आम्रसांदणी (अजूनही चुकवून दाखवा!)

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 April, 2024 - 17:37
आंबा इडली
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप* गव्हाचा बारीक^ रवा
१ कप* आंब्याचा रस
अर्धा कप* दही
साखर चवीप्रमाणे
मिठाची चिमूट चवीप्रमाणे आणि ऐच्छिक
दीड टेबलस्पून तूप
थोडंसं दूध

क्रमवार पाककृती: 

तुपावर रवा छान गुलाबी भाजून घ्या.
भाजलेला रवा ताटात पसरून निवू द्या.
तोवर आमरस गाळून त्यात दही रवी किंवा व्हिस्कने एकजीव करून ठेवा.
निवलेला रवा रसात हलक्या हाताने (व्हिस्कने) नीट मिसळून घ्या, त्यात गुठळ्या राहू देऊ नका.
मिश्रणात चवीनुसार साखर आणि आवडत असेल तर किंचित मीठ घाला.
दोनेक तास हे मिश्रण मुरत ठेवा.
दोन तासांनी रवा रसात मस्त फुलून आलेला असेल.
आता वाफवायची तयारी - पाणी उकळायला ठेवा आणि इडलीपात्राच्या वाट्यांना तुपाचा हात लावा.
मिश्रण घट्ट वाटलं (आणि वाटेलच) तर थोडं दूध घालून इडलीच्या पिठासारखं सरसरीत करून घ्या.
डावेने इडलीपात्रात घालून वीस मिनिटं वाफवा.
तुपाशी किंवा नारळाच्या दुधाला लावून छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात १६ इडल्या होतात.
अधिक टिपा: 

१. *कप म्हणजे मेझरिंग कप

२. ^मी बारीक रवा, लापशी रवा, इडली (तांदुळाचा) रवा असे बदल करून पाहिलेत. गव्हाच्या बारीक रव्याच्याच छान होतात या पद्धतीने.

३. मोसमात ताज्या रसाच्या इडल्या उत्तमच होतील, पण या मी देसाईंच्या कॅन्ड रसात केल्यात आणि सुंदर झाल्यात.
ताजा रस हॅन्ड मिक्सीने घुसळून मग गाळून घ्यावा लागेल.

४. सांदणांच्या पारंपरिक रेसिपीत दही घालत नाहीत, दूधच वापरतात, आणि ती सहसा तांदुळाच्या रव्याची करतात. म्हणून पाककृतीच्या नावात ‘पण’ आहे.

५. कृती फार म्हणजे फारच सोपी आहे. मी तर म्हणते चुकवून दाखवाच!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कृती. अगदी सुंदर, जाळीदार, लुसलुशीत दिसताहेत. 'चुकवून दाखवा' आवाहनामुळे आता 'माकाचुना' धाग्याला वाव मिळेल. Lol

फोटो लय म्हणजे लयच भारी दिसतोय!
गव्हाचा रवा म्हणजे उपमा करायला वापरतो तोच ना? सोडा नाही लागत का अजिबात.
आजच परत हापुस मिळालेत. बघतो चुकतात का. Happy

अमित, हो शिऱ्या/उपम्याला वापरतो तोच रवा.
बेकिंग पावडर/सोडा काहीही लागत नाही.
तसंच काहीही ॲडिशनल फ्लेवर (वेलची / केशर इ.) घालायचा नाही. आंब्याचाच स्वाद (चव, वास, रंगही) सुंदर येतो!
चुकवून दाखव आणि कळव. Proud Happy

सुंदर दिसतायत, चवीला पण भारी होतात हेही (स्वातीच्या हातच्या खाऊन) सांगतेय Happy रेसिपी इतकी सोपी असेल असे वाटत नाही.

मस्त ! ही रेस्पी आणि शीर्षकातील दावा पाहून करून बघण्याचा मोह होतोय. करूनच बघतो.

चुकवून दाखवलं तर बक्षीस काय मिळणार?

>>> चुकवून दाखवलं तर बक्षीस काय मिळणार?
महाचुकवेश्वर/री हा खिताब देता येईल, पण ती वेळ यायची नाही. Proud

सुंदर दिसतायत.
मी लहानपणापासून फणसाचीच सांधणं खाल्ली आहेत. आंब्याचीही क्वचित खाल्ली आहेत, नाही असं नाही. करून बघितली पाहिजेत.
माझी बेसिक शंका आहे. नेहमी तांदुळाचा रवा/इडली रवा वापरतात सांधणांना. यात गव्हाचा रवा वापरलाय. असं का? चांगला फुलतो म्हणून का?

हो, आणि छान मऊसर भिजतो आणि शिजतो....... +१.
काकडीचे धोंडस करताना मी हाच रवा वापरते.आता आंब्याचे सांदणं करताना वापरणार आहे. अवनमध्ये करायचा बेत आहे.

छान वाटतंय. भरपूर आंबे आले की करून बघण्यात येईल.
बाकी चुकवून दाखवा वगैरे काय खरं नाही. माबोकर सांदण चुकवण्याचे १०१ प्रकार करून दाखवू शकतात.

तुझे देख के आमरस इडली
दखनी शेजारीण चिडली
तुझे एक बार चंखके देखा
पडोस मे आयी रेखा
तूने मुंह का टेस्ट जो खौला
डोका कामातून गेला
बाई बाई, आमरसाचा कस्सा पिसारा फुलला

मस्तच रेसिपी काय दिसतायत ! अगदी हलकी झलियेत हे कळतंय फोटो बघूनच.
शीर्षक ही आवडलं खुप.
र आ विडंबन भारीच.

जबरी दिसतं आहे. आंबा इडली हे नाव या गोड पदार्थाला थोडं जंगमार की कुसुकू टाईप वाटलं. निदान - "तुमच्या घमेल्यात आंबवायचा हा इडली रवा नव्हे, ह्याला स्पेशल रस लागतो" - अशी शीर्षकात तळटीप पाहिजे होती. Wink

आचार्य Lol
हर्पा, तूच सुचव मग आता एखादं साजेसं भारदस्त नाव. Proud

सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार. Happy
आता पुढचे काही दिवस कोण कोण च्यालेन्ज घेतंय याकडे लक्ष ठेवीन. Proud

र आ Lol

बिघडवण्यात मी पहिली आले.
मी संदान(टायपो आहेसमजून घ्या) केले आणि यशस्वीपणे बिघडवले.एरवी बरेचदा केले आहेत.काल हमखास बिघडले
आंबा,गूळ,वेलची,मीठ आणि रवा सर्व तासभर भिजवले.जरा रस जास्त होता,वाटले फुलेल नंतर.बेपा काल घातली.एरवी घालत नाही.
चवीला छान लागले तर काय नवल नाही.पण जरा हलके होते तसे झाले नाही.
अगोड,कोवळे,आंबे असतील तर त्याचा रस काढून फ्रीझर्मधे ठेवते.तोच अशा पदार्थांसाठी वापरते.

अजनबी, भारी दिसतायत तुमच्या इडल्या.

देवकी, पण बक्षीस माझी रेसिपी तंतोतंत फॉलो करून बिघडवून दाखवली तरच मिळणार आहे. Proud

अस्मिता, 'माकाचुना' ही ट्यूब आत्ता जरा लेट पेटली! Lol

धन्यवाद , स्वाती_आंबोळे , त्या मी तांदळाच्या बनविल्या होत्या व आंबा गावचा होता आणि ठरवून न्हवत्या बनविल्या।

खूप उशीर झाला आता बाई... तुमची ट्यूब पेटली पण आमची 'बिजलीवाली आजी' झाली त्याचं काय.. ! Proud

हर्पांना मम. या इडल्यांना काही तरी सुरेख नाव शोधून पापप्रक्षालन करा आता.

देवकी तैनी चॅलेंज सुफळ संपूर्ण केलं की Lol

अजनबी, भारीच दिसताहेत.

Pages