पुढची लाट - भाग १

Submitted by हौशीलेखक on 12 May, 2024 - 22:17

सानियाला जाणवत होतं, की आता कुठल्याही क्षणी पॅनिक अटॅक सुरु होणार आहे. गाईडने सांगितलं होतं, उद्याच्या आत थिसीसचा विषय फायनलाईझ करायलाच हवा; आजकालच्या दिवसात फंडींग मिळणं सोपं नाहीय! त्यासाठी वेळेत अप्लाय करायलाच हवा. आणि तिचा निर्णय अजून पक्का होत नव्हता. गेले दोन दिवस गाईडने सुचवलेल्या तीनचार आणि तिच्या स्वतःच्या डोक्यातल्या काही कल्पनांचा विचार करकरून डोकं फुटायची पाळी आली होती. कल्पना सगळ्याच छान होत्या. काहींवर तिने थोडंफार काम केलेलंही होतं; गाईड त्यावर खुश होता. पण तिला स्वतःला त्यात काही जान दिसत नव्हती; काही स्पेक्टॅक्युलर वाटत नव्हतं. आणि अशा मिळमिळीत कामातून केवळ एक पी एचडी मिळवायची आणि कुठल्यातरी एआय कंपनीत आर अँड डी मध्ये बोअरिंग नोकरी पदरात पाडायची ह्यात तिला काडीचाही रस नव्हता.

समोरच्या स्क्रीनवर डोळे खिळवून नोट्स पुन्हा एकदा चाळून बघतांना एकदम टेक्स्ट मेसेजच्या 'बिंग' आवाजाने सानिया पार दचकली. बाजूला पडलेला फोन उचलून तिने मेसेज पाहिला. आईचा टेक्स्ट. दोन ओळीचा तो मेसेज वाचण्यापूर्वीच तिला अंदाज होता तो कशाबद्दल असणार. आणि तो अचूक निघाला; आईची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता कुठल्याही दिवशी हे अपेक्षितच होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रश्न खरं तर फक्त 'कधी' एवढाच होता. आई बावन्न वर्षाची होती, म्हणजे हाय रिस्कच, त्यात गेली काही वर्षे घरातल्या घरात राहून वजनही वाढत गेलेलं - तेव्हा प्रॉग्नॉसिस स्पष्ट होता. इतर स्टुडन्ट्सच्या, टीव्ही आणि नेटवरच्या बातम्यातल्या परक्या लोकांच्या ह्या अनुभवाबद्दल तिने कितीही ऐकलं वाचलं असलं तरी प्रत्यक्षात स्वतःच्या नात्यात, सगळ्यात जवळच्या माणसावर ही वेळ आल्याचा धक्का मात्र पार अनपेक्षित होता.

सुन्नपणे सानिया पुतळ्यासारखी स्तब्ध बसून राहिली. श्वासोच्छवासापलीकडे शरीराची तसूभरही हालचाल नसली, तरी मेंदूत मात्र थैमान चालू होतं. दोनच वर्षांपूर्वी बाबा गेले. अगदी असेच. आई आणि ती, दोघीच राहिल्या होत्या एकमेकीला, आणि आता... फोन तर करायलाच हवा.

बाबांशीही फक्त स्काईपवर बोलता आलं होतं; भेटणं, बघणं शक्यच नव्हतं!

गेली चार वर्ष ती सरकारी आयसोलेशन नियमांनुसार डॉर्मवरच राहत होती. सध्याच्या परिस्थितीत कॉलेजात शिकत असलेल्या मोजक्या मुलामुलींना, टीचिंग आणि संबंधित स्टाफला डॉर्म रूम्समध्ये राहण्याची सक्ती होती. जगभरच्या वाताहातीमधून एक सुशिक्षित पिढी सुरक्षितपणे वाढवण्याचा सरकारचा शेवटचा डेस्परेट प्रयत्न होता तो. ही महामारी सुरु झाल्यापासून पाच वर्षात जगाची लोकसंख्या अर्ध्यावर आली होती; भराभर म्यूटेट होणाऱ्या ह्या व्हायरसविरुद्ध प्रभावी लसही काढणे कठीण होत होते. एकमेकांपासून दूर रहाणे ह्यापलीकडे प्रभावी उपायच नव्हता. एकीकडे अभूतपूर्व अशी बेकारी, त्यातून निर्माण झालेली गरिबी, जीवनावश्यक वस्तूंचे तुटवडे; आणि दुसरीकडे ही अथक आक्रमक प्राणघातक महामारी! ह्या प्रलयकालाच्या वावटळीमधून एक पिंपळपान जगवण्याचा, मानवजातीची ज्योतच विझू न देण्याचा एक प्रयत्न म्हणून सरकारने खास 'गिफ्टेड आणि टॅलेन्टेड' तरुण मुलामुलींना समाजापासून वेगळं काढून सुरक्षित वातावरणामध्ये वाढवायचा, शिक्षण आणि संशोधन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सानिया प्राथमिक शाळेपासून आत्तापर्यंत निर्विवाद ह्या गटात निवडली जात होती. ह्या गटामध्ये मेडिकल सायन्स अभ्यासक्रमांवर जास्त भर असे. अपवाद म्हणून, सानियाला न्यूरॉलॉजीसारख्या सध्याच्या परिस्थितीत थोड्या कमी महत्वाच्या विषयाचा अभ्यास करण्याची सवलत मिळाली होती.

चार वर्षाच्या ह्या सक्तीच्या दुराव्यामध्ये एकापरीने मायलेकी जास्त जवळ आल्या होत्या. सुरुवातीचे फोन कॉल्स आणि टेक्सट्स नुसते 'माहित्येय का, गेल्या आठवड्यात ते हे... ;नाही, ते अजून व्हेंटिलेटरवरच आहेत..., आणि आयसीयू मध्ये; काळजी घे बाई, आणखी काय म्हणणार!' ह्या पद्धतीनेच चालले होते. पण नंतर मात्र ह्याच्या पलीकडे जाऊन, आई-मुलगी ह्याऐवजी दोन मैत्रिणींचं नातं त्यांच्यात निर्माण झालं. आईचे अनुभव, तिचं लहानपण, ह्या महामारीपूर्वीचं साधंसुधं पण सुरक्षित आयुष्य, तिच्या आकांक्षा, सानियाबद्दलची तिची स्वप्नं ... शेकडो गोष्टींवर, त्या दोघी कित्येकदा समोरासमोर एकमेकींशी बोलू शकल्या नसत्या एवढं सगळं त्या इमेल्स, टेक्सट्स आणि थोड्याफार फोन संभाषणांमधून व्यक्त करू शकल्या. एरवी तिच्या दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकात प्रत्यक्ष फोन कॉल तसे कठीणच असले तरी आता मात्र फोन करायलाच हवा.
आईला तिचा व्हिडीओ कॉल अपेक्षितच असावा. अँब्युलन्समधून बोलत असूनही ती नेहमीप्रमाणे शांतच होती. धाप लागते आहे हे दिसतच होतं; निदान बोलू तरी शकत होती. तिने शेवटच्या टेस्ट्सचे रिझल्ट्स सांगितले, प्रॉग्नॉसिस सांगितला आणि मग खंबीरपणे संभाषण मृत्यूपत्र, बँक अकाऊंट्स आणि इतर व्यवहारांकडे वळवलं. स्काईपपेक्षा साध्या फोन कॉल्स आणि टेक्स्ट वरून संभाषण करू हे निक्षून सांगितलं. 'माझ्या खालावलेल्या शारीरिक परिस्थितीत, शंभर ट्यूबा लावलेल्या अवस्थेत तू मला बघायला नको. माझं प्रेम, माझे विचार, माझ्या कल्पना हे सगळं जास्त महत्वाचं आहे माझ्या शरीरापेक्षा. आणि ते तर सगळं माझ्या डोक्यात आहे, माझ्या शब्दांद्वारे, लिखाणातून व्यक्त झालंच आहे; मग मी दिसण्याची काय गरज आहे?' ह्या आईच्या बोलण्यावर ती हबकली; पण हे सगळं आईच्या मनाप्रमाणेच होणार, हे ओळखून गप्प झाली. जड अंतःकरणाने पुन्हापुन्हा आईला डोळ्यात भरून घेत, तिने शेवटी फोन ठेवला तेव्हा मात्र तिचे विचार दुसरीकडेच होते.

तिला पीएचडीचा विषय सापडला होता. गाईडला धक्का बसेल; त्याला आवडणारही नाही कदाचित, तो साशंक असेल असल्या विषयाबद्दल.
पण तिला खात्री होती हा अतिशय महत्वाचा विषय आहे... आणि हो, स्पेक्टॅक्युलर सुद्धा!

* * * * *
क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults