नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ३

Submitted by साधना on 17 April, 2024 - 13:58

मागचा भागः https://www.maayboli.com/node/84965

शेताची पुजा करून १५ जानेवारी २०२१ ला रोप लावणीचा कार्यक्रम सुरू केला. गावठाण वाडीतल्या म्हणजे आमच्याच वाडीतल्या बायका सगळ्या मावशीच्या मैत्रिणी. केवळ मावशीमुळे त्या माझ्या शेतावर कामाला यायला तयार झाल्या. या बायका नियमीत मजुरीवर जाणार्‍या नव्हत्या. गावी वनखात्याची नर्सरी आहे, त्यात अधुन मधुन कामाला जाणार्‍या या बायका. त्यांना शेतातल्या कामाचा तितकासा अनुभव नव्हता. पण तरीही त्या प्रेमाने यायच्या. अर्थात मी मजुरी देत होते.

उसरोपाच्या दोन ओळीतले अंतर सरीमुळे फिक्स होते पण दोन रोपांत मला २ फुट अंतर हवे होते. गावच्या बायकांना रोपे जवळजवळ लावायची सवय. त्यांना सांगुनही अंतर ठेवणे जमेना. शेवटी दोन फुटांच्या काठ्या करुन दिल्या आणि काठी जमीनीवर ठेऊनच रोप लावा ही तंबी दिली. तेव्हा कुठे रोपलावणी मला हवी तशी सुरू झाली.

एवढ्या मोठ्या शेतावर मी कुठे व किती लक्ष देणार? त्यात मलाही फारशी माहिती नाही. आमची लावणी बघायला एक शेजारी आले. ते म्हणाले , हे काय? सर्‍यांच्या सुरवातीला का नाही रोप लावत? एका रोपाची जागा फुकट घालवताय तुम्ही..... आम्ही मग तसे केले. परिणाम हा झाला की नंतर पाणी लावताना ह्या बिचार्‍या टोकाच्या रोपाला जोरात पाणी मिळून त्याची माती वाहुन जायची, मुळे उघडी पडायची.. Happy सर्‍या पाडणार्‍याने पुर्व पश्चिम सर्‍या पाडल्या होत्या आणि उत्तर -दक्षिणेला एक लांबचलांब पाट ठेवला होता. बायकांनी या पाटातही रोपे लावली. नंतर भरती करायला त्याच ट्रॅक्टरवाल्याला बोलावले. तो पाटातली रोपे बघुन म्हणाला, हे काय? ह्याच्यात का रोपे लावली? मी ही जागा मुद्दाम खाली ठेवली होती, भरती करताना ट्रॅक्टर फिरवायला जागा राहावी म्हणुन... मी गप्प Happy Happy

रासायनिक शेती करणारे लोक रोपे लावल्यावर लगेच एक आळवणी घेतात. म्हणजे रोप मरु नये, वाढु लागावे म्हणुन एक टॉनिक + खत असे काहीतरी केमिकल पाण्यात मिसळून एकेक पेला प्रत्येक रोपाच्या बाजुला गोल टाकायचे. माझ्या जमिनीत तेव्हा काहीही खत नव्हते, त्यामुळे मला जरी रासायनिक शेती करायची नव्हती तरी आळवणी केली. रोपे मरुन गेली तर काय करणार? त्यानंतर एका महिन्याने रासायनिक खतांचा एक डोस दिला. आजवर मी वापरलेली रासायनिक खते एवढीच. यानंतर मी कुठलेही रासायनिक खत वापरले नाही.

खत म्हणुन मी जीवामृत देणे सुरू केले. साधारण दर दहा पंधरा दिवसांनी मी उसाला पाणी देत होते. पाण्याचा उपसा जिथे होता तिथे मी जीवामृताचा बॅरेल ठेऊन पाईपने पाण्याबरोबर जीवामृत सोडून देत होते. साधारण एका एकराला २०० लिटर जीवामृत पुरेसे होते. म्हणजे मला २ बॅरेल जिवामृत पुरायला हवे होते. पुर्ण शेतात पुर्व पश्चिम सर्‍या पाडल्यावर त्यावर पाणी देण्यासाठी उत्तर दक्षिण पाट काढले होते. हे पाट शेताचे आयताकृती भाग करतात. या प्रत्येक भागालाही सरी असे म्हणतात. म्हणजे पश्चिमेच्या कोपर्‍यातुन सुरवात करुन सरी १, सरी २ अशी नावे आम्ही ठेवली होती. अशी नावे ठेवणे आवश्यक असते कारण गड्याला काम सांगताना अमुक सरीत अमुक करायचे आहे असे सांगणे सोपे जाते. माझ्या शेतात अशा ११ सर्‍या होत्या.

माझ्या गड्याचा काम करण्याचा स्पिड अगदीच कमी असल्यामुळे त्याची एका दिवसात साधारण १ सरी पाणी देऊन व्हायचे आणि त्या दिवसभरात एक बॅरेल जीवामृत संपायचे. मी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सर्‍यांत जीवामृत द्यायचा प्रयत्न करायचे. पण पुर्ण शेताला जीवामृत मिळतेय असे मला वाटायचे नाही. कारण दोन बॅरेल जीवामृत ३-४ सर्‍यात संपायचे. माझ्याकडे बॅरेले दोनच होती आणि डिसेंबरातल्या थंडीत जीवामृत तयार व्हायला ५-६ दिवस लागायचे. तेच उन्हाळ्यात ३-४ दिवसात जीवामृत तयार व्हायचे. शेताची खतांची पुर्ण गरज मी भागवू शकत नव्हते. याचा अर्थातच उत्पादना वर परिणाम झाला.

पुर्णपणे रासायनिक शेतजमिनीवर मी पहिल्याच वर्षी उसाचा प्रयोग करायला नको होता. त्या जमिनीवर आधी द्विदल पिक घेऊन जमिनीतला नत्र वाढवायला हवा होता आणि मग उसाचा प्रयोग करायला हवा होता. यासाठी ऑक्टोबरात शेत नांगरुन घेऊन लगेच पुर्ण शेतात चवळी, मुग किंवा हिरवळीचे खत (ताग, धैंचा वगैरे) लावून त्याची जानेवारी शेवटपर्यन्त काढणी करुन मग फेब्रुवारीच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यात ऊस लावायला हवा होता.

मी पाळेकर पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या संपर्कात होते, त्यांनी साधारण अशाच स्वरुपाचा सल्ला दिला होता पण सगळेच सल्ले अंमलात आणता येत नाहीत. आजुबाजुला सगळेच जण अमुक एका प्रकारची शेती करत असताना तुम्ही काही वेगळे करायला लागलात तर तुम्ही कसे चुक आहात हे सांगणार्‍यांची गर्दी जमते. आणि त्यात शहरातुन पुस्तकी ज्ञान गोळा करुन आलेली एक बाई हे करतेय म्हटल्यावर ती मुर्ख आहे हा शिक्का मारणे अगदीच सोपे जाते. मला कुठल्याही शिक्क्याने काहीही फरक पडत नव्हता पण माझ्या सोबत मावशी होती, लोक तिच्यावर प्रेशर घालायचे, तिला फरक पडत होता. इतके पैसे खर्च केलेत तर जरा चांगली शेती करा, नैसर्गिक शेतीची फॅडे आंंबोलीत चालणार नाहीत, उगीच वेळ वाया घालवू नका वगैरे वगैरे भरपुर कानावर यायचे. मी डोक्यावर बर्फाची लादी ठेऊन दिलेली होती. मी सगळे ऐकायचे आणि काहीच उत्तर द्यायचे नाही. तसेही मी एक वर्ष शेती केल्यावर शेती सोडून पळणार याबद्दल बहुतेकांची खात्री होती. Happy

ऑक्टोबरात शेत तयार असणे अशक्यच होते त्यामुळे द्विदल वगैरे विचार सोडुन द्यावा लागला आणि लोकांचे प्रेशरही होते व माझी गरजही होती म्हणुन मी ऊस लावला. ऊस लावल्यानंतर 'तुमचे जीवामृत वगैरे द्या पण थोडा युरियाही द्या, नाहीतर काहीही वाढणार नाही' हा सततचा सल्ला मात्र मी सरळ धुडकाऊन लावला. मी सरळ सांगायला सुरवात केली की शेतात काहीही आले नाही तरी चालेल पण युरीया वगैरेचा सल्ला मला अजिबात देऊ नका. पहिले पुर्ण वर्ष मला ह्या सल्ल्याविरुध्द लढाई करावी लागली. मला लोकांचे वाईट वाटायचे कारण मी त्यांचे अजिबात ऐकणार नाही हे मला माहित होते पण सल्ला देणार्‍यांना आशा होती की सततच्या हॅमरींगमुळे मी शहाणी होईन Happy आता मला कोणीही खतविषयक सल्ला देत नाहीत , इतर सल्ले मात्र देतात. ही बया खताच्या बाबतीत अजिबात ऐकत नाही हे त्यांनी आता स्विकारलेय. पण माझे पुस्तकी ज्ञान चुकीचे आहे हे मला अधुन मधुन ते ऐकवतात.

बर्‍याच जणांना वाटते की शेतीत काय शिकायचे? आपले वाडवडिल शेती कुठुन शिकुन आले का? तरी ते करत होतेच ना? मग आपल्याला का शिकायचे? शेती शिकायची गोष्ट नाही, ती आपोआपच येते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांना हे कळत नाही की वाडवडिल शेती करत होते तेव्हाची हवा, पाणी, पर्यावरण आता राहिलेले नाही. आजोबापर्यंत शेतात जे पिकत होते ते त्यातला माणसांनी खायचा भाग माणसे खात होती व बाकीचा गुरे. तेच परत शेण बनुन शेतात येत होते. एक सुंदर निसर्ग चक्र शेतात होते ज्यात शेतातली प्रत्येक गोष्ट वापरात होती, परत शेतात येऊन पडत होती. वडलांच्या काळात हरित क्रांती झाली, गुरे नाहीशी झाली, त्यांच्या जागी पेट्रोल्/डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर आले. शेतात शेण पडायचे बंद झाले. त्याजागी युरिया आला.

२०२३ च्या जागतिक मृदा दिनानिमित्त आमच्या ग्रामपंचायतीत कार्यक्रम होता. (हे कार्यक्रम कसे साजरे होतात त्याची जम्माडी गंमत मी नंतर लिहिन Happy ) मी गेले होते. सरकारी कृषी अधिकारी आले होते. कार्यक्रमात उत्तम भाषणे झाली. जगभर आणि भारतात शेतजमिन कशी नापिक झालेली आहे आणि ती परत सुपिक करण्यासाठी जगभर व भारतात काय काय प्रयत्न होताहेत याचा आलेख अधिकार्‍यांनी उत्तमरित्या मांडला. एका अधिकार्‍याने सांगितले की भारतिय शेतकरी युरिया वापरायला लागले आणि त्यानी शेण वापरणे बंद केले म्हणुन अधःपात झाला. १ किलो युरियाबरोबर १० किलो शेण असे केले असते तर आजची परिस्थिती आली नसती. मी ऐकुन थक्क झाले. म्हटले हे शेणाचे आजवर कधी ऐकले नाही. कुठल्या पिकाला कुठले खत कधी द्यावे याचे कृषी विद्यापिठाचे कोष्टक असते. त्यात एक वाक्य सुरवातीला असते, अमुक एक टन शेणखत द्या. नंतर कुठेही शेणखताचा उल्लेख नसतो. अमुक दिवसांनी अमुक खत इतके किलो हे अगदी डिटेलवार लिहिलेले असते. ही सगळी खते सर्वत्र उपलब्ध असतात, त्यावर सबसिडीही आहे. पण शेणखत कुठेही उपलब्ध नाही. लोकांनी गुरे बाळगणे बंद केल्यावर शेण बंद झाले. उत्तमोत्तम खते गावागावात उपलब्ध आहेत पण शेणखत नाही. शेतकर्‍यांना शेणखत वापरायचे हे माहितच नाही. शेणखत वापरल्यामुळे शेतात हुमणी उर्फ रोटा म्हणजे व्हाईट ग्रब ही अळी होते हे आमच्या शेतकर्‍यांचे मत आहे त्यामुळे ते शेणखत टाळतात. विकतचे खत घेणे परवडत नसेल तर नाईलाजाने शेणखत घालतात. आणि इथे हा अधिकारी शेतकर्‍यांना दोष देत होता की शेतकरी चुकले म्हणुन जमिनीचे नुकसान झाले. मी म्हटले धन्य रे बाबा हे सरकारी अधिकारी!!! शेतात युरिया घाला हे यांनीच शिकवले, सोबत शेणखतही घाला हे यानी सांगितलेच नाही आणि आता म्हणताहेत हे शेतकरीच गाढव.... नशिबाने या कार्यक्रमाला आंबोलीतील शेतकरी उपस्थित नव्हते त्यामुळे सरकार त्यांच्यावर असला ठपका ठेवतंय हे त्यांना कळले नाही.. Happy असो.

तर लावणी होत आली, मी आळवणी घेतेय, मोकळ्या जागेत काय भाजी लावायचीय वगैरे नियोजन करतेय तेवढ्यात मुंबईला जाऊया असे टुमणे आईने लावले. माझे सर्व भाऊ मुंबईत, जुनपासुन कोणाचीही भेट नाही, करोनामुळे कोणी गावी आलेही नाही त्यामुळे आईला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यात भावाच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायचे ठरल्याचा निरोप मुंबईतुन आला आणि आता चलाच म्हणुन आईने हट्ट धरला.

तिला एकटीला पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे शेतातले काम अर्धवट सोडुन जाणे माझ्या जीवावर आले तरी आम्ही मुंबईला जायचे ठरवले.
तोवर ऊस लागवड होत आलेली पण राखुन ठेवलेल्या अर्ध्या एकरात कडधान्ये लावायची होती. घाईघाईने मी दोन सर्‍यांत झुडपी चवळी लाऊन घेतली. रोजच्यासाठी थोडी भाजी, कडधान्यात मुग व भुईमुग आणि काही ऊसरोपे जर मरुन गेली तर त्यांचा जागी ऊरलेली ऊसाची रोपे लावणी इत्यादी कामे मावशीच्या गळ्यात टाकुन मी मुंबईला गेले. मुंबईला आल्यावर साठलेली एकेक कामे काढली गेली, ती करण्यात पंधरा दिवस गेले आणि त्यानंतर आम्ही आंबोलीत परतलो. आई मुलांकडे थोडे दिवस राहते म्हणत मुंबईत राहिली आणि भावाची मुलगी शाल्मली चेंज हवा म्हणत आमच्यासोबत आली. तिचेही वर्क फ्रॅाम होम होते.

क्रमशः

पुढचा भाग :
https://www.maayboli.com/node/85042

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरू आहे ही लेखमाला.
बाकी गावातल्या लोकांना शहरी लोकांची अक्कल काढणे फार आवडते हा अनुभव घेतला आहे. अशा वेळेस त्यांची एकजूट बघण्यासारखी असते.

हा भागही खूप छान झालाय.

अनेकदा सर्व सूचना अगदी लेखी देऊनही आपल्या गैरहजेरीत कामगार त्यांना रुचेल तेच करतात त्यामुळे शेवटच्या १५ दिवसांच्या उल्लेखाने हा भाग फारच उत्कंठा वाढवणारा आहे.
-------------
नत्र पुरवठा करण्यासाठी युरियाला चांगला आणि स्वस्त पर्याय म्हणून अझोला वापरले जाते ह्या व्यतिरिक्त ते मल्चींग पासून पशुखाद्य असे विविध स्तरावर त्याचा उपयोग व्यावसायिक स्तरावर सिद्ध केला गेला आहे.
----------

तीलापिया प्रजातीच्या मत्स्य संवर्धनाचा इंटिग्रेटेड फार्मिंग मध्ये सर्वात मोठा फायदा इतर पिकांना रोजच्या रोज नत्र पुरवठा करण्यास होतो. हे लिक्विड खत असल्याने ऑटोमेशनद्वारे शेतात सर्व ठिकाणी पोहोचवणे सुलभ जाते.

मस्त आहे हा ही भाग.
बाकी गावातल्या लोकांना शहरी लोकांची अक्कल काढणे फार आवडते>>>>>> सहमत

पुभाप्र

अज्ञानी, धन्यवाद. माझ्याकडे खडकाळ भागही आहे ज्याचा काहीतरी उपयोग करायचा आहे. तिथे पाणी साठवुन त्यात अझोला लागवड करता येईल का हे पाहायचे आहे. मत्स्यपालनही चांगला उद्योग आहे पण पक्षी, विषेशतः पाणकावळे व खंड्या, मासे शिल्लक ठेवत नाहीत असा रिपोर्ट आहे :).

धनवंती व ऋतुराज Happy धन्यवाद.

बापरे बाप ! एका दमात वाचले. पहिल्या पॅरा मध्ये लिहिलेल्या चुका किंवा त्यातून मिळालेला धडा हि बहुतेक झलक असावी नुसती.
खूप छान लिहिताय.. पु भा खूप प्र

<<मत्स्यपालनही चांगला उद्योग आहे पण पक्षी, विषेशतः पाणकावळे व खंड्या, मासे शिल्लक ठेवत नाहीत असा रिपोर्ट आहे :).>>
हौदावर / छोट्या तळ्यावर मासे पकडायची जाळी पसरली तर?

धनवन्ती, तसे करता येईल पण ते किती योग्य असेल माहित नाही. हल्लीच एक बातमी बघितली. ज्वारी-बाजरीवर पक्षी हल्ला करतात म्हणुन काही जणांनी पुर्ण शेतावर जाळे पसरुन ठेवले. कित्येक लहान पक्षी त्यात अडकुन मेले. हे नको ना व्हायला..

पिक येते ते फक्त माणसाने शेतात काम केले म्हणुन नाही तर डोळ्यांना न दिसणार्‍या बुरश्यांपासुन सुरवात करुन नाना प्रकारचे किटक, माश्या, पक्षी, प्राणी यांच्या एकत्रित कामाने येते. या सगळ्यांना त्यांचा मोबदला त्याच शेतात मिळायची सोय निसर्गाने केलेली असते. माणुस त्यात ढवळाढवळ करुन सगळे पिक स्वतःसाठीच ठेऊ लागला तर उद्या पिकच यायचे नाही. भरल्यापोटी हे लिहायला माझे काही जात नाही, काही गुंठे शेती असलेल्या शेतकर्‍याने स्वतःचे पोट भरायचे की या सगळ्यांची काळजी करायची असे कोणाला काय मलाही वाटते पण असे झाले तर काही वर्षात पिक येणे बंद होईल.

इंटरस्टेलार चित्रपटात सुरवातीला 'आता फक्त मका व भेंडी हीच पिके शिल्लक राहिलीत' असे काहीतरी दृश्य आहे. मला तेव्हा इतर पिके नष्ट का झालीत हे कळले नव्हते. एकोसाईडचा अर्थ समजुन घ्यायला हवा असे मला तेव्हा वाटले नाही. आता शेतीचा अभ्यास करताना कळतेय की तपमान २-३ सेंटिग्रेडने वाढले तरी काही पिकांना फुले येणार नाही, म्हणजे फळे धरणार नाहीत. गव्हाला अमुक एवढी थंडी म्हणजे अमुक एक डिग्री तपमान रुजायला व लोंबी फुटायला लागत असेल आणि एखाद्या वर्षी तपमान तेवढे खाली गेलेच नाही तर गहु होणारच नाही. असे सतत होत राहिले तर गहु नामशेष होणार. आंब्याचेही तसेच आहे. त्याला मोहोर यायला अमुक एवढे तपमान लागते. ते जास्त असल्यास फुले येणार नाही, अमुक एवढ्या तपमानात फक्त मेल फुले येणार, फिमेल फुले येणार नाही. आपल्याला हा फरक कळत नाही आणि 'यंदा मोहोर भरपुर आला पण आंबा धरला नाही' असे आपण बोलतो.

कित्येकदा आपण सुवासिक तांदुळ आणतो पण तो सुवासिक नसतो. भात पिकताना तपमान ३५ डिग्रीच्या वर गेले तर सुगंध देणारा जीन इनअ‍ॅक्टिव होतो. सुवासिक तांदळाचा सुवास नष्ट होतो.

ग्लोबल वॉर्मिंग काय हाहा:कार उडवतेय/ऊडवणार हे आपल्या अजुन पुर्णपणे लक्षात आलेले नाही. यंदा एप्रिलमध्ये मुंबईच्या आसपास ४२-४३ डिग्री तापमान झालेय, येऊ घातलेल्या भयानक संकटांची ही नांदी आहे.

शेतकर्‍यांनी तापमान वाढीचा व जल वायु परिवर्तनाचा विचार करुन आपल्या शेताचे/पिकाचे नियोजन करणे आत्यंतिक गरजेचे आहे.

GIFT Tilapia culture आपल्याला २०गुंठा जागेतून ६ महिन्यात 2टन उत्पादन देऊ शकते. (म्हणजे 2 लाख रुपये साधारण)

शेत तळे बांधण्यास सरकारी सबसिडी असतेच. बरेचदा ह्या अर्धा एकर तळ्यात मस्त्यपालन करून (फिशरीज डिपार्टमेंट सुद्धा सबसिडी देते ती वेगळीच) वर्षाकाठी लाखात उत्पन्न बोनस म्हणून पदरी पडते.

मुळदे (कुडाळ) येथे फिशरीज फॅकल्टी आहे तिकडे ह्या सर्वाचे ट्रेनिंग मिळते. सावंतवाडीतील अनेकजण बायोफ्लोक आणि टीलापिया संगोपन करून चांगला नफा कमावत आहेत.

मी आधीसुद्धा लिहिलेले त्याप्रमाणे जर Tilapia च्या जोडीला एक्वेरियम कोई कार्प किंवा गोल्डफिश संगोपन केले (फक्त १० गुंठा जागेत) तरीही वार्षिक उत्पन्न काही लाखाने वाढवता येते. Tilapia खायचा मासा असल्याने किलोचा भाव असतो तर goldfish koi ह्या जाती नगावर विकल्या जातात त्यामुळे कमी जागेत भरपूर उत्पन्न देतात. आंबोलीत लिहिलेले वातावरण २ही प्रजातींसाठी फार पोषक आहे.

@साधना.. तुमचं खूप खूप कौतुक....
एका बैठकीत सगळं वाचून काढलं...खूप नवीन छान माहिती मिळाली..शेती बद्दल अजिबातच काही माहीत न्हवत...
सुंदर ओघवत लिहिता तुम्ही.... सुखासीन आयुष्य चालू असताना असा धाडसी,कष्टाचा निर्णय घेणं खरंच कठीण आहे. आधी इथे कुणीतरी लिहिल्याप्रमाणे आम्हाला साधी कुंडीतल्या रोपाची नीट देखभाल करता येत नाही आणि तुम्ही जमिनीवर शेती करताय..खरंच कौतुकास्पद आहे..
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.

ग्लोबल वॉर्मिंग काय हाहा:कार उडवतेय/ऊडवणार हे आपल्या अजुन पुर्णपणे लक्षात आलेले नाही. यंदा एप्रिलमध्ये मुंबईच्या आसपास ४२-४३ डिग्री तापमान झालेय, येऊ घातलेल्या भयानक संकटांची ही नांदी आहे.>> यावर तुनळी वर खूप आहेत व्हिडिओस कल्पना करवत नाही इतके काही दाखवतात

वाचते आहे. काहीही माहिती नसल्यामुळे काय प्रतिसाद द्यावा काही सुधरत नाहीये पण जे करते आहेस ते थक्क करणारं आहे.

माझ्याकडे फिश टॅन्कमध्ये भरपूर मासे ( ब्लॅक मॉली) झाले होते. ते मी कोकणातल्या एकाला दिले. त्याने हौस म्हणून ठेवलेल्या कमळाच्या हौदात (एक सवा मिटरचा सिमेंटचा वाडग्यासारखा हौद मिळतो ना) टाकले. छान दिसत होते म्हणाला. पण एक दोन महिन्यांत मासे गायब झालेले दिसले. कावळ्यांनी खाल्ले असतील. ,मी म्हटलं की कावळे खात नाहीत काळे मासे. गोल्ड फिश खातात. मग वॉच ठेवल्यावर छोटा किंग फिशर दिसला मासा काढताना. मग बारीक जाळी लावली वरती. आता मासे जात नाहीत पण कमळाच्या 'तळ्याची' गंमत गेलीच.

शेतीचे प्रयोग वाचतोय. कठीण आहे.

नामशेष होऊ नये म्हणून बियाणे साठवून ठेवली जातात.

खायला तर मिळायला हवेत. सुरक्षीत ठेवलेले गहु राहतील पण तापमान असेच वाढत राहिले तर पिकणार नाहीत कदाचित.

तुम्ही सगळे कौतुक करताहात पण मला यात कौतुकास्पद काही वाटत नाही. मुंबईतल्या जबाबदार्‍या संपल्या की गावी स्थायिक व्हायचे हे आधीपासुन डोक्यात होते, मुंबई मला कधीही आवडली नव्हती. मला नोकरीची, ऑफिसातल्या करियरची, त्यातल्या प्रमोशन वगैरेची असोशी नव्हती. आयुष्य चालवण्यासाठी पैसे हवेत आणि त्यासाठी नोकरी करणे गरजेचे आहे, तेवढेच महत्व तिला द्यायचे हे माझे आधीपासुन मत होते. नोकरी म्हणजे आयुष्य नाही, आपले आयुष्य वेगळे आहे त्यातल्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत हे मी संभाळायचा प्रयत्न केला. ( माझ्या नशिबाने मला असे करता आले, प्रत्येकालाच असे जमते असे नाही याची मला जाणीव आहे. )

अर्थात नोकरी करायची म्हणजे तिला प्रायोरिटी द्यावी लागतेच. नोकरीमुळे मी आजही शेतीला पुर्ण वेळ देऊ शकत नाही कारण माझा जॉब खुप डिमांडींग आहे, दिवसभर लॅपटॉप घेऊन बसावे लागते. शेती पुर्ण वेळाचे काम आहे, असे अर्धवट वेळ देऊन ती होत नाही. मी मुंबईत असते तर एवढीही शेती झाली नसती. मला आंबोलीत येऊन राहायचे होते, ते मी केले. शेतीही करायची होती. सुदैवाने तेही जुळुन आले. दुर्दैवाने शेती सुरू केली आणि वर्षात आई व मावशी दोघीही गेल्या, दोघींचा मला जबरद्स्त सपोर्ट होता. त्या गेल्यामुळे शेती, नोकरी व घर या तिन दगडांवर पाय ठेऊन न पडता उभे राहणे खुप ओढाताणीचे होतेय. आता चार महिन्यात रिटायरमेंट आहे. एक्स्टेंशन गळ्यात घालायचे बॉसचे प्रयत्न हाणुन पाडण्यात सध्या वेळ घालवतेय Happy

मला खुप जण सांगतात की तुला शेतीची इतकी हौस आहे तर तु पुण्या-मुंबईच्या जवळ जागा घेऊन शेती कर, आंबोलीतली इतके चॅलेंजेस असलेली शेती करण्यात का वेळ वाया घालवतेस. मी अशा वेळी इतकेच म्हणते की आंबोलीत राहायचे ही इच्छा जास्त तीव्र आहे. आंबोलीतच शेतीही मिळाली हे माझे नशिब. म्हणुन मी शेती करतेय. उद्या आंबोलीत शेती करता आली नाही तरी मी आंबोली सोडून जाणार नाही, शेतीचा विचार डोक्यातुन टाकेन. सुदैव हेच की माझ्या मुलीलाही आंबोली आवडते, तिलाही इथुन जायचे नाही.

कसलेही प्लॅनिंग केले नसतानाही आयुष्यातले प्रत्येक वळण मला हवे तसेच येत गेले. यात माझे प्रयत्न किती व माझे नशिब किती मला माहित नाही. नोकरीही मी झोकुन देऊन केली, शेतीही मी अशीच झोकुन देऊन करतेय. निसर्गाने किती साथ द्यायची हे तो पाहील, मी माझे काम मन लाऊन करणार. यात कौतुक करण्यासारखे काहीच नाही.

आता तुम्ही वर लिहिलेल्या कमेंट ला उभं राहून टाळ्या !! व कडक सॅल्यूट!
तुमचं आधीच ठरलं होतं की जमेल तेव्हा आंबोली ला जाऊन राहावं ते तसं घडतंय plus शेती हा देवाने दिलेला दुसरा डोळा सो तुम्हाला काही वाटत नाही. (म्हणजे कौतुक )
ठरवलंय हे सगळं कदाचित आम्ही सुद्धा!! पण मिळालं(शेत / आवार ) म्हटल्यावर तुम्ही लगेच कामाला लागलात व आहे त्या परिस्थितीतून तोडगा काढताय .. खूप शुभेच्छा तुम्हाला!

साधना, दंडवत तुम्हाला
जिद्दीने करत आहात.
आई मावशीबद्दल वाचून वाईट वाटलं फार.

अश्या पद्धतीप्रमाणे (सुरुवातीचा व्हिडिओ फक्त) केलेल्या ऊस लागवडी /शेती बद्दल काही भारतीय रेफरन्स पाहण्यात / वाचण्यात आले असतील तर जाणून घ्यायला आवडेल.

मुळदे (कुडाळ) येथे फिशरीज फॅकल्टी आहे तिकडे ह्या सर्वाचे ट्रेनिंग मिळते. सावंतवाडीतील अनेकजण बायोफ्लोक आणि टीलापिया संगोपन करून चांगला नफा कमावत आहेत.

हे चेक करते. नेटवर शोधले पण मिळत नाहीय. तुमच्याकडे पुर्ण पत्ता असेल तर द्या. सरकारी ट्रेनिंग आहे, फिशरीज मध्ये लोकांनी पुढे यावे असे प्रयत्न सुरू आहे हे मध्ये एकदा रेडिओवर रत्नागिरीतल्या एका सरकारी खात्यातल्या व्यक्तीच्या मुलाखतीत ऐकले होते.

अश्या पद्धतीप्रमाणे (सुरुवातीचा व्हिडिओ फक्त) केलेल्या ऊस लागवडी /शेती बद्दल काही भारतीय रेफरन्स पाहण्यात / वाचण्यात आले असतील तर जाणून घ्यायला आवडेल.

नोप. विडिओत नाव दिलेल्या जेड शुगरला सर्च केले तर हाच विडिओ येतोय सर्वत्र.

साधना, मस्त लिहिते आहेस. मूल लेख आणि कमेन्ट्स मधे लिहिलेलेही आवडले. सायो म्हणते तसे, यातले जास्त कळत नसले तरी किती अवघड आणि चिकाटीचे काम आहे ते कळतेय. जॉब आणि शेती एकावेळी सांभाळणे हे तर कल्पनेच्या पलिकडचे आहे Happy