प्रशस्त वाडे वर्सेस ‘फ्लॅट संस्कृती’

Submitted by ब्लू कोलंबसे on 27 April, 2024 - 02:05

शहरात कॉलेजला शिकायला गेलो त्यानंतर ग्रामीण भागात आपणच राहत असलेल्या मित्रांच्या जुन्या वाड्यांचे महत्त्व समजलं आणि सौंदर्यदृष्टी आली. चौसोपी, दगडी, मराठी वाडे आवडू लागले आणि शहरांमधील त्याचवेळी वाढणारी सिमेंटच्या ठोकळ्यांची गर्दी बघून मन विषण्ण होऊ लागले. तेव्हाच बालमित्राबरोबर असा एक छोटासा संकल्पही करून झाला की, पैसे मिळतील तेव्हा दगडी, चौक असणारा, मस्त वाडा बांधायचा.

या संकल्पानंतर माझ्या जुन्या वाड्यांबद्दलच्या मतांमध्ये प्रचंड फरक पडत गेला. कालांतराने समजलं, वास्तुमध्ये आनंद नसतो तर तो राहणाऱ्या व्यक्तींच्या मनात असावा लागतो.

त्यामुळे दिल्लीमध्ये बारा महिन्यांसाठी Isdm मध्ये आलेल्या माझ्या काही मैत्रिणींनी आपापली रूम इतक्या उत्तमपणे सजवली होती की, मला वाटले बारा महिन्यांच्या वास्तव्यासाठी हे लोक आपले वास्तव्य स्थान, खोल्या एवढ्या कष्टाने सजवू शकतात तर मग आपण जिथे कायमचे राहतो तिथे आपल्याला हवी तशी फ्रेश सजावट का नाही करत?

त्यातून 'सिमेंटच्या ठोकळ्यांबद्दलचा नाराजीपणा, आधुनिक स्थापत्य शैलीला शिव्या घालणे, बदल पाहून हळहळ करणे' बंद झाले आणि त्याचबरोबर 'बदल होतात, पण त्याबद्दलचा विचार हा असा लव-हेट स्वरूपाचा नसून तटस्थ असावा', या भावनेत बदलला.

पुढे या अशा 21व्या शतकातील या 'स्थापत्य सजावटी'ची हटके संस्कृतीची दिल्लीमध्ये ओळख झाली. पुण्यामध्ये ती वाढली, बाळसं धरू लागली. बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये आणि तेथील कॅफेमध्ये जाऊन तिकडच्या खाण्याबरोबरच काही अतिरिक्त पैसे हे मन शांत करणारे अशा मंद संगीताच्या आणि आदर्श सजावटीच्या जागेसाठी देण्याची मानसिकता वाढली. 'कसंतरी, काही पण, कुठेही खायचं', ही संकल्पना बदलत गेली, याविषयी जगण्याचाही मनामध्ये स्वीकार झाला आणि एक मनातील मध्यमवर्गीय चौकट मोडीत निघाली.

जगण्याचा पुरेपूर आनंद घेणे आणि योग्य गोष्टी खरेदी करण्यासाठी पैशाकडे न बघणं व त्याचवेळी आर्थिक चंगळवाद टाळणे हे मनामध्ये स्थिरावलं.

पुढे कालच कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून प्रवास करत असताना जाणवलं, स्त्रीवादी आणि स्त्रीच्या सुविधा यांचा विचारच न करता जुने वाडे आणि त्यातली अंधारी माजघरे, स्वयंपाकघरे बांधली असतात.

खरंतर स्त्रियांसाठी एक प्रकारची स्थापत्यशैलीतील आणि वावराची मुस्कटदाबी करणारी ही छळछावणीच म्हणायची, कारण यामध्ये पुरुषांच्या उठाबसायच्या जागा या पुरेशा हवेशीर, उजेडाच्या, खिडकी असलेल्या आणि या जुन्याच वाड्यांमध्ये अंधाऱ्या मोऱ्या आणि इतर अशा अंधाऱ्या जागांचा विचार करता मला प्रश्न विचारू वाटल. मध्ययुगीन काळापासून या प्रकारचे वाडे बनत आहेत, त्यांनी स्त्रिवर्गावर मुस्कटदाबी तर केलीच, पण त्याचबरोबर स्वच्छ उजेड, प्रकाश न येऊ देण्याची व्यवस्था करत सामंती घरंदाज परंपरांना जपणे आणि निसर्गाशी प्रतारणा करत हवा, उजेडाला येऊ न देण्याची चुकीची रचना झाली हे कळालं.

त्यामुळे माझा विचार हा ‘ सुंदर वाटणारे वाडे‘ ते ‘पर्यावरणास पाठ ठेवून उन, हवा, उजेड पुरेसा खेळला न जाण्याची रचना’ असा बदलत गेला.
(अर्थात हा एकांगी विचार आहे. प्रत्येक गोष्ट 'ग्रे शेड'मध्ये असते.)

याच वर्षी मी माझ्या घरामध्ये फ्रेंच विंडो बसवून घेतल्या. त्यामुळे घरात उजेड वाढलाच आणि त्याचबरोबर हवाही खेळती राहून चक्क लाईट बिल कमी येऊ लागले. हे सर्व घडले आमच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये.(फोटो वर जोडला आहे.)

त्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन माझा ‘प्रशस्त जुना वाडा’ याच्याकडे बघण्याचा विचारकोन बदलला आणि मी चिकित्सक दृष्टीने माझ्याच विचारांना आव्हान देत ‘फ्लॅट संस्कृती’कडेही बघू लागलो.

सेपियन वाचल्यानंतर समजले की ‘जुनं ते सोनं’ हा विचार सोडून सतत नव्याचे निर्माण करायला हवे, त्या नव्या गोष्टींचा खुल्या दिलाने आणि मनाने स्वीकार करायला हवा आणि तेच मी करतोय आणि हा माझा वाड्यांबद्दल विचार हा स्त्रीवादी साहित्य वाचल्यानंतर आणि पर्यावरण पूरक जीवनशैलीबद्दलचा आदर आणि त्याचबरोबर चिकित्सक विचार याच्या मिश्रणातून तयार झाला.

Group content visibility: 
Use group defaults

कौलारू दीड खोल्यांच्या चाळीत वाढल्याने प्रेम आहे पण आता राहू शकणार नाही चाळीत. एकीकडे आपल्या आई बाबांना परवडत नसताना छप्पर देणारी वास्तू म्हणून एक आदर वाटतो नक्कीच. टॉयलेट कॉमन असणं ही मात्र अजिबातच न आवडणारी गोष्ट.

बऱ्याच कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांचा आधार होत्या अशा चाळी.

आता फ्लॅटमधेच रहायला आवडतं.

अंजू, हे बरोबर आहे. दुसरं काही परवडण्यासारखं नव्हतं. तेव्हा कमी भाड्यात हा आसरा मिळाला. डोक्यावर छप्पर होतं. त्या वेळेचं ऋण मान्य करायलाच हवं.

हो नक्कीच हे ऋण मानायलाच हवं. काही वास्तू, काही शहरे परवडत नसताना आधार देतात.

लग्न झाल्यावर ना सो त आल्यावर दोन खोल्यांचाच फ्लॅट होता पण डोंबिवलीत फ्लॅट घेणं परवडेपर्यंत त्या शहराने आधार दिला. बरेच जण त्यावेळी तिथे राहून नंतर बोरिवली, गोरेगाव, ठाणे, डोंबिवलीत वगैरे शिफ्ट झाले.

आता परत चाळीत, ना सो वगैरे रहायला जायला आवडणार नाही पण त्यावेळी त्रासातही आनंदात दिवस काढले.

लेख छान आहे, आवडला. हे वरती पहिल्या कमेंट्मधेच लिहिणार होते, राहून गेलं.

Pages