आम्रसांदणी (अजूनही चुकवून दाखवा!)

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 April, 2024 - 17:37
आंबा इडली
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप* गव्हाचा बारीक^ रवा
१ कप* आंब्याचा रस
अर्धा कप* दही
साखर चवीप्रमाणे
मिठाची चिमूट चवीप्रमाणे आणि ऐच्छिक
दीड टेबलस्पून तूप
थोडंसं दूध

क्रमवार पाककृती: 

तुपावर रवा छान गुलाबी भाजून घ्या.
भाजलेला रवा ताटात पसरून निवू द्या.
तोवर आमरस गाळून त्यात दही रवी किंवा व्हिस्कने एकजीव करून ठेवा.
निवलेला रवा रसात हलक्या हाताने (व्हिस्कने) नीट मिसळून घ्या, त्यात गुठळ्या राहू देऊ नका.
मिश्रणात चवीनुसार साखर आणि आवडत असेल तर किंचित मीठ घाला.
दोनेक तास हे मिश्रण मुरत ठेवा.
दोन तासांनी रवा रसात मस्त फुलून आलेला असेल.
आता वाफवायची तयारी - पाणी उकळायला ठेवा आणि इडलीपात्राच्या वाट्यांना तुपाचा हात लावा.
मिश्रण घट्ट वाटलं (आणि वाटेलच) तर थोडं दूध घालून इडलीच्या पिठासारखं सरसरीत करून घ्या.
डावेने इडलीपात्रात घालून वीस मिनिटं वाफवा.
तुपाशी किंवा नारळाच्या दुधाला लावून छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात १६ इडल्या होतात.
अधिक टिपा: 

१. *कप म्हणजे मेझरिंग कप

२. ^मी बारीक रवा, लापशी रवा, इडली (तांदुळाचा) रवा असे बदल करून पाहिलेत. गव्हाच्या बारीक रव्याच्याच छान होतात या पद्धतीने.

३. मोसमात ताज्या रसाच्या इडल्या उत्तमच होतील, पण या मी देसाईंच्या कॅन्ड रसात केल्यात आणि सुंदर झाल्यात.
ताजा रस हॅन्ड मिक्सीने घुसळून मग गाळून घ्यावा लागेल.

४. सांदणांच्या पारंपरिक रेसिपीत दही घालत नाहीत, दूधच वापरतात, आणि ती सहसा तांदुळाच्या रव्याची करतात. म्हणून पाककृतीच्या नावात ‘पण’ आहे.

५. कृती फार म्हणजे फारच सोपी आहे. मी तर म्हणते चुकवून दाखवाच!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> आंब्याचा शिरा बनवुन का खात नाही.
हे फिंगर फूड होतं म्हणून. Happy
पुरणाला किंवा बटाटाभाजीला साधी पोळी लावून खाता येतेच, तरी सारण भरून पुपो किंवा पराठे का करतात? कलिनरी प्रयोग! Proud

येस, सांदणं कोकणातलीच. Happy

पुरणपोळीची भूक पुरणासोबत पोळीवर
अशी म्हण आजपासून सुरू होत आहे. बखरकारांनी याची नोंद घ्यावी.

भारीच एकदम चर्चा आणि नावे, पण फोटो सुंदर दिसतायत. पाकृ सुंदर हे सांगायला नकोच. माझी आई करते अशा प्रकारे सांदण आंब्याचं.
सलग वाचल्यामुळे माझ्याकडून सांडणी सांडणी वाचलं जातंय. Lol
AI चे फोटो डेंजर एकदम
पण माझा पास आहे Sad मला नाही आवडत आंबा शिजताना जो वास येतो तो.. त्यामुळे आंगण वाकडे आहे.
तसेही मी राहते तिथे mango pulp नाही मिळत त्यामुळे कोल्ह्याला द्राक्षे आंबटच

अगं आम्रसांदणी सोन वर्खीणी
काय म्हणू तुला तू हायस तरी कोन

pulp चा रिकामा डबा फेकून मारू नका पळाss

अगं आम्रसांदणी सोन वर्खीणी >> अहाहा! इतक्या छान प्रतिसादानंतर खाली आचार्यांनी पिठलं म्हणून एकदम लाजच काढली. Lol Lol

आचाऱ्यांचे आणि आचार्यांचे आचार निराळेच.

>>> अगं आम्रसांदणी सोन वर्खीणी
वा वाा!

आचार्य ‘लंचबॉक्स’ मराठीत डब करतायत का? Proud
हर्पा, यांना आचार्यसंहिता लागू करावी काय? Proud

सांदणे जास्त मऊ झाली असावीत आणि बेसनाचे लाडू जसे जास्त तूप झाल्यास 'वळून खा ' प्रकारात transform होतात तसे झाले असणार Lol

तुमच्या मिसेस ना स्वातीकडून बक्षीस मिळणार चुकवून दाखवल्याबद्दल.

चुकवून दाखवायचा विडा उचलून शेवटी कामगिरी फत्ते केली. या गोष्टी चुकवल्या -
१. रवाळ झाल्या नाहीत. मी 'samolina coarse' असं लिहिलेला पण हाताला जाड न लागणारा रवा वापरला. हा हा तो तो नाही बहुतेक. बारीक म्हणजे बारीक हे आता नोंदवून ठेवतो.
२. वरील इतरांप्रमाणे थोडी कमी गोड झाली. मी जास्तीची साखर घातली नव्हती. कॅन मधला रस वापरला आणि त्यात आधीच जास्त साखर असते अशी माझी समजूत होती.
३. कृतीमध्ये १६ इडल्या होतात असं लिहिलं आहे, पण माझ्या पावणे पंधरा झाल्या.

Screenshot_20240525_161148.jpg

अरे! इथे पाहिलंच नव्हतं!

रवाळ म्हणजे नेहमीच्या तांदुळाच्या (+ उडीद) इडल्यांसारखं नाही होत टेक्स्चर, मऊ शिऱ्यासारखं होतं. पण फोटोवरून या पुरेशा फुललेल्या वाटत नाहीयेत हे खरं आहे. म्हणूनच कमी भरल्या असाव्यात.

वाफवण्याआधी दूध घालून पीठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली होतीस ना?

मी काल्पनिक टाईम मशीन मध्ये बसून त्यात थोडं इनो घालून शिजवलं, आणि गरम गरम खाऊन टाकलं.सोड्याची चव जाणवेल, पण इडली थोडी फुगल्याने सोडत्वाचा सल कमी होईल.
(किंवा अजून सीनफुल करायचं तर वर मस्त नॅचरल मँगो आईस्क्रीम घालून त्यात भिजलेल्या चमच्याने खाऊन टाकायच्या.कोणी आयत्या करून देत असेल तर खायचे अनेक मार्ग आहेत.)

हर्पा, तुमच्या आम्रइडल्या दिवाळीतील रव्याच्या लाडवाप्रमाणे दिसत आहेत . फरक इतकाच रव्याचे लाडू गोल असतात , इथे त्या चपट झालेल्या आहेत Light 1

Pages