पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - देवरियाताल (२)

Submitted by साक्षी on 18 June, 2024 - 12:31

भाग १

पहिला दिवस असल्याने या दिवशी आमचा ट्रेक जरा सोपा होता. या दिवशी फार उंचीवरही गेलो नाही. सारी ६५६० फूटांवर आहे आणि ही कँप साईट ७८४१ फूट, यावरून थोडा अंदाज येइल. म्हणजे पुण्यातल्या व्यायाम करणार्‍यांना कळेल असं सांगायचं तर एक किंवा जास्तीत जास्त दिड ARAI टेकडी! मधेच थोडा चढ, मधेच जरा सपाटी असाच सगळा ट्रेल होता. रस्ताभर हिमालयातली अगदी सगळीकडे दिसणारी rhododendron (लोकल भाषेत बुरांश) मुबलक होती, पण सिझन नसल्याने फुलं फार नव्हती. मधे थोडे थांबत टंगळमंगळ करतही आज आम्ही २ तासात आमच्या आजच्या टार्गेटच्या म्हणजे देवरिया तालच्या जवळ आलो. पूर्वी इथे तळ्याकाठी कँपिंग करता यायचे, आता वन विभागाने हे बंद केल्याने तिथून पुढे थोड्या म्हणजे अगदी ५-७ मिनिटांवर आमचा तळ होता. आजची आमचा ट्रेक म्हणजे डोंगराच्या एका बाजूवरुन च्ढून दुसर्‍या बाजूला जाणे असल्याने, तिथून आमचा बेस कँप 'सारी' जवळ असला तरी दिसत नाही.

संध्याकाळी चहा झाला की तळ्यावर जायचे आहे, आत्ता झोपू नका नाहीतर रात्री झोप येणार नाही असं सांगून ट्रेक लिडर गायब झाला.(त्याच्या टेंट मधे जाऊन झोपला असावा) झोपू नका सांगितल्याने आम्हाला अतोनात झोप येत होती. एकमेकांशी ओळखी वाढवत, चहाची वाट बघत आम्ही काही जण ताटकळत बसलो, तर काही जण (including नवरा) बिंधास्त झोपले. काही जण डायनिंग एरियातच जिथे आम्ही गप्पा मारत होतो तिथे आडवे राहून मेडिटेशन करत होते (उर्फ झोपले होते)

संध्याकाळी तळ्याचे दर्शन मात्र अगदी अहाहा असे होते. तळ्यातल्या पाण्यातल्या प्रतिबिंबांचे फोटो कितीही काढले तरी मन भरत नाही.
हा तळ्याचा फोटो
Tal1.jpeg
थंडीच्या दिवसांत हा ट्रेक केला तर समोर दिसणारे बर्फांचे डोंगर या सौंदर्यात अजुन भर घालतात. आमची उत्साही जनता फोटो काढून थकल्यावर आमचे लोकल गाइड मनोज यांनी मस्त गोष्टीचा तास घेतला. हे मनोज म्हणजे सधारण चाळिशीतले गृहस्थ असावेत. भरपूर अनुभव तर होताच पण आ णखी एक वैशिष्ठ्य म्हणजे स्टोरी टेलर होते. इथल्या गोष्टीनंतर सगळ्या ट्रेकमधे आम्ही त्यांना प्रत्येक मोठ्या ब्रेकला गोष्ट/ किस्सा ऐकवायला
सांगितला.
देवी (देवता) कधीतरी या तलावात स्नान करण्यासाठी आल्या होत्या म्हणून हा देवेरिया ताल झाला. पांडव वनवासात असताना कृष्णाने त्यांच्यासाठीच हे तळे बनवले, त्यांना विचारलेले यक्ष प्रश्न गाइडने आम्हाला विचारले. यथाबुद्धी सगळ्यांनी उत्तरं दिली. इथे कोणताही पशू पक्षी तहानलेला राहू नये म्हणून हे तळे कधीच गोठत नाही असं गावातले लोक सांगतात. जन्माष्टमीला गावातले लोक तळ्याची पूजा करतात.

नंतर अजुन एक अगदी लहानसा पण आनंददायी ट्रेल म्हणजे तळ्याला फेरी! ही फेरी मारताना छोट्या पायवाटेने जात होतो. सूर्य मावळतीला निघाला होता. त्याचे किरण दाट झाडीतून मधे मधे वाटेवर पसरले होते. मधे मधे तळ्याचंही दर्शन होत होतं. हे सगळं वाचण्यापेक्षा अनुभवणं कितीतरी पटीने सुखद आहे. प्रत्येक जंगल ट्रेक मधला हा माझा आवडता पॅच असतो. इथे फक्त पक्षांचे आवाज आणि पाउल ठेवतो तिथे पाचोळ्याचा आवाज हे अनुभवायला फार आवडतं मला. या वाटेवर एकटी असेन तर nothing like it! इथेही ५ मिनिटांसाठी का होइना पण होते. आणि या आधीच्या पिंढारी, आणि अगदी छोट्या अंधारबनलाही होते.
इथे जराशी कल्पना येईल
Ekti.jpeg
परत सगळ्यांच्या बरोबर आले
Tal2.jpeg
तळ्याला फेरी पूर्ण झाल्यावर अजुन एक (हवा करायला)
Tal3.jpeg
तळ्याकाठी फेरी झाल्यावर आमचा दुसरा लोकल गाईड विजय याने अजुन मस्त गप्पा मारल्या. मनोजजींनी अख्यायिका सांगितल्या तर विजयने त्यामागचं शास्त्रोक्त कारण सांगितलं.
हे तळं कढईच्या आकाराचे असल्याने, मध्यभागी खाली जे पाणी आहे त्याच्या उष्णतेने हे तळे गोठत नाही. खाली नॅचरल सोर्सेस असल्याने हे तळे कधीही आटलेले नाही. तसंच या सोर्सेस मधून इथलंच पाणी पलिकडे सारी गावात जाते. बावीस वर्षाचा हा विजय म्हणजे उत्सहाचा झरा होता. सतत बोलत आम्हाला गुंतवून ठेवायचा. आणि इतक्याशा वयात त्याच्या पोतडीत भरपूर अनुभव होते, फोटो काढायची आवड होती, पक्षांची माहिती होती आणि मुख्य म्हणजे तो लहनाचा मोठा झाला त्या पहाडी भागाबद्दल अतोनात प्रेम होते. देवरिया ताल मधे उतरलेले दोन तीन जण बुडल्याच्या आणि त्यांचे प्रेतही न मिळाल्याच्या बातम्या आहेत, पण त्या अधी जेंव्हा लोकांना हे तळे इतके खोल आहे याची कल्पना नव्हती, तेव्हा स्थानिक लोक/ मुले या तळ्यांत पोहायला उतरत. आमचा विजय हा त्यातला एक होता. आता उतरायची हिंमत नाही म्हणाला. या तळ्याचा तळ शोधण्याचे बरेच प्रयत्न अयशस्वी झालेत अशीही माहिती सांगितली.

भाग ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रेक कोणत्या महिन्यातला? >> मागच्या महिन्यात २४ ते ३१ मे २०२४
इतक्या वरही उकडते का?>> आत्ता तिथेही उन्हाळा आहे, त्यामुळे हो, तिथेही दुपारपर्यंत चांगलंच उकडत होतं पण तिथे रोज दुपारनंतर पाऊस येतो किंवा वारा सुटतो आणि ढगाळ हवा असते. पाऊस पडला की लगेच हवेत गारवा येतो. त्या दिवशीही दुपारी पाऊस आणि वारा याने एकदम गारेगार झालो. त्यामुळे तळ्यावर परत गेलो तेंव्हा छान गारवा होता.