चांगली नाही, कृपया गोड मानून घ्या.

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर फुलवलेला लेख आवडलाच.
लग्नाचा वाढदिवस साजरा करायला याहून दुसरं कारण लागणार नव्हतं >>>
तुमचा तो वाढदिवस अगदी वसूल झाला असे समजा ! Happy

मी 1980 च्या दशकात भक्ती बर्वे यांचे नाटक पाहिलेले आहे आणि त्यांच्याबरोबर त्यात सतीश दुभाषी होते. अविस्मरणीय अनुभव.
आ हा हा !!!

1988मध्ये माझा भक्तीताईंच्या भगिनींशी चांगल्यापैकी परिचय झाला. त्यांच्याशी बोलताना भक्तीताईंची झाक अगदी स्पष्टपणे जाणवायची. त्यांच्या रूपात आपण जणू भक्तीताईंनाच पाहत आहोत असे एक समाधान लाभले.

वा! वा ! फार सुंदर लेख. तुमच्यासोबत तो नाट्यानुभव घेतल्यासारखं वाटलं.

' तुला शिकवीन चांगलाच धडा' हे स्वगत अभिनय 'दाखवण्या'साठी इतकं वापरलं गेलंय याची कल्पना नव्हती. मी कॉलेजात असताना एका स्पर्धेसाठी मीनल परांजपे परीक्षक म्हणून आल्या होत्या. त्यांनीही हेच स्वगत करून दाखवलं होतं, हे आठवतंय.

भक्ती च्या तुला शिकवीन चांगलाच धडा या स्वगताचा व्हिडियो झी मराठीच्या (पु लं वरच्या?) नक्षत्रांचे देणे मध्ये समाविष्ट केला गेला होता. तेव्हा ती अर्थात या जगात नव्हती नव्हती. प्रेक्षकांत पहिल्या रांगेत तिची आईच बसली होती.

'रहने को घर होगा'- ची गायिका मीना टी. असं सारेगमच्या यु ट्यूब चॅनेलवर व अन्यत्र दिसलं. मीना टी म्हणजे जयश्री टीची बहीण. त्या गाण्यातही दिसते आहे.

अरुणा इराणीच्या एका मुलाखतीत की तिच्यावरच्या लेखात तिची पहिली गाजलेली भूमिका म्हणजे गुजरातीतली फुलराणी - संतू रंगीली असं वाचलं होतं. आता शोधलं तर दिसतंय की पहिली संतू रंगीली सरिता जोशींनी रंगवली. इथे तेराव्या मिनिटापासून गुजरातीतलं 'तुला शिकवीन चांगलाच धडा' पाहता येईल. मराठी आणि गुजराती - दोन्हीतलं आधी कोणतं आलं असेल, याबद्दल कुतूहल आहे.

"शिल्पा हे नाव नव्हे," ही कोटी टाळली असती, तर बरं झालं असतं.

पुन्हा एकदा , लेख खूप आवडला.

मस्त लिहिलंय हपा. माय फेअर लेडी पिक्चर पाहिला आहे ऑड्री चा.अतिशय नेत्रसुखद, कानाला सुखद अनुभव.रेन इन स्पेन स्टेज मेनली ऑन द प्लेन, लिटल बीट ऑफ लक,जस्ट यु वेट आणि इतर.
पिगमेलीयन मूळ नाटक पुस्तकात एलायझा चं फ्रेडी शी लग्न होतं.पिक्चर मध्ये प्रोफेसर शी होतं.

सुरेख लेख. भक्ती बर्वे यांची 'ती फुलराणी' पाहिली आहे.

पिगमेलीयन मूळ नाटक पुस्तकात एलायझा चं फ्रेडी शी लग्न होतं.पिक्चर मध्ये प्रोफेसर शी होतं>>>

मूळ नाटकात शेवट थोडा open ended ठेवला आहे. एलायझा फ्रेडीने लग्नाची मागणी घातली आहे आणि ती लग्न करणार आहे हे सांगते आणि जाते. प्रोफेसर त्यावर हसत बसतो आणि नाटक संपते. खरोखर लग्न होते की नाही हे सांगितलं नाही. नाटकाचा दिग्दर्शक हर्बट ट्री यानेच प्रोफेसरची भूमिका केली होती. असा open ended शेवट प्रेक्षकांना रुचणार नाही म्हणून तो एलायझा जाताना तिच्याकडे गुलाबाचं फूल भिरकावयाचा. लोकांना ते एकदम पसंत पडलं. पण त्यामुळे त्याच्यात आणि शॉ मधे बरेच वाद झाले.
संगीतीका आणि सिनेमामधे शेवट एकदम बॉलिवुडी थाटाचा केला आहे. Happy

ओह, हां बरोबर.कादंबरीत शेवटी परिशिष्ट आहे त्यात प्रोफेसर ने फ्रेडी ला बिझनेस उघडून दिला पण त्यातही फ्रेडी ने विशेष केलं नाही असा लटकता शेवट होता बहुतेक.

सुंदर लेख आणि वर्णन! खरोखरच अविस्मरणीय अनुभव असणार.

एकूण नेपथ्याचे वर्णन वाचता कमाल केलेली दिसते. मी पिग्मॅलियन पाहिलेले नाही. माय फेअर लेडी व फुलराणी हे बहुधा सलग पाहिलेले नाहीत, किमान तसे आठवत नाहीत. पण त्यातले प्रसंग आठवतात एखाद दुसरे. पुलंनी मराठीकरण फार चांगले केले आहे असे वाचले आहे. सुबोध भावे व प्रियदर्शिनी इंदलकरचा "फुलराणी" मधे पाहिला होता, पण तो पुलंच्या नाटकातील संहिता/पटकथा वापरून बनवलेला वाटला नाही. याच कथेवर देव आनंद-टीना मुनिमचा "मनपसंद" कधीतरी पाहिला होता. पण तो ही फारसा आठवत नाही. तू बहुधा त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ त्या रहने को एक घर होगा मधे दिला आहेसच. तेव्हा माय फेअर लेडी किंवा पुलंच्या फुलराणीतील एक नीट सलग पाहिले पाहिजे असे आता वाटत आहे Happy

डाउनटन अ‍ॅबी मधला तो कलाकार कोण?

आणि त्या दिवशी प्रयोग होता. दुसरं कारण म्हणजे हा एक नावाजलेला नाट्यसंघ होता. याची दिग्दर्शिका होती स्वतः जूली अँड्र्युझ. होय, तीच जूली, जी साउंड ऑफ म्युझिकची नायिका/गायिका आहे, तीच पूर्वी मूळ ब्रॉडवेच्या माय फेअर लेडी म्यूझिकलची नायिका >>> कसलं ग्रेट ! हपा, तुस्सी ग्रेट हो.

शिल्लक पैशातून नाटकाची तिकीटे ती ही गाजलेल्या कलाकृतीची काढणे हे खरंच दर्दी माणसाचं काम आहे. या बाबतीत दंडवत घ्यावा.
लेख वाचताना जणू काही त्या हॉल मधे बसलोय आणि माय फेअर लेडी पाहतोय असं वाटलं. यु ट्यूबवर आहे त्यात स्टेज कव्हर झालेलं आहे. भव्य प्रेक्षागृह काही दिसलं नाही. आपण काय मिसलं हे लेख वाचताना समजलं.

ती फुलराणी भक्ती बर्वे असताना दूरदर्शनसाठी एकदा स्पेशल प्रयोग झाला होता. हे नाटक काही वर्षांनी सह्याद्री किंवा मेट्रो वाहिनीवर पुनःप्रक्षेपित झालं होतं. ते खूप म्हणजे खूपच रंगलं होतं. ते स्वतंत्र नाटक म्हणून आवडलंच होतं.

या ठिकाणी कबुली द्याविशी वाटते कि माय फेअर लेडीशी माझी ओळख देव आनंदमुळे झाली.
रिलायन्स पुरस्कृत मनपसंद सिनेमाद्वारे. सुभाचा फुलराणी पाहू शकलो नाही.

हा लेख मनात राहील.

रच्याकने - २०१७ सालचा अनुभव आहे का हा ?

अरे काय लिहिलं आहेस! मस्त अनुभव!
एका श्वासात वाचलं सगळं. नाटक संपल्यावरचे अनुभव वाचताना अंगावर रोमांच शहारे काय म्हणतात तसं कायस झालं.
कधी इकडे आलं तर नक्की बघेन.
नाटकाचा पदडा उघडला म्हणजे तिकडे पडदा पडत असणार. इकडे बघितली ते आपण नाट्यगृहात शिरल्यावर रंगमंचावरील नेपथ्य दिसतच. मध्ये पडदा नसतोच.

लेख खूपच मनोरंजक झालेला आहे. आवडला आहे.
----------
इथे मी 'अलादिन' पाहीलेला ब्रॉडवे शो. तो गालिचा कसा उडत होता ते अजिबात कळले नाही. पुढे बसले होते अगदी पण तरीही ना दोर्‍या दिसल्या ना काही. चमचमणारी तारकांची रात्र आणि जास्मिन व अलादिन उडत्या गालिच्यावर आरुढ - फार नेत्रसुखद दृष्य होते.

सुंदर लिहिलं आहे.
मीही अमृता सुभाष-अविनाश नारकर यांचंच 'ती फुलराणी' नाटक बघितलं आहे आणि मलाही ते आवडलं नव्हतं. भक्ती बर्वेचं ते सुप्रसिद्ध स्वगत टीव्ही/आता यूट्यूबवर वगैरे बघितलं आहे. माझ्या बहिणीच्या एका मैत्रिणीने घरगुती कार्यक्रमात म्हटलेलं हे स्वगतही ऐकलंय.
'जीवन त्यांना कळले हो' हे जे पुलंवरच्या विविध मान्यवरांच्या लेखांचं संकलन आहे, त्यात भक्ती बर्वेचा लेख आहे. खूप छान लेख आहे तो. त्यात तिने असं लिहिलंय की नाटकात 'दगडोबा' हे जे पात्र आहे ते काम पुलंनी स्वतः करायचं ठरवलं होतं आणि त्यानुसार तालमीही सुरू झाल्या होत्या. ते खूप गोड काम करायचे. ('गोड' हाच शब्द तिने वापरलाय!) पण सतीश दुभाषी एकदा पुलंना म्हणाले की तुम्ही पहिले पन्नास प्रयोग गाजवाल, मग तुमच्या इतर व्यापांमधून तुम्हाला वेळ व्हायचा नाही आणि मग तुम्ही हे काम दुसऱ्या कुणाला तरी द्याल. मग आम्हाला बघायला कोण येईल? Wink हे पुलंना पटलं आणि त्यांनी ते काम मुळातच करायचं नाही असं ठरवलं. Happy

हर्पा भाग्यवान आहात.खूपच मस्त अनुभव आणि त्याचं वर्णन पण.

मी ती फुलराणी तुकड्या तुकड्यात बघितलं आहे. मनपसंद बहुतेक टिव्ही वर पण चिडचिड करतच बघितला होता. चिडचिड अशासाठी कि काय तो देवानंद आणि टिना मुनिम आणि काय ती गाणी (शब्दशः उचललेली) . रहे को इक घर होगा, आणि सारेगमपमगरे साग साग .
पण नंतर मला माय फेअर लेडी ची कॅसेट मिळाली होती आणि ती मी वेड्यासारखी ऐकली. बहुतेक पुस्तक ही होतं. पण मला जास्त इंटरेस्ट गाण्यात होता. मी तेव्हा या संदर्भात लं सगळं वाचून काढलं होतं. ही जी टीप तुम्ही लिहीली आहेत जूली आणि ऑड्री ची ते मला वाचल्याचं आठवतंय आणि खूप गंमत वाटली होती तेव्हा.

>>>>परंतु नाटकातली एलायझा मात्र सिनेमात बदलली. कारण त्यावेळी म्हणे जूली अँड्रुझ ही प्रसिद्ध नव्हती. ऑड्रेने ती सुंदरच केली आहे यात प्रश्नच नाही, पण जूलीही खूप गुणी अभिनेत्री आहे आणि ती ती भूमिका कोळून प्यायली होती. असो. तिने कधी त्याबद्दल राग मानला नाही. दोघींमध्ये पुढेही मैत्रीचे संबंध राहिले.<<<<

भरत ,लिंक साठी धन्यवाद. बघितलं, अफाट काम करते ती सरीता जोशी

आहाहा, चित्रदर्शी वर्णन.

तुमच्याबरोबर आम्हीही अनुभवलं सर्व.

भक्ती बर्वेचा तो प्रवेश दूरदर्शनवर बघितलेला आणि अमृता सुभाषचाही बघितलेला दूरदर्शनवर. भक्ती बर्वेपुढे नतमस्तक. त्यांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवली फुलराणी, त्याच्या आसपास कोणी पोचू शकेल, असं वाटत नाही.

प्रतिसाद वाचले नाहीत अजून.

खतरनाक, हपा! आंग्ल देशी राहूनही कधी नाटक बघितलं नाही. आर्थिक बाब महत्त्वाची नव्हती. पण त्या ऑराचं दडपण यायचं, खोटं का बोलू...

भक्ती बर्वेंचं फुलराणी बघणं नशिबी नव्हतं.
पुढे माय फेअर लेडी सिनेमा मात्र कैकदा बघितला, पारायणं केली! ते पक्कं उच्चभ्रू इंग्रजी वातावरण कादंबऱ्यांतून नजरेसमोर उभं रहायचं ते पिक्चरमध्ये प्रत्यक्ष पाहिलं. ऑड्री हेपबर्ननं ती भूमिका समरसून केली आहे. तिचं प्राजक्ताच्या फुलासम नाजुक सौंदर्य त्या फुलासारखंच अल्पजीवी. या पिक्चरमध्ये ते थोडं कोमेजायला सुरूवात झाली होती. पण तोपर्यंत रोमन हॉलिडे मधली अल्लड, नवथर बालिका टिफनीचा ब्रेकफास्ट करून अभिनयात माहिर झाली होती. त्यामुळेच तिला इंग्लिश कनिष्ठ वर्गातली टक्केटोणपे खाऊन तयार झालेली तरुणी समर्थपणे रंगवता आली. तिचं उच्चैरवातलं किंचाळणं अगदी आपल्या इथल्या नळावरच्या भांडणांची आठवण करून देतं! पण रेक्स हॅरिसन एवढा आवडला नाही बरं का..
बऱ्यापैकी गाऊ शकणाऱ्या ऑड्रीला या पिक्चरमध्ये मार्नी निक्सन या गायिकेने प्लेबॅक दिला आहे.
ऑड्री हेपबर्नचा फॅन असूनही वाटतं, ज्युली ॲन्ड्यूज या पिक्चरमध्ये कशी बरं वाटली असती?! ताठ कण्याची मारिया - साऊंड ऑफ म्युझिक - बघून वाटतं, कदाचित लवलवत्या शेंगेसारखी ऑड्री या परिवर्तनाचे अनेक रंग दाखवण्यात, भावनांचे हिंदोळे खुलवण्यास अधिक योग्य असावी. पण...

असो. हपा, सुंदर वर्णन. असं काही की आठवणींचा पिटारा खोलला गेला! त्या बापाचं काम करणारा नट कसला रावडी होता..

सुंदर लिहिले आहे . तुमच्याबरोबर आम्हालही सफर घडली मस्त .

४ महिन्याची शिल्लक अश्या प्रकारे खर्च करायचे धाडस दाखवले याचे कौतुक वाटले . माझं काही धाडस झाल नसते .

मी अमृता सुभाष चे नाटक बघितले आहे . त्यात ती फारच लाऊड वाटलेली .

भरत यांनी कुठली लिंक दिली आहे ?

>>>>अरुणा इराणीच्या एका मुलाखतीत की तिच्यावरच्या लेखात तिची पहिली गाजलेली भूमिका म्हणजे गुजरातीतली फुलराणी - संतू रंगीली असं वाचलं होतं. आता शोधलं तर दिसतंय की पहिली संतू रंगीली सरिता जोशींनी रंगवली." इथे" तेराव्या मिनिटापासून गुजरातीतलं 'तुला शिकवीन चांगलाच धडा' पाहता येईल. मराठी आणि गुजराती - दोन्हीतलं आधी कोणतं आलं असेल, याबद्दल कुतूहल आहे.>>> हे भरत यांच्या पोस्टीत जाऊन बघ "इथे"
मी ती क्लिप बघितली आणि लहानपणी बघितलेली गुजराथी नाटकं आठवली. आमच्या एन् आर सी कॉलनी मध्ये माघी गणपतीत नाट्य महोत्सव असायचा. दर्जेदार नाटकं यायची. मराठी, गुजराथी पण- गुजराथी नाटकं - मला नाव आठवतंय केवडा नो डंख, ( यात पण भक्ती बर्वे ने काम केलंय बहुतेक) लफडासदन, रंगिलो रतन, पण गुजराथी ती फुलराणी नाही आलं आमच्या कडे. गुजराथी कोणी लिहीलाय? चांगलं असावं असं वाटतं.

आहाहा, चित्रदर्शी वर्णन.

तुमच्याबरोबर आम्हीही अनुभवलं सर्व.

भक्ती बर्वेचा तो प्रवेश प्रत्यक्ष बघितलेला. >>>> आणि अमृता सुभाषचाही बघितलेला दूरदर्शनवर. भक्ती बर्वेपुढे नतमस्तक. त्यांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवली फुलराणी, त्याच्या आसपास कोणी पोचू शकेल, असं वाटत नाही.>>> मम

हर्पा : फारच अविस्मरणीय अनुभव. असे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात. अर्थात त्यासाठी ४ महिन्याची शिल्लक खर्चण्याचे धाडस पण लागते.

ऑड्रे हेपबर्नच्या 'माय फेअर लेडी'ची सीडी आहे. फार गोड काम केलंय तिने. पुन्हा पाहणे आले. भक्ती बर्वे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या प्रयोगातले ते स्वगतही पहिले आहे. अर्थातच आवडले आहे. ज्युली अँड्र्यूज मारिया आणि ऑड्रे एलायझा म्हणून डोक्यात बसल्या आहेत. आता ज्युलीला एलायझा म्हणून इमॅजिन नाही करू शकत.

हरपा,
आपल्या या अविस्मरणीय अनुभवाची या लेखातून आम्हाला चित्रदर्शी, नितांतसुंदर अनुभूती दिल्याबद्दल खूप आभार.
फारच सुंदर लेख.
फारच अविस्मरणीय अनुभव. असे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात. अर्थात त्यासाठी ४ महिन्याची शिल्लक खर्चण्याचे धाडस पण लागते.>>>+१११११

सुंदर लेख ! खरंच नशीबवान आहात !!
भक्ती बर्वे, अमृता सुभाष व नंतर हेमांगी कवी ह्या तिघांनीही साकारलेली एलायझा पहिली कारण तें नाटक बघणंच अपरिहार्य होतं !!
ज्युली ॲन्ड्यूज व ऑड्री हेपबर्न - ज्युलींने ब्रॉडवेवर एलायझाच्या भूमिकेवर स्वतःची छाप उमटवली होती व नाटकाचे विक्रमी प्रयोग केले होते. तिला डावलून सिनेमात ऑड्री हेपबर्नला त्या भूमिकेसाठी घेतल्याने ज्युलीला प्रचंड निराशा वाटण साहजिकच होतं. योगायोग असा की ' साऊंड ऑफ म्युझिक ' व ' माय हेअर लेडी ' एकाच वर्षी ' ऑस्कर ' साठी आमने सामने होते व ऑड्री हेपबर्नला ' माय फेअर...' साठी नाहीं, तर ज्युलीला ' साऊंड ऑफ.. ' साठी बेस्ट अभिनेत्रीच ऑस्कर मिळालं !! Poetic justice की, विथ अ लिटल बीट ऑफ लक. ?

मस्तच लिहिलं आहे. हर्पा धन्यवाद ह्या लेखाबद्दल... एका शो साठी चार महिन्यांची शिल्लक खरचं करायला तेवढीच पॅशन पाहिजे .. ग्रेट आहात... ह्याला म्हणतात जगणं...
My fair lady आणि भक्ती बर्वेच फुलराणी ( बाकी कोणाचं बघायची इच्छा ही होत नाही.) दोन्ही बघितलं आहे. दोन्ही तितकच आवडलं होत. सतीश दुभाषी आणि भक्ती बर्वे दोघं ही अप्रतिम अभिनय ... लिखाण ही तितकच ताकदीच... अनुवाद किंवा मूळ कल्पना आपली नसून ही अगदी आपल्या मातीतली च गोष्ट वाटावी अस लिहिलं आहे. हे नाटक मी जवळ जवळ पन्नास वर्षापूर्वी बालगंधर्व ला ( जेव्हा ते एकदम नवीन होत .) पाहिलं आहे. आणि ते ही कॉलेज ला दांडी मारून. तेव्हा पुण्यात कारखान्याना गुरवारी सुट्टी असे म्हणून गुरवारी प्रयोग होता. आमच्या कॉलेज मध्ये वर्गात वीसच मुलं असायची त्यामुळे दांडी मारणं सोपं नव्हत. तरी कसं तरी जमवलं होतं. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.

My fair lady ही पुण्यातच पाहिला होता . आणि तो ही तितकाच आवडला होता. रोमन holiday आणि हा हे दोन्ही पाठोपाठ पाहिले होते आणि ती नायिका म्हंजे ऑड्री हेपबर्न फारच आवडती होती. हल्ली लंडनमध्ये घोडा गाड्या दिसत नाहीत, लांब कोट ही दुर्मिळ च झालेत , फार कोणी छत्र्या ही वापरत नाही, हुड वाल्या जाकिटांवर लंडनचा भुरभुरणारा पाऊस आरामात मॅनेज होतो पण सेंट्रल लंडन मध्ये फिरताना विशेषतः पिकडली भागात वगैरे पाऊस आला तर तो पहिला सीन अजून ही आठवतो मला.

सुंदर अनुभव कथन! चार महिन्याची शिल्लक तिकिटासाठी वापरलीत, आणि लाख मोलाची आठवण जमा केलीत, खरे रसिक आहात!

किती सुंदर चित्रदर्शी लिहिलंयस!

>>> चार महिन्याची शिल्लक तिकिटासाठी वापरलीत, आणि लाख मोलाची आठवण जमा केलीत
अगदी!

'माय फेअर लेडी' सिनेमा आणि 'ती फुलराणी' दोन्हीही फार जिव्हाळ्याचे विषय आहेत. पुलंनी नुसतं भाषांतर केलं नाही नाटकांचं, त्याची मुळं इथल्या मातीत रुजवून फुलराणीचं इथलं वाण फुलवलं! 'मंजुळा साळुंके' नावाबद्दल तुझ्या दुसर्‍या धाग्यावर लिहिलं होतंच.
'तुला शिकविन चांगलाच धडा' या स्वगताला संगीत नाटकांतल्या पदासारखा 'वन्स मोअर' आला पाहिजे' असं दिग्दर्शक पुलंनी भक्ती बर्वेला सांगितलं होतं म्हणे. आणि तसा तो तिला हमखास मिळतही गेला.

शाळकरी वयात सिनेमा प्रथम पाहताना (व्हीसीआरवर टेपवर!) गाणी पुन्हा पुन्हा रिवाइंड करून पाहिली होती आणि 'I will always be a lady to Col. Pickering, because he always treats me like one!' या वाक्याशी थक्क होऊन थांबले होते हे अजून आठवतं!
मात्र सिनेमाचा शेवट मला अजूनही आवडत नाही. तिने हिगिन्सला क्षमा करणं कळतं, पण त्याच्याकडे परत जाणं मात्र समजत नाही मला. गेली तरी ते किती काळ सुखाने नांदतील याची शंका येत राहते. असो. रेक्स हॅरिसन फार आवडला होता मात्र त्यात - आणि त्याला ऑस्करही मिळालं होतं! Happy

आता पुन्हा सिनेमा पाहणं आलं. Happy

खुपच सुंदर लिहिलयं हर्पा.

मी भक्ती बर्वेंची फुलराणी बघितली आहे, पण My Fair Lady चा योग मात्र अजून तरी आला नाहिये.

तुम्हा सर्वांच्या उत्कट प्रतिसादांबद्दल आणि कौतुकाबद्दल अतिशय मनापासून आभार. इथल्या अनेक भाग्यवंतांनी भक्ती बर्व्यांची फुलराणी बघितली आहे हे वाचून हेवा वाटला. फारएण्ड आणि पुढे अनेकांनी मनपसंदचा उल्लेख केला आहे. मला ते गाणं त्या सिनेमातलं आहे हे कालच लिंक देताना कळलं. त्या सिनेमाबद्दल काहीच माहीत नव्हतं तुम्ही सांगेपर्यंत.

भरत, सरिता जोशींचा व्हिडिओ छान आहे. शिवाय तुम्ही सुचवल्याप्रमाणे 'उपरती' शब्द बदलून सुधारणा केली आहे लेखात. शिल्पाची कोटी टाळायला पाहिजे होती हे पटलं. जित्याची खोड हो!

अनु, चीकू, शॉचं पुस्तक वाचलंय? भारीच की!

फा, तो 'द स्केच'चा वयस्कर संपादक आहे ना नंतर, जो इडिथच्या प्रेमात पडतो - तो झाला होता प्रोफेसर हिगिन्स.

आचार्य, हो बरोबर. थॅन्क्यू. सुभा आणि प्रिइं यांच्या फुलराणीचा ट्रेलर बघित्ल्यापासून मला तो सिनेमा बघायची अजिबात इच्छा झाली नाही.

अमित, आता तू म्हणल्यावर मी परत विचार करायला लागलोय. पडदा होता का नक्की? आठवत नाही नीट. पण पडदा पाडणार कसा? म्हणजे शंकर्‍याचं दांडीवरून धोतर पडण्यासारखंच इमॅजिनेशन माझं आहे. पाडला तर तो स्टेजवर राहील ना?

सामो, अलाद्दिन ब्रॉडवे! जबरीच. सविस्तर वाचायला आवडेल याबद्दल. हे लोक टेक्निकली फार्च स्ट्रॉन्ग आहेत. भारतात ब्रॉडवेच्या धर्तीवर मोठा संच घेऊन मुघल-ए-आजम नाटक आत्ता काही वर्षांपूर्वी झालं म्हणे - प्रियांका बर्वे अनारकली करत होती. कुणी पाहिलंय का?

वावे, अच्छा. हे दगडोबांबद्दल माहीत नव्हतं. मला वाटायचं की पुलंना प्रोफेसर करायचा होता की काय. शिवाय सतीश दुभाषी आणि पुलंमध्ये दिसण्यात बरंच साम्य आहे. अर्थात ते एकमेकांचे मामे-आते भाऊच होते म्हणा!

तिचं प्राजक्ताच्या फुलासम नाजुक सौंदर्य त्या फुलासारखंच अल्पजीवी. >> काय चपखल वर्णन केलंत Abuva!

ज्युलीला ' साऊंड ऑफ.. ' साठी बेस्ट अभिनेत्रीच ऑस्कर मिळालं !! Poetic justice की, विथ अ लिटल बीट ऑफ लक. ? >> फारच आवडला हा प्रतिसाद, भाऊ Happy

कुमार, धनुडी, मनीमोहोर, स्वाती, तुमच्या आठवणीही खूप छान आहेत.

>>> मराठी आणि गुजराती - दोन्हीतलं आधी कोणतं आलं असेल, याबद्दल कुतूहल आहे.
भरत, 'ती फुलराणी'च्या संहितेची प्रथमावृत्ती १ जानेवारी १९६०ला प्रकाशित झाली होती असं दिसतंय.

तसंच, 'संतु रंगीली'वर सिनेमा आला होता की काय - IMDB वर एन्ट्री आहे. अरुणा इराणी त्यात होती असं दिसतंय.

Pages