(भाग १ - https://www.maayboli.com/node/84969)
अर्जुन लवकर घरी आला होता. आई-बाबा आणि मुलं या वेळी घराबाहेर असतात. उलुपी कुठे कामाला बाहेर गेली नसेल तर घरीच असते. पण या कुठल्याच गोष्टींचा तो विचार करत नव्हता. त्यांचं डोकं भणभणत होतं. आल्या आल्या त्यानं सगळे रात्रीचे कॉल कॅन्सल केले. यूएस डिलिव्हरी हेडला मेसेज टाकला "नॉट फीलींग वेल." तडक किचनमध्ये गेला आणि स्वतःसाठी चहा ठेवला. उलुपी आली तर ती पण घेईल हे लक्षात आल्यावर एक कप वाढवला. थंडीचे दिवस होते त्यामुळे चहा घेऊन अर्जुन टेरेसवर त्याच्या खुर्चीत टेकला तेंव्हा सूर्य पश्चिम क्षितिजावर टेकला होता.
तेवढ्यात उलुपी आली. तिला टेरेसवर बसलेला अर्जुन दिसला. "का रे, लवकर आलास?"
"हं"
उलुपीनं त्याचा चेहेरा बघितला. ती त्याच्याकडे प्रश्नचिन्हांकित नजरेनं बघत उभी राहिली.
"तुझा चहा केलाय. घे नं"
उलुपी न बोलता चहा घेऊन आली आणि अर्जुन च्या समोर बसली. अर्जुन क्षितिजापार नजर लावून बसला होता. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही.
"आज ऑफिसमधे एक कॉन्व्हर्सेशन ऐकलं. मी ऐकणं अपेक्षित नव्हतं. पण एका कॉन्फरन्स रुममध्ये स्पीकर फोनवर बोलणं चाललं होतं. मी तिथे आलो आहे हे बोलणाऱ्यांच्या लक्षात आलं नव्हतं, म्हणून कानावर पडलं. शिट." तो थांबला.
"तर?"
"करणचं लफडं चालू आहे." त्यानं धाडकन सांगून टाकलं.
उलुपी चकित झाली. "क्काय?"
अर्जुन तिच्याकडे बघायला लागला. "हो. आमचा एक टीम लीड सकाळच्या कॉलवर होता. त्याच्या तिकडच्या काउंटरपार्टशी बोलत होता."
"काय म्हणाला तो?" उलुपीच्या आवाजात अविश्वास होता.
"करण एका गोऱ्या पोरीच्या लफड्यात सापडलाय. तो तिच्याबरोबर रहातोय. किंवा ती त्याच्याबरोबर."
उलुपी उठली, "हे कन्फर्म केलं आहेस?"
"नाही. कसं करणार?"
"अर्जुन, दोन टवाळ कार्टी काही तरी बोलतात, आणि तू विश्वास ठेवतोस?"
"बस उलुपी. मी उल्लू नाहिये. आज पहिल्यांदाच हे ऐकलं असतं तर कदाचित मी विश्वास ठेवला नसता. पण ही कुणकूण मी बरेच दिवस ऐकतोय."
"अगोदर का बोलला नाहीस ते?"
"कशाला उगाच अफवा पसरवा? आणि गमती गमतींत उल्लेख व्हायचा याचा, सिरीयसली घेण्यासारखं काही वाटलं नाही."
"मग आज?"
"आज हे दोघे जणं खुल्लमखुल्ला चकल्लस करत होते गं. आणि त्यांना कुणी सिनीअर ऐकतोय याची कल्पनाच नव्हती."
"काय ते नीट सांग"
"तुला आठवतेय गेल्या वर्षीची एप्लॉयी ऑफ द इअर? तिकडची?"
"हो, ती कुणी तरी इस्ट युरोपियन होती ना?"
"तीच."
"ती?"
"आयोना! ही बाई कुठे युक्रेन का कुठून तरी आलीये. ब्राईड फॉर हायर! कुणी तरी तिला विकत घेऊन युएसला आणलं. हौस भागल्यानंतर त्या नवऱ्यानं घराबाहेर काढलं. मग बेकारीभत्त्यावर इंग्लिश बोलणं शिकली. अकौंटिंगचा डिप्लोमा का काय केलं आणि मग आपल्याकडे लागली! आणि मग तिला करणला बकरा बनवावसं वाटावं?"
"करण आणि बकरा? तो काय भोळा सांब आहे का? ग्लोबल मार्केटिंग हेड आहे! त्याला जाळ्यात अडकवणारी अजून जन्माला यायचीये. ते शक्य नाही. ह्याचाच पाय घसरला असणार"
"... करणला गेल्यावेळी फटका बसला होता. खोटे हिशोब दिले म्हणून जॉब जायची वेळ आली होती. कसाबसा वाचला. या वेळी बाई.. का वागतो हा असा..?"
"ही वेळ करणची काळजी करण्याची आहे का, अर्जुन? मला काळजी वाटतेय चित्रांगदेची."
"तोच घोर लागला, म्हणून मी काम सोडून घरी आलोय, उलुपी! चित्रांगदेला हे बाहेरून कळलं तर..."
"तू आधी कन्फर्म कर. कोण आहे तुझा तिकडे? कृष्णा आहे नं? त्याला निश्चित माहिती काढायला सांग. आणि नक्की असेल तर मी चित्रांगदेला सांगेन. लगेच बोल. आत्ता!"
---
"कृष्णा..."
"हाय अर्जुन! हाऊ आर यू फीलींग?"
"नो, आय ॲम क्वाईट ऑल राइट! बट आय ॲम डिस्ट्रॉट.."
"क्या हुवा भाई? क्या चल रहा है?"
"तू एकटा आहेस रुममध्ये? कोणी ऐकू शकेल आपलं बोलणं?"
"नहीं यार, मैं अकेला हूं. आणि केबिन बाहेर ऐकू जाणं शक्य नाही. बोल"
"कृष्णा, करणचं काय चालू आहे?"
"काय चाललं आहे म्हणजे?" कृष्णाचा आवाज सावध झाला होता.
"यार, नाटक मत कर. तुमची आख्खी कंपनी तेच डिस्कस करते आहे, माहिती आहे मला. आज एक फोन कॉल जो ऐकायला नको होता तो ऐकला मी...."
"..."
"पण बरं झालं ऐकला. आता तू बोल"
"अर्जुन, लुक, करण आऊटरॅंक्स मी. आणि तो तुझा जवळचा दोस्त आहे"
"साले, इस लिये तू जे घडतंय ते नीट सांग. आऊटरॅंक कसलं? काय आर्मी आहे काय ही? चित्रांगदा ही माझी त्यापेक्षाही चांगली मैत्रिण आहे. आणि तिला जर काय चाललंय ते बाहेरनं कळलं... आय कान्ट लेट दॅट हॅपन. सो टेल मी फ्रॅंकली काय घडलंय करणबरोबर"
"इट्स अ सॉर्डिड टेल, माय फ्रेंड. आयोना आणि करण आर लिव्हिंग फॉर द पास्ट अलमोस्ट अ मंथ इन द सेम अपार्टमेंट. एकत्र येत नाहीत, जात नाहीत. पण जे घडायचं आहे ते घडलंय."
"ओ शिट. कसं घडलं पण हे?"
"आमचं असं मत आहे की त्या अकौंटींगच्या घोटाळ्यात आयोनानं त्याला सुटायला मदत केली किंवा.. अडकवला! हे फ्रॉड दोघांनी मिळूनही केलं असू शकेल! नो वन नोज फॉर शुअर. पण, पण... टेक इट फ्रॉम मी की आता करण इज इंटू हर हूक, लाईन, ॲन्ड सिंकर... शी इज ए मॅनइटर, माय फ्रेंड. यू नो हर – शी इज अ वॉकिंग वेट ड्रीम..."
"आणि करण?"
"त्याला वाटतं कोणाला कळणार नाही! काय मूर्ख माणूस आहे.. माकड झालंय त्यांचं..."
"कृष्णा, मला अगोदर का नाही रे सांगितलंस? नाऊ व्हॉट कॅन आय डू? गोष्टी अशा थराला पोचल्या आहेत..."
कृष्णानं बरेच डिटेल्स दिले.
---
उलुपीनं रविवारी प्लॅन करून सगळी चिल्लीपिल्ली आणि म्हातारे पिकनिकला पाठवून दिले. त्यासाठी तिनं आख्ख्या सोसायटीतल्या म्हाताऱ्यांना आणि त्यांच्या नातवंडांना "ग्रॅन्ड किड्स डे आऊट" अशी थीम बनवून दोन दिवसांत वाटेला लावलं!
चित्रांगदेला लंचला बोलावलं. बोलावायचंय कसलं, करण नसला की ती खालतीच असायची बरेचदा. एनी वे, लंच झाला. मग कोचावर बसून गप्पा सुरू झाल्या.
"करण पुढच्या महिन्यात येणारे ना?" उलुपीनं विचारलं.
"हो, झालं त्याचं बुकींग"
"या वेळेला बरेच दिवस राहिलाय?"
"हो, काही मल्टी मिलियन डॉलर्सची डील्स चालली आहेत. ते संपवून येतो म्हणालाय."
उलुपीचा आवाज बदलला. ती म्हणाली, "चित्रांगदा, तुला एक सांगायचंय." तिनं पटकन अर्जुनकडे नजर टाकली. अर्जुन टेन्स होऊन बसला होता.
चित्रांगदा म्हणाली, "मला वाटलंच काही तरी मनात आहे तुझ्या! तो अर्जुन बघ कसला टेन्स आहे मगापासून. बोल, कायै?"
उलुपीनं दोन्ही हात ओटीत दुमडून घेतले. सरळ चित्रांगदाच्या नजरेला नजर देत ती म्हणाली, "तुला माहिती आहे करणचं अफेअर चाललं आहे ते?"
"उलुपी..." चित्रांगदाचा आवाज एक पट्टी चढून उतरला. चेहेऱ्यावर वेदनेची कळ उमटली होती. परत ती उठून उभी राहिली, ओरडली, "काय वाट्टेल ते.... हाऊ डू यू नो? बुलशिट, हाऊ कॅन यू इव्हन से दॅट उलुपी! फऽऽक! अर्जुन..." त्याला हाक मारताना मात्र ती रडवेली झाली होती. कळवळून उलुपी उठली अन् तिला बिलगली... अर्जुनचा चेहेरा कसानुसा झाला होता. त्यानं डोक्याला हात लावून मान खाली घातली. चित्रांगदानं आवेगात उलुपीला ढकललं, "व्हॉट नॉन्सेन्स, कशा लाजा वाटत नाहीत? लाज नाही वाटत तुम्हाला वाटेल ते बोलायला? डू यू हॅव प्रूफ?" पण शेवटच्या वाक्याला तिचा आवाज पुन्हा कातर झाला होता.
अर्जुन उठून उभा राहिला. "चित्रांगदा, सॉरी, पण सगळ्या कंपनीत ही वार्ता पसरली आहे. मला अपघातानंच कळलं. मग मी कृष्णाला फोन करून सगळं विचारलं. इट्स अ सॉरी स्टेट ऑफ अफेअर्स." त्यानं तिच्यासमोर कृष्णाचे मेसेजेस धरले. चित्रांगदेनं त्यातला फोटो पाहिला आणि तिरीमिरीनं अर्जुनचा हात दूर ढकलला. "दॅट बास्टर्ड इज हेलबेन्ट ऑन स्क्रूइंग मी."
ती ताडकन उठून चालती झाली. उलुपी "चित्रांगदा.." म्हणेपर्यंत ती दरवाजा आपटून धावत जिन्यातून वरती गेली. अर्जुन आणि उलुपी एकमेकांकडे बघत राहिले. अर्जुन म्हणाला, "ॲट लीस्ट, तिला बाहेरून कळलं नाही एवढंच समाधान." इतका वेळ रोखून ठेवलेले अश्रू उलुपीच्या डोळ्यांत चमकू लागले. थोडा कढ ओसरल्यावर ती म्हणाली, "का व्हावं हे असं? इव्हन विथ समवन लाइक चित्रांगदा?! आणि करण इतक्या खालच्या पातळीला गेला कसा? एक सुंदर, हाय-अचिव्हर पत्नी, एक गोंडस बाळ... हाऊ कॅन ही थ्रो ऑल दॅट अवे?" अर्जुन म्हणाला, "लुक, द बेस्ट इज, वी आर हिअर फॉर हर, नो मॅटर व्हॉट."
---
तासभर कुडबुडी कामं करत उलुपीनं काढला. पण ती अस्वस्थच होती. "अर्जुन, मी वर जाऊन येते" असं म्हणे पर्यंत दाराची बेल वाजली. उलुपीनं लगबगीनं दार उघडलं. ओढलेल्या, रडून रडून भागलेल्या चेहेऱ्यानं चित्रांगदा आत आली, आणि उलुपीच्या खांद्यावर मान ठेवून रडू लागली. तिनं चित्रांगदेला आत आणलं. दोघी सोफ्यावर बसल्या. अर्जुन त्यांच्या मागे येऊन उभा राहिला. दोघींच्याही खांद्यावर हात ठेवत तो चवड्यांवर खाली बसला. चित्रांगदानं एकदाच मान वळवून त्याच्याकडे पाहिलं आणि तिला हुंदका फुटला. स्फुंदत, स्फुंदत ती म्हणाली, "अर्जुना, का लग्न केलंस रे उलुपीशी?" दोघंही चमकले. काय म्हणायचंय हिला?
रडतच चित्रांगदा म्हणाली, "सॉरी उलुपी, सॉरी. इट केम आऊट रॉंग"
सगळेच शांत होते. चित्रांगदेनं उलुपीच्या खांद्यावरची मान काढून तिच्याकडे पाहिलं. "का करतो आपण लग्न? सुख मिळावं म्हणून करतो ना? मग माझ्या नशिबी दुःखच का?"
अर्जुन समोर येऊन सोफ्यावर उलुपीशेजारी बसला. दोघांच्याही चेहेऱ्यावर चित्रांगदेविषयीची काळजी, प्रेम लख्ख उमटलं होतं. चित्रांगदा त्या जोडीकडे बघत मागे झुकली, जणु अर्जुन-उलुपीला एका फ्रेममध्ये पकडत होती. "यू लकी बास्टर्ड्स" ती म्हणाली. तिचे डोळे निवळत होते. उठली, आत गेली, आणि स्वच्छ तोंड धुवून आली.
"आता जरा बरं वाटतंय! अर्जुना, कावळ्या, तुझ्या हातचा चहा हवाय मला..." चित्रांगदेनं कित्येक वर्षांत अर्जुनाला कावळ्या म्हटलेलं नव्हतं! त्यांच्या अचंबित नजरा पाहून चित्रांगदा खळखळून हसली. हसली?!
"माझा जुना दोस्त आहेस ना? जा चहा करतोस माझ्यासाठी, प्लीज?"
तिनं उलुपीला टपली मारली, "उल्पे, घाबरू नकोस, मी पळवत नाहिये तुझ्या नवऱ्याला!" परत तिचा चेहेरा काळवंडला, "माहिताय मला ते दुःख आता"
त्या वाक्यावर उलुपी आवेगाने तिला ओढून घेतले, "नको गं बोलूस असं!"
चित्रांगदा तिच्या कुशीत शिरताना म्हणाली, "नाही बोलत गं, नाही बोलणार."
थोड्या वेळानं ती उठली आणि म्हणाली, "या क्षणापासून मी मुक्त आहे, मुक्त.." तिच्या शिणलेल्या चेहेऱ्यावर निर्धार होता.
अर्जुन चहा घेऊन बाहेर आला. चित्रांगदेनं पुढे होऊन ट्रे वरचा मग उचलला. एक घोट घेऊन म्हणाली, "वाह, ताज!" सगळेच प्रयत्नपूर्वक हसले. वातावरणातला ताण कमी झाला. चहा पिताना तिचं लक्ष समोरच्या शोकेसमधल्या फ्रेमवर गेलं. उलुपीच्या कडेवर व्योम, आणि चित्रांगदेच्या कडेवर जाई असा तो फोटो होता. तिनं तो हातात घेतला, "ही कुडन्ट सी धिस ॲन्जेलिक फेस, डिड ही?"
"किती शोभून दिसतोय व्योम तुझ्या कडेवर नै? हाऊ द हेल कुड ही फरगेट बोथ ऑफ अस?" भवसागरातल्या वादळात मनाची नौका भावनांच्या लाटांत कधी भिजणार, कधी गोते खाणार तर काहींवर स्वार होणारच ना.. चित्रांगदा मुळातली कणखर, म्हणून बरं. पण आता ही वाक्यं करुणरूदन नव्हती तर प्रश्नार्थक होती.
"वरती गेल्या गेल्या मी करणला फोन लावला. वेडावाकडा झोडपला त्याला." चित्रांगदा म्हणाली. "उद्या येतो म्हणालाय. उलुपी, चहा झाला की चल जरा माझं सामान आवरू." उलुपीनं काही बोलण्यापूर्वी ती म्हणाली, "मी समोर आई-पप्पांकडे रहाते काही दिवस. मी आणि व्योम."
(क्रमशः)
सुन्न करणारा प्रसंग..
सुन्न करणारा प्रसंग..
दुर्दैवाने या 3-4 वर्षांत आजुबाजुला असे खूप प्रसंग डोळ्यासमोर घडत आहेत.