अव्वा

Submitted by Sarav on 26 May, 2024 - 03:32

अव्वा.

“ स्वयंपाकघरात चूल पेटवणाऱ्या अव्वाच्या शेजारी मी बसायचो. ती भाकऱ्या थापायची आणि मी चुलीच्या आगीत लाकडे टाकायचो. शाळेत काय काय शिकवलं ते ती विचारायची. अव्वा चौथी पर्यंत शिकली होती. मी शाळेत शिकलेली कविता, पुरंदर दासांचे पद, गोष्टी, मित्रा सोबत केलेल्या गमती तिल्या सांगितल्या कि ती खळखळून हसायची आणि सगळं आवडीने ऐकायची.

पावसाळ्यात चूल पेटवायला फार कष्ट पडायचे. लाकडं ओली झालेली असायची, पेटायला वेळ लागायचा आणि अव्वा फुंकणी फूं फूं फुंकत राहायची. ठिणग्या उडल्या की ती मागे सरकायची. जरा कुठे जाळ दिसतोय तेवढ्यात परत धूर. तिच्या डोळ्यात धूर जाऊन पाणी यायचे, चेहरा धुरामध्ये घामाने भिजलेला दिसायचा. हळूहळू धूर एवढा वाढायचा, मी आणि अव्वा खोकून खोकून हैराण व्हायचो. मी खोकू लागलो की ती कासावीस व्हायची आणि साडीच्या पदराने माझे डोळे पुसत म्हणायची,” अप्पा, जारे राजा बाहेर, चूल पेटली की मी हाक मारते हां बेटा.” मी खोकत खोकत आणि शर्टाच्या बाहीने डोळे पुसत अंगणात यायचो. “ धूर सहन होत नाही तर बसतोस कशाला स्वैपाक घरात?” तुझा काका गुरूचे नेहमीचे वाक्य. त्या काळया धुराने स्वयंपाकघर आगीत जळाल्यासारखे वाटायचे. थोड्या वेळाने तिची हाक ऐकू यायची, “अप्पाण्णा, बारो, जाळ पेटला एकदा.. ये आत..” आता डोळे चुरचुरणार नाहीत, खोकला येणार नाही याची खात्री पटून मी स्वैपाकघराकडे धावायचो. ताटात दुमडलेली गरम भाकरी असायची. ती उघडली की त्यातून तूप ताटात सांडणार हे मला ठाऊक असायचं. खाऊन झाल्यावर मी शाळेकडे पळायचो.

वर्षे उलटली. गुरुराजचे लग्न झाले. एका वर्षानंतर माझेही झाले. गुरुची बायको आणि तुझी आई भांडू लागल्या. गुरुराज मला घर सोडून जा म्हणाला. मग आपण किट्टप्पाचे घर भाड्याने घेतले. अव्वा फार रडली. गुरुची बायको अव्वाला अद्वातद्वा बोलायची ते कानावर यायचे. अव्वा आपल्याकडे एक दोनदा आली. नंतर मला नोकरी लागली बंगलोरला. आपण बंगलोरला घर केलं. अव्वा गुरुकडेच गावात राहिली.

हळू हळू माझं गावाकडे जाणं कमी झालं. कोणीतरी गावाकडून यायचे ते सांगायचे, अव्वाला आता चष्मा लागलाय, तिला ऐकू कमी येतंय, हळू हळू चालते, गुडघे दुखतात. मी मग सकाळी इथून जाऊन तिला भेटून यायचो. तिच्या खोलीत ती पलंगावर पडलेली असायची. गुरूच्या बायकोच्या कपाळावर मला बघितल्यावर आठया पडायच्या. गुरूच्या मुलांना मी कपडे, खेळणी आणि पुस्तकं घेऊन जायचो आणि ती मला बिलगायची. ते वहिनीला आवडायचं नाही. अव्वाला, ‘बेंगलोरकं नडी अव्वा’ अशा विनवण्या केल्या बऱ्याच वेळा, पण नाही आली. गुरूने आता जुने घर पाडून नवीन सिमेंटचे बांधकाम केले होते. स्वैपाकघरात आधुनिक किचन कट्ट्यावर गॅसच्या शेगड्या दिसत होत्या. संध्याकाळच्या गाडीने मी परत निघायचो तेंव्हा घशाशी दाटून यायचं.

असेच दिवस गेले आणि एके दिवशी पहाटेच गुरूचा अव्वा गेल्याचा फोन आला. मी तडक निघालो. हवा आणि मन दोन्हीं ढगाळ झाली होती. मी गावी पोचलो तेव्हा पाऊस पडत होता. अव्वाला बाहेर हॉल मध्ये झोपवलं होतं. तिच्या नाकात आणि कानात कापसाचे बोळे बघून मी मान फिरवली. तिच्याकडे बघवेना. मी तिला हॉल मध्ये पहिल्यांदाच पाहात होतो. तिचा मुक्काम स्वैपाक घरातच असायचा. ती मला दिसायची ते कधी तांदूळ निवडताना तर कधी पोहे चाळताना, कधी भांडी घासताना तर कधी पापड लाटताना, चुली शेणाने सारवताना, झाडू मारताना, पाणी भरताना, कपडे वाळत टाकताना, भाजी चिरताना, लोणच्याची बरणी पुसताना, लोणी कढवताना, भाकऱ्या थापताना, निरांजन पेटवताना… सतत कामात गर्क असलेली. ती माझ्या अगोदर उठलेली असायची आणि ती झोपायच्या आत मी झोपी जायचो. मला ती कायम जागीच दिसायची. आता तिच्या स्तब्ध, निश्चेष्ट देहाकडे बघताना मला जाणवलं की मी तिला आता मुकलो. ती आता अनंताच्या प्रवासाला निघाली होती. परत न येण्यासाठी. आता ती कधीच दिसणार नव्हती. माझ्या पाठीवर तिचा जिव्हाळ्याचा थरथरणारा हात आता फिरणार नव्हता. आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली होती.

तिला चितेवर ठेवलं आणि लाकडाना अग्नी दिला. पावसामुळे ओली झालेली ढलपी पेटेनात. काही लोकांनी त्यात गोवऱ्या टाकल्या तसा धूर निघू लागला आणि मी खोकू लागलो. गुरूने मला लांब उभे राहायला सांगितले. चिता पेटत नव्हती. पावसाचे थेंब पडायला लागले तसं काळजी वाटायला लागली. क्षणभर असं वाटलं की अव्वा उठेल आणि फुंकणी घेऊन फूं फूं फुंकायला लागेल. तेवढ्यात धूर विरळ झाला आणि चिता धडधड पेटून उठली. मला वाटलं, ती आता म्हणेल, “अप्पाण्णा, बारो, जाळ पेटला एकदा.. ये आत..” जाळ आकाशात जातोय आणि त्याबरोबर अव्वाही चाललीय असं चित्र दिसल्याचा भास झाला.”

बाबांनी स्वतःच्या आईच्या फोटोला नमस्कार केला. समोर लावलेल्या उदबत्तीच्या धुराने त्यांचे डोळे पाणावले होते. आईने तूप आणि भात वाढलेली पत्रावळी आणि छोट्या द्रोणातले पाणी त्यांच्या समोर ठेवले. ते घेउन बाबा ती ताटली गच्चीवर ठेवायला पायऱ्या चढू लागले.
....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

घर घर की कहानी.. Sad

आई वडील असताना गृहीत धरले जातात. ते गेले की लक्षात येते त्यांच्यासाठी काय काय करायचे राहुन गेले ते. त्या करायच्या गोष्टी अगदीच यत्किश्चित असतात त्यामुळे ते असताना लक्षात येत नाही. ते गेल्यावर मात्र इतकी छोटी गोष्टही आपण करु शकलो नाही ही बोचणी कायमची मनाला लागते.