असेल माझा हरी.. (१)
https://www.maayboli.com/node/84928
असेल माझा हरी.. (२)
https://www.maayboli.com/node/84934
असेल माझा हरी..(३)
https://www.maayboli.com/node/84937
असेल माझा हरी..(४)
सकाळी जरा लवकरच जाग आली, तेव्हा एकदम फ्रेश वाटलं वसुधाला. ब्रश करून ती बाहेर आली तेव्हा हरी किचन मध्ये काहीतरी खुडबुड करत होता.
‘इथेच राहिला का हा रात्री..? की लवकर उठतो तो..? काल विचारायच राहिलंच.. इथेच रहातो का हरी ते ..? पण काल घर फिरतांना त्याची खोली कोणती, ते दिसलं नाही.. प्रियाने तर नर्सरी पासून सगळं दाखवलं काल.. कदाचित माझच लक्ष नसेल..’
हरी ब्रेकफास्ट ची तयारी करत होता .. श्रेयस प्रिया अजून उठलेली दिसत नव्हते. ‘रोजची धावपळ असतेच त्यांची.. आज रविवार.. त्यांची सुट्टी असणार.. म्हणून सगळं आरामात दिसतंय.. बरं झालं.. हा हरी आहे ते.. नाही तर आताच गॅस पेटवायला लागला असता चहा करिता.. तरी जरा वेळाने नीट बघून घेईन सगळं..’
“चहा करशील का कपभर?” वसुधाने दारातूनच हरीला सांगितलं, आणी ती हॉल च्या प्रशस्त खिडकीतून बाहेरच्या हिरव्यागार लॉन कडे बघत उभी राहिली. सगळी कडे एकदम शांत होतं.. कसलेही आवाज नाहीत.. बाहेर माणसं नाहीत.. बाकी सगळं कसं चित्रा सारखं आखीव.. रेखीव.. सुंदर दिसत होतं.... ६५” चा टी. व्ही. म्यूट करून बघितल्या सारखं!
“गुड मॉर्निंग आँटी. जल्दी उठ गयी आप..” प्रियाच्या आवाजाने वसुधा भानावर आली.
अजून चहा आला नव्हता.
“हो. गुड मॉर्निंग. छान झोप झाली माझी. आणी तू मला आई म्हंटलस तरी चालेल गं..., श्रेयस सारखं.. म्हणजे तुझी हरकत नसेल तर.. आँटी ऐकलं ना की, शेजारची मुलगी बोलल्या सारखं वाटतं.” वसुधा हसत म्हणाली.
“अच्छा आईजी. ठीक है। हरी, गेट टी..” आधीचं वाक्य तिच्या करता, आणी नंतरच हरी करता होतं. वसुधाने मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
हरीने तिच्या एकटी करता आधी चहा आणला नव्हता, हे आत्ता तिच्या लक्षात आलं. थोडं खटकलच ते.. पण कपाळावरचा हात ‘आईजी’ करता होता. हरीला कदाचित मराठी येत नसेल. किमान सांगायचं तरी त्याने तसं.. पुढच्या वेळी हिंदी बघू. त्याचं नाव तर पक्क भारतीय वाटतंय... दिसतोय पण भारतीयच.. विचारायला हवं एकदा.. बहिरा पण नाही.. प्रियाचं ऐकलं त्यानं..
त्या दोघी चहा घेतच होत्या तर, श्रेयस पण आला उठून. मग चहा घेता घेता जरा गप्पा झाल्या.
“आई, चहा झाला की तू तयार हो. आपण जरा इथल्या इथे बाहेर फिरून येऊ. तुला इथलं जीम वगैरे दाखवतो. पार्क पण आहे जवळच, अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर. म्हणजे उद्या पासून तुला एकटीला जाता येईल बाहेर. तुझ्या वयाच्या बायका पण भेटतील कुणी तरी ह्या वेळी... बघूया.. ओळखी होतील हळू हळू .. कुणी इंडियन दिसली तर.. तसे आहेत बरेच लोकं इथे.. भेटतील सगळे चार आठ दिवसात.. ” श्रेयस आईला म्हणाला.
वसुधा पटकन आवरून तयार झाली. प्रिया घरीच थांबणार होती. जरा ‘आईजी’ च्या बॅग्स अन्पॅक करते म्हणाली. मग निवांत बाथ वैगेरे घेईन म्हणाली. वसुधा म्हणालीही तिला, ‘तू कशाला..? मी करीन की..’
पण ती म्हणाली, “मै कहा..? हरी ही करेगा.. मै तो सिर्फ सुपरवाईज करूंगी”
ते एक बरं होतं, घरात सगळं करायला हरी होताच. पण हा हरी करतो तरी काय काय..?
‘आता जरा घरात रहाणं सेट झालं, की मग बघू रोज एकेक पदार्थ करणं. वाटली होती तशी एकदम घाई नाही.’ वसुधाच्या मनात आलं. आता तिला जरा धीर आला होता.
सगळीच घरं बैठी आणी सुबक होती. प्रत्येक घरासमोर सुरेख लॉन आणी फुलझाडं होती. काही ठिकाणी अगदी तरुणाईच्या उत्साहाने म्हातारी जोडपी बागकाम करत होती. कोपऱ्यावरच जीम होतं आणी पलीकडे विस्तीर्ण हिरवगार पार्क. तिथे कुणी पळत होतं.. तर कुणाचे सूर्यनमस्कार चालू होते. जागोजागी बसायला बाकं होती. आणी पाणी प्यायला फाऊंटन पण. श्रेयस उत्साहाने तिला परिसराची माहिती देत होता.. तिला एकटीला इथे काय काय करता येईल ते सांगत होता..
“मला जीम नको रे.. इथेच येत जाईन मी रोज मोकळ्यावर. पाऊस वगैरे असला, तर मग नंतर बघू जीमचं. किती मस्त वाटतंय इथे. एकदम मोकळं मोकळं.. ” वसुधा चांगलीच खुलली होती.
“म्हणून तर तुला बोलवत होतो ना.. तर तुझं आपलं सतत नाही नाही.... आता रोज फक्त किल्ली आणी फोन जवळ ठेवत जा.. मग कितीही वेळ बाहेर असलीस तरी काही हरकत नाही.” श्रेयस म्हणाला.
“किल्ली कशाला? तुझा तो मुका हरी असतो नं घरी..? दार उघडेल नं मला तो..? पण काय रे, तो अजिबातच बोलत वगैरे नाही का..?” वसुधाने विचारलं.
“तू किल्ली ठेवत जा गं.. सांगितलं तेवढं ऐकावं माणसानं..” श्रेयस चा राखीव स्वर निघालाच.
‘छान! आईनं सगळं ऐकायचं.. तू मात्र काहीच धड सांगू नकोस.. प्रियालाच विचारायला हवं. ती पोरगी तरी गोड बोलते ह्याच्यापेक्षा... .’ वसुधा मनातल्या मनात बोलली. मुलं मोठी झाली, की आया बहुतेक मनातल्या मनातच जास्त बोलतात..
...............................
(क्रमश:)
असेल माझा हरी..(५)
https://www.maayboli.com/node/84945
मस्त
मस्त
हरी रोबो असू शकतो नाहीतर मूकबधिर अमराठी
स्वगतं आणि दोन संवादांमधले
स्वगतं आणि दोन संवादांमधले अवांतर चिंतन आवडले.
किल्ली, रोबो म्हणतेस ते बरोबर वाटतंय.
उत्कंठा! पुभाप्र
उत्कंठा! पुभाप्र
छान चालू आहे..
छान चालू आहे..
सगळे हरीला रोबोट समजत आहेत.
तुम्ही त्याला एलियन बनवा
हरी फक्त मालक-मालकिणीचे ऐकतो
हरी फक्त मालक-मालकिणीचे ऐकतो असे दिसतयं!