25 जानेवारी 2021
कोल्हापूरच्या दक्षिणेकडील कर्नाटकच्या बेळगाव सरहद्दीला असणारा आजरा, गारगोटी, चंदगड, गडहिंग्लज हा तालुक्यांचा पट्टा फार वेगळा आहे. म्हणजे इथली अजूनही टिकून राहिलेली वनसंपदा, तिथले सह्याद्रीचे कमी-अधिक उंचीचे पठारे डोंगर भाग आणि तुलनेने थंड आणि अल्हाददायी हवा.
अशा गावी मी सांगलीतून ए एच - 47 पार करत पुढे छोटी मोठी घाटी, गावे व दोनदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ओलांडत पोहोचलो. संध्याकाळी उत्तूर गावातील एका महादेव मंदिराचा माग गुगल मॅप व स्थानिक गावकऱ्यांना विचारत शोधून काढला.
मंदिर व तळे
मूळ गावाच्या बाहेर हे मंदिर व शेजारी दगडी बांधीव कट्ट्याने सुशोभित केलेले हे तळे खूप सुंदर दिसत होते. संध्याकाळची वेळ. सूर्य नुकताच कललेला. डोईवर चंद्राचा शीतल प्रकाश. काठावरची झाडे आपले प्रतिबिंब पाण्यात पाहत उभारलेली. मावळतीच्या लाल रंग या निळ्या आकाशीच्या प्रतिबिंबात मिसळू पाहणारा.
ज्या कारणासाठी मी हे वर्णन लिहायला बसलो आहे, त्याबद्दल आता लिहितो. महादेवाचा मंदिर कळस त्रिकोणी आकाराचा, आयताकृती पायऱ्या निमुळता होत जाणारा. दोन्ही बाजूंनी हेमाडपंथी शैलीतील चौकोनी खांब. पाठीमागे तीन-चार दगडी शिळातील ग्राम देवांच्या मूर्ती पडलेल्या. पुढच्या सपाट अंगणात नुकताच लाल पेव्हरब्लॉक टाकलेला. उजवीकडे अंगण संपताच हडकुळ्या फांद्या पारंब्या पेलत उभा असलेलं वडाचं झाड. त्याला सभोवार मापांच्या जांभ्या दगडी विटांनी घेरलेलं. वर चढून पारावर जाण्यासाठी दोन तीन पायऱ्या.
तिथून समोर पाहतो तर तळ्याच्या तोंडावर 10-20 माणसे पाणी शेंदण्यासाठी पाण्याची सोय असलेली दगडी बसकण बांधलेली. या आयताकृती दगडावर मध्यभागी तीन रहाटे अजूनही सुस्थितीत होती, लोकल बोर्डाने कधीकाळी त्याची डागडुजी केल्याची कोनशिला दिमाखाने मिरवत असलेली. चहूबाजूंनी असमान बांधीव पड बांधीव काठाचं तळ. लोक वापरण्यासाठी, गाईगुरांना पिण्यासाठी एखादा घडा भरून येत होते. संध्याकाळी चंद्र उगवताच त्याचं चांदणं या सर्व गोष्टींवर पडून वातावरणाला एक गूढ पण ऐतिहासिक महत्त्व मिळाल्यासारखं वाटत होतं.
टीप_फोटोज मुद्दाम दिले नाहीत, ज्यामुळे प्रत्येक वाचक आपल्या मनात त्या ठिकाण, वेळ, जागेचं रेखाचित्र आपल्या मनी रेखाटू शकेल.