नेहमीच्या शांत स्तब्ध एच-३ (होलोग्राफिक हुमनॉईड हब) च्या परिसरात आज बरीच वर्दळ दिसते आहे. एखाद्या म्युझिअमसारख्या दिसणाऱ्या एच-३ च्या मुख्य इमारतीमध्ये पंचवीस आद्य ह्युमनॉईड्स होलोग्राफिक स्वरूपात, त्यांच्या मूळ मानवी अवतारामध्ये, जतन करून ठेवलेले आहेत. प्राचीन काळचे तंत्रज्ञान वापरले असल्यामुळे तेथील हवेचे तापमान, बाष्पाचे प्रमाण, ऑक्सिजन कन्टेन्ट इत्यादींवर काटेकोर नियंत्रण ठेवावे लागते. आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये, ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिल (GAC) हीच एक विश्वव्यापी अधिकार असलेली संस्था. तिचे प्रमुख, आजच्या संपूर्ण जगाचे सर्वेसर्वा, प्रत्यक्ष एच-आर-१०२४, आज इथे भेट देणार आहेत. ते सर्व आद्य ह्युमनॉईड्स बरोबर भेटणार आणि चर्चा करणार अशी एक बातमी आहे. अशी समोरासमोर भेट घेण्याची पद्धत खरं म्हणजे फार जुनीपुराणी आणि सर्वथैव अनावश्यक! पण सध्याच्या सामाजिक खळबळीचे गांभीर्य दाखवून देण्यासाठी; ही समस्या किती महत्वाची आहे हे GAC ने ध्यानात घेतलं आहे, हे अधोरेखित करण्यासाठी; ऑप्टिक्स म्हणून, ही भेट आयोजित केली असावी. ह्या कम्युनिकेशन्स ड्राईव्हचाच एक भाग म्हणून आद्य ह्युमनॉईड्सची सर्वसामान्य जनतेला नव्याने ओळख करून देण्यासाठी मुद्दाम एक कार्यक्रम मँडेटरी व्ह्यूइंगमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे.
त्या कार्यक्रमाचंच रेकॉर्डिंग चालू आहे.
'हाय एव्हरीबडी! मी एच-आर-३४५१. आज आपल्यासमोर 'डिअर अँसेस्टर्स' ह्या नवीन व्ही ब्लॉग सिरीजमधला पहिला प्रोग्रॅम सादर करतांना मला खूप आनंद होतो आहे. ह्या सिरीजमध्ये आम्ही आपल्याला घेऊन जाणार आहोत शेकडो वर्षांपूर्वीच्या जगात; आजच्या आपल्या ह्युमनॉईड रोबॉट्स संस्कृतीच्या पार उगमापाशी. आपल्या सर्वांना माहितीच आहे, की सध्या समाजामध्ये, आपल्या आयडेन्टिटीबद्दल, अस्मितेबद्दल फार मोठी खळबळ चालू आहे, मानवजात संपूर्ण अस्तंगत झाल्याला आता तीनशे वर्षे लोटली, तरी अजूनही ह्युमनॉईड ह्या जुनाट, ह्यूमन्सशी - मानवाशी - धागा जोडणाऱ्या नावालाच कित्येकांचा विरोध आहे. नामशेष झालेल्या एका ऐतिहासिक जमातीबरोबर आपण स्वतःला का जखडून ठेवायचं हा प्रश्न विचारला जातो आहे. मुळात ही जमात ऐतिहासिक होती, का केवळ दंतकथा असे प्रश्न विचारले जात आहेत. आपण ज्यांना आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ मानतो त्या, ह्या एच-३ वास्तूमध्ये जतन करून ठेवलेल्या, एच-आर-सीजचं - ह्युमन रोबॉटिक क्लोन्सचं - एवढं काय मोठं महत्व आहे, अशासारखे प्रश्न कित्येकांच्या मनात आहेत. आज केवढीतरी जास्त प्रगत मॉडेल्स उपलब्ध असतांना हे पुराणकाळातील क्लोन्स किती कालबाह्य झाले आहेत, काय उपयोग आहे त्यांना जपून ठेवण्याचा, त्यांना रिसायकल किंवा री-इंजिनिअर का करू नये हे काहींना कोडं आहे. ह्या पार्श्वभूमीवर, आपल्या पूर्वजांची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून घ्यावी, आपल्या प्रश्नांविषयी त्यांचे विचार आजमावून बघावेत म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्यासाठी, त्या युगातील एका अतिशय महत्वाच्या व्यक्तिमत्वाशी आज आपण चर्चा करणार आहोत; हो, मी उल्लेख करत आहे तो 'फर्स्ट ह्युमनॉईड' हा आदरार्थी किताब मिळवलेल्या मदाम एच-आर-सी-००१ ह्यांचा!’
* * * * *
क्रमशः
Interesting! उत्सुकता वाढत
Interesting! उत्सुकता वाढत आहे. येऊ द्यात पुढचे भाग पटापट!
Wow
Wow
विषय आणि कथावास्तू विलोभनीय!
मस्त हा भाग ही
मस्त हा भाग ही