हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उप-शास्त्रीय संगीतातील भावलेली ध्वनिचित्रे

Submitted by अमितव on 7 May, 2024 - 13:25

सध्या ऐकत असलेला एखाद्या गाण्याचा, मैफिलीचा, रागाचा दृक्श्राव्य दुवा, त्यातलं तुम्हाला आवडलेलं सौन्दर्यस्थळ, नवे गायक/गायिका यांचे दुवे. त्यातलं तुम्हाला काय आवडलं किंवा आवडलं नाही, याची देवाणघेवाण/ चर्चा करायला धागा.

दुवे नसतील तर तुम्हाला प्रत्यक्ष बघितलेल्या कार्यक्रमांचे शब्दचित्र काढायला ही हरकत नाही.

धागा हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतापुरता मर्यादित ठेवू, आणि फक्त दुव्यांची देवाण घेवाण करण्याऐवजी थोडे तुमचं विचार ही लिहिता आले तर आपल्याला न जाणवलेल्या/ समजलेल्या गोष्टी नव्याने समजुन ते गाणं परत ऐकताना आणखी वेगळे आयाम मिळत रहातात.

उपशास्त्रीय मध्ये बुजुर्ग लोक ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती, टप्पा, नाट्य संगीत इ. म्हणतात. आपण कव्वाली, गझल, रागाधारित सिनेसंगीत ही घ्यायला ही हरकत नाही. अशी रेघ काढणं कठिण आहे. डोक्यात रुंजी घालणारं हिदुस्थानी राग पद्धतीवर आधारित आणि शक्यतो सोलो परफॉर्मन्स म्हणजे चित्रपटातील चित्रित/ किंवा प्रसिद्ध गीतापेक्षा त्या गीतावर केलेला नवा प्रयत्न चांगला वाईट कसाही असेल... त्याची देवाणघेवाण करण्यासाठी धागा असं डोक्यात होतं.
आपल्याला आवडलेलं दुसर्‍यांबरोबर शेअर करुन आपला आनंद द्विगुणित करायचा. आपल्या शिकण्यात दुसर्‍यांना सहभागी करुन घ्यायचं झालं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात करतो.
'लालवाला जोबन' म्हटलं की मालिनीताई राजुरकरांचा चष्मा आणि ठसठशीत कुंकू लावलेला चेहरा, साडी नेसून मांडी घालून किंवा वयोपरत्वे स्टेजवर पाय सोडून म्हटलेला भैरवीतला टप्पा आणि तो संपून आपण एकदा दीर्घ श्वास घेतोय न घेतोय ... हो आपणच, कारण त्या कधी श्वास घेतात, आता घ्यायच्या म्हटलं पाहिजे खरंतर, हे कोडच होतं!... तोवर 'तदानि तानि तोम तन तनत देरेना' या टप्प्यापेक्षाही जलद लयीतला तीनतालातील तराणा सुरू झाला की अंगावर शहारे आणि चेहेर्‍यावर, त्या सरसर चढणार्‍या ताना आणि त्या मृदंगाच्या एकेक बोलावर अत्यंत जलद लयीत गिरक्या घेत चाललेले खेळ हे केवळ आपल्यासाठीच चाललेलं आहेत हा विचार, एका अर्थी त्या गदारोळातच शांत मंद स्मित आल्याशिवाय रहाणेच अशक्य.

आत्ता शाश्वती मंडल यांचा हाच भैरवीतला टप्पा आणि तराणा ऐकला. टप्पा चालू व्हायच्या आधी फार सुरेख आलापी विस्तार केलाय. व्यवस्थित घोटलेला (पॉलिश्ड) आणि परफेक्शनच्या जवळपासचा पीस आहे. पण रॉनेस थोडा मिसिंग आहे. टप्पा छानच गायलाय. तराणा मला तरी सुराला काही ठिकाणी हललेला वाटला. पण एकुण सादरीकरण आवडलं,

सौरंगजेब असल्याने इथे वाचनमात्र असेन.
डोक्यात शिरले नाही तर अडाणी प्रश्न विचारले तर चालेल ना?

@अमितव >>> मला शास्त्रीय व उपशास्त्रीय प्रकारचा गंध नाही. उपशास्त्रीय संगीतामध्ये कोणते प्रकार मोडतील? वेळोवेळी काही क्लासिकल सिंगर्सची गाणी आवडली आहेत. यात बरीचशी शब्दप्रधान गायकीच आहे. त्यामुळे लिहावे की नाही या संभ्रमात आहे.

माझेमन, उपशास्त्रीय मध्ये बुजुर्ग लोक ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती, टप्पा, नाट्य संगीत इ. म्हणतात. आपण कव्वाली, गझल, रागाधारित सिनेसंगीत ही घ्यायला ही हरकत नाही. अशी रेघ काढणं कठिण आहे. डोक्यात रुंजी घालणारं हिदुस्थानी राग पद्धतीवर आधारित आणि शक्यतो सोलो परफॉर्मन्स म्हणजे चित्रपटातील चित्रित/ किंवा प्रसिद्ध गीतापेक्षा त्या गीतावर केलेला नवा प्रयत्न चांगला वाईट कसाही असेल... त्याची देवाणघेवाण करण्यासाठी धागा असं डोक्यात होतं.
रघु, स्वाती, बस्स क्या! आपल्याला आवडलेलं दुसर्‍यांबरोबर शेअर करुन आपला आनंद द्विगुणित करायचा. अज्ञान आणि अडाणीपणा कसला आलाय! Happy आपल्या शिकण्यात दुसर्‍यांना सहभागी करुन घ्यायचं झालं.
हे वरती पण टाकतो.

@अमितव >>> थँक्स. आता मी याची व्याख्या हळूच वाढवून त्यात अभंग पण ऍड करते आणि सुरूवात किशोरीताईंच्या 'बोलावा विठ्ठल'ने करते. मला शास्त्रीय परिभाषेत सांगता येणार नाही पण किशोरीताईंच्या सोन्याच्या कांबीसारखा आवाज आणि त्यांनी घेतलेल्या ताना व अर्थातच स्वरातले भाव मला नेहमी आकर्षित करतात.

दुसरा अभंग मंजुषा पाटील यांचा 'अबीर गुलाल उधळीत रंग'. मंजुषा यांचा आवाज मला पहाडी खुला वाटतो, ताना जोरकस असतात आणि त्या गाताना एन्जॉय करतात असे वाटते. अजित कडकडे यांच्याही आवाजात आवडते.

पंडित संजीव चिम्मलगी यांची बिलासखानी तोडीमधील 'जागत तोरे कारन' ही बंदिश (हे इतरांनी यूट्यूबवर कमेण्टमध्ये लिहिले आहे म्हणून) मी ही पहिल्यांदा 'आई शप्पथ' या मराठी पिक्चरमध्ये ऐकली. पिक्चरमध्ये ही अतिद्रुत आहे. त्यातली सरगम आणि पखवाज अप्रतिम आहे.

अमित, मला तुझा हेवा वाटतो. तुला शास्त्रीय संगीताचा आनंद घेता येतोच आणि त्याचे (तुझ्या शब्दात) "शब्द्चित्र" ही काढता येते. माझं म्हणजे असं आहे की काही काही वेळा कानावर पडतेय ते काहीतरी भारी आहे हे जाणवतं पण कान कधी तयार झालेला नाही की त्यातली काही माहिती सुद्धा नाही! इथे वाचत राहीन आणि दिलेल्या लिन्का ऐकेन नक्कीच.

MazeMan
हो सके तो लिंक भी देना.
maitreyi.
Same here. आणि शब्द नसतील तर आपल्याला भाव समजत नाही. "शास्त्रीय संगीत" ते सगळे पुढच्या जन्मासाठी ठेवले आहे.

मला तुझा हेवा वाटतो. तुला शास्त्रीय संगीताचा आनंद घेता येतोच आणि त्याचे (तुझ्या शब्दात) "शब्द्चित्र" ही काढता येते >> +१

अरे! बोलावा विठ्ठल किशोरीताईंचं फार्फार आवडतं.
जितेंद्र अभिषेकींची चाल ही छानच आहे. पण मला किशोरीताईंची ऐकल्यावर त्यांनी जो शब्दांना न्याय दिला आहे, त्याने डोळे दिपून जातात.

सुरुवातीला बोलावा विठ्ठल म्हणताना 'बोलावा' शब्द साधा सरळ एका खालच्या स्वराचा टच घेऊन येतो. पहावा विठ्ठल मध्ये 'पहावा' खालून वरती चढत जातो जणू आपण ती सावळी मूर्ती विटेवरील चरणापासून चालू करुन मुखकमला पर्यंत सरकन पहात आहेत. मग लगेच 'करावा' वर न जाता आधी विविध प्रकारे बोलावा म्हणजे नक्की कसा बोलावा तर एका 'बोलावा' च्या व्हरायटीला तुम्ही बोलावा असं ऐकू येतं, मग आपण सगळ्यांनी बोलावा असं वाटतं. 'पहावा' ची व्हरायटी मात्र शांत आहे जणू पहाताना चित्त शांतच झालं आहे. पुढचं 'करावा' मात्र करारी आवाजात आणि सुरातही ऐकू येतं. विठ्ठल 'करणे' काही फारसं सोपं नसणारच. करावा ची पहिली काही व्हर्जन ही ट्राय करावा आणि करत रहावा अशी त्या वरच्या स्वरावरच राहुन आजुबाजुला थोडी वळणे घेत, वेगवेगळ्या स्वरांना स्पर्ष करत, पण परत त्या वरच्या स्वरालाच संपणारी आहेत, शेवटच्या करावा मध्ये मात्र भावात एक अजिजी आहे, करायचा आहे पण तुझ्या सहाय्याविना तो होत नाहीये अशी.

पुढे 'येणे सोसे मन' 'परत माघारीला' येत नाही म्हणजे नक्की काय हे त्या मराठी शब्दांचा अर्थ समजला नाही तरी फक्त स्वरांतुनही कदाचित अमराठी रसिकाला समजेल, त्यातली आर्तता जाणवेल असं राहुन राहुन वाटतं. तीच 'देता आली मिठी सावकाश' मधल्या 'सावकाश' ची कहाणी.
फार छान गाणं आज परत ऐकलं.

मैत्रेयी+१
छान धागा. कुणी गाणं किमान ऐकायचा कान तयार करण्याइतपत ऑनलाईन शिकवते का, तशी काही माहिती आहे का कुणाला?

अरे! कान वगैरे जरा जास्त झालं. पण धन्यवाद!
अस्मिता, म्युझिक अप्रिसिएशनचे कोर्स नक्की असतील. वीणा सहस्त्रबुद्धे पूर्वी आयआयटी, बाँम्बे मध्ये असा एक कोर्स घेत. त्याची रेकॉर्डिंग माझ्या जवळ होती. जुनी डार्ड ड्राईव्ह शोधून सापडतात का बघतो. ऑनलाईनही मिळावित.
त्यात अगदी स्वर, ताल राग, आलाप, थाट, वेगवेगळे गान प्रकार, राग विस्तार.. इ. माहिती सहज सोप्या प्रकारे इंग्रजीत काही प्रात्यक्षिकांसह आणि एक विदुषीने केलेली असं सगळं होतं.
अपडेट: इथे नमुने देऊन सीडी केली आहे दिसते आहे. https://www.cse.iitb.ac.in/~hvs/Veena/Language.html पण सीडीचे पान उघडलं नाही माझ्याकडे.

अस्मिता,
पं. संजीव अभ्यंकर , धनश्री देशपांडे, कौशिकी चक्रवर्ती, गोपाल म्युझिक क्लासेस (इंग्रजी अक्षरे), सिद्धांत पृथी, व्हॉक्स गुरू, स्वर स्वामी (पं संजय पत्की), डी जी क्रिएशन्स आणि अन्य काही युट्यूब चॅनेल्स पैकी काही उपयोगाचे वाटते का ते पहा.

https://artiumacademy.com/ हा पेड चॅनेल आहे. शुभा मुदगल यांच्यासारखे गुरू इथे क्लासेस घेतात.
( जडबुद्धी असल्याने कुणी कितीही सांगितले तरी समजत नाही. )

https://www.youtube.com/watch?v=q0MCGjlJSag
प्रिये पहा गायक :छोटा गंधर्व नाटक :सौभद्र PRIYE PAHA
https://www.youtube.com/watch?v=Dagd3pgt-r4
घनश्याम सुंदरा श्रीधरा | पहाटेची भक्ति गीते |अमर भूपाळी |
उठी उठी गोपाला l
https://www.youtube.com/watch?v=RPLYMCM1Xl4
वाटे भल्या पहाटे यावे | Vate Bhalya Pahate | Halakech jagvawe
आमच्या इकडे उजाडत आहे तवा ऐकली.
हा काय भूपाळी राग आहे काय? असा राग असतो का ? माहित नाही.

अरे बेष्ट धागा काढलास अमित. इथे आलेले सजेशन्स ऐकायला आवडतील. माझेमन यांनी सुचवलेली जागत तोरे कारण - ही मी पण चित्रपटातच ऐकली होती आणि आवडली होती, पण पंडित संजीव चिम्मलगी यांच्या दुव्याबद्दल तुम्हाला अनेक दुवा देईन! Happy आता ती ऐकून बघतो.

'त्यावरून आठवलं' यादीत बयो नावाच्या चित्रपटात शास्त्रीय संगीत खूप छान आहे. त्यात ही 'मोही तोही लागी' चीझ ऐका. त्याच चित्रपटात मिलिंद शिंदे फणस काढून आणताना सहज म्हणून 'लंगर ढेड मगमग रोगत रे' (शब्द चुकीचे असू शकतील माझे) गात बिहाग गुणगुणतो - ते तर एकदम 'दिल को छू लिया' टाईप आहे.

अमितव आभार.
काल रात्री ती वीणा सहस्रबुद्धे यांची CD ऐकली. थोSSडं थोSSडं समजतंय. त्यामुळे हपा नी दुसऱ्या धाग्यावर केलेली यमन वरची टिप्पणी समजली.
अजून काही मुलभूत प्रश्न आहेत पण ते नंतर धागा धगधगू लागल्यावर. लोकं हळू हळू मैफिलीत येत आहेत.

मैत्रेयी+१. Sad कान नाही आणि या जन्मात तयार होणारही नाही ... अमुक जागा , हा राग वगैरे वर्णन वाचताना फिजिक्स वगैरेच्या प्रबंधाइतकं अगम्य वाटतं .. खूप लहानपणी पेटी शिकायचा प्रयत्न केला होता , त्यात पुलंच्या गजा खोताएवढंच स्किल होतं . कुणीतरी आणलेलं रागांवरचं एक छोटंसं जुनं पुस्तक आहे घरात , ते एकदा उघडून बघितल्यावर ज्यांना पेटी तबला , कुठलंही एखादं वाद्य वाजवता येतं त्यांच्याबद्दल अपार आदर वाढला ... फिजिक्स प्रबंधाइतकीच अगम्य क्लिष्ट भाषा ...

आणि ज्यांना ते समजतं त्यांच्याबद्दलही , आदर आणि थोडुशी जेलसी ..
पण म्युजिक ऐकायला आवडतं , ही एक देवाची कृपा Happy

मस्त धागा आहे, माझे २ आणे

भीमसेन जोशी मिया मल्हार द्रुत चीज https://www.youtube.com/watch?v=RqwE6K8Dy-g
राघवेंद्र जोशींच्या ( भीमसेनांचे चिरंजीव) गाणाऱ्याचे पोर या पुस्तकामध्ये उल्लेख आहे की त्यांची आई ( म्हणजे भीमसेनांची पहिली बायको) म्हणायची की माझ्या नवऱ्याचे गाताना वाटीभर रक्त आटते तेव्हा हे सगळे ऐश्वर्य मिळते वगैरे. हा मिया मल्हार ऐकताना मला बिनचूकपणे हा संदर्भ आठवतो, एकूण खरंच वाटीभर रक्त आटल्याशिवाय असे गाणे होणे नाही असेच वाटते. चीजेच्या शब्दांकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होते, महंमद शाह रंगीले काहीतरी करतो वगैरे चीज आहे. भरून आलेले आभाळ, काळोखी शांतता, वीज , ढगांचा प्रचंड गडगडाट आणि एकदम प्रचंड कोसळणारी सर ही सगळी अनुभूती आपण अगदी विरुद्ध वातावरणात असलो तरी मिळते.

भीमसेन जोशी केदार सावन की बूंदनिया https://www.youtube.com/watch?v=qZlgmfJJdjQ
हे ही पावसाचेच गाणे आहे पण श्रावणातल्या रिमझिम पावसाचे. यातल्या ताना मिया मल्हार इतक्या आक्रमक नाहीत, पावसाची भुरभूर चालू होऊन जराशी सर पडावी असे वाटते.
पाऊस पडला पाहिजे असे वाटू लागले की मी क्रमाने ही गाणी लावते, त्याने वातावरणात बदल होतो अशी माझी अंधश्रद्धा आहे.

गणपती भट कलावती सपनो मे आया पियरवा https://www.youtube.com/watch?v=6J5iVCIzXEk
भीमसेनांनंतर एकदम गणपती भट म्हणून विचित्र वाटेल, म्हणजे अगदी आवर्जून थोर्थोर लोकांच्या यादीत त्यांचे नाव असतेच असे नाही. पण प्रत्येकाचे एखादे गाणे - या सम हे असे असते, त्यातली सादगी, सूर जसे लावलेत ते, चीजेची मांडणी, वेगळेपण, ठेहराव, रागाच्या मूडला साजेशी मांडणी यानुसार कधी कधी काही गोष्टी ऑल टाइम फेवरीट होतात, तसे हे आहे. ही सर्वोत्तम कलावती आहे असे मी म्हणणार नाही पण ती अतिशय युनिक आणि मोहक आहे. अति ताना नाहीत, मध्य लयीत आहे. चीजेतील हिंदीचे उच्चारही कदाचित खटकू शकतात पण चीजेचे भाव आणि मांडणी अतिशय सुरेख आहे. रागाचा विस्तार शिकायला म्हणून ही चीज चांगली आहे असे मला वाटते.

जाता जाता, भीमसेन जोशी केवळ २५ वर्षांचे असताना कुठेतरी उत्तरेत ( कदाचित पंजाब) मुलतानी आणि पूरिया धनश्री गायलेल्याचं रेकॉर्डिंग - ज्याला 'दंगल का गाना' असं म्हटलं होतं, ते कुठून तरी मला मिळालं होतं. २५ वर्षांच्या भीमसेनांचा तरुण आवाज आणि जन्मोजन्मी साधना करून होणार नाही असं ते गाणं आहे. त्यापुढे त्यांनी आयुष्यात काही गायलं नाही तरी पुरे होतं , इतकं जबरदस्त गाणं २५ व्या वर्षी गायलं आहे. गाण्याला दंगल ( मराठीतला) का गाना असं सार्थ नाव आहे. तर कुठेतरी ते रेकॉर्डिंग माझ्याकडून बहुतेक गहाळ झालं आहे. स्वर्गीय गाणे स्वर्गात गेले, मर्त्यलोकात राहण्याचा त्याला अधिकार नाही अशी मी स्वतः:ची समजूत करून घेतली आहे.

केदार आणि मिया-मल्हार रिमझिम ते गडगडाट हे अगदी चपखल वर्णन वाट्टेल ते. (चपखल ते वाट्टेल ते एका वाक्यात! Wink )
अश्विनी भिडे-देशपांड्यांचा 'बतिया दौरावत' मधला 'रितु बरखा' एपिसोड आठवला.
त्यात त्यांनी किंचित वेगळा टेक घेतलाय. 'मेघ मल्हार' आणि 'मिया मल्हार' तुलना करताना मेघ-मल्हार हा पावसाच्या आधीच्या आकाशातील ढगांच्या आक्रमकपणा गडगडाट पण पावसाआधीचा, जास्त आक्रमक. तर मिया-मल्हार बहादुर कठोर पण धीरोदत्त असा.
त्यात गौड - मल्हार, सूर-मल्हार मग कजरी झूला. शोभा गुर्टु, बेगम अख्तर यांचे प्रसिद्ध दादरे. कजरी (सावन की ॠतु आई री सजनिया .. छा रही काली घटा ...) असं त्या काय काय गातात. आणि गुंग व्हायला होतं!
जमेल तेव्हा सावन गाण्यांची प्लेलिस्ट करायची आहे. ही सगळी गाणी युट्युब वर आहेत, पण एकत्र केली पाहिजेत.

धन्यवाद अमित आणि आचार्य. अगदी मनापासून आभार. Happy
नक्की बघेन. आणि इथेही गोगलगायीच्या वेगाने एकलव्य बनून वाचत राहीन.

फार ऊन ऊन होत होते म्हणून 'सावन की बुन्दनिया' लावले आणि पुण्यात पाऊस पडला ना हो... म्हटले जाऊ दे, भीमसेन जोशींना पुणे जास्त आवडत असेल. जोक्स अपार्ट श्रावण सरींचा अनुभव येतो हे ऐकताना.
'सपनों में आया पियरवा' आवडलं.

चारदा ऐकूनही मन भरेना....

इथे बराच खजिना आहे की, ऐकते एक एक.
वीणाताईंची सगळी आयआयटी कानपूरची लेक्चर्स फार सुंदर आहेत.

नारायणा रमारमणा - एक मराठी नाट्यगीत. प्रसाद सावकार, शरद जांभेकर, आनंद भाटे यांनी खूप सुंदर गायलय, इतरही अनेकांनी गायलं असेल.

पण जेंव्हा अरुणा सईराम ते गातात तेंव्हा ते ऐकायला वेगळंच वाटतं. थोडे उच्चार वगळता कर्नाटकी बाज त्यांच्या गायकीत नाहीये पण मृदंगमची साथ त्या गाण्याला वेगळ्याच लेव्हलवर नेते.

एक जबरी फ्युजन पण आहे - मराठी नाट्यगीत, गायलय कर्नाटकी शैलीच्या गायीकेने, सोबतीला हिदुस्तानी शैलीचा सरोद वादक सौमिक दत्ता आणि पाश्चात्य पियानो वादक अल मॅक्स्वीन.

https://www.youtube.com/watch?v=MrqTa5njMP0

अरुणा साईराम यांना गाताना बघणं हीच पर्वणी असते. त्या इतक्या आनंद घेत गातात की आपणही एंजॉय करतो. त्यांचं कलिंगा नर्तन पाहिले नसेल तर नक्की पहा - हो पहाच, ऐकले तर जाईलच.

(धागा हिदुस्तानी संगीताचा आहे. थोडे विषयांतर झाले त्याबद्दल सॉरी)

Oh हे बघायला पाहिजे. त्यांच्या कलिंग नर्तन चा फॅन आहे मी. पण उच्चार नीट नसतील तर माझा उत्साह जातो. मग नकोच बघायला. माझं खूप चांगलं मत आहे त्यांच्याबद्दल, ते तसच राहूदे. Happy

मागे कैवल्य कुमार गुरव यांचं शूरा मी वंदिले ऐकलं होतं. त्यांना मराठी येतं, तरी त्या गाण्याचं त्यांनी जे केलं होतं ते आवडलं नव्हतं.

Pages