नागरिकांच्या सकारात्मक सुचना - Citizens' Think Tank

Submitted by मामी on 9 June, 2024 - 00:53

ही एक कल्पना डोक्यात आली ती इथे लिहीत आहे. काहीशी विस्कळीत लिहिली गेली आहे असं वाटतंय. सुचनांचं स्वागत आहे.

********************************************************************************************

एक नागरीक म्हणून उत्तम पायाभूत व्यवस्था, स्वच्छ शहरं, हिरवाई, सुरक्षितता, वाहतुकीची साधनं, शिक्षण, आरोग्य, कम्युनिटी स्पेसेस (बागा, बगिचे, मैदानं इ) यावर आपला हक्क आहे. त्याच बरोबर ही आपली जबाबदारीही आहे. समाजात वावरताना कितीतरी गोष्टी खटकत असतात. त्या कशा बदलता येतील किंवा सुधारता येतील यावर आपल्या डोक्यात कल्पना येतात पण त्या डोक्यातच राहतात. या कल्पना, संकल्पना डोक्यातून बाहेर काढून निदान कुठेतरी लिहिल्या जाव्यात यासाठी हा धागा.

केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, नगरपालिका असो अथवा इतर कोणत्याही सरकारी / निमसरकारी संस्था असोत. त्या सुयोग्य रितीने चालत रहाव्या जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर व्हावं आणि समाजाची उन्नती व्हावी यासाठी आपल्या सकारात्मक सुचना सल्ले, कल्पना इथे मांडू शकतो. या संस्थांकडून काही अपेक्षा असतील तर त्याचा उल्लेख करू. जर केवळ नागरिकांच्या पातळीवर करता येण्यासारख्या कल्पना असतील तर त्याही नोंदवू.

एखादा अगदी साधा बदल असेल अथवा एकदम नवी वेगळी संकल्पना असेल तरीही चालेल. एखाद्या ठिकाणचा अगदी स्पेसिफिक इश्शूही चालेल. त्यावर तुम्ही काही विचार केला असेल तर नक्की लिहा. त्यावर सकारात्मक चर्चा झाली तर उत्तमच. काही तृटी असतील तर इतरांनी त्या जरूर दाखवून द्याव्यात. त्यावर मात करण्याचे काही मार्ग असतील तर ते तपासता येतील. एकत्रितपणे ही कल्पना पुढल्या स्तरावर घेऊन जाता येईल.

थोड्क्यात, एक छानशी आयडिया बँक तयार होऊ द्या. शक्य असेल तर पोस्टस मध्ये हॅशटॅग देऊन योग्य त्या व्यक्ती, खाती, संस्थांपर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करू शकता. (हे मायबोलीच्या धोरणात बसतं की कसं ते माहित नाही.)

कृपया इथे कोणा व्यक्तीवर, पक्षावर, संस्थेवर, सदस्यावर टीका नको. (त्यासाठी असंख्य धागे मायबोलीवर उपलब्ध आहेत.) हा खरोखरीच सकारात्मक कल्पनांचा थिंक टँक धागा बनावा अशी अपेक्षा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला खटकणारी गोष्ट म्हणजे जागोजागी असलेले फलक. सर्व पक्षांतर्फे शहरभर हे बोर्ड्स, होर्डिंग्ज, पताका, झेंडे लावले जातात आणि नंतर ते तसेच राहतात. वार्‍यापावसात मग त्यांची लक्तरं लटकत राहतात. They are such an eyesore.

सुचना :.

* हे पूर्णपणे थांबवा. सार्वजनिक जागा नागरिकांची आहे. त्यावर हे असले अतिक्रमण करणं बंद झालं पाहिजे.
* पूर्णपणे थांबवणे शक्य नसेल तर किती लावावे, कुठे लावावे, कोणते लावावे यासंदर्भात स्पष्ट नियम असावेत. उदा, अभिनंदनाचे, वाढदिवसाचे, अमुकांचे शहरात स्वागत टाईप अजिबात नकोत. फारतर सभा, एक्झिबिशन्स वगैरे असतील तर काही बोर्ड्स लावण्याची परवानगी असावी पण त्याचेही नियम असावेत.
* कार्यक्रम झाल्यावर ते त्वरीत काढण्यात यावेत.

मामी चान्गली कल्पना!
बोर्ड लावण्यापेक्षा डिजिटल डिस्प्ले असावेत...बिलबोर्ड अजिबात नको, तसच शक्य झाल तर इमारतीच्या प्लेन बाजुवर करता आल तर किवा एखादा पडदा लावुन ,स्क्रिन लावुन करा...पण टनावारी वजनाचे फ्लेक्स अजिबात नको.

कोणतेही नियम, कायदे न पाळणारा एक मोठ गट प्रत्येक ठिकाणी, शहरात, गावात असतो. त्यांचं काय करणार? सूचनांच्या पुढे स्वार्थ पळत असतो.

मामी चान्गली कल्पना!
बोर्ड लावण्यापेक्षा डिजिटल डिस्प्ले असावेत... >> हे छान पण लाईट पोल्युशन शहरांत तसंही ऑलरेडी चिकार आहेच. पण दगडापेक्षा वीट मऊ म्हणून डिजिटल डिस्प्ले चालेल.

कोणतेही नियम, कायदे न पाळणारा एक मोठ गट प्रत्येक ठिकाणी, शहरात, गावात असतो. त्यांचं काय करणार? >>> यावर काही उपाय सुचत असेल तर नक्कीच सुचवा.

जोपर्यंत अशिक्षित अडाणी अर्धवट लोकं हा देश चालवताहेत तोपर्यंत हे असंच सुरु राहणार आहे. गावी जायचं चार पाच गुंठे जागा घ्यायची, तिथे लहान घर बांधायचं, आजूबाजूला भाजीपाला फळांची झाडं लावावीत. मस्त आरामात जगायचंय.

छान धागा मामी.

घरात, रस्त्यात गुंता कुठूनही उडून किंवा घरंगळत येतो. तेव्हा गुंता कचरा पेटीत टाकताना विचारपूर्वक टाकायला पाहिजे. प्लास्टिकच्या पिशवीत नको. वेस्ट कागदात पुडी बांधुन वगैरे टाकावा.

Srd , लोक जागृत झाले तर तशे लोक पण हळु हळु बदलतील.

डिजिटल डिसप्ले नको. त्यात बदलणारे ग्राफिक्स चालकांचे लक्ष विचलित करते. सर्वत्र एकाच मापाचे आकाराचे डेसिग्नेटेड ठिकाणीच बोर्ड लावायला पर वानगी असावी.

प्रवासात दिसते की हॉटेल्स मध्ये व बाहेर जास्तीचे दिवे लावलेले असतात. दारात झाड असेल तर त्यावर दिवे सोडलेले असतात.

रात्री १२ वाजता तरी हे दिवे बंद करा. शहरातील डिस्प्ल्ये बोर्ड, मोठ्या होर्डिंगवरचे दिवे रात्री १२ नंतर तरी बंद करा. आपण
एकटेच नाही राहात जगात. इतर सजीवही आहेत. त्यातले काही झाडांवर झोपतात. त्यांनाही शांत झोप लागु दे. त्यांच्या जीवावर उठु नका. उद्या ते तुमच्या जीवावर उठले तर तुम्हाला पळायलाही जागा राहणार नाही.

चांगला धागा.
निव्वळ सूचना करणे मला पटत नाही. म्हणून ज्या विषयाच्या बाबतीत मी आधी कृती केली आणि मग सूचना केल्या होत्या अशा एकाच विषयाबद्दल लिहीतो.
सुरुवातीचा परिच्छेद https://www.maayboli.com/node/61740?page=1
या धाग्यावरून उचलून इथे ठेवत आहे :

वाहनजन्य प्रदूषण
हा तर माझ्यासाठी संवेदनशील विषय. प्रदूषणग्रस्त शहरामध्ये राहून प्रदूषणत्रस्त झालेला मी ! गेल्या २५ वर्षात सर्वत्र वाहनजन्य प्रदूषण खूप वाढले.त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागला. असे दिसते की या विषयावर लेखन, चर्चा, परिसंवाद आणि परिषदा अगदी भरपूर होतात पण, सर्वात गरजेची असलेली कृती मात्र अत्यल्प असते. बहुतेक सगळा मामला ‘लोका सांगे...’ असा असतो. अधूनमधून कृतीच्या छोट्या लाटा येतात अन लगेच त्या विरूनही जातात. कधी आपण ‘बस डे’ अनुभवतो, कधी सायकलची प्रभातफेरी पाहतो तर कधी पाच वर्षातून एखाद्याच दिवशी आपले काही मोजके खासदार संसदेत सायकलवरून जाताना फोटोत पाहतो !

पण, माझ्या पाहण्यात काही अपवादात्मक असे लोक आले. त्यापैकी काहीना स्वयंचलित वाहन परवडत असतानाही ते आजन्म सायकलनिष्ठ आहेत. मग मलाही काहीसे अपराधी वाटू लागले. पूर्णपणे स्ववाहनरहित आयुष्य जगणे कठिण होते पण, निर्धार केल्यास काही प्रमाणात स्ववाहन-संयम शक्य होता. मग पहिले पाउल टाकले ते म्हणजे आठवड्यातून एक दिवस फक्त चालत अथवा सायकलचा वापर. सुरवातीस हा शनिवार ठेवला होता जेणेकरून दुखऱ्या पायांना रविवारी विश्रांती मिळावी.

पुढच्या टप्प्यात सुटीच्या दिवशी काही कामे ठरवून दुपारच्या वेळांत बसने जाऊन करणे. तेव्हा आपण बसमध्ये शिरू शकतो! अखेर, विचारपूर्वक माझे वाहन-धोरण असे ठरले:
१ किमी पर्यंतची कामे चालत, ३किमी पर्यंतची सायकलने, त्यापुढच्या अंतराची बसने आणि फक्त तातडीची कामे स्वतःच्या वाहनाने करणे.

गेल्या २ वर्षात मात्र सायकल सोडावी लागली कारण आसपासच्या २ किमी परिसरातील हवा भरण्याची व तिच्या दुरुस्तीची दुकाने बंद पडली आहेत. तरी सांगायला समाधान वाटते की आज मी वर्षातले निम्मे दिवस स्वतःचे वाहन रस्त्यावर आणत नाही.
…….
या खेरीज,
२. चारचाकी वाहन (अपवादात्मक परिस्थिती सोडून) एकट्याच्या प्रवासासाठी वापरत नाही.

३. सार्वजनिक पातळीवर इतरांनी/ सरकारने काय करावे यासंदर्भात काही सूचना वृत्तपत्रांमधून केल्या होत्या. त्यामध्ये महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एक वाहनबंदीचा दिवस, खाजगी वाहनांच्या बाबतीत वाहन क्रमांकानुसार महिन्याचे विशिष्ट दिवस रस्त्यावर आणायला बंदी. . . यासारख्या काही सूचनांचा समावेश होता.

माझ्यापुरतं बोलायचं तर मी बाहेर पडताना स्वतःची पाण्याची बाटली घेतो. बाहेर एखाद्या ठिकाणी पाण्याची बाटली जर देण्यात आली तर ती पूर्ण रिकामी करतो, अथवा उरलेली बाटली स्वतःकडे ठेवतो.

पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल ह्याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः गाड्या धुताना जे पाणी वाया जाते त्याकडे. कुठेतरी वाचनात आले होते की 100 मिली पाण्यात गाडी धुता येईल अशी युक्ती एकाने शोधली आहे. अशांना प्रसिद्धी द्यावी आणि त्याचा वापर करणे बंधनकारक करावे

रात्री १२ वाजता तरी हे दिवे बंद करा. शहरातील डिस्प्ल्ये बोर्ड, मोठ्या होर्डिंगवरचे दिवे रात्री १२ नंतर तरी बंद करा. >> साधना, तुझी ही सुचना फार आवडली आणि हे अगदी सहज शक्य आहे.

विविध नगरपालिकांपर्यंत ही सुचना कशी पोहचवता येईल? मायबोलीच्या फेसबुकवर लिहून तिथे टॅग करता येईल का? काय मत लोकहो?

कुमारसर , भ्रमर उत्तम मुद्दे. वैयक्तिक पातळीवर अश्या अनेक गोष्टी आपण करत असतो. समाजात या बाबतीत मोठ्य प्रमाणावर जागरुकता निर्माण होऊन त्यांचा प्रसार होण्यासाठी सरकारी यंत्रणांची कशी मदत घेता येईल याचाही विचार करायला हवा.

सूचना,तक्रार,निवेदन,आवाहन,विनंती यात काही अर्थछटा आहे. अजूनही शासकीय यंत्रणेला तक्रार व सूचना यात फरक करता येत नाही.
मध्यंतरी मी वाहतूक अराजकतेबद्दल पोलिस उपायुक्त वाहतूक यांना खालील ईमेल केले. यात तक्रार ही आहे व सूचनाही आहे
पुण्यात वाहतुक यंत्रणा निष्प्रभ झाली आहे. लोक आक्रमक पद्धतीने वाहतूक नियम तोडताना दिसतात कारण कुठलीही कारवाई होत नाही. रहरदारीवर लक्ष ठेवणारे कॅमेरे काम करत नसावेत. सेकंदा सेकंदाला पुण्यात वाहतुक नियमांचे उल्लंघन होत आहे. नुकतेच मी या अंदाधुंद वाहतुकीचा बळी होता होता मी वाचलो आहे.
दिनांक- 15/04/2024
स्थळ- कर्वे रस्त्यावरील डहाणुकर कॉलनी चौक
वेळ- सायंकाळी 6.05
मी एक जेष्ठ नागरिक असून डहाणुकर कॉलनी कडून हॅपी कॉलनी कडे चौकातून स्कूटरवरुन जात होतो. सिग्नल पुर्णपणे ग्रीन होता. अचानक वारजे कडून डेक्कन कडे जाण्यार्‍या रस्त्याने काही दुचाकीस्वार लाल सिग्नल बेफिकिरीने तोडून जात होते. थोडक्यात मला धडकता धडकता वेगाने निघून गेले. माझी स्कूटर जरा घसरली पण मी वाचलो.
ही परिस्थिती अपवादात्मक नसून पुण्यात सर्रास या गोष्टी सातत्याने घडत आहेत. वाहतूक पोलिस प्रत्येक ठिकाणी ठेवणे शक्य नाही. पण traffic monitoring system with camera ही यंत्रणाच काम करत नाही. हे कॅमेरे नुसतेच शोभेचे झाले आहेत. प्रबोधनाची तमा नाही व शिक्षेचे भय नाही अशी परिस्थिती झाल्याने वाहतुक अराजक पुण्यात निर्माण झाले आहे. अपघात होता होता वाचल्याची संख्या प्रचंड आहे. त्याची कुठेही नोंद होत नाही.
पोलिसांकडून काही कारवाई होईल अशी नागरिकांकडून असलेली अपेक्षा व्यर्थ आहे
पोलिसांकडून युद्धजन्य परिस्थिती सारखी आक्रमक कारवाई जर सातत्याने होत राहिली तरच या बेबंद नियम तोडणार्‍यांना वचक बसेल. सिग्नल तोडून बेफान वेगाने जाणे, उलट दिशेने जाणे हे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असल्याने तो केवळ वाहतुकीचे नियम तोडल्याचा गुन्हा नाही. त्यापेक्षा कितीतरी गंभीर आहे. आपण जरी कितीही वाहतुकीचे नियम पाळले तरी इतरांनी ते पाळले नाही तर धोका तुमच्या जीवाला निर्माण होत असतो.
तरी या बाबत योग्य ती कारवाई व्हावी.

प्रत्येक महिन्यात एकदा महापालिकेच्या वाॅर्ड ऑफीसमध्ये मोहल्ला कमिटी ची बैठक असते. यात कमिटी चे सदस्य असतात आणी सामान्य नागरिक ही जाऊ शकतात. आसपासचा परिसर सुधारण्यासाठी ऊपयुक्त सूचना, अतिक्रमण तक्रारी, परिसराचे सुशोभन, दुरूस्त्या ई सूचना नागरिक करू शकतात.
पुण्यात दर महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी अशी बैठक होते. आमच्या येथील रहिवाशांचा एक कर्वेनगर सिटीझन फोरम म्हणून मंच आहे. दर मासिक सभेस काही सदस्य हजेरी लावतात आणी आधी डेटा गोळा करून त्यावर चर्चा करून मंचाच्या लेटरहेडवर ह्या मागण्या सहाय्यक आयुक्त यांना सादर केल्या जातात.
काही गोष्टी होतात तर काहींसाठी सतत पाठपुरावा करावा लागतो.
आपापल्या शहरात अशी बैठक कधी होते ते माहीती करून घेऊन तुम्हाला ही जाता येईल

मी असं का म्हटलं ?

जिथे अधिकृत जागा आहेत तिथे नियम वगैरे पाळण्याची तजवीज करता येते. आणि तसे होतही आहे. पण जिथे सार्वजनिक भाग आहे तिथे काय करणार? दुष्टपणा आणि त्यांना त्या वस्तीशी काही देणे घेणे नसते.

--------------------
पूर्वी मुंबईत लोकल ट्रेन तिकिटासाठी कुपन पद्धतही ठेवली होती. मशिन मध्ये त्यावर प्रिंट करून घ्यायची तारीख,वेळ आणि स्टेशनचे नाव. पण काही स्टेशनच्या मशिदीत कायम चुंगम भरून ठेवलेले असे.

रेल्वे हद्दीत कडेच्या भिंतीवरून भरपूर कचरा ओतला जातो. विस्टाडोममधून काय हा कचरा पाहायचा? आणि हा कचरा कोण टाकतो असं नियंत्रण ठेवणार?

ट्राफिक व गुन्हेगारीसाठी शहरात मोठ्या संख्येने cctv कॅमेरे बसवावेत. ते बसविणे, त्याची देखभाल करणे व त्यांचे व्यवस्थापण याचे खाजगी कंपनीला कंत्राट द्यावे. या सर्व cctv चे लाईव्ह फीड इंटरनेटवर (website व यूटुब) सर्वांसाठी मोफत उपलब्द असावे. यामुळे फुटेजमध्ये फेरफार करणे होणार नाही व एखादा कॅमेरा बंद असल्यास जागरूक नागरिक व्यवस्थापनाला सांगू शकतील. या लाईव्ह फीड च्या website वर जाहिराती दाखवून त्यातून या सर्व प्रोजेक्ट चा खर्च करावा. कमी पडत असलेले पैसे सरकारने द्यावेत. या कॅमेरांशी छेडछाड करणे किंवा नासधूस करणे हा गुन्हा असावा असा कायदा करणे.

अफलातून कल्पना माबो वाचक.

साधारण अश्याच प्रकारची कल्पना मलाही सुचली होती. रस्ते, फूटपाथ कोणी बनवले त्यांचे नाव आणि नंबर त्या त्या विभागात लिहिणे. जरा जरी खराब झाले तरी नागरीक त्या नंबरवर संपर्क साधू शकतील. तक्रार त्वरीत दूर केली जावी.

रच्याकने, मुळात आपले रस्ते आणि फूटपाथ हे इतके वाईट पद्धतीनं बांधलेले असतात. सुटे झालेले पेव्हर ब्लॉक्स, एकूणच क्वालिटीचा अभाव, स्टँडर्डायझेशनचा अभाव ... सगळाच आनंद. लहान मुलं, म्हातार्‍या व्यक्ती, अपंग यांना तर अश्या रस्त्यांवरून / फूटपाथवरून चालणे शक्य होणारच नाही याची जास्तीत जास्त काळजी घेतलेली. या गोष्टी समपातळीत असाव्यात ही संकल्पना मोडीत काढलेली असते. चालण्याचा आनंद अजिबात मिळू देणार नाही हे ध्येय समोर ठेऊन एकूण बांधणी केलेली. बाबागाडी, व्हिल चेअर्स वगैरे घेऊन बाहेर जाणे हे एखाद्या हॉरर फिल्मपेक्षा कमी नसते.

परदेशात असतात तसं हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इथे का मिळू नये? नागरिकांच्या जीवनमानात त्यामुळे कितीतरी फरक पडेल.

प्राजक्ता कागदे, उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद. हे सर्व खरंतर नागरीकशास्त्रात शिकवलं जायला हवं. शाळेत हा सगळ्यात जास्त दुर्लक्षलेला विषय असतो.

माबो वाचक, ह्या कॅमेऱ्याची देखभाल खाजगी कंपनीच करते. पण देखभाल होत नसल्याने अनेक कॅमेरा बंद असतात, विशेषतः अंतर्गत रस्त्यावरील. त्यामुळे कुठलीही घटना घडली की पोलीस आजूबाजूच्या इमारतीमधून फुटेज गोळा करत फिरतात. तुम्ही केलेली सूचना खुप छान आहे आणि सहज करता येण्याजोगी आहे

साधनाने केलेली सूचना रस्त्यावर असलेल्या दिव्यामध्ये राबवत आहेतच की, तसाच टाइमर ह्या डिस्प्ले मध्ये लावला की सहज साध्य होऊ शकेल

रेल्वेचे रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटावर जाऊ नये ह्याकरता मध्ये कठडे केलेले असतात,पण तेदेखील ओलांडून लोकं जातात किंवा चुकीच्या बाजूने उतरणारे ह्या कठड्यावर पाय ठेऊन पलिकडे उडी मारतात. अशा काठड्याच्या वरील बाजूस अणकुचीदार पत्रा लावल्यास रूळ ओलांडणायच्या घटना कमी होतील असे वाटते.

धन्यवाद मामी.
<<<ह्या कॅमेऱ्याची देखभाल खाजगी कंपनीच करते. पण देखभाल होत नसल्याने अनेक कॅमेरा बंद असतात>>> भ्रमर, असे असेल तर काय करणार. या कॅमेऱ्यांच्या uptime/ downtime चे नियम कंत्राटाच्या करारपत्रात नमूद करता येतील. व त्यानुसार त्या खाजगी कंपनीला दंड, कारवाई, करार रद्द करणे, इत्यादी करता येईल. पण खरेच असे होईल का याबद्दल शंका आहे.

आपल्या शहरांतील बसस्थानके व रेल्वे-स्थानके हि गर्दीने गजबजलेली असतात. तेथे मनुष्यबळाचा, नियोजनाचा व व्यवस्थापनाचा अभाव असतो. अशा ठिकाणांवरून प्रवास करणे हे भल्याभल्यांना कठीण जाते, गांगारून जायला होते. चोरी होण्याची, पाकिटमारीची, लहान मुले हरविण्याची, अपघाताची भीती असते. हवी ती बस/रेल्वे कधी, कोठे येणार वगैरे माहिती नसते. रात्रीच्या वेळेस सुरक्षिततेचा प्रश्न असतो. वृद्ध, गरोदर स्त्रिया, अपंग, निरक्षर यांना एकट्याने अश्या ठिकाणांवरून प्रवास करणे हे खूप कठीण जाते. अश्या ठिकाणी मदतनीस उपलब्ध असतील तर खूप सोय होईल. यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करता येइल. केवळ समाजकार्य करणे हेच प्रोत्साहन (incentive) असल्यामुळे त्यांच्या कामात गुणवत्ता राहील असे वाटते. सरकारवर खर्चाचा बोजा पडणार नाही. स्वयंसेवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांकडून तपासून घेणे, त्यांचे फोटो, पत्ता, इतर कागदपत्रे यांची नोंद ठेवणे यासारख्या गोष्टींमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येणार नाही. हे सर्व करण्यासाठी कोणत्याही नवीन सिस्टिम ची किंवा कायदे करण्याची किंवा परवानगीची गरज पडणार नाही. स्थानिक बस-स्थानके व रेल्वे स्टेशन हे करू शकतील.
अश्या मदतनिसांना ओळखण्यासाठी जॅकेट, टोपी, बॅज, इत्यादी देता येईल. ही नोकरी नसल्यामुळे स्वयंसेवक त्यांना हवा तेवढा वेळ, हव्या त्या कालावधीसाठी करू शकतील व त्यात लवचिकता राहील. स्वयंसेवकांना त्यांच्या कामाचे प्रमाणपत्र सुद्धा देता येईल, ज्याचा वापर ते नोकरी मिळविण्यासाठी करू शकतील.

अशी स्वयंसेवक-अधिष्ठित व्यवस्था उभी राहू शकेल का? त्यासाठी पुरेसे स्वयंसेवक मिळतील का? हा प्रश्न आहे. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

मला वाटतं बदल स्वतःपासून सुरु करावा त्यामुळे एक चांगली नागरिक म्हणून मी काही गोष्टी कटाक्षाने पाळते.
* मी बाहेर कचरा करत नाही. अगदी छोटासा कपटा सुद्धा मी माझ्या पर्समधून घरी घेऊन येऊन कचरापेटीत टाकते.
* भ्रमर सारखीच माझ्याकडे माझी पाण्याची बाटली सदैव असते आणि रुमाल पण असतो. ऑफिस मध्ये मी पेपर नॅपकिन वापरात नाही.
* वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळते. सिग्नल मोडत नाही, विरुद्ध दिशेने येत नाही. पुढे जागा मिळावी म्हणून अजून एक रांग करत नाही. मागे जागा मिळाली तरी सिग्नल पुन्हा लागला तरी एकाच रांगेत जाते. विनाकारण हॉर्न वाजवत नाही. लोकांना यायला जायला अडचण होईल अशी गाडी लावत नाही. भाजीवाल्याच्या पुढ्यातच गाड्या थांबवून भाजी घेण्याची खोड असते लोकांना, ती मला अजिबात नाही. मी गाडी बाजूला लावून भाजी विकत घेते. गाडी नेहमी मेन स्टँड ला लावते त्याने गाडी सुरक्षित तर राहतेच शिवाय पार्किंग ला किंचित कमी जागा लागते.
*पाण्याचा अपव्यव टाळते.

घराबाहेर आपल्याला ट्रॅफिक प्रदूषण, आवाज याने जितका स्ट्रेस होतो तो जरी कमी झाला तर आपलं आयुष्य सुकर होईल. पण हा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे.

Pages