भाषणाची हौस

Submitted by रघू आचार्य on 5 May, 2024 - 05:36

भाषण ही कला आहे.

काही जणांकडे उपजत असते. काही ती कमावतात.
काही जणांचे भाषण ऐकायला लोक काम धंदा सोडून धाव घेतात. तर काहींचे भाषण सुरू झाले कि लोक चुळबूळ करू लागतात. टिव्हीवर चालू असेल तर वाहिनी बदलली जाते.

सामान्यांवर सहसा भाषणाची वेळ येत नाही. पण यातल्या काहींना हौस दांडगी असते.
मग संधी मिळाली कि ही हौस भागवून घेतली जाते. घरगुती कार्यक्रम असेल किंवा सध्या निवडणुकीच्या काळात उमेदवाराची चतुराई म्हणून प्रचारफेरीत तिथल्याच एखाद्याला झाडावर चढवून दोन शब्द बोलायला सांगणे असेल, जो वाटच बघत असतो त्याला ती पर्वणीच कि !
अशाच काही भाषणांचे हे किस्से

श्रद्धांजली

ज्या घरात हा कठीण प्रसंग ओढवलेला असतो तिथे वातावरण गंभीर असतं. उघड किंवा सुप्त असे शोकाकुल वातावरण असते. लोक भेटायला येत असल्याने भावनांना आवर घालावा लागतो. घराचा ताबा हा नातेवाईकांकडे गेलेला असतो. मग कुणी तरी श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवतं. परस्पर निरोप जातात. घरच्या मोठ्या व्यक्तीला कल्पना दिली जाते. ऐन वेळी कळते कि भाषणे होणार आहेत. मग जे कुणी गुरूजी असतील त्यांना पाच सहा लोकांची नावे पुकारायचा आग्रह होतो.

एखादा चाळिशीतला तरूण उठतो. हे वय असे असते कि संबंधिताला आपण आता अल्लड वय सोडून पोक्तपणाकडे झुकलो आहोत असे वाटू लागलेले असते. एक जबाबदार नागरीक असल्याने आपले बोलणे, वागणे हे तसे दिसायला हवे असे वाटून गहन विषयावरची मतं मांडायला सुरूवात झालेली असते. काही जण तिशीतच या स्टेजला पोहोचतात. यांच्याकडे पन्नाशीला आलेले मिस्कीलपणे बघत असतात. खरे तर त्यांना आपली दहा वर्षांपूर्वीची अवस्था आठवत असते. पन्नाशीतल्यांना साठी प्लस वाले न हसता आतल्या आत हसत बघत असतात. सत्तरी ओलांडता ओलांडता बदमाषी थोडी मुरलेली असते. न हसता वेड्याचं सोंग घेत फिरकी घ्यायची कला अंगात चांगलीच जिरलेली असते. हा श्रोता वर्ग गंभीरपणे बसलेला असताना संबंधित चाळीस पंचेचाळीशीतले व्यक्तिमत्व उठते.

" व्यासपीठावरचे सर्व प्रतिष्ठीत नागरीक, जमलेले सर्व मान्यवर , आदरणिय गुरूजी आणि स्वर्गवासी श्री............. यांना नमस्कार करून मी माझे दोन शब्द आपल्या समोर ठेवत आहे.
आज आपण तात्यांच्या निधनानिमित्त जमलेलो आहोत. खरे म्हणजे तात्या हे फक्त आमचे मित्र श्री अमूक यांचेच वडील नसून माझेही वडीलच होते. त्यामुळे ते कधी जातील यावर विश्वासच बसत नाही. खरे तर ऐंशी हे वय आजकालच्या आधुनिक जगात जाण्याचे नाहीच. या वयात लोक आपले छंद पूर्ण करतात.

युरोप देशातल्या इस्टोनिया देशातले रिचर्ड यांचंच घ्या. ते ८० व्या वर्षी चित्र काढायला शिकले. रिचर्ड यांचे चरित्र माझ्याच मुद्रणालयात मुद्रित झाले. मी स्वतः जातीने त्याची प्रूफे तपासली. आमचेच एक मित्र रिचर्ड यांचे चरित्र लिहीत आहे. तुम्ही म्हणाल कि आडनाव नाही का रिचर्डला ? तर आमच्या धंद्यात सगळेच उघड करता येत नाही. हे रिचर्ड आमच्या मित्राकडेच चित्रकला शिकले. आमचे हे मित्र सुद्धा आज पैंच्याऐंशी वर्षांचे आहेत. ते मला मित्र म्हणा असे म्हणतात म्हणून मी मित्र मानतो. नाहीतर त्यांना काका म्हणायला पाहीजे एव्हढे संस्कार आहेत. आमचे हे मित्र उत्तम लेखक देखील आहेत. त्यांना मीच रिचर्ड यांच्यावर लिहा असा आग्रह केला. त्यांनाही ते पटले आणि आज माझ्या मुद्रणालयात ते काम पूर्णत्वास गेले आहे (टाळ्यांसाठी पॉज, पण प्रसंग ध्यानात येऊन खजील होते पुढे चालू)..

तात्यांचे सुद्धा वाचन अफाट होते. एव्हढे दांडगे वाचन मी कधीच पाहिले नाही.
ते माझ्याशी तासन तास चर्चा करायचे. ( तात्यांची मुलं चमकून बघतात. हे आपल्याला कसे ठाऊक नाही ?)
त्यांनी चार पुस्तकांचा संकल्प सोडला होता आणि मी त्यांना ती छापून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आज त्यांच्या मुलांनाही माहिती नाही, त्यातली तीन पुस्तके छापून पूर्णत्वास गेली आहेत. त्याचे गठ्ठे गाडीत आहेत. सर्वांची परवानगी असेल तर आजच त्याचे अनावरण होणे समयोचित होईल.

तुम्ही म्हणाल कि काय हा व्यवसाय बघतो !
पण तसे नाही. व्यवसाय करत असताना सामाजिक भान म्हणून तात्यांची ही पुस्तके मी छापली. कारण तात्यांनी आज या ठिकाणी जे सामाजिक भान जपले आहे त्याची मला जाणिव आहे. त्यांनी अनेक लोक जोडण्याचे काम या ठिकाणी केलेले आहे. आज त्यांनी कुटुंब तसेच परीसरातले सौहार्दाचे वातावरण वाढवण्याचे काम केलेले आहे. त्याबद्दल त्यांनी कधीही जाहिरात केली नाही. ना स्वतःच्या कुटुंबात त्यांनी चर्चा केली. त्यांना या गोष्टी फक्त माझ्याजवळच बोलाव्याशा वाटत याचा मला अभिमान वाटतो.

तात्यांकडे मी "महाराष्ट्रातल्या काव्यपरंपरेवरच्या समिक्षेची समीक्षा - एक गंभीर टीका" या ग्रंथावर चर्चा करण्यासाठी येत असे.
तात्यांना समज असलेला श्रोता मिळाल्यावर ते खुलत असत. एरव्ही त्यांच्याकडे असलेली ही विद्वत्ता जवळच्या लोकांना रस नसल्याने अव्यक्त राहिली होती. या चर्चेदरम्यान मी तात्यांना लिबिया या देशातल्या हिशम मातार या पुलित्झर पुरस्काराने गौरवित कवीच्या कवितेचा संदर्भ दिला होता तेव्हां त्यांनी कौतुकाने माझ्या पाठीवर थाप मारली होती.

इतकेच नाही तर भैरप्पांच्या पर्व कादंबरीवरील चर्चेदरम्यान मी ग्रीक कवी होमर च्या इलियडमधला एक उतारा ऐकवला होता. तेव्हांही त्यांनी दोन्ही भिवया उंचावून आश्चर्य व्यक्त करत मला मिठी मारली होती. मला जे तात्या ठाऊक आहेत ते कुणालाच ठाऊक नाहीत. अगदी घरच्यांनाही नाही. कारण त्यांच्या साठी ते एक आधारवड होते. त्याच्या सावलीत घरचे लोक होते. या झाडाच्या सावलीवर, फळांवर, पानांवर त्यांचाच हक्क होता. तो त्यांचा आधार हरपला आहे याचे दु:ख आहेच.

पण माझे त्यांचे नाते याही पलिकडचे होते. कोणतीही अपेक्षा नसलेले आमचे हे नाते होते. त्याची वाच्यता मी कधी माझ्या मित्राकडेही केली नाही. त्यामुळेच तात्यांचे हे रूप फक्त मलाच माहिती आहे या माझ्या म्हणण्यात अजिबात अ तिशयोक्ती नाही. त्यांचे जागतिक काव्यावरचे जे पुस्तक अप्रकाशित आहे ते त्यांची मुलं पुढाकार घेऊन पूर्ण करतीलच याची मला पूर्ण खात्री आहे.

त्यांनी नेहमीच तरूणांना पुढे नेण्याचे काम केलेले आहे. कुणाचा व्यवसाय असेल त्याला मदत करण्याचे काम या ठिकाणी केलेले आहे. माझ्या माहितीतल्या अनेक गरीब वस्तीतल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी न बोलता उचलण्याचे काम या ठिकाणी केलेले आहे.

तात्यांचे जाणे हे फक्त घरच्यांसाठीच नाही तर माझ्यासारख्या कलासक्त रसिकासाठीही नुकसानच आहे. तसेच या असंख्य गरजूंसाठीही नुकसानच आहे. ते मी शब्दात मांडू शकत नाही.

त्यांचे कार्य त्यांची मुलं चालूच ठेवतील ही आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

राजकीय सभा

पक्षाच्या सभेत सर्वात मोठ्या सभेचे भाषण संपलेले असते आणि कधी नाही ते सूत्र संचालनाची संधी मिळालेल्या कार्यकर्त्याला आपले महत्व ठसवण्याची खुमखुमी आलेली असते..

आपले सर्वांचे लाडके नेते, पक्षाची मुलूखमैदानी तोफ आदरणिय श्री बाळासाहेब लहाने यांचे भाषण आपण शांतचित्ताने ऐकल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. साहेबांनी सांगितल्या प्रमाणे आज इथून घरी गेल्यानंतर तुम्ही विचार कराल आणि मगच मतदान कराल ही मला खात्री वाटते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी झटलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार आणि कौतुक. सभेला परगावाहून आलेल्या श्रोत्यांची वाहने मैदानापासून एक किमी लांब लावलेली आहेत. तिथे बसमधे चढताना ठरल्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते आपला योग्य तो पाहुणचार करतील. काळजी नसावी. या सभेसाठी दिवसरात्र राबलेल्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना साहेब नंतर शाबासकी देणारच आहेत. जे जे कार्यकर्ते माझ्याप्रमाणेचे गेला आठवडा रात्रीचेही झोपलेले नाहीत त्यांची व्यवस्था गांधी पुतळ्याजवळ बाबूराव फरसाणवाल्याकडे केलेली आहे. तरी कुणीही जाऊ नये. साहेबांसाठी मर्चिडीज गाडी पाठवणारे आपले दानशूर शेठजी नवलमल पोकर्णा यांचे उपकार साहेब लक्षात ठेवतीलच. काळजी नसावी.
अशा रितीने आजचा कार्यक्रम निविग्रपणे पार पडला याबद्दल सर्व कल्याणकरांचे आभार मानून मी इथे थांबतो.....

याच क्षणाला जाण्यासाठी निघालेले साहेब आता मर्चिडीजमधे बसू कि नको या विवंचनेत वरीष्ठ कार्यकर्त्याला याला बोलायची संधी कुणी दिली याची विचारणा करत असतात.

लग्नातले भाषण

लग्न लागायची वेळ आलेली असते. गुरूजी मंगलाष्टके म्हणायची घाई करत असतात कारण त्यांना पुढच्या कामाला जायचे असते. इतक्यात नेत्यांचे आगमन होते. लग्न थांबते. नवरा नवरीला खुर्चीत बसवले जाते. त्यांच्या हातात दिलेले हार काढून घेतले जातात. नवरी मुलगी नाराजीने काका, मामा कडे बघते. तो हातानेच "दम धर" असा इशारा करत असतो.

पुकारा होतो.
"मंडपात जमलेल्या नागरिकांपैकी प्रतिष्ठीतांचा सत्कार नेत्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यांनी नाव पुकारल्यावर वर यायचे आहे. असे म्हणात पन्नास एक नावे घेतली जातात. यात सूत्रसंचालकाला खटल्यातून वाचवलेले वकील, इन्स्पेक्टर साहेब, तलाठी साहेब, शिक्षण अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी पतपेढीचे सर्व संचालक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांची नावे घेतली जातात. सत्कार संपल्यावर पुन्हा सूत्रधार सांगतो " सर्व प्रतिष्ठीत नागरिकांचा सत्कार संपलेला आहे. कुणी एखादा राहून गेला असेल तर वाईट वाटून घेऊ नये. कारण आता नेते बोलणार आहेत. त्यांना तातडीने अर्जंट जायचे असल्याने शांततेत सायलेन्स ठेवून सर्वांनी सहकार्य करावे ही नर्म विनंती"

नेत्यांचे भाषण सुरू होते.
" आज या ठिकाणी दादासाहेब इंगळे यांच्या मुलीचा विवाह आहे. त्यांची कन्या ती माझी कन्या. (यावर दबक्या आवाजात खसखस पिकते. अशा अर्थाच्या चर्चा अधून मधून होतच असतात). चि. सारिका हिच्या लग्नासाठी मी आदरणिय पक्षाध्यक्षांशी असलेली मिटींग पुढे ढकलून या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. (टाळ्या).

चि. सारिका हिच्या शिक्षणासाठी आपण कधीच मागे पुढे पाहिलेले नाही. कितीबी खर्च होऊ द्या, सारिकाला पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश मिळेल हे आपण पाहिलेले आहे. तालुक्यातली सगळीच मुलं अशीच शिकावीत हेच ध्येय आपण नेहमी बाळगलेले आहे. परंतु काही लोकांना आमचे हे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. त्यामुळे आमच्या लोकांवर खोटे आरोप होत आहेत. आपल्या साठी झटणार्‍या लोकांना पोलीस दिवसा ढवळ्या पकडून एन्त आहेत. आम्ही म्हणालो कि, न्यायचे तर न्या, पण रात्रीच्या अंधारात तरी न्या. पण ते तरी काय करणार ? त्यांच्यावर वरून दबावच तसा आहे.

चि. सारिका हिच्याप्रमाणेच आम्हाला तालुक्यातली सगळी मुलं परदेशातल्या केंफर्ड विद्यापीठात शिकायला पाठवायची आहेत. त्यांच्यासाठी काय लागेल तो फंड आपण सरकारी निधीतून मिळावा म्हणून प्रयत्न करत आहोत. पण बाजारसमितीत आमचे पॅनेल बसल्याने सत्ताधार्‍यांनी ते आमचे स्वप्न हाणून पाडले आहे. त्यांनी शिक्षण महाग करून ठेवले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आपल्या भागाच्या विकासासाथी ज्या शिक्षण संस्था आपण उभारल्या आहेत तिथे फी वाढ करावी लागली आहे.

आम्ही शिक्षणाचे कल्याणकारी काम करत असल्याने गरीब बाप दोन एकर, चार एकर विकताना आम्ही डोळ्याने पाहिले आहे. पण काहीही करू शकत नाही. ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या पाठोपाठ झेडपी पण आमच्या हातातून गेली. नाहीतर आम्ही काही तरी केलंच असतं.

अशा परिस्थितीत मुलांना शिकवावं कसं हाच प्रश्न मतदारंघातल्या नागरिकांपुढं आहे. मुलं तरी का होऊ द्यायची असा प्रश्न लग्न झालेली जोडपी विचारतात आणि ज्यांचे लग्न व्हायचे आहे किंवा ठरलेले नाही ते तर लग्नच नको म्हणत आहेत. ही परिस्थिती का आली याचा विचार आपण आज करायला पाहीजे आहे. आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास कुणाच्या हातात सुरक्षित आहे याचा विचार नीट बारकाने करायला पाहिजे आहे.

आज शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. उद्या फट्याचं पाणी सुटणार नाही. रस्ते खोदले तर नीट होणार नाहीत. परिस्थिती बिकट होत जाणार आहे . याचा विचार करूनच सर्वांनी कारखान्याच्या निवडणुकीत तरी योग्य तो निर्णय घ्यावा. एव्हढे बोलून वधू वरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

वधू वर हातात हार आणि चेहर्‍यावर भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन अवघडलेल्या अवस्थेत पुढच्या विधीसाठी सज्ज होतात.

(अशाच भाषणांचे किस्से आपल्याकडेही असतील. ते इथे सांगावेत ही आपल्या सर्वांना विनंती.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे..!

श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात बऱ्याच लोकांना भाषण करण्याचा उत्साह असतो ते पाहिलयं.. गेल्या वर्षी एका नातेवाईकाचं अकाली निधन झालं. व्यक्ती मेहनती होती. नोकरीत जिद्दीने अगदी खालच्या पायरी पासून वरची पायरी गाठली होती. नातेवाईकांनी , समाज बांधवांनी त्यांचा सगळा प्रवास पाहिला होता. मात्र त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात एका उत्साही भाषण कर्त्याने त्यांच्या गरीब परिस्थिती पासून त्यांचं नोकरीत काय पद होतं, आधी कामाचं काय स्वरूप होतं त्याचं यथासांग वर्णन केलं.. माझ्यासकट बहुतेकांना ते खटकलं होतं हे माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं.

राजकीय सभांना कधी गेले नाहीये... टिव्हीवर पण त्यांना ऐकण्यात जास्त रस नसतो. हेडलाइन मध्ये काय म्हणाले नेते लोकं ते बघते.. बातम्यात वाचते ..!

छान लिहिलं आहे.
लग्न समारंभात, मुलांच्या gathering मध्ये सुद्धा रटाळ भाषणे असतात.
एक वेळ भाषणे परवडली पण त्याचं दुसरं रूप हॅपीसतले powerpoint presentations.. झोप येतअसते एकीकडे आणि लोकं काय माहिती revenue, value, power असेल महाकिचकट आणि irrelavant प्रश्न विचारत असतात. उगाच उशीर होतो

भाषणं वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. छान
कल्याणकरांचे आभार मानल्याबद्दल माझ्याकडून तुमचे स्पेशल आभार + शाल + श्रीफळ!! माझ्या जमान्यात कल्याणच्या राजकीय सभा शंकरराव चौक किंवा सुभाष मैदानात होत असत. क्वचित कोळसेवाडीत. आता कुठे होतात कोण जाणे? तुमची ही सभा कुठे होती?

मची ही सभा कुठे होती? >>> युट्यूबवर लाईव्ह पाहिली. Happy ठिकाणाचे नाव मुद्दाम बदलले.

सर्वांचे आभार.
रूपाली विशे पाटील , या आधीही श्रद्धांजलीच्या सभेत भाषणे करणार्‍यांचे अनुभव घेतलेले आहेत. भान ठेवून बोलणारे असतात. पण काहींना आपण कुठे बोलतोय याचे भान राहत नाही. एका लग्नात तर आता सर्व प्रतिष्ठीत नागरिकांचा सत्कार झालेला आहे असे म्हटल्यावर खाली उरलेले म्हणाले म्हणजे आपण प्रतिष्ठीत नाही, चला निघूयात असे बोलले गेले.

ममो - बाप रे ! __/\__
हे अगदीच खरडायचे म्हणून खरडले होते. आधी दोनच ओळी लिहील्या होत्या.

शर्मिला,किल्ली , अनया, अनिंद्य मनापासून आभार. Happy
अनिंद्य , अशी खूप लग्ने अटेंड केली आहेत. लग्नात राजकीय पुढार्‍याचे भाषण हे कॉमन झाले आहे. एकाच ठिकाणी पुढार्‍याने "ही काय भाषणाची जागा आहे का ?" असे म्हणत नकार दिला होता. त्याला भेटून मी धन्यवाद पण दिले होते. Happy

अशी अप्रस्तुत भाषणं ऐकताना हसावं की रडावं कळत नाही. श्रद्धांजली, विवाह वगैरे राहिली बाजूला, ह्यांचं वेगळंच काहीतरी.

एकाच ठिकाणी पुढार्‍याने "ही काय भाषणाची जागा आहे का ?" असे म्हणत नकार दिला होता >> असे वंदनीय अपवाद फार विरळा.