पंकज भोसले हे लोकसत्तेचे वरिष्ठ मुख्य उपसंपादक असा त्यांचा परिचय रोहन प्रकाशनच्या संकेतस्थळावर दिसतो. बुकमार्क या सदरात त्यांचे लेख नेहमी दिसतात. त्यावर नजर टाकली की ही पुस्तकं आपल्याला सहज मिळणं आणि मिळाली तरी वाचावीशी वाटणं कठीण आहे, असं मत व्हायचं. हेच त्यांच्या चित्रपट आणि संगीतविषयक लेखनाबद्दलही मला म्हणता येईल.
अशा लेखकाच्या कथासंग्रहाचं नाव हिट्स ऑफ नाइन्टी टू असावं, त्यात लव्ह एटीसिक्स नावाची कथा असावी हे पाहून नवल वाटलं आणि तो वाचनालयातून घरी आला.
१९८३ ते ८५ ही माझी पदवी शिक्षणाची वर्षे. एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टींना सुरुवात शेवटच्या वर्षीच केल्याने पहिली दोन वर्षे लेक्चर्स संपली की लायब्ररी नाहीतर घर हेच माहीत होतं. मला आठवतंय, तेव्हा दुपारी बाराच्या सुमारास विविधभारतीवर गाण्यांचा जो कार्यक्रम असे त्यात बुधवारी आणि शनिवारी नवीन म्हणजे अगदी तेव्हा आलेल्या चित्रपटांतली गाणी लागत. इतर दिवशी जुनी. तर ही गाणी ऐकावी लागू नयेत म्हणून मी या दोन दिवशी मुद्दाम उशिरा घरी जात असे. [ सकाळी सहा मुंबई ब वर बातम्या ते रात्री ११:३० विव्धभारतीवर बेला के फूल असा आमच्या घरी रेडियो, त्यावर प्रक्षेपण ( करेक्शन - टीव्ही पाहायचा नसेल तेवढा वेळ) चालू असेल तोवर चालूच असे. जणू तेवढा वेळ तो बंद करणं अलाउड नव्हतं.]
ही गाणी आपल्याला अजिबात आवडत नाहीत, हे मी पक्क ठरवून टाकलेलं. पिंड जुन्या गाण्यांवर पोसलेला. यात अजूनही फार फरक पडलेला नाही. एकविसाव्या शतकातली फार कमी गाणी मी स्वतःपर्यंत पोहोचू दिलीत. थेटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणं माहीतच नव्हतं आणि अजूनही फारसं नाही. कॉलेजत तेव्हा इतर मुलंही थेटरात पिक्चर बघायला जाताहेत, असं काही आठवत नाही. चित्रपटाशी संबंधित त्या काळातली आठवण म्हणाजे बोफोर्स घोटाळ्यात अमिताभ बच्चनचं नाव आल्यावर अभाविपवाल्यांनी त्याच्या घरासमोर निदर्शने केली होती आणि पोलिसांचा सौम्य छडीमार खाल्ला होता. शहेनशाह वर बहिष्काराच्या घोषणा झाल्या होत्या. टीव्हीवर हम लोग, बुनियाद, रामायण, महाभारत अशा मालिकांचा जमाना आल्याने छायागीत, चित्रहार यांचं आकर्षण ओसरलं होतं.
हा कथासंग्रह या काळात सुरू होतो. पहिल्या कथेत प्राथमिक शाळा संपत आलेला एक मुलगा उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईहून रायगड जिल्ह्यातल्या त्याच्या काकाच्या की मामाच्या गावी जातो. सोबत त्याच्या नात्यातली कॉलेज संपलेली एक मोठी बहीण. साहित्यातली गावं एक तर तळकोकणातली नाहीतर पश्चिम महाराष्ट्रातली. त्यात एस टीने काही तासांत जाता येईल असं हे गाव वेगळं आणि जवळचं वाटतं. गावात रेडियो श्रोता संघ आहे. अनेकानेक गोष्टी करणारा एक भावी राजकीय नेता म्हणावा असा तरुण आहे. त्याच्या दुकानासमोर रेडियोवरची गाणी ऐकायला गावकरी जमतात. टीव्ही असलेल्या मोजक्या घरांत गावातली मुलं कार्यक्रम पाहायला जमतात ; हे मी थोडं आधीच्या काळात मुंबईतच अनुभवलेलं. शहरी मुलाला दिसणारं गाव वाचताना लंपन आठवतो. रेकॉर्ड डान्स, त्याच्या स्पर्धा हा प्रकार आहे. (मी शाळेत असताना आमच्या भागातल्या सार्वजनिक गणेशोत्सवातल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला एकदा गेलो होतो, तेव्हा अमिताभ रेखाच्या परदेसिया या गाण्यावर तीन जोड्यांनी वेगवेगळा नाच केला होता, हे आठवलं. ) मिथुनच्या एका गाण्यावरच्या नाचाचं वर्णन चपखल केलं आहे.
कथेतली शेवटची कलाटणी अनपेक्षित आहे आणि अगदी subtly लिहिली आहे.
पुढच्या कथा ठाणे शहरात घडतात . यातल्या बर्याच ठिकाणांची नावं किमान ऐकून माहिती असल्याने कथा आपल्या ओळखीच्या परिसरात घडते आहे असं वाटत राहतं. एका कथेतली पात्रे दुसर्या कथेत दिसतात इतका हा परिसर कथेचा भाग आहे.
दुसर्या कथेत थोडा मोठा, पण वेगळा मुलगा आहे. कबुतरे उडवणारे लोक आहेत. चित्रपटात एक्स्ट्रा डान्सर म्हणून काम करणारी तरुणी आहे. ती असलेल्या चित्रपटांतल्या गाण्यांचे तपशील आहेत. मग शूटिंगचं वर्णन आहे. वॉकमनला स्पीकर लावण्याचे जुगाड आहेत. गरीब - निम्न मध्यमवर्ग - विशेषतः स्त्रिया चरितार्थासाठी करीत असलेल्या उद्योगांचं चित्रण आहे.
त्यानंतरच्या कथेत डबल कॅसेट असलेला प्लेयर आहे. कथानायक (हा आता शाळा कादंबरीच्या वयात आहे आणि कथेत तसे - मुलींच्या मागे फिरण्याचे, त्यांच्याशी बोलण्याचे प्रसंगही आले आहेत) हा आपल्या मित्रमैत्रिणींना गाणी टेप करून देतो. (आमच्याकडचा दुसरा कॅसेट प्लेयर हा असाच होता. कॅसेट रिवाइंड करणं, रिवाइंड करून गाणी ऐकणं हे प्रकार आठवले. कोर्या कॅसेट्स विकत आणून त्यात गाणी भरण्याचा प्रकार त्या काळात प्रचलित होता. मी एकाच कॅसेटपुरता हा प्रकार केला होता. एका कॅसेटमधून दुसरीत नाही, पण रेडियोवर वाजणारी गाणी रेकॉर्ड केली होती. घरातलं कॅसेट कलेक्शन ऐकता यावं म्हणून दहाबारा वर्षांपूर्वी कॅसेट प्लेयर घ्यायला दुकानात गेलो तेव्हा त्यातलं रेकॉर्डचं बटण डिसेबल केलेलं असतं असं कळलं. (कॉपीराइट). कॅसेट त्यात अडकून पडणं, मग पेन्सिलीच्या टोकाने त्या उसवून गुंता सोडवून पुन्हा गुंडाळणं असले प्रकार केलेले आठवतात.) तर कथेतला मुलगा कॅसेटमध्ये गाणी भरून देतो हा भाग कंटाळवाणा वाटला . त्यात गाण्यांच्या अक्षरशः याद्या आल्या आहेत आणि त्यातली फार कमी गाणी ऐकल्यासारखी वाटली. कुमार सानू कथेवर छा गया है आणि ए आर रहमानची चाहूल आहे.
टी सिरीजने त्या काळात गाण्यांना प्रॉपर रिलीझ मिळावी म्हणून चित्रपट काढले ( आशिकी आणि लाल दुपट्टा मलमल का) . तसं गाण्यांच्या याद्या टाकता याव्या म्हणून ही कथा लिहिल्यासारखं वाटलं.
शेवटची कथा कॉलेजात घडते. आता सीडीज, एम पी थ्रीचा जमाना आला आहे. लेखकाचा अमीर खानवर राग असावा. त्याचं नाव न घेता तथाकथित पर्फेक्शनिस्ट असाच उल्लेख केला आहे. त्या काळात अमीर टॉम हँक्सची नक्कल करत असे असं वाटत नाही. जाणकारांनी सांगावं. लेखकाने कालप्रवास करून भविष्यात जाऊन पुन्हा मागे येत तसं म्हटलं आहे.
या कथेत वासुनाकातला भीड है, लाभ ले सकते है प्रसंग आला आहे.
कथांमधला माझा रस उतरत्या भाजणीने कमी होत गेला. पहिली कथा वाचतानाची "काय भारी पुस्तक मिळालंय" अशी भावना चौथ्या कथेपर्यंत "आता घेतलंच आहे, तर वाचून संपवावं" अशी झाली. प्रत्येक कथेत हसू आवरता आलं नाही असा किमान एक प्रसंग आहे. चार ही कथांमधल्या मुली हुशार, विचारी आणि पुढाकार घेणार्या आहेत.
पंकज भोसलेंनी स्वतः तयार केलेली गाणी ऐकण्याची सोय क्यु आर कोड छापून केली आहे. म्हणजे रेडियो ते इंटरनेट असा चित्रपट संगीताचा प्रवास या पुस्तकात आला आहे. ( हे लिहिताना , आपण कधी ग्रामोफोन प्रत्यक्षात पाहिलेलाही नाही, हे जाणवलं.) तसंच यातली एक कथा नेटवरच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली आहे.
कथासंग्रहाचं संपादन प्रणव सखदेव यांनी केलं आहे. ( म्हणजे काय केलं असेल?)
ब्लर्ब सचिन कुंडलकर यांनी लिहिला आहे.- "ज्याचा कुणी नसतो त्याचा हिंदी सिनेमा असतो. माझ्या आतमध्ये खोलवर घट्ट रुतून बसलेल्या ह्या जीवनावश्यक भावनेला ........" करण जोहरला सुद्धा असंच वाटतं आणि तो त्याच्या चित्रपटांतून हे करतो तेव्हा आपण नाक मुरडतो. असो.
स्थलांतरउत्सुक नव्वदीच्या तरुण पिढीचे हे कथाविश्व आहे असं कुंडलकर म्हणतात. तेव्हा ज्यांना हा लेबल लागऊ शकतं, त्यांना आवडावा.
छान परिचय. या सगळ्या गडबडीत
छान परिचय. या सगळ्या गडबडीत नाईनटी टूलाच का मुखपृष्ठ मिळालं आहे ते कळलं नाही. या वर्षी कुठलं विशेष हिट झालं होतं का?
छान परिचय. तुमच्या लेखनातूनही
छान परिचय. तुमच्या लेखनातूनही शेवटाकडे येताना श्वास कोंडल्याची भावना हळूहळू गडद होत गेली. तेच कॅसेट भरणे आणि त्यावेळी वयात येत असल्याने एक दबलेले ममव उष्ण जड श्वासाचे फील. ह्या अनुभवातून गेलेलं असल्याने नको वाटणारं... शब्दात न मांडता ही जाणवणारे.
आणि बाकी कुंडलकरला ही नाकं मुरडतो की!
छान लिहिले आहे. तुमच्या
छान लिहिले आहे. तुमच्या परिचयावरून फार सखोल हाताळणी नसलेल्या कथा जास्त असाव्यात असे वाटले.
वेगळ्या मुलाची व स्त्रियांच्या जास्त रोचक असाव्यात असं वाटलं. नव्वदीतली गाणी किंवा त्या काळातील चित्रपट उत्कट कलाकृती वगैरे नसावेत, नॉस्टॅल्जियामुळे पूर्वग्रहरहित टिप्पण्या अशक्य असाव्यात.
जाणकार अजिबात नाही पण आमिर खान नव्वदीत टॉम हॅन्क्सची नक्कल करायचा असं वाटत नाही. नव्वदीत दिल, अंदाज अपना अपना, दिल है के मानता नही, कयामतसे कयामत तक वगैरे मधे 'चॉकलेट बॉय'ची प्रतिमा होती. मला हे आठवत नव्हते चक्क, फिल्मोग्राफी बघावी लागली. मी त्याला जरठलेलं-निबर, शिवाय डोळ्यांतला कायम 'स्टार्टल्ड लूक'/ दचकलेले हावभाव घेऊन वावरतानाचा जास्त बघितलं आहे. कदाचित 'लगान' वगैरे नंतर त्याने टॉम हॅन्क्ससारखी मि. पर्फेक्शनिस्टची प्रतिमा अंगिकारली असावी.
केजो जे चित्रपटांतून टाकतो ते फक्त आक्षेपार्ह विनोदाच्या स्वरूपात असं वाटतं. त्याने मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो. एवढे रिसोर्सेस, अनुभव व कल्पकता असूनही त्याला समलैंगिकांच्या जाणीवा आणि माणूसपण नीट मांडता आलेलं नाही. कुंडलकर डिप्रेस्ड व आत्ममग्न वाटतात. त्यांचं आर्त इतरांपर्यंत पोचत नाही, इतरांच्या हाका त्यांच्यापर्यंत. नीट सांगता येत नाही, काही तरी मोठी काचेची अदृष्य भिंत बांधून ठेवली आहे असं वाटतं. असे असतात बरेच लोक, unreachable. चूभूद्याघ्या.
रच्याकने, लालसिंग चढ्ढा मध्ये
रच्याकने, लालसिंग चढ्ढा मध्ये त्याने टॉम हॅन्क्सची नक्कल करायला हवी होती आमीर साधा निरागस न वाटता स्क्रू ढिला वाटतो, ते तरी नसतं झालं. बाकी तो टॉम हॅन्कची नक्कल करतो असं मलातरी अजिबात जाणवलेलं नाही.
परिचय आवडला. पण त्याहून तुमचा
परिचय आवडला. पण त्याहून तुमचा प्रवास जास्त भावला.
अनेक ठिकाणी अगदी अगदी असं झालं.
अमित, अस्मिता +1
छान परिचय!
छान परिचय!
छान परिचय!
छान परिचय!
कथांमधला माझा रस उतरत्या भाजणीने कमी होत गेला. >> मी याच लेखकाचं "विश्वामित्र सिंड्रोम" थोडेफार वाचलं. त्या पुस्तकाच्या बाबतीत मलाही असेच वाटले. सुरूवातीला भारी वाटले पण अजूनही ते पुस्तक पूर्ण वाचलेले नाही. पण बहुधा अधूनमधून वाचण्यासारखे असेल.
तुम्ही लोक "रंगीला" विसरलात
तुम्ही लोक "रंगीला" विसरलात कि काय? त्यामधला तो हॉटेल मधला सीन!
पुस्तक परिचय : विश्वामित्र
पुस्तक परिचय : विश्वामित्र सिण्ड्रोम (पंकज भोसले)
https://www.maayboli.com/node/81842 हे वाचल्यावर अस वाटलं कि दोनी कथा संग्रह एक सारखे आहेत.
विश्वामित्र सिण्ड्रोम पचवायला
विश्वामित्र सिण्ड्रोम पचवायला सुरुवातीला मला जड गेलं होतं, पण नंतर आवडलं खूप...
पण हे पुस्तक मात्र अजून वाचावंसं वाटलेलं नाही.
तुम्ही परिचय छान लिहिला आहे.
भरत.
भरत.
तुम्ही परिचय एकदम छान लिहिला आहे. हे सांगायला म्हणून परत आलेलो.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
बरेच गोष्टी वाचताना रीलेट झाल्या. कारण मी सुद्धा नाईंटीज किड आहे.
बाकी नव्वदीच्या दशकातील गाण्यांबद्दल काय म्हणावे.. मी मागेही कुठेतरी हे लिहिले होते की तेव्हाची मेलोडी मी आजच्या गाण्यांमध्ये मिस करतो.. यावर धागा सुद्धा काढणार होतो.. पण राहिला.. पुढे मागे जरूर.. कारण त्या निमित्ताने ती गाणी आठवणे होईल..
परिचय मस्त लिहिला आहे भरत.
परिचय मस्त लिहिला आहे भरत. चाळून बघायला पाहिजे पुस्तक.
अवांतर-
हे रेडिओवरून कॅसेटवर गाणी रेकॉर्ड करणं, कॅसेटवर हवी ती गाणी रेकॉर्ड करून देणारं दुकान असणं, कॅसेटचं रीळ कधीकधी गुंतणं, मग ते सोडवणं, कधीकधी ती फीत कापून परत चिकटवावी लागणं, हा जमाना मीही अनुभवलाय. आता ते पार मागच्या युगात घडल्यासारखं वाटतं आणि ते खरंच आहे. मध्यंतरी एकदा एका तरूण मुलामुलींच्या ग्रुपबरोबर या विषयावर गप्पा झाल्या. त्यातला एकजण एक्याण्णव-ब्याण्णव साली जन्माला आलेला असल्याने त्यानेही हे कॅसेटसंबंधित प्रकार केलेले/बघितलेले होते. बाकी एकजात सगळे सीडी आणि यूट्यूबच्या जमान्यात वाढलेले. तेव्हा परत एकदा जाणवलं की एकंदरीतच इलेक्ट्रॉनिक्समधे प्रचंड प्रमाणात प्रगती झाली गेल्या तीसचाळीस वर्षांत. कॅसेट्स खूप वर्षे टिकून होत्या, पण सीडीज लवकर कालबाह्य झाल्या, आयपॉड आणखी लवकर.
मी ज्याची कॅसेट विकत घेतली असा सर्वात नवीन सिनेमा म्हणजे दिल चाहता है
होय वावे. मी पण अशा कित्येक
होय वावे. मी पण अशा कित्येक सीडी जमवल्या होत्या. आता बघतो तर लॅपटॉप वरून ड्राइव्हच गायब झाला आहे.
टंकलेखनाच्या चुका सुधारल्या.
टंकलेखनाच्या चुका सुधारल्या.
चौथ्या कथेबद्दल - वासुनाकातला भीड है, लाभ ले सकते है प्रसंग आला आहे. हे वाक्य जोडलं.
चार ही कथांमधल्या मुली हुशार, विचारी आणि पुढाकार घेणार्या आहेत. हे आणखी वाक्य जोडलं.
ह.पा. हिट्स ऑफ नाइन्टी टू या नावाने एक अल्बम म्युझिक कंपनीने काढला होता. इथे १९९७ साठीची hmv ची एक कॅसेट दिसली. त्या त्या वर्षातल्या हिट गाण्यांची कॅसेट ही कल्पना अमेरिकेतही होती. तिथूनच इथे आली असेलही.
अस्मिता, करण जोहरच्या बॉलिवुड आणि बॉलिवुड संगीत प्रेमाबद्दल हे आहे. ऐ दिल है मुश्किलमधली रणबीर - अनुष्का यांनी रंगवलेली पात्रे जुन्या हिंदी चित्रपट आणि संगीताबद्दल वेड्यासारखं बोलतात, तेव्हा त्यांच्या तोंडून करण जोहर (जबरदस्तीने ) बोलतोय, असं वाटतं. त्याच्या लेटेस्ट धर्मेंद्र- शबाना चित्रपटातही हे दिसतं. सचिन कुंडलकर आणि करण जोहर , दोघांचं समलैंगिक असणं हे साम्य मला तुम्ही लिहिल्यावर लक्षात आलं. तुमचा त्याच्या हाताळणीचा मुद्दा या कथासंग्रहाच्या संदर्भात अवांतर असला तरी व्हॅलिड आहे. करण याबाबत गोंधळलेला आहे, असं मला वाटतं. त्याने त्याच्या आत्मकथनपर पुस्तकात मी माझी लैंगिकता उघड केली तर त्याचे वाईट परिणाम मला भोगावे लागतील, असं काहीसं लिहिलं आहे. आणि मग तो त्यावर - अगदी स्वतःवरही विनोद करतो- ए आय बी रोस्ट मध्येही केला होता.
वावे, रायगड जिल्ह्यातलं गाव म्हटल्यावर तुमची आठवण आली होती.
माझ्याकडेही कॅसेट्सचं बरंच मोठं कलेक्शन होतं. अगदी याच वर्षी भंगारात दिलं. सीडीज अजून ठेवल्यात. एकेक कॅसेट प्लेअर / म्युझिक सिस्टम्स बिघडत गेल्या आणि त्या दुरुस्त करून देणारे लोक आता मिळत नाहीत. कॅसेट्सची कव्हर्स ( अल्बमचं नाव, गाण्यांची यादी असलेला कागद) सध्या ठेवलीत. कॅसेट्सवरून सीडीवर गाणी कॉपी करून देणे हा पुढचा उद्योगही मधल्या काळात येऊन गेला. ते करून घेऊ म्हणत राहिलं.
ललिता- प्रीति, तुम्ही लिहिलेल्या विश्वामित्र सिंड्रोमच्या परिचयातलं -प्रत्येक कथेत इतर कथांमधले काही ना काही संदर्भ/उल्लेख येतात. त्या अर्थाने, म्हटलं तर या कथा जोडलेल्या आहेत; म्हटलं तर स्वतंत्रपणेही वाचता येतील अशा आहेत. - या संग्रहालाही लागू पडतं.
सगळ्या प्रतिसादांसाठी
विश्वामित्र सिंड्रोमच्या मुखपृष्ठावर व्हिडियो कॅसेट्स आहेत का?
रायगड जिल्ह्यातील गाव हो.
रायगड जिल्ह्यातील गाव हो. हृषीकेश गुप्तेच्या कथाकादंबऱ्यांमध्येही रोहा-नागोठणे परिसर असल्यामुळे छान वाटतं. नाही तर एरवी खूपदा कोकण म्हटलं की रत्नागिरी-सिंधुदुर्गाचीच पार्श्वभूमी असते.
परिचय - किंबहुना या
परिचय - किंबहुना या पुस्तकाच्या निमित्ताने मांडलेली आठवणींची सफर आवडली.
मलाही नव्वदीच्या दशकातली (पासूनची) गाणी विशेष आवडत-भिडत नाहीत, एक रहमानचा सणसणीत अपवाद वगळता. ('रोजा' १९९२मध्येच आला होता.)
आणि कदाचित काही अंशी विशाल भारद्वाज. (काही अंशी म्हणजे 'ओम्कारा'. )
भरत, प्रतिसाद आवडला.
भरत, प्रतिसाद आवडला.
इतर प्रतिसादांतील चर्चाही आवडली.
भरत, छान पुस्तक परिचय.
भरत, छान पुस्तक परिचय. आवडीच्या गाण्यांची list देऊन कॅसेट ऐकणे, अडकल्यावर पेन्सिलने गुंडाळने वगैरे अनुभवले आहे. बाकी ९०s ची गाणी आणि फॅशन याबद्दल काय बोलू. एकदम तेजाब,साजन, दिल वगैरे डोक्यात येतात. शिवाय त्या भयानक टिकल्या(बिंदी ), हेअरस्टाईल, गोटा वर्कचे चनिया चोली, लूज स्कर्ट ब्लाउज (दिल स्टाईल ) हे आठवून शहारा आला.
भरत, छान परिचय करून दिलात.
भरत, छान परिचय करून दिलात.
प्रतिसादही वाचनीय.
अच्छा. धन्यवाद भरत.
अच्छा. धन्यवाद भरत.
दिवाळी अंकांत कथा किंवा थेट
दिवाळी अंकांत कथा किंवा थेट कथासन्ग्रह छापायचे भाग्य ज्यांना लाभते त्या कथा खुपच सुमार दर्जाच्या असतात हे गेल्या ५-७ वर्षातले निरिक्षण आहे. सुरवात चांगली करतात पण पुढे ढेपाळतात. कित्येकदा कथेच्या नावाखाली काहीही घटना न घडणारी दैनंदिनी वाचायला मिळालेली आहे. त्यामानाने ऑन्लाईन लिहिणारे खुप उच्च दर्जाचे लिहितात.
परिक्षण चांगले लिहिलेय. शेवटपर्यंत धीर टिकुन राहिला हे भारीच. (मला पेशन्स शब्दाला योग्य मराठी शब्द वापरायचा होता पण सुचेना/आठवेना)
कालच्या लोकसत्तेत पंकज भोसले
कालच्या लोकसत्तेत पंकज भोसले यांचा 'संगीतकार' झाकीर हुसेन हा लेख आहे. त्यातून - कॅसेटचे युग अस्तारंभावर आलेली १९९७-९८ ही वर्षे. पुढे ए र रहमान , नदीम श्रवण अस्तपर्व - परदेस , जतिन ललित, अन्नू मलिक यांचे उल्लेख आहेत. सांगीतिक गोंगाटाचे रोंबाट असे शब्द त्यांनी वापरलेत.
----
माझ्या वरच्या लेखात पदवी शिक्षणाची वर्षे १९८३-८५ असं म्हटलंय, ते १९८५-८८ हवं. ८३ -८५ कनिष्ठ महाविद्यालयाची वर्षे.
सुरेख परिचय.
सुरेख परिचय.
पंकज भोसले - यांच्या काही कथा ऐसीवर वाचलेल्या. शैली आवडली होती.