अत्तराच्या कुपीतून दरवळणारा सुगंध. . .

Submitted by मार्गी on 28 April, 2024 - 00:23

रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही. आणि पुढे जाताना मागची वाटसुद्धा आपल्या नजरेसमोरून दिसेनाशी होती. आपली मुळं आणि आपला आरंभ आपल्या डोळ्यांसमोर नसतो. म्हणून अशाच नितांत सुंदर आठवणींच्या अत्तराच्या कुपीला उघडण्याचा हा प्रयत्न.

जेव्हा आपण जुन्या जगातल्या गोष्टी आठवतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की जुनं जग किती समृद्ध होतं. आणि आपल्याला जे लाभलं होतं ते किती सुंदर होतं. तेव्हा त्याचं मोल जितकं जाणवलं नसेल त्याहून त्याचं मोल आज कळतं. काळ, परिस्थिती, जीवनशैली बदलली तरी छोट्या गोष्टी किती आनंददायी होत्या ही जाणीव होते. ताजेपणाचा शिडकावा होऊन एक नवीन दृष्टीही मिळते. त्यामुळे अधून मधून जुन्या जगामध्ये फेरफटका मारणं उपयोगाचं असावं.

ह्या आठवणी आहेत माझ्या नांदेडच्या आजीच्या म्हणजे कै. कालिंदी गजानन फाटक ह्यांच्या! मला लहानपणी दोन आजी- आजोबांचा भरपूर सहवास मिळाला. जे परभणीला सोबत राहायचे ते आजी- आजोबा हे नुसते आजी- आजोबा होते तर नांदेडला राहणारे आजी- आजोबा नांदेडचे आजी आजोबा होते! आणि त्या आजी- आजोबांची भेट काही नेहमी होत नसल्यामुळे तिथे होणारे लाड जास्त असायचे. आजोबांच्या आठवणी मागच्या वर्षी ते गेले तेव्हा लिहील्या होत्या. त्याच वेळी जाणवलं होतं की, नांदेडच्या आजीच्या म्हणजे कालिंदी आजीच्या तर त्याहूनही किती जास्त आठवणी आहेत! आजीला जाऊन आज ९ वर्षं होतील. म्हणून ह्या अत्तराच्या कुपीला उघडण्याचा हा प्रयत्न.

लहानपणीच्या सगळ्यांत जवळच्या व्यक्तींमध्ये- लाड आणि कौतुक करणार्‍यांमध्ये आजी अगदी पुढे होती. कोवळ्या वयात मिळालेला स्वीकार आणि प्रेम बहुमोल असतं. वामन मूर्ती, सौम्य आणि हळुवार स्वभाव आणि चेहर्‍यावर हसू. आठवणींचा पेटारा सांगतो की, आजीसोबत आम्ही नातू व नातींनी किती तरी मजा केली आहे. तिच्याकडून ऐकलेल्या गोष्टी, तिने सांगितलेले किस्से आणि विनोद, तिने आवडीने खाऊ घातलेले पदार्थ (ही बाब तर आता हळुहळु नामशेष होण्याइतकी दुर्मिळ होते आहे), तिच्या हातची चव, स्वयंपाकाचा तिचा उत्साह आणि अर्थातच दुपारच्या जेवणानंतरचे पत्त्यांचे असंख्य डाव! "निरू, काय सुरेख पत्ते आहेत तुझे! दोन एक्के, सगळे रथी महारथी तुझ्याकडेच! आणि मला तर अगदी रद्दी, एक हात मुश्किलीने होईल!" हा संवाद तर नेहमीचा होता! त्याशिवाय वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल ती गोष्टी सांगायची. विनोबांची गीताई तिला विशेष आवडायची. समाजातले महापुरुष, समाज सुधारक, देशभक्त आणि क्रांतीकारक ह्यांच्याबद्दलही ती खूप काही सांगायची, (सांगत असे म्हणायला पाहिजे). हे लिहीताना तेव्हाची भाषाही वेगळी असल्याचं जाणवतंय. तेव्हा "निजायची वेळ झाली, गाडीत फार रेटारेटी होती का, दिवेलागणीची वेळ झाली, चांगलंच गरजतंय, बहुधा सर येणार" अशी वाक्यं ऐकल्याचं आठवतंय. आज हे शब्द आपण फार वापरत नाहीय, हेही जाणवतंय.

आजीला आठवताना नांदेडचं घर व तिथल्या आठवणी मनात दाटून येतात. भाग्य नगर कमानीच्या अलीकडे असलेलं उदय नगर! समोर पवार टी हाऊस! छोट्या गल्लीने आत गेल्यावर असलेलं बैठं मोठ‌ं घर- कांचनगंगा! घराला लागून अंगण नव्हे परस, मागे असलेलं मोठं पेरूचं झाड आणि छोटी लिंबाची झाडं, पाण्याचा हौद, स्वयंपाकघरातला देव्हारा आणि टेबलावरचा पॅनासॉनिक रेडिओ! त्याच्यावर आजोबांचं रोज सकाळी ६ वाजता बीबीसीच्या बातम्या आणि कधी जुनी गाणी ऐकणं! मार्च १९९९ मध्ये अनील कुंबळेने १० विकेट घेतल्या ती मॅच त्याच रेडिओवर ऐकल्याचीही एक आठवण आहे! घरभर वेगवेगळे पुस्तकं, दैनिक, नियतकालिक आणि हस्तलिखित वह्या! एकता मासिक, तरुण भारत, लोकपत्र अशी वृत्तपत्रं. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत तरुण भारत वाचून काढल्याचंही आठवतं! ते शांत जग वेगळंच होतं! टीव्ही नावाचा प्रकार जवळ जवळ नव्हताच.

तेजस्वी चंद्राच्या बाजूची सौम्य चांदणी

नांदेडच्या आठवणींमध्ये नंदन मामा सगळ्यांत ठळक आहे. त्याचं व्यक्तिमत्व थोडक्यात सांगायचं तर धर्मेंद्र किंवा अरनॉल्ड सारखं! एकदम डॅशिंग. तो नजरेसमोरचा हिरो! त्याच्या तेजोवलयाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव! मामासोबतच्या गप्पा, त्याच्यासोबतचं आकाश दर्शन आणि बाहेर फिरणं! त्यामुळे मामा समोर असताना आजीच काय, लहान मामेबहिणीही दिसेनाशा व्हायच्या! मामीही खूप लाड करायची, कौतुक करायची पण मामाच्या तेजापुढे तीही दिसेनाशी व्हायची. समई दिव्याइतका मोठा प्रकाश देत नाही, पण ती सतत तेवत असते. तिचं मोठेपण काय असतं, हे आज जाणवतंय. आजीचा गोतावळा मोठा. घरात येणार्‍या मावशा, राजूदादापासून दुकानदार, शिक्षक असे सगळे तिचे परिचित. घरात कामाला येणार्‍या मावशाही डोळ्यापुढे येतात. मामेबहीण- बाळ विदुलाला त्यांनी‌ आंघोळ घालणं आठवतं. आजीच्या हातची चुक्याची भाजी आठवते! आणि सगळ्यांना जपणारी, अडी अडचणीला सतत मदत करणारी आजी समोर दिसते. तिच्यासोबत नांदेडमध्ये फिरणं- तिथला गुरूद्वारा, विसावा बगीचा, रडत रडत आई व आजीसोबत केलेला सिटी बसचा प्रवास, आजीने खुलवून सांगितलेले विनोद असं खूप काही आठवतं! आजोबांचं घरामध्ये सतत काही ना काही दुरुस्त करत असणं, सकाळी लयबद्ध सुरात पुजा करणं आणि आजीचा घरातला सौम्य वावर आठवतो! तिच्या स्वयंपाकातल्या मसाल्याची चव ओठांवर येते! तिने जपलेली माणसंही डोळ्यांपुढे येतात!

तिचा जन्म १९३४ चा मोरशी, अमरावती इथला (ती उमरावती म्हणे). माहेरून ती कालिंदी कृष्णाजी जोशीराव होती. तिचे दोन मोठे भाऊ दुसर्‍या महायुद्धामध्ये युरोप आणि आफ्रिकेत लढले होते. दादा मामा, अप्पा मामा आणि बापू मामा ह्यांच्याबद्दल ती खूप अभिमानाने सांगायची. त्यापैकी अप्पा मामा- अप्पा आजोबांना भेटण्याचा योग आला होता. काही वर्षं तिने नागपूरमध्ये शिक्षण घेतलं. काही काळ तिने तेव्हा शिकवण्याही घेतल्या होत्यां नंतर त्या काळातल्या परिस्थितीमुळे बीए खाजगी पद्धतीने पूर्ण केलं. काही वर्ष आजी आणि आजोबा (गजानन फाटक) नागपूरला राहिले आणि १९६७ मध्ये ते नांदेडच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विभाग प्रमुख म्हणून आले. पुढे ते नांदेडलाच स्थायिक झाले. माझी आई (सौ. संध्या वेलणकर) दहावीला असताना म्हणजे १९७० च्या सुमारास आजीने नागपूर विद्यापीठातून खाजगी पद्धतीने एम.ए. पूर्ण केलं आणि नंतर १९७२ ते १९९४ ती नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात मराठीची प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती. ते करता करता आज ज्याला सामाजिक काम म्हणतात, तेही तिने खूप सहजपणे केलं. त्यातले तपशील तर आम्हांला नंतरच कळत गेले. आजोबा आणि आजी अनेक विद्यार्थ्यांना मदत करायचे.

गरीबीची व्याख्या

आजीने सांगितलेला एक प्रसंग नेहमी आठवतो. तिने केलेली गरीबीची व्याख्या पुढे सामाजिक कार्यामध्ये शिक्षण घेतल्यावरही मला लक्षात राहिली. तिच्याच शब्दात तो प्रसंग सांगतो. "अरे निरू, मी अशी रस्त्याने जात होते. दुपारचं हे कड्डक ऊन! मला एक बाई रस्त्यामध्ये दिसली. तिचं लेकरू सारखं रडत होतं. बहुधा ते उपाशी असावं. मी विचारलं तिला की, का हो, तुमचा मुलगा इतका का रडतोय? त्यावर तिने सांगितल‌ं की, त्याला खूप तिखट लागलंय. म्हणून तो रडतोय. मग मी तिला विचारलं, इतकं तिखट तुम्ही करताच का? अरे निरू, तिने जे उत्तर दिलं ते ऐकून मी गप्पच झाले. ती बोलली की, जर मी तिखट कमी केलं तर भाजी पुरणार नाही. कारण मुलगा पाणीच पिणार नाही. मी तिखट करते, त्यामुळे तो जास्त पाणीच पितो आणि माझे दोन घास त्याला पुरतात!" गरीबीची ह्यापेक्षा समर्पक व्याख्या मला कोणती दिसली नाही. आजी विचारपूस करून थांबत नव्हती. तिला त्यावेळी शक्य असेल ते ती करायची. अनेक वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या महिलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायची. ज्या महिलांना- मुलींना त्यांचे नवरे किंवा इतर कोणी त्रास देत असतील, त्यांच्यासाठी ती पुढे येऊन मदत करायची. फसवून किंवा फूस लावून घराबाहेर पळून जाणार्‍या अनेक मुलींना तिने कसं वाचवलं, ह्याचेही अनुभव ती सांगायची. कोणावर अन्याय होत असेल तर तिचा संताप व्हायचा आणि ती हिमतीने त्याचा विरोध करायची. त्याबरोबर हुंडबंडी, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार विरोध, स्वदेशी अशा विषयांवरही तिने काम केलं. जनसंघ- भाजपचं काम तिने केलं. कॉलेजात सतत १४ वर्षं एनएसएसच्या कामात ती सहभागी होती.

त्याबरोबर संघाचे कार्यकर्ते, संघ परिवारातल्या संस्था, अनेक सामाजिक संस्था इथेही तिचा वावर होता. ग्राहक मंचाचंही तिने काम केल्याचं आठवतं. त्याबरोबर मराठी‌ साहित्य, अरुणा ढेरे सारख्या कवयित्री, बाबासाहेब पुरंदरेंसारखे लेखक हेही तिला आवडायचे. चांगल्या मराठीचे संस्कार तिने आमच्यावर केले. वाचनाची गोडी लावली. त्याबरोबर भारताचं स्वातंत्र्य, टिळक- सावरकर, क्रांतीकाकांचं काम तिने समजावून सांगितलं. आणीबाणीतले तिचे व इतरांचे अनुभव कळण्याचं तेव्हा वय नव्हतं. आणीबाणीमध्ये ती १३ महिने येरवडा आणि नागपूरच्या तुरुंगवासात होती. ते दिवस खूपच वेगळे होते असं आई- बाबांच्या पिढीकडून त्या दिवसांबद्दल खूपदा ऐकलं आहे. आजीने नंतर 'गजाआडचे विश्व' हे पुस्तक त्या अनुभवांवर लिहीलं. त्या सर्वच काळात तिने खूप योगदान दिलं आणि खूप काही निभावूनही नेलं. नंतर सरकारच्या विविध समित्यांवर आणि लोक न्यायालयामध्येही काम केलं. हे सगळं करताना तिचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मी काही करते आहे, केलं आहे हा भावच नसायचा. सहज- अंत:प्रेरणेने केलेल्या ह्या गोष्टी होत्या. १९९४ मध्ये ती निवृत्त झाली तरी कार्यरत राहिली.

अगदी क्वचित पण आजीला मी चिडतानाही बघितलेलं आहे. अगदी माझ्यावर चिडलेलंही बघितलं आहे. सौम्य असली तरी तिची शिस्त होती व तिचाही एक छुपा धाक असायचा. बालपणातल्या सर्वांत रम्य अशा असंख्य आठवणी आजीसोबतच्या आहेत. आजी आजोबांसोबत केलेले ट्रेनचे व बसचे प्रवासही आठवतात! त्याकाळी रेटारेटी फार असे! पुढे २००४ मध्ये आजी- आजोबा औरंगाबादला आनंदमामाकडे शिफ्ट झाले. त्याआधी नऊ वर्षं प्रचारक म्हणून आनंदमामाने वनवासी भागामध्ये डॉक्टर म्हणून सेवाभावी काम केलं होतं. त्यामागची प्रेरणाही आजी- आजोबांचीच होती. आजी- आजोबांनी मुलांना सामाजिक चाकोरीच्या बाहेर जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिलं.

कालांतराने शिक्षण, जॉब नंतर प्रपंचाने मला ह्या तेवत्या समईपासून दूर नेलं. औरंगाबादच्या वर्षांमध्येही आजी सक्रिय राहिली. लोकांशी जोडलेली राहिली. अगदी २०१२ पर्यंत मला स्वत: फोन करायची. अधून मधून होणार्‍या भेटींमध्येही तीच स्निग्धता मिळायची. तिचे मुलं- सुना- मुलगी, जावई आणि नातू- नाती सगळ्यांचा तिला प्रचंड अभिमान! कमालीचं कौतुक! तिला भेटल्यावर जुनं जग- अगदी स्वातंत्र्याच्या वेळचा काळ कसा होता, हे तिला विचारायचो. तीही रंगून आठवणी‌ सांगायची. त्या काळात तिने सांगितलेली एक आठवण म्हणजे १९४९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यावरून ट्रेनने कलकत्त्याला जात होते. तेव्हा नागपूर स्टेशनवर त्यांना बघायला आलेल्या विशाल जनसमुदायामध्ये तीसुद्धा होती! औरंगाबादला खूप नवीन लोकांना तिचा सहवास मिळाला. तिने तिच्या आठवणीही लिहील्या. त्याचं पुस्तक करायचं ठरलं. 'आठवणींच्या हिंदोळ्यावरून' आणि 'वेचलेले मोती' अशी पुस्तकंही संकलित झाली. पण तोपर्यंत तिला विस्मरण- डिमेंशियाचा त्रास सुरू झाला. एक एक करत स्मृतीचा र्‍हास सुरू झाला. शरीरही थकत गेलं. तिने तीन वर्षं ह्या स्थितीत काढले. सुमनमावशींनी तिची त्या काळात खूप सेवा केली. विस्मरणामध्येही तिला सगळ्यांची नावं आठवायची. सगळ्यांबद्दल मनात प्रेम यायचं. तिची ही अवस्था जीवनाला फार काळ बघवली नाही आणि २८ एप्रिल २०१५ रोजी तिच्या ज्योतीने प्रस्थान केलं!

आजी कशी होती आणि काय होती हे आजोबांनीच नंतर बोलून दाखवलं. काहीसे कठोर असलेल्या आजोबांचे आजी गेल्यानंतरचे हे शब्द होते- ती फार चा‌ंगली होती. मी तिला नीट समजून घेतलं नाही. अशा ह्या सुगंधी आठवणी! डिमेन्शिया जितका घात करत नाही तितकं अशा अशा व्यक्तींचं झालेलं विस्मरण घातक ठरतं. एके काळी असेही लोक होते, असंही साधं- सुंदर जग होतं, हे लक्षात राहण्यासाठीचं हे स्मरण.

वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्या लेखातले काही तपशील माझ्या आईकडून (सौ. संध्या वेलणकर) घेतलेले आहेत.

- निरंजन वेल‌णकर 09422108376

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान आठवणी.
उदयनगर चा भाग माहितीतला असल्यामुळे चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं

अतिशय हृद्य, छान, मनाला भिडणारं लिहिलय,
आपल्या सर्वांच्या जीवनात असे अनमोल क्षण अन आठवणी असतात.
माझ्या आजी आजोबांच्या आठवणी लिहायची मला तुम्ही प्रेरणा दिलीत... स्वान्त: सुखाय
जियो

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! Happy

@ रेव्यु जी, नक्की लिहा.