नागरिकांच्या सकारात्मक सुचना - Citizens' Think Tank

Submitted by मामी on 9 June, 2024 - 00:53

ही एक कल्पना डोक्यात आली ती इथे लिहीत आहे. काहीशी विस्कळीत लिहिली गेली आहे असं वाटतंय. सुचनांचं स्वागत आहे.

********************************************************************************************

एक नागरीक म्हणून उत्तम पायाभूत व्यवस्था, स्वच्छ शहरं, हिरवाई, सुरक्षितता, वाहतुकीची साधनं, शिक्षण, आरोग्य, कम्युनिटी स्पेसेस (बागा, बगिचे, मैदानं इ) यावर आपला हक्क आहे. त्याच बरोबर ही आपली जबाबदारीही आहे. समाजात वावरताना कितीतरी गोष्टी खटकत असतात. त्या कशा बदलता येतील किंवा सुधारता येतील यावर आपल्या डोक्यात कल्पना येतात पण त्या डोक्यातच राहतात. या कल्पना, संकल्पना डोक्यातून बाहेर काढून निदान कुठेतरी लिहिल्या जाव्यात यासाठी हा धागा.

केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, नगरपालिका असो अथवा इतर कोणत्याही सरकारी / निमसरकारी संस्था असोत. त्या सुयोग्य रितीने चालत रहाव्या जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर व्हावं आणि समाजाची उन्नती व्हावी यासाठी आपल्या सकारात्मक सुचना सल्ले, कल्पना इथे मांडू शकतो. या संस्थांकडून काही अपेक्षा असतील तर त्याचा उल्लेख करू. जर केवळ नागरिकांच्या पातळीवर करता येण्यासारख्या कल्पना असतील तर त्याही नोंदवू.

एखादा अगदी साधा बदल असेल अथवा एकदम नवी वेगळी संकल्पना असेल तरीही चालेल. एखाद्या ठिकाणचा अगदी स्पेसिफिक इश्शूही चालेल. त्यावर तुम्ही काही विचार केला असेल तर नक्की लिहा. त्यावर सकारात्मक चर्चा झाली तर उत्तमच. काही तृटी असतील तर इतरांनी त्या जरूर दाखवून द्याव्यात. त्यावर मात करण्याचे काही मार्ग असतील तर ते तपासता येतील. एकत्रितपणे ही कल्पना पुढल्या स्तरावर घेऊन जाता येईल.

थोड्क्यात, एक छानशी आयडिया बँक तयार होऊ द्या. शक्य असेल तर पोस्टस मध्ये हॅशटॅग देऊन योग्य त्या व्यक्ती, खाती, संस्थांपर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करू शकता. (हे मायबोलीच्या धोरणात बसतं की कसं ते माहित नाही.)

कृपया इथे कोणा व्यक्तीवर, पक्षावर, संस्थेवर, सदस्यावर टीका नको. (त्यासाठी असंख्य धागे मायबोलीवर उपलब्ध आहेत.) हा खरोखरीच सकारात्मक कल्पनांचा थिंक टँक धागा बनावा अशी अपेक्षा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारण ती स्वच्छ ठेवावीत यासाठी त्यांना काहीही प्रोत्साहन नसते. त्यांना त्यातून पैसे मिळत नाहीत. >>>> असं नाहीये. वापरणाऱ्यांनी पण नीट वापरले पाहिजे. अर्थात पुरेसे पाणी, जेट स्प्रे, हॅन्ड वॉश, न गळते बेसीन, लादी, फ्लश, दरवाजा नीट राखणे हे petrol pump चे काम.

वापरणारे आणि राखणारे अश्या दोघांची जबाबदारी आहे ही.

वापर करण्यापूर्वीच्या अवस्थेत आणुन बाहेर येतील?.....
हे फार दूरचे आहे.कमोड किंवा टॉयलेट नीट वापरून फ्लश तरी ओढावा ही किमान अपेक्षा.

उत्तरेकडे स्वच्छ पब्लिक टॉयलेट असतात.इतकी वर्षे झाली तरी गोव्याला जाताना काही सोय असावी हाच विचारच नाही.

टॉयलेट एटीकेट्स नावाचे प्रकार कुठे शिकवतात? >>>> वाढत्या वयात घरी व नंतर इतरत्र बघून, विचारून हे शिकता येते. बेसिकली स्वतःला ते पाळायची शिस्त हवी.

स्वच्छतागृह हे एक misnomer आहे.
ते तर अस्वच्छतागृह असते. >> +१

टॉयलेट एटीकेट्स नावाचे प्रकार कुठे शिकवतात? >>> अगदी खरंय.

आपण जाऊन आल्यावर ते घाणेरड्या अवस्थेत सोडणे ही काय विचित्र वृत्ती आहे कळत नाही.

सार्वजनिक शौचालयेही जास्तीतजास्त घाणेरडी दिसतील अशी बांधलेली. 'हे शौचालय आहे' असं ओरडून सांगणारं कळकट स्ट्रक्चर असतं. तरीही लोकांना दिसलं नाही तर काय घ्या! असा विचार करून ते शौचालय दरवळतही ठेवलं जातं. जिथे पाणी हवं तिथे नाही पण बाकी जमिनीवर सर्वत्र चपचप पाणी. अगदीच निकड असेल तरच कसंबसं जातात लोकं.

सामान्यतः ' पे अँड यूझ' प्रकारची स्वच्छतागृहे स्वच्छ असतात. पेट्रोल पंपावर तसं करावं. पाचदहा कशाला, वीसपंचवीस रुपयेही देऊन बऱ्यापैकी स्वच्छ स्वच्छतागृह खात्रीपूर्वक मिळणार असेल तरी मला चालेल.
स्वच्छतागृह हाच विषय चालला आहे, तर - सार्वजनिक ठिकाणच्या स्त्रियांसाठीच्या स्वच्छतागृहात तरी भारतीय आणि पाश्चात्य, दोन्ही प्रकार असावेत.

एकूणात आपल्याकडे अ‍ॅस्थेटिक सेन्स / सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यदृष्टी दिसलीच पाहिजे असा आग्रह नसतो. काहीतरी बटबटीत, रंगित, चकचकीत असं परिसराचा विचार न करता बांधतात. सो कॉल्ड 'सौंदर्यीकरणा'च्या नावाखाली सध्या मुंबईत ही भिंत रंगव, तो ब्रिज रंगव, चकचकीत टाईल्सच लाव (भले लोकं घसरले तरी चालतील), जागोजागी झाडं लावायचं सोडून फायबरचे पुतळे, पक्षी, शिल्प असलं कायबाय मिसमॅच बसव असं करून वात आणलाय.

प्रभादेवीवरून केईम रुग्णालयाकडे जाताना जगन्नाथ फ्लायओव्हर (आधीचा एल्फिस्टन ब्रिज) आहे. त्यावरून गेल्यास किर्तीमहाल हॉटेलच्या कोपर्‍यावर असंच एक पर्यावरणाचा संदेश देणारं स्ट्रक्चर बसवलंय. महाभयाण दिसणारं आणि गोल गोल फिरणारं आहे ते. धूळ बसलीच आहे. आता ते मोडणार, फिरणं बंद होणार आणि एक अजून केविलवाणा कळकट कोपरा निर्माण होणार हे लक्षात येतं.

यापेक्षा चार बेंच टाका , झाडं लावा, मांडव घालून लतावेली चढवा आणि एक कम्युनिटी स्पेस तयार करा. अश्या काही ठिकाणी केल्याही आहेत आणि तिथे सिनियर सिटिझन्स (फक्त पुरुष हं, बायका नाही पाहिल्या कधी) बसलेले पाहिलेत. खूप छान वाटतं.

हे मला कुठल्या धाग्यावर टाकावं कळेना. पण इथे त्याच विषयावर चर्चा चालू आहे, तर इथेच सांगतो. माझ्या ई परिचयातील श्री अमोल भिंगे यांनी टॉयलेट सेवा नावाचं ॲप तयार केलं आहे. त्याची माहिती त्यांनी आतापर्यंत सकाळ, लोकसत्ता, एबीपी माझा इत्यादी अनेक ठिकाणी छापील आणि व्हिडिओ माध्यमातून दिली आहे. ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलं, तर त्याचा उपयोग फक्त लोकांनाच होईल असं नाही, तर सुविधा सुधरण्याकडे कल वाढेल असं त्यांचं निरीक्षण आहे. हा व्हिडिओ बघा. मला हे अत्यंत उपयुक्त वाटलं.

हे मला कुठल्या धाग्यावर टाकावं कळेना.
<<
असा प्रश्न पडला तर नवा धागा काढावा. नंतर शोधायला उपयोग होतो.

Submitted by रघू आचार्य on 13 June, 2024 - 09:10
अवांतर / अस्थानी असल्यास प्रतिसाद उडवावा ही विनंती.

पुढील दोन सूचना कितपत व्यवहार्य आहेत माहित नाही.
१) निवडणुकांतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लॉटरी. जो मतदान करेल तो आपसूक लॉटरी साठी पात्र होईल. बक्षिसाची रक्कम मोठी असावी. (उदा. १ करोड). बक्षिसाच्या आमिषाने लोक मतदानाला येतील.
२) मुंबईतील लोकल वरील भार कमी करण्यासाठी रात्रीसुद्धा लोकल चालू ठेवाव्यात व पूर्णपणे मोफत असाव्यात. कर्मचाऱ्यांचे पैसे वाचविण्यासाठी काही ऑफिसेस दिवसांऐवजी रात्री चालू राहतील. इतर कारणांसाठी प्रवास करणारे लोकसुद्धा शक्य असेल तर रात्री प्रवास करतील.

सध्या चालू असल्येल्या NEET परीक्षेमधील पेपरफुटीवरून हे सुचले. परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी एक कल्पना. परीक्षेसाठी एक प्रश्नसंच (question bank) तयार करायची ज्यात बऱ्याच संख्येने प्रश्न असतील (उदा. ५०० प्रश्न) आणि हा प्रश्नसंच प्रश्नपत्रिका म्हणून वितरीत करायचा. पण त्यातील कोणते प्रश्न हे त्या परीक्षेचा भाग असतील हे ती परीक्षा घेणारी संस्था परीक्षा चालू व्हायच्या काही वेळ आधी (उदा. २ तास) लॉटरी पद्धतीने ठरवेल; व त्या प्रश्नांचे क्रमांक सर्व केंद्रांवर तत्काळ वितरित करेल. हे वितरण ई-मेल, व्हॅटसॅप, इत्यादीने करता येईल. परीक्षा चालू झाल्यावर प्रॉक्टर त्या प्रश्नाचे क्रमांक परीक्षार्थींना सांगेल. परीक्षार्थी केवळ त्याच क्रमांकांचे प्रश्न प्रश्नसंचात पाहून सोडवेल. प्रश्नपत्रिका हीच मुळात परीक्षेच्या काही तास आधी तयार होत असल्याने ती फोडायला वेळ मिळणार नाही आणि जरी फुटली तरी तयारी करायला वेळ मिळणार नाही.
प्रश्नसंच हा अगोदरच तयार होत असल्याने तो फुटायची शक्यता आहे. पण जर प्रश्नसंचातले प्रश्न सर्व अभ्यासक्रम कव्हर करणारे व संख्येने बरेच असले तर तेव्हढा धोका घेता येईल. (जो कि सध्याच्या प्रश्नपत्रिकांच्या सोबत आहे.) कारण ५०० प्रश्नांची तयारी करणे म्हणजे सर्व अभ्यास केल्यासारखेच आहे.

Pages