कबूतरावरचं असंही एक पुस्तक

Submitted by मार्गी on 16 May, 2024 - 05:57

नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी! १९२५ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या समृद्ध भावविश्वामधील प्रत्यक्षातील अनुभवांचं वर्णन आहे. आज आपण "त्या काळापासून" खूप दूर आलो आहोत. पण निसर्गामध्ये मुक्त फिरण्याचा, अनेक दिवस व रात्र जंगलात आणि डोंगरात राहण्याचा तो काळ कसा होता हे खूप छान त्यात वाचायला मिळतं.

हे पुस्तक म्हणजे लेखकाचे व त्याच्या लाडक्या कबूतराचे अनुभवच आहेत! साधारण १९१४- १९२० ह्या काळातले हे अनुभव लेखकाने नंतर पुस्तकातून मांडले. हे वाचताना माझं लहानपण आठवलं! 'कबूतर जा जा जा' च्या काळातला माझा बालहट्टही आठवला! त्या काळच्या कलकत्यामध्ये घरोघरी कबूतरं पाळलेली असायची, त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं, त्यांच्याही स्पर्धा व्हायच्या हे सगळं कळत जातं तेव्हा आश्चर्य वाटतं. अंड नेमकं कोणत्या क्षणी हलकीशी चोच मारून उघडायचं हे कबूतराच्या पिलाच्या आईला कसं कळतं, एक एक काडी आणून कबूतर कसे घरटे बांधतात, कसे शेकडो किलोमीटर दूर उडत जाऊ शकतात हे सर्वच खूप विलक्षण आहे. कबूतराचं दिशा- ज्ञान (नेव्हिगेशन) तपासण्यासाठी लेखक व त्याचे मित्र कबूतराला घेऊन दार्जीलिंग- सिक्कीम भागात जातात. तिथे कबूतरावर गरूडाने केलेला हल्ला, त्यापासून गे- नेक कबूतराने केलेलं स्वत:चं संरक्षण, जंगलात राहून लेखकाने त्याचा केलेला शोध असे सगळेच प्रसंग विलक्षण थरारक आहेत.

हल्ल्यानंतर अतिशय घाबरलेलं दुखापतग्रस्त कबूतर एका लामांच्या गोंपामध्ये आश्रय घेतं. तिथे कबूतरावरून हात फिरवणारे लामा लेखकाला सांगतात, “आता हे कबूतर परत कधीही घाबरणार नाही. वीस वर्षांहून अधिक काळ रोज चार तास ध्यान करणार्‍या व्यक्तीच्या स्पर्शातून त्याची सगळी भिती कायमची निघून गेली आहे.” सगळ्या पुस्तकामधलं वर्णन चित्रदर्शी आहे. जनावरांचा मोठा समूह येण्यापूर्वीच जमिनीला कान लावून सावध होणारा माणूस, पक्ष्यांच्या व पशुंच्या क्षमता, निसर्गातले अनेक रहस्य असे अनेक प्रसंग ह्यामध्ये सुंदर आलेले आहेत. लेखक अमेरिकेमध्ये शिकल्यामुळे आणि १०० वर्षं जुनं असल्यामुळे इंग्लिश काही वेळेस कठीण वाटतं. पण तरी खूप चित्रदर्शी वर्णन असल्यामुळे पुस्तकाचा आनंद घेता येतो. नावंही माहित नसलेल्या वेगवेगळ्या पक्ष्यांचं व प्राण्यांचं सूक्ष्म वर्णन लेखकाने केलं आहे. पुढे लेखक कबूतराला अजून कसं एक एक शिकवतो त्याचं वर्णन आहे. कबूतर हरवलं असतानाचं वर्णन कबुतराच्या मनोगतामधून आलं आहे!

१९१४ मध्ये युरोपामध्ये युद्ध सुरू होतं. तेव्हा लेखकाचं वय लहान असल्यामुळे तो जाऊ शकत नाही. पण त्याच्या एका जंगलात वाढलेल्या अनुभवी मित्रासोबत त्याच्या कबूतराला ब्रिटीश 'पिजन फोर्स' मध्ये सहभागी केलं जातं. फ्रान्समध्ये युद्ध आघाडीजवळ कबूतर आणि लेखकाचा मित्र जातात. लेखकाचा मित्र मुख्य ठाण्यावर थांबतो आणि कबूतरं शत्रूच्या सैन्यालगतच्या आघाडीवर जातात. तिथे गेल्यावर सैनिक त्यांच्या पायाला नकाशा व शत्रू सैन्याची माहिती सांगणारी चिठ्ठी देऊन हवेत उडवतात. कबूतराच्या नजरेतून आग ओकणारे गरूड व भुंकणार्‍या तोफांसारख्या शत्रूंना चुकवत ते त्याच्या मालकाकडे पोहचतं. युद्धाच्या पुढच्या टप्प्यावर लेखकाचा मित्र स्वत: कबूतराला घेऊन शत्रूच्या आघाडीजवळ येतो. शत्रूच्या ताब्यात असलेल्या डोंगराळ भागात शिरतो. तेव्हाचा एक प्रसंगही सुंदर आहे. कबूतरासोबत तो जात असताना अचानक एक रानटी कुत्रा त्याच्या समोर येतो. आणि हा माणूस अजिबातच कसा घाबरला नाही म्हणून तो कुत्रा थबकतो. आणि मग त्या माणसाने हात पुढे केल्यावर त्याचा हात चाटायला लागतो.

लेखकाने इथे लिहीलंय, आपल्या मनात आलेली भिती दुसर्‍याला जाणवते, विशेषत: प्राण्यांना आपल्या भितीचा गंध व भाव जाणवतो आणि तेही घाबरतात आणि म्हणूनच आक्रमक होतात. पण एखादा कोणी अजिबातच न घाबरणारा असेल तर प्राणीही घाबरत नाहीत व मित्र होतात. हे वाचताना एका पुस्तकात वाचलेला एक प्रसंग डोळ्यांपुढे उभा राहिला. वनामध्ये ध्यान करणारा भिक्षु नागार्जुन आणि त्याच्या सभोवती स्तब्ध उभे असलेले कित्येक लांडगे! त्याच्या मनामध्ये भितीचा लवलेशही नसल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्यास असमर्थ असलेले लांडगे!

युद्धामध्ये माहिती नेण्यासाठी कबूतर हे किती विलक्षण माध्यम होतं हे कळतं. (अगदी आजही ओदिशा पोलिस दलामध्ये दुर्गम भागामध्ये कबूतरच संदेश पोहचवतात!) लेखकाचा मित्र व ते कबूतर युद्धामुळे दु:खी व निराश होतात. तेव्हा पुन: पूर्ववत होण्यासाठी ते निसर्गाच्या सान्निध्याचा आसरा घेतात व बरे होतात. असं हे पुस्तक असं खूप थरारक आणि रंजक आहे. त्याबरोबर इतके पशु- पक्षी, निसर्गातील छोटे घटक ह्यांच्यामध्ये किती मोठी रहस्यं दडलेली आहेत, त्यांच्याही जीवनामध्ये किती गहनता आहे हे समोर येत जातं. आपण तर वाचावंच, पण आजच्या इंग्रजीच जास्त वाचणार्‍या मुलांना आवर्जून भेट द्यावं असं हे पुस्तक आहे. आपल्याला दिसतो आणि कळतो त्याहून निसर्ग किती सखोल आणि अर्थपूर्ण आहे ह्याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. पुस्तक नॅशनल बूक ट्रस्टच्या वेबसाईटवर इंग्रजीत उपलब्ध आहे.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! लेख जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर परिचय.

माणूस अजिबातच कसा घाबरला नाही म्हणून तो कुत्रा थबकतो. आणि मग त्या माणसाने हात पुढे केल्यावर त्याचा हात चाटायला लागतो..... नवल आहे.

तरीही कबूतर अजिबात आवडत नाही.अर्थात तो या लेखाचा भाग नाही.

परिचय आवडला.

< आपल्या मनात आलेली भिती दुसर्‍याला जाणवते, विशेषत: प्राण्यांना आपल्या भितीचा गंध व भाव जाणवतो आणि तेही घाबरतात आणि म्हणूनच आक्रमक होतात.> हे अनुभवलं आहे.

सुंदर परिचय.

लेखकाची माहिती बघितली तर

Dhan Gopal Mukerji was born in India in 1890 and came to America when he was 19. He spent the rest of his life writing and lecturing.

१९१० साली अमेरिकेत आले मुकर्जी साहेब!!

मार्गी : एका सुंदर पुस्तकाची खूप छान ओळख करून दिलीत. धन्यवाद.
Srd : पुस्तकाच्या दुव्याबद्दल आभार. वाचते आहे.

आरकाईववर पीडीएफच्या दोन लिंक्स आहेत. 6.6mb and 12mb size. मुखपृष्ठावर तीन चार वेगळी चित्रे असलेली पुस्तकंही आहेत.
कबुतरं आणि पारवे यात फरक असावा. मुंबईत चौकांत चणे खाणारी आणि आपल्या बाल्कनीत येऊन घूंघूं आवाज करत त्रास देणारी जात पारवे असावी. एकदा आमच्या खिडकीत एक पांढरे कबुतरं येऊन बसले. (शांततेचे प्रतिक दाखवतात तसे )ते गप्प बसायचे. हातातून चणाडाळ खायचे. आवाज वगैरे काही करायचे नाही. असे तीन चार महिने येत होते. एकदा एक वसईचे पाहुणे आले होते त्यांच्याबरोबर तिकडे पाठवले. आठ दिवस ठेवून सोडा सांगितले. तसे त्यांनी सोडले पण इकडे आले नाही.
Homing pigeon म्हणतात निरोप घेऊन येणारे ते मात्र पारवेच असतात. वाटेत ससाणे हल्ला करतात पण त्यांना शिताफीने चुकवून उडत मूळ जागी येतात .

My dog is trained by nature to hunt and kill small birds mostly kabutar in Mumbai. Daschund is dasch small bird hound hunter. She is old now but still does from time to time.

ते Dachshund आहे. जर्मनोच्चार डाक्सहुंड.
Dachs (हे dach चे अनेकवचन नव्हे, dach म्हणजे छत) म्हणजे badger, हा बिळात रहाणारा प्राणी आहे.
Hund म्हणजे कुत्रा, त्याचा अर्थ to hunt / hunter असा बहुकेत नाहीय, नक्की माहीत नाही.

Dachshund चा वापर त्यांची शिकार करण्यास होत असे.

पुस्तक वाचून संपवले. मजेदार आहे. काही प्रसंग ते कबुतरं स्वतः सांगत आहे असे आहेत. बौद्ध मठातले लामा संदेश देतात, भीती सोडण्याचा उपदेश देतात. इतर पक्ष्यांचीही वर्णने आहेत. शेवटी गोव्याचे प्रकरण घुसडल्यासारखे वाटले. ठीक आहे. कबुतराला चरित्र नायक बनवणारे हे पुस्तक वेगळे आहे.

धन्यवाद मंडळी!

@ srd जी, मीसुद्धा पीडीएफ शोधलं होतं. काही पानं वाचून पुस्तक बघितलं कसं आहे. आणि मग घेतलं. हातातलं पुस्तकच वाचायला व मुलांनाही द्यायला सोयीचं. तुमचं वाचून झालंसुद्धा! Happy तुम्ही सांगितलेला प्रसंग भारी आहे!

@ भरत जी- अच्छा!

@ अश्विनीमामी जी- ओह! निसर्गाचे संस्कार ते!

सर्वांना धन्यवाद.