भेळेमध्ये चिरलेला पालक आणि सॅलड कसं लागेल? आमच्याकडे असे प्रश्न नुसते पडत नाहीत. भेळेचा साग्रसंगीत घाट घालून संशोधनाचा प्राथमिक प्रयोग लगेच अंमलात आणला जातो. मटकी भेळ, कॉर्न भेळ हे भेळेचे उपप्रकार म्हटले तरी खरी भेळ चुरमुऱ्याचीच. चुरमुरे थोडे फोडणीला टाकलेले असले की काम झालं, फक्त त्यात परतलेले तेलावरचे भाजके शेंगदाणे पाहिजेत. बारिक कापलेला कांदा, टोमॅटो, कैरी त्यावर फरसाण, चाट मसाल्यासह पुदिन्याची झणझणीत आणि चिंचगुळाची आंबटगोड चटणी टाकल्यावर चुरचुरणारे चुरमुरे कालवत होणारी भेळ… मग त्या भेळेचं पौष्टिकत्व वाढवण्याच्या हेतूने त्यात घातलेली काकडी, लाल मुळा, उकडलेला बटाटा ही मंडळी. आता या भाऊगर्दीत आणि वर पालक अन् आईसबर्ग लेटस नावाचं सॅलड…? अहो, खाऊन तर बघा, मस्त लागतं. जीभ आणि पोट दोन्हीची एकाचवेळी तृप्ती करणारी चविष्ट पाककृती आहे ही!
तर सांगत काय होते, स्वयंपाकघरात प्रयोगशीलता महत्वाची. मग नेहमीच्या पदार्थाची सुधारित आवृत्ती असो किंवा बाहेर खाल्लेला नवा पदार्थ. पाककृती चाखून, आपल्याला करून बघता आली पाहिजे. अमेरिकेत आल्यावर माझ्यात (मुळात नसलेल्या) सुगरणपणाला असाच बहर आला. म्हणजे आधी उपजत नसलेलं पाककौशल्य मिळवण्यात, काहीतरी वेगळं करण्यात आणि नंतर नवे खाल्लेले पदार्थ त्यातले जिन्नस ओळखून तसेच घरी प्रत्यक्ष बनवण्यात. माझ्या घरच्यांच्या सोशिकपणाला मनोमन दाद दिलीत ना? आता प्रयोगशीलतेत थोडे अपघातही घडणारच की. असे धसकू नकात, बरेचसे प्रयोग यशस्वीही होतात म्हटलं. चटकदार भेळेने चव आणलेली आहेच, मात्र अमेरिकेत अस्सल भेळ कुठली मिळायला? इथे मनपसंद जेवणाचीही बाहेर मारामार. मग मेक्सिकन, एशियन, ग्रीक, इटालियन असा वैश्विक मेळा. या खाद्यमेळ्यातून जे आवडले ते घरी प्रयत्न करून बनवले, त्यातलीच एक सुफळ संपूर्ण पाककृती.
झालं असं की, चौदाएक वर्षांपूर्वी एंगलवूड या कोलोरॅडोतल्या शहरात आम्ही राहात होतो. संसार ऑस्टिनला ठेवून मोजकं चंबू गबाळं बांधून माझ्या नव्या नोकरीसाठी आम्ही तिथे भातुकलीचा डाव मांडलेला. थोडे स्थिरावेपर्यंत अधूनमधून पेटपूजा करण्यासाठी बाहेर जाणं अपरिहार्य होतं. सकाळी ऑफिसला जाताना बर्फ उपसण्याचं काम लावणारी, एरवी टेक्ससच्या रस्त्यांना सरावलेली मात्र कोलोरॅडोच्या शुभ्र रस्त्यांवर पदोपदी घसरणारी बेभरोशाची आपल्याच हातातली आपली गाडी… ती कुडकुडणारी, कोरडी, हाडापर्यंत मुरत जाणारी थंडी. अशा परिस्थितीत किमान पोटासाठी काहीतरी गरमागरम मिळालं पाहिजे या माफक अपेक्षेने आम्ही आसपासची रेस्टॉरंटस् धुंडाळत होतो. नाही म्हणायला इटालियन ‘माजियानो’ आमच्यासारख्या शाकाहारी लोकांची चांगली बडदास्त राखणारं होतं पण कडक, गरम कुठे मिळेल हा सवाल कायम होता. तिन्ही त्रिकाळ बर्फाशिवाय पाणी न पिणाऱ्या, दिवसा बाहेरचा स्वच्छ सूर्यप्रकाश झाकून आत पुन्हा अंधुक दिवे जाळण्याची प्रथा असणाऱ्या या पाश्चिमात्य देशात गरम जेवण मात्र दुरापास्त वाटत असतानाच युरेका… नकाशावरच्या एका रेस्टॉरंटवर बोट ठेवत नवरा म्हणाला, “Fire Bowl Cafe!” नावातच फायर असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये धाब्यासारखं मस्त नाकातोंडातून धूर निघणारं, गरम कडक जेवण मिळेल तर किती छान होईल या स्वप्नरंजनावर आम्ही तिथे पोहोचलो.
थाई वा चायनीज (एशियन) लोक काहीही खातील, याची प्रचिती यांचा मेन्यू बघताना आली. बराच उहापोह करून कुठलाही फिश सॉस नसलेली आणि मांसाहार विरहित डिश आम्हाला सापडली. प्रश्न होता तो त्यासाठी भाज्या निवडायचा. स्प्रिंगमिक्समधलं बांबू शूटस्, वॉटर चेस्ट्नट आणि थाई मिक्समधला मश्रूम… छे नको, माहिती नाही, उगाच गिळगिळीत कसेतरी लागायचे. मग त्या माणसाला पटवलं, त्या दोन्हीतल्या आम्हाला आवडणाऱ्या भाज्याच तेवढ्या द्यायला. त्यादिवशी रेस्टॉरंटमध्ये आम्हीच काय ते एक गिऱ्हाईक असल्यामुळे त्यालाही पर्याय नसावा. ऑर्डर झाली, पोटात कावळे ओरडत होते. तिथे उपलब्ध असलेल्या उकळत्या पाण्याचा नळ पाहून आम्हाला अगदी भडभडून आलं. कारण तोपर्यंत Water, no ice हे केवळ बर्फ काढून दिलेलं असावं असं थंडगार मिळत होतं आणि तसल्या थंडीत अधिकच दातखिळ बसवून जात होतं. अखेर त्या कडाक्याच्या थंडीत गरम पाणी आणि जेवण आम्हाला मिळत होतं.
यथावकाश तो वाफाळता बाऊल आमच्यासमोर आला. स्पायसी पिनट! गरमागरम थाई स्टिकी राईस (उर्फ चिकट भात) त्यावर अल्-डेंटे शिजलेल्या बाईट साईज भाज्या, पांढरट तपकिरी सॉस आणि वर भाजक्या दाण्यांचा अर्धवट रगडलेला कूट… काय लागलं ते! यथेच्छ पेटपूजा करून पुढ्यातलं सगळं संपवून आम्ही अपार्टमेंटवर पोहोचलो आणि ही डिश आपल्याला जमली पाहिजे असं डोक्यात बसलं. प्रत्यक्षात त्या प्रयोगाला नोकरी बदलून पुनःश्च ऑस्टिन, मग आम्ही नव्याने बांधून घेतलेल्या घरात गृहप्रवेश, आमच्या पहिल्या लेकीचा जन्म इतका काळ जायला लागला. एकेदिवशी कॉस्टकोच्या शेल्फवर थाई स्टिकी राईस दिसण्याचं निमित्त काय झालं आणि नवरा ते ५० lb (म्हणजे सुमारे २५ किलो) तांदळाचे पोतं घेऊन घरी आला. मी अचंबित. तो भात शिजवण्याचा पहिला प्रयत्न सपशेल फसला. लापशी मुलीला भरवावी लागली. त्या तांदळाच्या चिकटपणावर फिदा होत मी तो धुवून वाळवत मुद्दामून त्याची थोडी पिठी काढली आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेतली. भारतीय दुकानातून आणलेल्या बहुतांशी विरी गेलेल्या तांदूळ पिठीत घातले तर उकडीचे मोदक नीट जमतील म्हणून. मात्र मोदकाच्या उकडीची पारी एकमेकांना चिकटण्यापेक्षा बोटांनाच जास्त चिकटून ऊत आणत होती. मूळ प्रयोगातून फुटलेला जोडप्रयोगही असा उताणा पडला.
अनेक फसणारे भात पचवत शेवटी या भाताचे इंगित मायाजालावरच्या एका हौशानौशाकडून कळले. तीन ते पाचवेळा थाई तांदूळ धुवून घ्यायचा. जेमतेम तांदळाइतकेच पाणी त्यात घालून (कुकरमध्ये नाही तर) पातेल्यात झाकून शिजायला ठेवायचा. पाणी उकळायला लागले की वर केवळ जाड कापडाने झाकून बारीक आचेवर शिजू द्यायचा यामुळे वाफेचे पाणी मर्यादितच भातात मुरते आणि भात सुंदर मोकळा शिजतो. त्यानंतरच्या ६॥ वर्षांतही आमचा न संपलेला तो तांदूळ घरात आपली जागा राखून होता तेव्हा कापड नाही ठेवले तरी चालायचे कारण पंट्रीत हा मूळचा भयंकर चिकट तांदूळ घराण्यातल्या सर्वात वयस्क जाणत्याप्रमाणे भलताच जुन झालेला होता. असो! तर भाताचा प्रश्न असा लांबच्या रस्त्याने का होईना पण सुटला.
बाहेरचा पदार्थ घरी करताना काही बदल करावे लागतात कदाचित सामग्रीत फरक पडू शकतो. त्यामुळे माझी पाककृती अधिकृत असा माझा दावा नाही मात्र चव जमली की आणखीन काय हवे?
ब्रोकोली, स्नॅप पीज, गाजर, लाल-हिरवी ढबू मिरची, झुकिनी, बेबीकॉर्न, बीन्स यातल्या उपलब्धतेनुसार असतील त्या भाज्या घ्याव्यात. उकळत्या पाण्यात एखादा मिनिट टाकून कढत तापलेल्या लोखंडाच्या तव्यावर चटका लागेल अशा थोडं तेल टाकून मस्त सिझ्झलिंग भाजून घ्यायच्या त्या अगदी जेवायला बसायच्यावेळी. त्याआधी करावा लागतो तो स्पायसी पिनट सॉस. या सॉसच्या सोसापायी अनेक एशियन-थाई बल्लवाचार्यांच्या पाककृती पालथ्या घातल्यानंतर त्याच्यातल्या घटकांचा उलगडा झाला. करायला अतिशय सोपा. ३ – ४ पातीचा केवळ कांदा, इंचभर आलं, ४ पाकळ्या लसूणाबरोबर हलका किंचित तेलावर परतून घ्यायचा. पातीचा कांदा नसल्यास नेहमीचा कांदाही वापरू शकतो मात्र कांद्याने सॉसला उग्रपणा येणार नाही एवढाच हवा. कांदा, लसूण वगळून करणार असाल तर पाव चमचा मिरपूड. मग परतेलेले हे जिन्नस बारीक वाटून घ्यायचे.
सॉससाठीच्या छोट्या पातेल्यात कपभर पिनट बटर, अर्धा कप सोया सॉस किंवा कोकोनट अमिनोस, पाव कप व्हिनेगर किंवा अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. त्यात अर्धा-एक कप नारळाचे दुध आणि वाटलेले मिश्रण हे एकत्र करून मंद आचेवर ठेवायचे. नारळाचे दूध नसेल तर पाणी वापरले तरी चालते. गरज असल्यास थोडे मीठ. साखर मात्र लागते सोया सॉस, लिंबू किंवा व्हिनेगरच्या आंबटपणाला समतोल आणेल इतकी. वरून थोडे चिली फ्लेक्स तिखटपणासाठी. हे सारे फारसे उकळू वगैरे न देता हलवत जेव्हा एकजीव होतात तेव्हा बनतो तो आपला स्पेशल सॉस. प्रमाण आपापल्या सवयीने, चवीप्रमाणे बदल करून ठरवू शकतो. शाकाहारी लोकांसाठी मऊ वा तळलेला टोफू किंवा पनीर. वाफाळता भात, त्यावर सिझ्झलिंग हॉट भाज्या, टोफू, वरून बनलेला गरम स्पायसी पिनट सॉस, सजावटीसाठी हवा असल्यास भाजक्या दाण्यांचा कूट.. की ‘स्पायसी पीनट’ तयार!
हा फर्माइशीचा बेत घरात बनला की हटकून कोलोरॅडोच्या दिवसांची आठवण होते. अर्थात त्या आठवणींत बरेच काही सामावलेले आहे. त्यातल्या रॉकी माऊंटन, कोलोरॅडोचा निसर्ग यावर पुन्हा केव्हातरी!
https://sayalimokatejog.wordpress.com/2024/04/27/spicy-peanut/
सायली मोकाटे-जोग
छान आहे. आवडलं
छान आहे. आवडलं
Mast aahe. Please also put
Mast aahe. Please also put this recipe in the recipe section
मस्त
मस्त
मस्त लिहिलंय. आयती कोणी बनवून
मस्त लिहिलंय. आयती कोणी बनवून दिली तर रेसिपी खायला मजा येईल.
रेसिपी मस्त वाटत्येय. करेन
रेसिपी मस्त वाटत्येय. करेन एकदा.
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
प्रयोग आवडले. आणि ते करून
प्रयोग आवडले. आणि ते करून वेगळे ठेवून खातोही.
फडफड्या शिताड्या भारतापेक्षा चिकटगोळा भात आवडतो. गिळायला सोपा असतो, चावावा लागत नाही.
धन्यवाद सर्व प्रतिक्रियांसाठी
धन्यवाद सर्व प्रतिक्रियांसाठी!