आधीचा भाग : https://www.maayboli.com/node/85042
मी परत आले तोवर नियमीत पाऊस सुरू झाला होता. नाचणी रुजुन आली होती पण शेतात कोणी गेले नसल्याने तण नियंत्रण राहिले नाही, परिणामी गवत कुठले व नाचणी कुठली हे कळणे मुश्किल झाले. नाचणीला जास्त ओल राहणारी जमिन चालत नाही, चिखलणी करुन नाचणी लावली जात नाही. चिखलात नाचणी रोपे कुजणार. मी जो तुकडा शिल्लक ठेवला होता त्यावरचे पिक म्हणजे चवळी वगैरे मी काढुन घेतली होती. पाऊस पडल्यावर तिथले तण भराभरा वाढले होते. ते आता हाताने काढणे खर्चीक झाले असते. त्यामुळे नाचणी लावायचा बेत रहित केला. उगवुन आलेली नाचणी गरजुंना देऊन टाकली. ज्यांना पावसाळ्यात भात/नाचणी लावायचीय ते आपापली नर्सरी बनवतात पण खुपदा अंदाज चुकल्यामुळे एकतर रोपे उरतात तरी किंवा कमी तरी पडतात. मग ज्यांची उरतात ते ज्यांची कमी पडतात त्यांना रोपे देऊन टाकतात. याचे पैसे वगैरे कोणी मागत अथवा देत नाहीत.
थोडी नाचणी मी घरासमोरील जागेत लावली. पण हा प्लॉट खुपच लहान होता. लोकांनी नेऊनही शिल्लक राहिली ती लावली इतकेच.
पावसाळ्यातही मी जीवामृत बनवायचे काम सुरू ठेवले. दर महिन्यात एकदा जीवामृत शेतात नेऊन ओतत होते, गड्याने यात चांगले सहकार्य केले. गणपतीच्या थोडे आधी ऊसात परत तण वाढलेले दिसायला लागले. आधीचा अनुभव लक्षात घेऊन तण काढायला बाया घेतल्या. आजुबाजुच्या शेतातुन पाणी वाहात येऊन माझ्या शेतातुन ते नदीला मिळत होते. त्यातले बरेच पाणी शेतात साठत होते. पाऊस इतका पडत असायचा की शेतात आत जाऊन ऊस पाहणे अशक्य. ऊसाची वाढ थांबल्यातच होती कारण सुर्यदर्शन होतच नव्हते.
ह्या प्रतिकुल परिस्थितीत ऊस कसा वाढवता येईल ह्याचाच विचार मी दिवसरात्र करत होते. ऊस लागवडीसंदर्भात लोकांचे अनुभव वाचत होते. उस हे गवतवर्गीय पिक आहे. वर पाने येत जातात, खालची सुकुन उलटी पडतात आणि उसाला चिकटुन बसतात. असे लक्षात आले की कोल्हापुर वगैरे भागात लोक ही सुकलेली पाने काढुन टाकतात ज्यामुळे ऊस उघडा राहतो, त्याच्यावर ऊन पडते आणि प्रकाशसंश्लेषण फक्त पानात न होता पुर्ण उसात होते. यामुळे उसाचे एकुणच आरोग्य सुधारते. मला जर ऊस सोलता आला, म्हणजे ही पाने काढुन टाकता आली, तर ऊस वाढण्यात थोडी मदत होईल असे वाटले. अर्थात आंबोलीत कोणीही हे करत नसल्यामुळे गडी कुरकुरायला लागला. गवत काढणार्या बायांना गवत काढताना ऊस सोलायला सांगितले आणि मीही गडी जोडप्यासोबत ऊस सोलायला लागले. चिखलात उतरुन हे काम करताना माझी पाण्यात असलेल्या किड्यामकोड्यांबद्दलची, खेकड्यांबद्दलची, सापांबद्दलची भिती पुर्णपणे गेली. आदल्या वर्षी पावसाळ्यात शेतात वाढलेल्या गवतातुन चालायला मला खुप भिती वाटायची. पायाखाली कोण येईल का ही धास्ती वाटायची. पुढच्या वर्षी कसलीही भिती उरली नाही. अर्थात शेतात फिरताना पायाखाली बघुनच फिरावे लागते. ते आपले घर नाही तर वन्य जीवांचे घर आहे हे कायम डोक्यात ठेवावे लागते. कोणावर पाय पडला तर तो जीव उलटुन हल्ला करणारच. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. मी शेतात कायम मोबाईलवर गाणी सुरू ठेवते. आवाजाने वन्य जीव दुर पळतात.
माझे ऊसाचे पहिलेच वर्ष. ऊस सोलायच्या निमित्ताने पावसात ऊस फिरुन पाहिला गेला. उसाच्या प्रत्येक बेटातील एक दोन ऊस तरी कु़जून गेलेले आढळले. मी एकेक रोप लावले होते. त्या प्रत्येक रोपातुन पंधरा,विस, पंचविस असे ऊस फुटवे आले होते. आणि पावसाळ्यात त्यातले कित्येक कुजून गेले होते. हळहळण्याखेरिज इतर काहीही करण्यासारखे हाती नव्हते. पहिल्या वर्षी खुप ऊस कुजले. पुढची दोन वर्षे तितके कुजले नाहीत. नंतर चौकशी केली तेव्हा कळाले की पहिल्या वर्षी आंबोलीत ऊस असे कुजतातच. ऊस गवतवर्गीय असल्याने मुळातुन सतत नविन फुटवे येत राहतात. मुळाशी पाणी साचले की उशीरा फुटलेले कोवळे फुटवे कुजतात. माझे दोन तिन फुट वाढलेले फुटवे कुजलेले पाहुन वाईट वाटले.
ऊस सोडुन इतर काहीच शेतात नसल्याने पुर्ण लक्ष उसावर केंद्रित केले. पावसाळा संपत आला तसे परत एकदा तण काढुन घेतले, जसा वेळ मिळेल तसा येताजाता ऊस सोलत होतेच. ऊस उघडा राहिल तेवढा वाढेल ही आशा पावसाळा संपल्यावर मात्र ऊस जरा जोमाने वाढला. येणारेजाणारे कौतुक करायला लागले. ऊसाने पावसाळा काढला हेच त्यांच्यासाठी आश्चर्य होते.
अर्थात माझा ऊस आणि इतरांचा ऊस यात जमिन आसमानाचा फरक होता. त्यांनी खताचे बेसल डोस, भरती डोस, टॉनिक असे सगळे दिले होते. मी केवळ जीवामृत एके जीवामृत करत होते. इतर काही द्यायचे मला माहित नव्हते.
होता होता दिवा़ळी सरली, तुलसीविवाह झाला आणि ऊस तोडणीच्या कामाला सुरवात झाली. इकडे तिकडे विचारुन आमच्या गावात उघडलेल्या कारखान्याच्या टेम्पररी ऑफिसात मी माझी कागदपत्रे दिली होती पण ऊस तोडणी कधी होणार माहित नव्हते. मी आपली देव पाण्यात ठेऊन बसले होते. आजुबाजुला सगळ्यांना सांगुन ठेवले होते की मला ऊस तोडणीसाठी माणुस सुचवा म्हणुन.
सर्वत्र अशी पद्धत आहे की कारखान्याला आपली ऊस शेती संलग्न असते आणि तोडणी कारखानाच करुन घेऊन जातो. आंबोलीतही आधी अशीच पद्धत होती. कारखान्याचे लोक येऊन उस तयार झाला म्हणजे त्यात साखरेचे योग्य प्रमाण तयार झाले का हे मीटर वापरुन चेक करत आणि मगच तोडणीला संमती देत. नियम असा होता की अमुक भागातला ऊस त्या भागातल्या कारखान्यातच जाणार. कित्येक ठिकाणी ऊस पिक कुठल्या जातीचे लावायचे, खताचे डोस किती व केव्हा द्यायचे याचे नियोजनही कारखान्याने सांगितल्या प्रमाणेच करावे लागायचे. आता यातले किती होते माहित नाही. आता कुठल्याही भागातला ऊस कुठल्याही कारखान्यात देता येतो. जो ऊस कारखान्यात जातो तो स्विकारला जातो. निदान आंबोलीत तरी.
आंबोलीत सगळेजण जरी ऊस लावत असले तरी एकुण टनेज कारखान्यांना जितके पाहिजे तितके नसल्यामुळे कारखान्याच्या टोळ्या आंबोलीत येत नाहीत. आंबोलीतले लोक स्वतःच्या टोळ्या करुन ऊस तोडतात. गावातल्या लोकांना दोन चार महिने काम मिळते. टोळीच्या मुकादमाला कारखान्यातुन कमिशन मिळते आणि उसतोडीचे पर टन पैसे मिळतात. ते पैसे तो ऊसमालकाला देतो. कारखाना बंद व्हायच्या वेळी हा हिशोब होतो. त्यामुळे ऊसमालकाला ऊसाचे पैसे लगेच म्हणजे महिनाभरात मिळतात आणि तोडीचे मे मध्ये. ऊसाचे बिलींग दर पंधरा दिवसांनी होते. म्हणजे मी डिसेंबराच्या दुसर्या पंधरवड्यात ऊस तोडला तर मला जानेवारीच्या दुसर्या पंधरवड्यात पैसे मिळतात. शेतकरी हा असा विक्रेता आहे ज्याला फक्त उत्पादन काढायचा हक्क आहे. त्यापुढच्या सगळ्या बाबी दुसर्यांच्या हाती. शेतकर्याने फक्त वाट पाहात बसायचे.
पण आंबोलीत निदान उसाचे पुर्ण पैसे लगेच मिळतात. काही ठिकाणी ६०-२०-२० किंवा ८०-२० टक्के असे पैसे मिळतात. त्या उरलेल्या टक्क्यांसाठी खुप वाट पाहावी लागते. शेतकर्यांची थकबाकी अजुन दिली गेली नाही ही बातमी दरवर्षी पेपरात येतेच.
शेतकरी नेते या बाबतीत का मुग गिळुन बसलेले असतात देव जाणे. ते भांडतात एम आर पी किंवा एफ आर पी साठी. पण ही किंमत लागु होते जर सरकारने माल खरेदी केला तरच. जर सरकारने माल उचललाच नाही तर काय कामाची ही एम आर पी किंवा एफ आर पी? ऊस थेट सरकार खरेदी करत नाही तर ऊस कारखाने करतात. ऊसाची सरकारने ठरवलेली किंमत गेल्या चार पाच वर्षांत २८५० - ३४०० पर टन ह्या रेंजमध्ये आहे. पण प्रत्यक्षात शेतकर्याला काय मिळते? मला नगर जिल्ह्यातला एक शेतकरी दोन महिन्यापुर्वी भेटलेला. त्याचा कारखाना २४०० रु पर टन देतो. त्याच भागातला अजुन एक कारखाना २७०० देतो कारण त्याच्याकडे कोण उस घालत नाही, त्यामुळे शेतकर्यांना आकर्षीत करण्यासाठी तो ही किंमत द्यायला तयार आहे.
आंबोलीत काही वाड्यांतील शेतांना हिवाळ्यात धरणाचे पाणी मिळते पण ते मिळते १५ डिसेंबरनंतर. आंबोलीतल्या ऊसटोळ्या बहुतांश ऊसशेतकरी मंडळींनीच बनवलेल्या आहेत. ते स्वतःचा ऊस तोडतात आणि इतरांचाही. कारखान्याच्या टोळ्यांनी ऊस तोडण्यापेक्षा ह्या लोकल टोळ्यांनी ऊस तोडलेला लोकांना परवडतो कारण हे लोक ऊस तोडणी व्यवस्थित करतात. कारखान्याच्या टोळ्यांना टनेजवर पैसे मि़ळतात त्यामुळे प्रत्येक दिवसात जास्त टनेज मिळवणे हे त्यांचे लक्ष्य असते. ते भराभर ऊस तोडतात, त्या भानगडीत ऊस अगदी जमिनीलगत तोडला जात नाही, वरुनही जास्तीचा तोडला जातो. हे आंबोलीच्या शेतमालकांचे म्हणणे आहे, मला अनुभव नाही. तेच लोकल टोळ्या दिवसाच्या मजुरीवर काम करत असल्यामुळे व्यवस्थित तोडतात. ऊस अगदी मुळापासुन तोडावा लागतो. तसे केले तरच त्याला परत जमिनीतुन नवे फुटवे येतात ज्याला खोडवा म्हणतात. जमिनीवर तोडला तर तुटलेल्या भागाला जोडुन नवा फुटवा येतो, त्याची वाढ नीट होत नाही.
ऊस तोडताना त्याचा शेंडा तोडुन शेतात टाकुन देतात त्याला वाढे म्हणतात. ऊस तोडताना गुरे पाळणारे लोक शेतात फिरुन वाढे गोळा करुन गुरांसाठी नेतात. ऊरलेले वाढे तसेच शेतात पडुन राहतात आणि दोन चार दिवसात सुकतात. ते सुकले की एका सकाळी किंवा संध्याकाळी उशीरा शेतात आग घालतात. त्यानंतर ऊसाला पाणी सोडुन दिले की नवा खोडवा लगेच फुटतो. आंबोलीत धरणाचे पाणी डिसेंबराच्या १५ तारखेच्या आसपास सोडतात. तर त्या भागात शेती असलेले टोळीकर त्या आधी आमच्या सारख्या शेतकर्यांची जे टोळीत सामिल होत नाहीत त्यांची ऊसतोड करतात आणि १५ नंतर आपल्या शेतात ऊसतोड सुरू करतात.
मी सगळ्यांना सांगुन ठेवले होते त्यामुळे एक मुकादम मला मिळाला ज्याला १५ पर्यंत त्याचे शेत तोडायचे नव्हते. माझ्या आजुबाजुची दोन चार शेते तोडल्यावर माझे शेत तोडायला तो तयार झाला. त्या वर्षी धरणाचे पाणी सोडायला थोडा ऊशीर होणार होता. माझे शेत तोडायला १५ डिसेंबर तारिख ठरली.
ऊस तोडणी करणार्या टिमला दिवसाची ठरलेली मजुरी तर द्यायचीच पण पुजेला कोयत्यावर ५००-१००० रु ची दक्षिणा ठेवावी लागते. ऊसतोड करणारे आजुबाजुच्या वाड्यांतुन येतात, त्यांची आणायची न्यायची सोय टेंपोमधुन करावी लागते. दोन वेळचा चहा, एका चहासोबत बिस्किटे, चिवडा किंवा अन्य काहीही सुका नाश्ता, रोज दुपारचे शाकाहारी जेवण, त्यात एक दिवस नॉन वे़ज, त्यात मासे, चिकन किंवा मटण तुमच्या श्रद्धेप्रमाणे, टिमचा मुड लागला तर वडापाव, थंडा किंवा आईसक्रिम इत्यादी सोय करावी लागते. जेवण बनवायचे काम शेतकर्याने केले तरी चालते, शेतकर्याकडे मनुष्यबळ नसेल तर ऊसतोडणीसाठी आलेल्या बायातल्या दोन बाया चहा, जेवण इत्यादी बघतात आणि दुपारनंतर ऊस तोडतात. ऊस पुरूष लोक तोडतात आणि बाया तो बांधतात. ऊस उचलुन ट्रक मध्ये भरण्यासाठी ऊसाची मोळी बांधणे आवश्यक असते. बाया हे काम करतात. ऊसाचे वाढे वापरुन ऊस बांधतात. ऊस ट्रक मध्ये भरताना काही पुरूष ट्रकवर चढतात आणि उरलेले स्त्री/पुरुष त्यांना खालुन मोळी सप्लाय करत राहतात. दोन तिन इंच जाड दोर ट्रकामध्ये टाकलेला असतो, ज्यावर ऊस टाकतात आणि पुरेसा ऊस टाकला गेला की दोराने तो व्यवस्थित बांधतात. कारखान्यात ह्या दोरासकट क्रेनने उचलुन ऊस रसासाठी यंत्रात टाकतात. कधीकधी एका शेतकर्याचा शेवटच्या दिवशी अर्धा ट्रक ऊस भरेल इतकाच उरतो. तेव्हा एक दोर, ज्याला रोप म्हणतात, बांधुन त्याचे अकाऊंट क्लोज करतात आणि पुढच्या शेतात जाऊन तिथला ऊस उरलेल्या ट्रकात भरतात. तिथे दुसरा रोप वापरतात. कारखान्यात ऊस मोजताना दोन्ही रोप वेगवेगळे मोजतात.
ऊसतोडणी मजुर हे एक वेगळे प्रकरण आहे, महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी ऊसतोडणी मजुर म्हणुन नवराबायको जोडपी मुकादमाबरोबर फिरतात. ऊसतोडणी ६ महिने चालते. सहा महिन्यांच्या फिरस्तीमुळे या मजुरांची मुले शाळेत जाऊ शकत नाहीत, स्त्रियांचे असह्य शारिरीक हाल होतात इत्यादी खुप वाचलेय. आंबोलीत लोकल टोळ्या असल्याने हे घडत नाही.
तर माझा ऊस तोडायचे ठरल्यावर मुलीच्या लग्नात सामान विकत घ्यावे तसे जेवणाचे सामान विकत आणले, सामान घेताना प्रत्येकजण विचारत होता, उद्या ऊसतोड का म्हणुन??? माझ्याकडे त्या वर्षी आई व मावशी दोघीही होत्या, त्यांनी मध्ये मध्ये मस्त लुडबुड केली, सैपाकाला दोन बाया गावातुन बोलावल्या.
चार दिवसात माझा ऊस तोडुन झाला. तोडणार्यांच्या मते ऊस चांगला झालेला, अजुन थोडा उंच व्हायला पाहिजे होता आणि थोडा जवळ जवळ लावला असता तर खुपच चांगले झाले असते. मी सगळे ऐकुन घेतले.
जगभर झालेल्या संशोधनातुन असे निष्पन्न झाले आहे की कितीही प्रयत्न केले तरी उसाच्या शेतात तोडणीच्या वेळेस एकरी ४५-५०,००० उसकांड्याच शिल्लक राहतात. म्हणजे उगवुन आलेले फुटवे जरी दोन तिन लाख असले तरी उगवल्यापासुन सहा महिन्याच्या कालावधीत भरपुर फुटवे मरुन जातात व शेवटी ४५-५०,००० फुटवेच वाढलेल्या ऊसात परावर्तित होतात.. वाढीच्या वेगवेगळ्या स्थितीत मरणारे हे फुटवे पाणी, खत वगैरे सगळे खाऊन मग मरतात. म्हणजेच यांच्यावर खर्च झालेले पाणी, खत सगळे फुकट जाते. एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पन्न काढणारे शेतकरी हा सगळा अभ्यास करुन सुरवातीपासुन फुटव्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, चांगल्या जाडजुड ऊसात परिवर्तीत व्हायची शक्यता असलेल्या ऊसकांड्या बेटात ठेऊन बाकीचे नको असलेले फुटवे काढुन टाकतात. आणि जे ४५-५० हजार फुटवे शिल्लक राहणार आहेत त्यांचे वजन कसे वाढेल याकडे लक्ष देतात. तयार उसकांडीचे वजन दोन किलोच्या पुढे गेले की आपोआप एकरी शंभर टनाच्या आसपास पल्ला गाठता येतो.. (माझ्या ऊसकांडीचे सरासरी वजन अर्धा ते पाऊण किलो आहे, यावरुन मला किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात येते.
आंबोलीत याच्या बरोबर उलट विचार केला जातो. उसाच्या कांड्या जितक्या जास्त तितका एकत्रीत ऊस वजनाला जास्त भरणार असे त्यांना वाटते. अजुन एक हास्यास्पद समीकरण मला सुरवातीला ऐकायला मिळाले ते म्हणजे "ट्रक तर भरला पाहिजे, म्हणुन ऊस जवळ जवळ लावुन भरपुर ऊसकांड्या मिळवायच्या." एकरी ४५-५०,००० कांड्यांचे जगन्मान्य गणित त्यांना माहित नाही. समजा आपण कोणाला शहाणे करायचे मनावर घेतलेच तर उर्वरीत जगाचे नियम आंबोलीत चालत नाहीत हे ऐकवतात. उस जवळजवळ लावला तर भरपुर कांड्या येणार ह्या हिशेबाने अडिज ते तिन फुटावर सरी पाडुन आंबोलीत उस लागवड केली जाते. या अरुंद सरीत उसाचा जीव गुदमरतो, वाढीच्या वयात नेमका पावसाळा येतो आणि उसाचा प्राणवायु जो सुर्य तोच गडप होतो आणि सगळी वाढ ठप्प होते. परिणामी वजन वाढ होत नाही. सरासरी अर्धा ते एक किलोची उसकांडी होते आणि पाच वर्षांची एकरी सरासरी पंचविसच्या पुढे जात नाही. पहिल्या व चौथ्या वर्षीपेक्षा दुसर्या व तिसर्या वर्षी जरा जास्त उत्पन्न येते. चौथ्या वर्षाचा पर्फॉर्मन्स पाहून पाचवे वर्ष ठेवावे का काढावे याचा विचार केला जातो. आंबोलीत चार एकर जमिनीत १००-१५० टन ऊस येतो. कोल्हापुरचे लोक हे वाचतील तर हसुन मरतील
पण आम्ही आंबोलकर एवढा आला की प्रचंड खुश होतो. यापेक्षा जास्त येण्याजोगे वातावरण इथे नाही.
ऊसाची ९०% वाढ सुर्यप्रकाशावर होते आणि उरलेली १०% वाढ जमिन व इतर घटक यांमुळे होते. भारतातल्या बहुसंख्य ऊस उत्पादकांना हे माहित नसावे, कोणी माहित करुन देत नाही. साखर उत्पादनात जागतिक स्तरावर पहिल्या नंबरावर असलेल्या ब्राझिलमध्ये भारतासारखेच बाराही महिने ऊन मिळते पण जिथे ऊस प्रामुख्याने केला जातो त्या भागात रिमझिम पाऊसही सतत पडत राहतो जो ऊसाची पाण्याची गरज भागवतो. आपल्याकडे ऊस पाण्यावर वाढतो यावर ठाम विश्वास असल्यामुळे व ऊस हे महत्वाचे नगदी पिक असल्यामुळे धरणाचे जास्तीत जास्त पाणी ऊसाला दिले जाते आणि बाकीचे पिके रडतात. सामान्य शेतकरी सकाळी ऊसाला पाणी लाऊन फटफटीने तालुक्याला जातो, दुपारी आल्यावर ऊसात दगड मारुन बघतो. डब्ब आवाज आला की ऊस पाणी प्याला असे समजुन जायचे. ऊसाला खुप ठिकाणी असेच पाणी दिले जाते. पाण्याचा सत्यानाश, जमिनीचा सत्यानाश आणि विजेचाही सत्यानाश. त्यात महाराष्ट्रात शेतासाठीची विज खास करुन रात्रीच सोडली जाते. कित्येक ठिकाणी घरात दिवसरात्र विज असते पण शेतातली मात्र रात्रीच येते. मग रात्रीबेरात्री सापाविंचवाच्या भयात पाणी लावण्याऐवजी असेच शेतात सोडून दिले जाते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा असा खेळखंडोबा चालतो पण यात आपलेच नुकसान हे कोणाच्याही ध्यानी येत नाही. सरकारी यंत्रणेला काहीही पडलेले नाही आणि शेतकरी तर जन्मअडाणीच.... असो.
ऊस नैसर्गिक की रासायनिक खतांवर वाढवलेला यामुळे कारखान्याच्या ऊस किंमतीत फरक पडत नाही. त्यामुळे एवढी मेहनत करुन नैसर्गिक ऊस करतेयस तर गुळ करुन विक असा सल्ला बर्याच जणांनी दिला पण तितकी माझी तयारी नव्हती. माझ्या शेतापासुन ३०-३५ किमी वर एक गुर्हाळ मला मिळाले. त्याच्या काहिलीत एका वेळेस दोन टनाचा रस बसत असल्यामुळे तितक्या ऊसाचा गुळ करुन द्यायला तो तयार होता पण त्या सगळ्याला येणारा खर्च पाहता मी फारसे मनावर घेतले नाही.
आपण बाजारात ऊसाचा रस पितो, तो ऊस बाहेरुन व्यवस्थित साफ केलेला असतो, त्याच्यावरची काजळी काढुन टाकलेली असते. तरीही त्या रसात आपल्याला थोडाफार कचरा तरंगताना दिसतो. गुळ बनवताना ऊस जसा शेतात असतो तसाच तो क्रशरमध्ये घालुन रस काढला जातो. हा रस सतत उकळवत ठेवला की तो खुप जाड होतो. हा जाड रस खुप घोटतात मग त्याचा गुळ बनतो. ऊसावर भरपुर कचरा असल्यामुळे रस उकळताना हा कचरा काढत बसावे लागते. ही मळी एकत्र यावी व रस साफ व्हावा यासाठी ऊसात भेंडीचे झाड चेचुन त्याचे पाणी घालतात. अर्थात गुर्हाळवाल्याकडे भेंडीची झाडे नसल्यामुळे तो विकतची भेंडी पावडर घालतो. ही विकतची भेंडी पावडर हवा तो रिझल्ट देत नाही म्हणुन ऊसात फॉस्फरिक अॅसिड घालतात. मला भेटलेल्या गुर्हाळवाल्याने ह्या अॅसिडचे ट्रेसेस अजिबात राहात नाहीत म्हणुन मला सांगितले पण मला ह्या असल्या भानगडित पडायचेच नव्हते. मला ऑर्गनिक गुळ करायचाय असे म्हटल्यावर गुर्हाळवाला म्हणाला तुम्ही फॉस्फरिक अॅसिड वापरु नका, मळी तशीच ठेवा. गुळाचा रंग काळा म्हणजे तो ओर्गॅनिक/नैसर्गिक असे लोक समजतात. हे ऐकुन मी कपाळाला हात लावला.
गुऴ बनवताना काहिलीत रस चिकटु नये म्हणुन आधी तेल टाकावे लागते. नंतर फॉस्फरिक अॅसिड वापरुन उकळणारा रस साफ केला जातो. हे दोन्ही पदार्थ कुठल्या प्रतीचे वापरतात यावर काहीही नियंत्रण नाही. मी कोल्हापुरच्या एका गुर्हाळात गेले तिथे २ टन ऊसाच्या रसात २ टन साखर टाकत होते. म्हणजे गुळात अर्धी साखर... मारवाडी व्यापार्यांना असाच गुळ लागतो म्हणे. असा गुळ बाजारात भराभर विकला जातो म्हणुन सगळी गुर्हाळे हे करतात असे तिथेच ऐकले. साखर ३० रू किलो आणि गुळ ७०-८० रु किलो. आणि ह्या गुळातही भेसळ आंबोलीत तर गुळ ४५ ते ५० रु पर्यंत मिळतो. हा गुळ म्हणजे साक्षात दगड असतो. तुम्ही खरा दगड त्यावर मारलात तरी गुळ फुटणार नाही. हा गुळ कसा करतात देव जाणे. गुळाचा रंग स्वच्छ पिवळाजर्द किंवा पांढरेपणाकडे झुकणारा हवा म्हणुन त्यात निरमा पावडर घालतात असेही ऐकलेय. गुळ घोटल्यावर तो एक किलो/अर्धा किलोच्या भांड्यात भरतात, घट्ट झाल्यावर नीट निघावा म्हणुन या भांड्यांत फडकी घातलेली असतात. ती कधी धुतात देव जाणे. मी गुर्हाळात गेले तेव्हा गुळ भरायचे काम सुरू होते. राजस्थानी दिसणारी विशीतली मुले गुळ भरत होती, पायात स्लिपर घालुनच ती त्या गुळ घोटायच्या जागेत उतरली होती. ती जागा सोडून बाकी सगळी जमिन चिकट काळी झालेली होती. हे सगळे बघुन तिथे गुळ घ्यायची ईच्छाच मेली. नजरेआड अजुन काय काय असेल देव जाणे.
नैसर्गिकरित्या केलेल्या गुळात, जो मी करताना पाहिलाय, त्यात काहिलीत तुप किंवा शेंगदाणा तेल घालतात. पाऊण किलो तुप/तेल एक ते दोन टन रसाला पुरते. भेंडीचे मोठे रोप स्वच्छ धुवून, त्याला चेचुन पाण्यात रात्रभर ठेवतात, हे पाणी उकळत्या रसात घालतात. रस हवा तितका जाड होत आला की त्यात चुना घालतात. आणि मोठ्या परातीत हा गुळ ओतुन त्याला घोटतात व एक किलो/अर्धा किलोच्या भांड्यांमध्ये भरुन घट्ट करतात. हा घट्ट केलेला गुळ भांड्यातुन काढल्यानंतर उन्हात वाळवतात. असे केल्याने त्याचे शेल्फ लाईफ थोडे वाढते.
ऊस वर्षभर सांभाळायचा खर्च आणि तो तोडुन कारखान्यात पाठवायचा खर्च मला डोईजड वाटला. माझे टनेज कमी असल्यामुळे तो डोईजडच होता. बाकी लोकांना चार एकरात शंभर सवाशे टन ऊस मिळतो ज्याचे तिन-साडे तिन लाख रुपये मिळतात. खर्च दिड ते दोन लाखांपर्यंत जातो. त्यातले जास्तीचे खते व पाण्यावर खर्च होतात, तोडणीवर बर्यापैकी ऊडतात. तरी हातात लाख-सवा लाख शिल्लक राहतात. एवढे निघाले तरी आंबोलीत बरे मिळाले समजतात.
पहिल्या वर्षानंतर काहीजणांना वाटले मी गाशा गुंडाळणार, काहींनी तसे बोलूनही दाखवले. पण मी शेतीत उतरले होते ते पळण्यासाठी नव्हतेच. त्यामुळे नव्या दमाने नव्या सिझनची तयारी सुरू केली.
मला एकुणच ऊस शेती निरर्थक वाटू लागली पण दुसरे काही करण्याइतकी अक्कल, अनुभव व वेळ नसल्याने आहे तेच चालु ठेवायचे ठरवले.
क्रमशः
मला वैयक्तिक अनुभव नाही पण
मला वैयक्तिक अनुभव नाही पण गावी मामा, काका, मावस इत्यादी नात्यात पाहिलेले फक्त observation लिहितो. ही सगळी गावं कोल्हापूर जिल्ह्यात पाउस चांगला पडणाऱ्या पट्ट्यात. मात्र जमिनी एक सलग नाहीत.
5 एकरपेक्षा कमी आहेत आणि तुकड्या तुकड्यात आहेत. त्यामुळे आर्थिक फुटपट्ट्या एकसारख्या नाहीत. फक्त इकॉनॉमी कशी चालते ह्या उत्सुकतेने केलेले निरीक्षण. फक्त हेच सत्य असेही नाही. ह्याच गावांत जास्त जमिनी असलेले लोकं श्रीमंत प्रगतीशील शेतकरी आहेत.
मागच्या।पिढीत उस आणि सहकारी साखर कारखाने ह्यांनी फार हात दिला. आपल्या खाण्यापुरते तांदूळ नाचणी ज्वारी वै करायचे काही तुकड्यात. बाकी उस. जिथे धान्य लावली आहेत तिथे बांधावर पावटे वै वेली ज्यातून भाज्या मिळतील. उन्हाळयात विहीर असेल तर थोडाफार भाजीपाला होतो. उस नगदी पिक. त्यामुळे हातात पैसा खेळता राहिल्याने खूप सपोर्ट. त्यातच गोकुळ वारणा सारख्या दूध संस्था असल्याने दूध विक्रीचे पैसे आठवड्यात एकदा मिळतात. ह्या पैशाने देखील खूप मदत झाली. स्वतःच्या शेतातले पिंजर ( भाताचे सुकलेले) , वैरण( उसाची पाते ) असल्याने पशुखाद्य खर्च कमी असायचा. शेंगदाणे तेल केले की त्यातून पेंड यायची. शिवाय शेतातल्या तांदूळ कांडताना येणारा भुसा देखील जनावरांना खाद्य असायचे. त्यामुळे खाउन पिउन सुखी लोक होते. 3 ते 4 भावातला एखादा कोल्हापूरात छोटी नोकरी करत असेल तर तो ही थोडाफार पैसा खेळता राहायचा.
आमच्या पिढीत साखर कारखाने राजकरण अड्डे झाले.
बियाणे, खत, तण नाशक हे सगळे खर्च वाढत गेले. उसाचा भाव तितका मिळेना. राजू शेट्टी आंदोलन ह्यातूनच उभे राहिले. ते नसते तर इतकाही भाव नसता. सहकारी कारखाने बऱ्यापैकी दिवाळखोरीत गेले. तोट्यात चालायचे. आता खाजगी झालेत आणि फायद्यात चालतात. ते एक मॅजिक असोच. शेतीत काम जितके तितका मोबदला मिळेना. थोडेफार शिकलेले माझ्यासारखे पुणे मुंबई नोकरी शोधार्थ. ज्यांचे फार शिक्षण नाही ते कोपुत MIDC अथवा इतर खाजगी नोकरी करत शेतीत मागच्या पिढी सोबत काम करतात. नोकरी आणि शेती एकाचवेळी नाही होत. मागची पिढी हाती पायी धड आहे आणि कामाची आवड आहे म्हणून शेतात खूप काम ओढतात. मोठे काम असेल ( उदा पेरणी )तेव्हा नोकरीतून सुट्टी घेउन शेती कामे उरकली जातात. पण सगळा हिशोब घातला तरी मागच्या पिढीतील व्यक्ती स्पष्ट म्हणतात की शेतीत पैसे आधी सारखे न्हाईत.
वारणा गोकुळ अजूनही आहेत तो सपोर्ट आहे.
पण आता जर्सी गायी, त्यांना पोत्याने पशुखाद्य वै सर्व सुरू झाले. त्याचा खर्च वाढला. दूध उत्पादन वाढले पण चारा , आणि गायी गुरे दवाखाना , तपासण्या, रोगराई इत्यादी खर्च वाढला. फक्त pure दुध उत्पादन नाहीये आणि काही खाद्य वै गोष्टी शेतीतून बायप्रोडक्ट आहेत म्हणून दुधाबाबत अद्याप तरी तोट्यात नाही. गोकुळ सारख्या संस्था देखील राजकारण अड्डा आहेत हल्ली. त्यामुळे आमच्या पिढीत संपूर्ण शेतीवर अवलंबून बोटावर मोजण्यासारखेच.
पारंपारिक धान्य शेतीत तितका फायदा नसल्याने काहीजण फळ बागायत वै प्रयत्न करतात. त्यासाठी फिक्स मार्केट शोधून मगच ही रिस्क घेतात.
हल्ली पूर्ण वेळ देता येत नसल्याने मावसभावाने रत्नागिरी देवगड कलमे शेतात लावायला सुरू केलेले. आता 3 वर्षे झाले फळ धरतेय उत्तम. त्यातील मिळेल ते अडिशनल उत्पन्न आहे. हे ही सगळ्यांना शक्य नाही.
आमची पुढची पिढी आता नेटके शिक्षण घेतेय.
शेतीत काही करतील असे वाटत नाही. एकतर तुकडे तुकडे आणि शाश्वत उत्पन्न नाही.
दूध संस्था आणि MIDC नसती तर कॉलप्स झाले असते सगळे.
झकासराव लिहा, चांगली माहिती
झकासराव लिहा, चांगली माहिती मिळतेय.
सहकारी कारखाने तोट्यात जायचे महत्वाचे कारण तिथली कामगार संख्या हेही आहे असे बरेच ठिकाणी वाचलेय. सहकारी म्हणजे तिथे पॅनेले, निवडणुका वगैरे आल्या. आपल्या लोकांना खुष ठेवावे लागते, नोकरी देऊन.
तेच खाजगीत याण्त्रिकीकरणामुळे कामगार संख्या कमी असते. ब्राझिलची साखर भारतापेक्षा स्वस्त पडते कारण तिथे एक कारखाना दहा ते पंधरा लोक चालवतात. महाराष्त्रात खोगिर भरतीमुळे खर्च वाढतो हे वाचलेय.
आधीच्या पिढीपर्यंत शेतात काहीही विकतचे घेउन घालत नव्हते. पिकाचा प्रत्येक भाग उपयोगात येत होता. शेतातील कडबा गुरे खात होती व त्यांचे शेण परत शेतात.
आता गुरे गायब झालीत. ज्यांना दुधाचा धंदा करायचा आहे तेच गुरे ठेवतात. सगळेच शेतकरी दुधाचा धंदा करत नाहीत त्यामुळे गुरे नसतात. शेतातले प्रत्येक काम करायला दुसर्याचे औत किंवा ट्रक्टर बोलवावा लागतो. औत बोलावले तर खर्च कमी येतो पण ट्रॅक्टरचा सोबतच्या अॅटॅचमेंट प्रमाणे ४०० ते १००० रु ताशी खर्च येतो. हायब्रिड बियाणे दरवर्षी घ्यावे लागते, खते, किटकनाशके, तणनाशके, मजुरी हे सगळे पैसे घालुन घ्यावे लागते. हा एवढा खर्च ज्याच्या विक्रीतुन काढायचा त्या शेतमालाचा भाव शेतकर्याच्या हातात नाही, जो भाव मिळेल तो मान्य करावा लागतो. अशा परिस्थितीत लहान शेतकर्याला शेतीतुन पैसा मिळणे कठिण आहे. ऊस, द्राक्ष वगैरे नगदी पिके घेणारे शेतकरी सोडले तर बाकी सगळा अंधार आहे. कोणालाही आपली पोरे शेतकरी व्हावीत असे वाटत नाही.
ही लेखमाला सलग वाचायची असे
ही लेखमाला सलग वाचायची असे म्हणून ठेवली होती. आज सगळे भाग सलग वाचले.
सध्या थोडाफार याच प्रकारच्या अनुभवातून जात असल्याने फारच रिलेट झाले.
पुभाप्र.
हा भागही झकास! आणि त्यावरची
हा भागही झकास! आणि त्यावरची चर्चा सुद्धा.
साधना, अभ्यासपूर्ण शेतीचे आणि चुकांमधून शिकण्याचे अनुभव लिहिते आहेस, त्यामुळे वाचायला मजा येतेय.
छान आहे लेखमाला.
छान आहे लेखमाला.
Pages