*'लंपन" च्या निमित्ताने* ...
"लंपन" बघताना खूप वेळा डोळ्यात पाणी आलं... त्रास तर झालाच... माझं बालपण आठवलं. त्या छोट्या मुलाला जसं एकटंएकटं, असुरक्षित, अस्वस्थ वाटत होतं तसंच कदाचित त्यापेक्षा जास्त मला वाटत असावं. मी तर जेमतेम पाच वर्षाची होते. काही म्हणजे काही कळायच्या आत आजूबाजूचं सगळंच बदललं. बाबा गेले... त्यामुळे नक्की काय नुकसान झालं हे कळण्याचं वयच नव्हतं. पण त्यानंतरच्या काळात बरीच उलथापालथ झाली त्यातल्या काही गोष्टी बालमनाला अगदीच अनाकलनीय होत्या... तरीही आईपासून वेगळं रहाणं काय असतं ते पक्कं समजलं! बाबांच्या एकाएकी जाण्याने *मी एकाकी झाले*. तेव्हा बालमानसशास्त्र वगैरे शब्द अस्तित्वात असतीलही पण परवडणारे नव्हते. अचानक बाबा दिसेनासे होतात, आई आणि लहान भाऊ दूर जातात, आपलं घरंही जातं... कडक शिस्तीत मोठ्या काकांच्या घरी धाकात रहावं लागतं... हे सगळं पचवणं खूप होतं माझ्यासाठी!
एकही दिवस मी खूप किंवा पूर्ण आनंदी असल्याचं मला आठवत नाही. खायचीप्यायची आबाळ नाही झाली कधी, दुष्टपणे कोणीच नाही वागलं जाणूनबुजून! पण लोकांच्या नजरेत मला न समजणारं काहीतरी दिसायचं, जे मला अजिब्बात आवडायचं नाही. वाटायचं बघूच नये कोणाकडे! शाळा, अभ्यास नाहीच आवडायचा कारण त्यामुळेच मला आईला सोडून रहावं लागतय अशी पक्की समजूत झाली होती! म्हणूनच की काय तिथे असताना एकदाही पहिल्या पाचात नंबर नाही आला. नाखुषीने का असेना, अभ्यास मात्र करावाच लागायचा म्हणून मार्क चांगले पडायचे. कोणी फार जवळ घेणार नाही, लाड करणार नाही, हट्टबिट्ट तर दूर की बात! दंगामस्ती करायला आवडायचं पण भीतीही वाटायची. तरीही घाबरत घाबरत जमेल तेवढी मस्ती करायचे, पोरवय कुठं गप्प बसणार. कधीकधी न केलेल्या चुकीसाठी पण ओरडा बसायचा पण सांगणार कोणाला? जसं त्या लंप्याला वाटतं ना अगदी तसंच मॅड सारखं, आपण कोणालाच नको आहोत असं वाटायचं. पालक म्हणून काकाकाकू तसे कुठेच कमी नाही पडले हे आत्ता कळतंय पण तेंव्हा नाहीच आवडायचं. सणासुदीला मामा, आई कोणी न्यायला आले की पर्वणी वाटायची पण परत रवानगी तिथेच या कल्पनेने मन सतत धास्तावलेलं असायचं. अशाच एका धास्तावलेल्या क्षणी एक निर्णय घेतला आणि ठाम राहिले त्यावर! नाही म्हणजे नाही जाणार आईला सोडून... असहकारच पुकारला!
आणि हो, माझी सुटका झाली... काहीही सुविधा नसलेल्या छोट्या गावी मी निर्धास्तपणे आणि स्वखुशीने आईबरोबर नवीन जीवन सुरू केलं. मनस्वास्थाचा सगळ्या गोष्टींवर किती सकारात्मक परिणाम होतो याचा जणू साक्षात्कार झाला. अभ्यास, शाळा सगळंच आवडू लागलं. पूर्वी कधीही पहिला नंबर न काढणारी मी पहिल्या सहामाही परीक्षेपासून कायम पहिली आले. छोटी खोली, विहिर, कॉमन संडास, वीजेचा अनियमित पुरवठा या सगळ्यावर फक्त आई जवळ असणे या एका गोष्टीनी अक्षरशः मात केली.
-- अभिश्रुती
आता माझ्याच निमित्ताने तर मीच
आता माझ्याच निमित्ताने तर मीच देतो प्रतिसाद पहिला
छान लिहिलं आहे, एकदम गलबलून आलं. भावना अगदीच पोचल्या. सिरीज बघायची आहेच. पण गीतांजली कुलकर्णी आणि ती भाषा ऐकून मुडच गेला. लंप्याची आजी म्हणून मनात एकदम वेगळी इमेज होती, ज्यात गिकु कुठेच बसत नाही.
निःशब्द. तुम्हाला एक घट्ट
निःशब्द. तुम्हाला एक घट्ट मिठी.
बालपणीचा भावनाकल्लोळ अगदी
बालपणीचा भावनाकल्लोळ अगदी चपखळ शब्दांत लेखात उतरलाय.
खरोखर गलबलून आलं, आईसोबत
खरोखर गलबलून आलं, आईसोबत रहायचा निर्णय उत्तम होता, मानसिक समाधान मिळालं असेल.
भावना चांगल्या प्रकारे
भावना चांगल्या प्रकारे मांडल्यात तुम्ही.
आईवडील सोबत राहणे आणि इतर कोणासोबत राहणे ह्यात फरक असतोच. आमच्याकडे मावशीचा मुलगा 3 वर्षे होता. बालवाडी पहिली दुसरी मध्ये असताना. त्यांचे गाव दुर्गम भागात आणि चांगली शाळा नव्हती. नंतर मावशीने आम्ही रहायचो तिथेच जवळ जागा घेउन घर बांधले. आणि राहायला आली. आई सोबत असताना तो वेगळाच खुलून यायचा. आमच्या घरीही त्याचे लाड ( कारण तेव्हा तो सगळ्यात लहान होता म्हणून ) वै सर्व नीट असूनही त्यालाही असे फील व्हायचे. मला तेव्हा प्रश्न पडायचा की आमच्यापेक्षा ह्याचे लाड जास्त होऊनही हा आई आली की लगेच पलटी कशी मारतो म्हणून. तेव्हा समज नव्हती. नंतर लक्षात आलं ते.
खूपच हृदयस्पर्शी लेखन..!
खूपच हृदयस्पर्शी लेखन..!
गलबलून आलं. तुला घट्ट मिठी!
गलबलून आलं. तुला घट्ट मिठी!
खरोखर गलबलून आलं, आईसोबत
खरोखर गलबलून आलं, आईसोबत रहायचा निर्णय उत्तम होता, मानसिक समाधान मिळालं असेल........ +१.
ह्रदयस्पर्शी मांडलय..छान लेख.
ह्रदयस्पर्शी मांडलय..छान लेख.
छान लिहिलं आहे. भावना पोचल्या
छान लिहिलं आहे. भावना पोचल्या.
लंपन च जर तुम्हीं आकाशवाणवरील
लंपन च जर तुम्हीं आकाशवाणवरील पुस्तकाचा अनुवाद एकला पाहिजे होता . त्या सारखा नितांत सुंदर अनुभव कुठेच नाही.. फारच दुर्मिळ अनुभव..
हो हो पुणे आकाशवाणीला
हो हो पुणे आकाशवाणीला नभोनाटीका आली होती.. रविवारी दुपारी. फारच उच्च. तसे काही ऐकलेच नाही.
पटलं.
पटलं.
ओह्ह..... ! डोळे पाणावले. खूप
ओह्ह..... ! डोळे पाणावले. खूप मोठा संदेश असलेले लिहून गेलात
"लंपन" आपले मायबोलीवरचेच मला माहिती (ज्यांचा पहिला प्रतिसाद) म्हणून लेख वाचला.
सिरीज आहे माहित नव्हतं. सध्या भावनिक करणारे काही नको अशी मानसिकता आहे, त्यामुळे जरा सवडीनेच बघेन.
खूप छान लिखाण!
सर्वांना धन्यवाद मनापासून!
सर्वांना धन्यवाद मनापासून!
लंपन वेबसिरिज SoniLiv वर आहे. प्रकाश संतांच्या पुस्तकावर आधारितच आहे. ती पाहिल्यावर रहावलंच नाही मला! म्हणून व्यक्त झाले.
खूप सुंदर लिहिलंय. बालपणी जे
खूप सुंदर लिहिलंय. बालपणी जे अनुभवलंय त्याने काही वेळा कडवट पणा राहतो स्वभावात, अढी किंवा नेगेटिव्ह भावना राहतात काहींच्या मनात. पण तुमच्या लिखाणात तो कुठंही दिसला नाही त्यामुळे जास्त भावलं तुमचं लिखाण. तुमचं खूप कौतुक आणि एक tight hug तुम्हाला. Tight hug यासाठी की त्यानिमित्ताने तुमची पॉसिटीव्हिटी मला ही मिळेल
अभिशृती, वाचून वाईट वाटलं पण
अभिशृती, वाचून वाईट वाटलं पण नंतर आई आणि भावाबरोबर राहाता आलं हे उत्तम झालं.
लंपन पुस्तक वाचलेलं नाही त्यामुळे लंपन आयडी गिकुबद्दल काय म्हणतायत ते काही कळलं नाही. पण सिरीजमध्ये त्याला आ़इ आजोबांकडे का नेऊन ठेवलं असावं हे काही नीट्सं कळत नाही. त्याच्या आईची सुमार अॅक्टींग बघून काहीही कारण नसावं असंच वाटलं.
@लंपन sarcastic comment आहे
@लंपन sarcastic comment आहे का तुमची...
२१ भागांची मालिका होती पुणे आकाशवाणी केंद्रावर.. माझ मत मी व्यक्त केलं.. आवडलं नसेल तर दुर्लक्ष करा..
Abhishruti वाईट वाटलं वाचून
Abhishruti वाईट वाटलं वाचून.पण शेवटी आईकडे रहायला मिळालं हे उत्तम..
रंगीला, बापरे असे का वाटले
रंगीला, बापरे असे का वाटले तुम्हाला????? ह्या नभो नाटिकेवर वाड्यावर मेघना ह्यांच्या बरोबर बोलणे पण झाले आहे. मला फारच आवडली होती, ती ऐकून मी हा चार पुस्तकांचा संच घेतला होता. असो लेखिकेने लंपनच्या निमित्ताने तिचे मनोगत लिहिले आहे, तेंव्हा ही चर्चा बास.
अभिशृती, वाचून वाईट वाटलं पण
अभिशृती, वाचून वाईट वाटलं पण नंतर आई आणि भावाबरोबर राहाता आलं हे उत्तम झालं.
+१
आणि मी बिल्वाशी सहमत.
अभिशृती, वाचून वाईट वाटलं पण
अभिशृती, वाचून वाईट वाटलं पण नंतर आई आणि भावाबरोबर राहाता आलं हे उत्तम झालं.
+१
आणि मी बिल्वाशी सहमत.+१११ मी पण सहमत.
मी ही प्रकाश संतांच्या ह्या गोष्टी वाचल्या नाहीत. पण आता वाचीन.
वाचून वाईट वाटलंच, पण नंतर
वाचून वाईट वाटलंच, पण नंतर तरी आई आणि भावाबरोबर राहता आलं हे वाचून बरं वाटलं.
छान लिहिले आहे. खूप
छान लिहिले आहे. खूप हृदयस्पर्शी.
बाकी सिरिजचा ट्रेलर आवडला नाही त्यामुळे पाहीन की नाही माहित नाही.
अभिश्रुतीः खरंच लहान वयात फार
अभिश्रुतीः खरंच लहान वयात फार मानसिक कल्लोळातून गेलात तुम्ही. पण तुम्हांला परत आईजवळ राहता आले हे खरंच बरं झालं.
अभिश्रुतीः फार कसंतरी वाटलं
अभिश्रुतीः फार कसंतरी वाटलं वाचून. पण चला ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. स्वतःसाठी स्टँड घेतलात ते खूप छान झालं!
पालक त्यांच्या भूमिकेतून जो निर्णय (एकतर्फी असला तरी घेतात) त्यांना योग्य वाटतो तो घेतात. पण मुलांना काय वाटत असतं हे किती जण जाणून घेतात माहित नाही.
सॉरी फॉर अवांतरः काही साध्या साध्या गोष्टी (आपल्याला वाटणार्या) मुलांच्या आयुष्यात किती महत्वाच्या असतात.
फेबु/इन्स्टावर मी एका अमेरिकन फॅमिलीच्या पोस्ट फॉलो करते. खूप छान छोट्या रोजच्या जीवनात घडणार्या गोष्टी, भावा बहिणीतलं बाँडीग, नवरा बायकोमधलं प्रेम, आजी आजोबा, मुलं आणि त्यांच्या फार्ममधल्या प्राण्यांच विश्व, डॅडी आणि किड्स मधले गमतीशीर प्रसंग याचे फोटो विडीओ टाकतात. त्यात काल तिने लिहिलं होतं की तिची मुलगी रोज फॅमिलीसोबत नाश्ता करायला हटून बसलेली असते , डॅडी बाथरूम मधे असेल तर दाराबाहेर उभी राहते वाट बघत. आईची नाश्ताय्ची वेळ वेगळी/उशिराची आहे आणि ती काही बदलत नाही ती फक्त कॉफी घेते त्यांच्यासोबत. त्यामुळे मुलगी नाराज होते आई आपल्याबरोबर खात नाही म्हणून. त्यामुळे बाबा लागतोच सोबत खायला.
त्यावर तिला एका फॉलोअरचा मेसेज आला या प्रसंगासंदर्भात की माझा नवरा नुकताच वारलाय आणि माझ्याही मुलीचा फेव मोमेंट त्याच्यासोबत सिरिअल दुध खाणे हा होता. तुझ्या पोस्टमुळे छान आठवणी जाग्या झाल्या.
त्यावर तिने पोस्ट केलंय.. कधी आपल्याला वाटतं मुलं काय एवढ्या छोट्या गोष्टींवर अडून बसतात पण त्यांच्यासाठी तो अमुल्य खजिना असतो हे मला कळलं. who knew eating breakfast together would be so exciting for little soul... now i know these little moments are not so little!!
>>गलबलून आलं. तुला घट्ट मिठी!
>>गलबलून आलं. तुला घट्ट मिठी!>>+१
खरंय अंजली... मुलाचं भावविश्व
खरंय अंजली... मुलाचं भावविश्व खूप वेगळं आणि नाजूक असतं.. कुठल्या गोष्टी त्याच्या साठी महत्वाच्या असतील याचा अंदाज मोठ्यांना सुरुवातीला येतच नाही. पण संवादाने, अनुभवाने या गोष्टी कळतात. म्हणून असेल कदाचित, पहिल्या मुलाच्या बाबतीत केलेल्या चुका आपण दुसऱ्याला वाढवताना करत नाही. But again single parenting चे काही वेगळेच चँलेंज असते. जे माझ्या आईने सक्षमपणे पेलले. एकही चापटीसुद्धा न मारता दोन आनंदी जीव वाढवले.
सर्वांचे परत एकदा मनापासून आभार... तुम्ही इतका उस्फूर्त आणि सविस्तर अभिप्राय/प्रतिसाद दिलात. त्याबद्दल तुम्हा सर्वांनाच घट्ट आणि मीठी मिठी !!