संमीलन (भाग २)

Submitted by Abuva on 27 March, 2024 - 13:12
Photo by https://unsplash.com/@joetaylorland

(भाग १ - https://www.maayboli.com/node/84883)

उदयन शेवटी नाहीच येऊ शकला. अवंतिकेला एकटं सोडणं शक्यच नव्हतं. मग त्याच्या बदली उलुपीची वर्णी लागली. चित्रांगदा मार्केटिंग टीमचाच भाग झाली होती. आणि अर्जुन बॅकएन्ड सर्व्हर आणि नेटवर्क, सिस्टिम अपटाईम, हॉट फिक्सेस या साठी मुकर्रर होता.
कॉन्फरन्स तीन दिवसांची होती. एक दिवस आधी बूथ सेटअप साठी मिळणार होता. अशी चार दिवसांची न्यूयॉर्क ट्रिप होती. आपले तिघंही कथानायक पहिल्यांदाच न्यूयॉर्कला जाणार होते. कधी तरी डोक्यात विचार होता की न्यू इअर्स इव्हला टाईम्स स्क्वेअरला जायचं. पण एक तो भयंकर प्रकार घडला आणि त्या इराद्यांवर पाणी पडले होते. पण आता हा मौका आपसूक चालून आला. एकंदरच अमेरिकनांनी जोर लाऊन पुन्हा एकदा न्यूयॉर्कला पूर्वपदावर आणून ठेवलं होतं. अर्थातच जे गेलं होतं तिथली पोकळी भरणं सहज शक्य नव्हतं.

चार दिवसांपूर्वी बूथचे प्रॉप्स येऊन पडले होते. मग बरोबरच्या इन्स्ट्रक्शन्सनुसार एक भाग या सगळ्यांनी मिळून उभा करुन पाहिला. दिसत तर भारी होतं! कलर स्कीम, वाक्यं, शब्द, फॉंट्स, प्लेसमेंट, लोगोज, प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी असावी, योग्य दिसावी, लक्ष आकर्षित करून घ्यावं यासाठी किती सायास घेतले होते मार्केटिंग टीमनं आणि बॉसनं. लोकं कुठून येतील, त्यांना काय दिसेल, त्यांचं लक्ष कसं वेधलं जाईल, हा विचार झाला होता. जवळपासच्या इतर बूथपेक्षा आपला बूथ कसा वेगळा राहील हे ठरवलं होतं. बूथ घेतानाच जवळपास कुठल्या दिग्गज कंपन्यांचे बूथ आहेत वा नाहीत याचा विचार झाला होता.
सेल्स टीमची ब्रोशर्स, लीगल डॉक्युमेंट्स, प्रॉडक्ट मटेरियल रेडी होऊन आलं. टेस्टिंग टीमनं काही मेजर फीचर्स पास केली. काही फिचर्सचा स्कोप कमी केला. इंप्लेमेंटेशन टीमनं सर्व्हर सेट केला, वेगवेगळे ऑप्शन्स तयार ठेवले. बूथमध्ये चार डेमॉन्स्ट्रेशन किओस्क आणि एक एक्सपिरिअन्स सेंटर असणार होतं. एक पूर्णतः बंद एरिया कस्टमर डिस्कशन्स साठी राखीव होता. सहा मार्केटिंग, सेल्सची लोकं, बॉस सातवा आणि आपले तीन वीर अशी दहा लोकांची दणकट टीम तयार होती. चित्रांगदा आणि उलुपी या दोघी मार्केटिंग सपोर्ट आणि अर्जुन बॅकएन्ड. खूप खर्च झाला होता, खूप होणार होता, आणि भवितव्यात खूप काही या कॉन्फरन्सवर अवलंबून होतं.

---

त्यांच्या कलीगांच्या दोन मॉम्मी मोबिल – म्हणजे त्यातल्या त्यात मोठ्या - व्हॅन्स सामान भरून तयार होत्या. आणखी एका कार मधून सेल्स हेड आणि मार्केटिंग टीमचे काही लोकं येणार होते. दुपारी बाराच्या आत न्यूयॉर्कला कॉन्फरन्स सेंटरला पोहोचणं भाग होतं. कारण बूथ उभे करून, सगळ्या सिस्टीम चालू करून टेस्ट करून संध्याकाळी सात वाजता, प्री-कॉन्फरन्स डिनरला हॉटेलवर परत येणं आवश्यक होतं. काही महत्त्वाच्या कस्टमर्सना आणि संभाव्य कस्टमर्सना बोलावलं होतं. त्यांची खातीरदारी करणं हे ही तितकंच महत्त्वाचं होतं!

जाताना न्यूयॉर्कच्या आधीच्या रेस्ट एरियात सगळ्यांनी भरपूर ब्रेकफास्ट केला. आता चार दिवस लंचला ना वेळ ना सोय. बरोबर मध्यान्हीला गाड्या कन्व्हेंशन सेंटरला‌ पोहोचल्या. तिथे अनलोडिंगसाठी हीऽ लाईन होती. करता करता सामान उतरलं. जसं येईल तसं बूथ सेटअप सुरू झाला. मार्केटिंग टीमला सवय होती खरी. पण या वेळी बूथ मोठा होता. पॅनल्स, लायटिंग सगळंच व्यवस्थित हवं होतं. त्यांना चित्रांगदा आणि उलुपी मदतीला धावल्या. कष्टाचं काम होतं. कौशल्याचं काम होतं. तिकडे एका मार्केटिंगवाल्यानं पॉवर कनेक्शन घेतलं, अर्जुननं नेटवर्क कनेक्शन घेतलं. सर्व्हर चालू केला, नेटवर्क केबल्स खेचल्या. पाच वाजता मार्केटिंगची पहिली टीम हॉटेलकडे रवाना झाली. सहा वाजता बऱ्यापैकी सेटअप रेडी होता! सगळं लॉक करून उरलेली मंडळी हॉटेलकडे निघाली!

---

हॉटेल टाईम्स स्क्वेअर मधेच होतं! कॉन्फरन्सशी टाय अप असल्यानं डायरेक्ट बस सेवा होती! न्यूयॉर्कचा नखरा बघत बघत आपले हिरो हिरॉईन्स हॉटेलला आले.
तिघांना एकच रूम दिली होती. चोविसाव्या मजल्यावरून न्यूयॉर्क बघताना तिघांचेही डोळे विस्फारले होते. दिवसभराच्या कामाचा शीण जादू व्हावी तसा नाहीसा झाला. संध्याकाळ पडू लागली होती. आकाशाची निळाई काळवंडू लागली होती. आणि न्यूयॉर्क झगमगायला लागलं होतं.
उलुपीनं चहा बनवला. तिघेही सुखावले, सुस्तावले. न्यूयॉर्कची महती ही अशी आहे. इथे येणारा प्रत्येक नवखा माणूस नुसता नजारा बघूनच गार होतो. बऱ्याच जणांसाठी स्वर्ग दोन बोटे उरणं म्हणजे काय, तर हे! इथे येणारा प्रत्येक जण 'मेड इट' असं म्हणत येतो. त्यानंतर कुणाची भूक खवळते, तर कुणाची निवते! पण न्यूयॉर्कमधे येऊन निर्विकार राहिलेले थोडे. जसे आपले अर्जुन महाशय. एका बेडवर आडवा होऊन तो ऑलमोस्ट घोरायला लागला होता! उलुपीनं त्याला वरून पांघरुण घातले. बाथरूम मधून बाहेर आल्यावर हे चित्र पाहून चित्रांगदा चवताळलीच. तिनं त्याच्या ढुंगणावर लाथ घालून त्याला उठवला. "कावळ्या, झोप कशी सुचते रे तुला?"
"अगं तुम्ही आवरत होतात, म्हटलं जरा झोपून घ्यावं!"
"मंद आहेस, मंद. जा बाहेर आता. आम्ही तयार झालो की बोलवतो तुला."
तो बाहेर पडला. त्यानं घड्याळात पाहिलं. पंधरा मिनिटांत वर डिनर सुरू होणार होतं. तेवढ्यात शेजारच्याच रूममधून दोन मार्केटिंगचे कलीग बाहेर पडले. हा तिथे घुसला. कशाला इकडेतिकडे फिरायचे?!
यथावकाश तिघेही तयार होऊन टॉप फ्लोअरच्या रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंटकडे निघाले. चित्रांगदा टिप टॉप मॉडर्न ड्रेसमध्ये, उलुपी चकाचक ऑफिसवेअरमध्ये आणि अर्जुन टी-शर्ट, जीन्स वर जॅकेट घालून. द यंग जनरेशन स्टेपिंग अप!

---

रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट मधे वेलकम डिनर म्हणजे बॉसनं नवीन कस्टमर मिळवणे आणि जुने टिकवणे यात काहीही कमी ठेवली नाही याचंच निदर्शक! हे रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट न्यूयॉर्कमधलं एकुलतं एक – फिरतं रेस्टॉरंट. बसल्या जागी तुम्ही इमारतीला एक प्रदक्षिणा घालता. याची ख्यातीच ही, की तुमच्या एका डिनरमध्ये आख्ख्या न्यूयॉर्कचं कमीत कमी एकदा ३६० डिग्री दर्शन होणार! सुमारे ५० मजले उंचावर, पण तरीही आजूबाजूच्या उंच इमारतींमुळे खुजीच भासणारी ही बिल्डींग. ही मंडळी पोहोचली तेव्हा बॉस ऑलरेडी कस्टमरांचं आवभगत करण्यात गुंतला होता. एक पूर्ण २०-२२ जणांचा एरियाच त्यानं रिझर्व्ह केला होता. एका कोपऱ्यातलं‌ टेबल पकडून हे तिघे टाइमपास करण्यात गुंगले! ह्यांना काय काम होतं? ह्यांचं काम सगळं उद्या... प्रत्येक टेबलवरच्या पेपर नॅपकीन्सवर चारी बाजूंनी दिसणाऱ्या वेगवेगळ्या लॅंडमार्क टॉवर्सची नावं आणि आकार दाखवले होते. तेवढ्यात उलुपीला एम्पायर स्टेट बिल्डिंग दिसली! ती‌ बिल्डिंग तर आयकॉनिक आहे. पहिल्यांदा येणारा अतिथीसुद्धा ती बिल्डिंग बघायची इच्छा घेऊन येतो. तिच्या एक्साईटेड बोटाच्या दिशेनं सगळ्यांनी पाहिलं! आणि मग कुठली बिल्डिंग कुठली आहे याचे गेस सुरू झाले. अंधारून आलं होतं. एम्पायर स्टेट, क्रायस्लर या सारख्या प्रख्यात बिल्डिंगा रोषणाईत झळाळून उठल्या होत्या. उंच बिल्डिंगांमधून मधनंच दर्शन देणाऱ्या हडसन नदीत बोटींचे दिवे झळकत होते. खालती रस्त्यावर तर काय टाईम्स स्क्वेअरचे लाईट झगमगत होते. चित्रांगदा म्हणाली, "उद्या आपण टाईम्स स्क्वेअर मधेच फिरायचं हं! ही संधी वाया घालवायची नाही." "नक्की, नक्की", उलुपी आणि अर्जुन दोघंही म्हणाले.

तिकडे बॉस आणि मार्केटिंग टीम पाहुण्यांच्या सरबराईत मग्न होते! नवनवीन खाण्याच्या डिशेस येत होत्या, प्यायला महामूर होतं, जगह बढिया होती, मौसम सुहाना होता, सोबत प्रेमाची होती.
दुनियेत सारं काही आलबेल होतं!

---

अर्जुनचा गजर पाचाचा होता. कॉन्फरन्सचा पहिला दिवस होता. सात-साडेसातला बसमध्ये बसायचं होतं हे काल ठरलं होतं. आता तिघांचं आवरायचं, ब्रेकफास्ट करून साडेसातची बस गाठायची तर इतक्या लवकर उठणं भाग होतं. जाग आली तीच अंग दुखून. काल बूथ लावताना, सर्व्हर लावताना, नेटवर्क सेटअप करताना एवढं वजन उचलणं, चढणं, उतरणं, यानं अंग बोलत होतं. पण आजचा किकऑफ चांगला झालाच पाहिजे या विचारानं त्याला धडकी भरली! दोन मिनिटं झोपू जरा..
उलुपीसुद्धा त्याच वेळेला उठली होती. तिला अर्जुनची चुळबूळ जाणवली. तिनं पडदा थोडा बाजूला करून बाहेर नजर टाकली. न्यूयॉर्क सिटी कधाच झोपत नाही या उक्तीचा तिला प्रत्यय आला! वर आकाश काळं होतं. उजेडाचा थांगपत्ता नव्हता. पण खाली रस्ते मात्र लखलखत होते. झगमगते दिवे होते, बिलबोर्ड्सवर डोळे दिपवणाऱ्या जाहिराती फिरत होत्या. भल्या थोरल्या व्हिडीओ स्क्रीन्सवर बास्केटबॉलचे रिप्ले चालले होते. रस्त्यावर गाड्या दिसत होत्या, आणि मुंग्यांंएवढी माणसं.
अर्जुनाला जागं करण्याचा प्रयत्न तिनं केला आणि सोडून दिला. फ्रेश होऊन आली. चहासाठी किटलीत पाणी तापवायला ठेवलं, अन मग तिनं अर्जुनाला ढोसून ढोसून जागं केलं.
"उठ रे, तुला आटपायचंय लवकर." किरकिरत तो उठला.
"आंग दुखतंय सगळं. आयायी.."
"जा फ्रेश होऊन ये, तोवर चहा होईल."
जांभई देत तो वॉशरूममधे घुसला. इकडे गरम करायला ठेवलेल्या पाण्याच्या किटलीची खडखड सुरू झाली. आणि खट आवाज होऊन हिटींग बंद झालं.
तो फ्रेश होऊन बाहेर निघाला तेव्हा उलुपी, तिचा चहाचा मग हातात घेऊन भिंतभर काचेशेजारचा पडदा बाजूला करून खालची हालचाल न्याहाळत बसली होती. मधल्या टीपॉयवर त्याचा चहाचा मग होता. समोरच्या खुर्चीत बसत त्यानं चहाचा मग कवटाळला, थंड पडलेल्या बोटांत जान यावी म्हणून. न बोलता दोघेही त्या पहाटेचा आस्वाद घेत बसले होते.
"तुझा सेटअप अजून बाकी आहे ना?"
"हो, अजून दोन डेमो स्टेशन्स वायर करायची आहेत."
"मग चल मी येते तुझ्या मदतीला."
"अग नको, करीन मी."
"असू दे रे, एकास दोन. कॉन्फरन्स सेंटरसाठी बस सात वाजता सुरु होणार आहेत. पहिली बस गाठू. आज गर्दी असेल, पहिलाच दिवस म्हटल्यावर. लवकर निघालेलं बरं."
त्यांच्या बोलण्यानं चित्रांगदेची झोप चाळवली. तिनं डोळे उघडले. कोपर गादीत टेकवून डोकं उचलून बघितलं. तिला अंधारच दिसला.
"काय उगाच लवकर उठून बसला आहात तुम्ही..", ती किरकिरली.
"तू पण उठ आता", उलुपी म्हणाली.
"ऊंहूं, तुमचं झालं की मला उठवा." असं म्हणून तिनं कूस बदलली आणि पांघरूण कानापर्यंत ओढून परत झोपली.
अर्जुन हसला. "मी आटपतो, तुम्हाला मग काय गोंधळ घालायचाय तो घाला. मला भूक लागतेय."
उलुपी म्हणाली, "ब्रेकफास्ट सहाला सुरू होतोय खाली हे बरंय. जा तू आटप, मग मी आटपते, एकत्रच ब्रेकफास्टला जाऊ. जाताना हिला उठवू."
दोघांनी आवरलं. मग उलुपीनं चित्रांगदाला गदागदा हलवून उठवलं.
"काये गंSS तुम्ही तयार झालात? इतक्या लवकर कुठे निघालात?"
"आम्ही ब्रेकफास्ट करून पुढे जातो. ह्याचं काम बाकी आहे अजून."
"अगं पण मला का नाही उठवलं? मी आले असते ना"
"बरं. पण आता तू आटप आणि मार्केटिंगवाल्यांबरोबर ये. तुझी सगळी तयारी काढून ठेवली आहे इथे."
"चित्रांगदे, झोपू नकोस हां परत. नाही तर घोटाळा होईल! लक्षात आहे ना बॉसनं सांगितलेलं? आठच्या नंतर निघालीस तर तिथे वेळेत पोचू शकणार नाहीस हं", अर्जुन म्हणाला. त्यानं लॅपटॉपची बॅग खांद्याला अडकवली, अन निघाला.
चित्रांगदेनं उलुपीकडे बघून मान डोलावली.

---

भरपेट ब्रेकफास्ट आटपून अर्जुन आणि उलुपी हॉटेलमधून बाहेर पडले. जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर मध्ये ते दोघे उभे होते. आत्ता कुठे फटफटत होतं. पण टाईम्स स्क्वेअरमधे तशी बारा महिने तेरा काळ दिवाळी! इतक्या सकाळीही गर्दी जाणवावी इतकी होती. बहुतेक ऑफिसला निघालेली जनता होती. काळा लॉन्ग कोट किंवा जॅकेट, डोक्यावर वूलन कॅप, पाठीवर एक सॅक, ग्लोव्ह घातलेल्या हातात एखादा कॉफीचा कप. स्त्री वा पुरूष, पेहेरावात फारसा फरक नव्हता आणि चालीत तीच लगबग! रस्त्यावर पोलिस होते, त्यांच्या गाड्या होत्या, जॅनिटर आणि इतर कष्टकरी जनता होती. रस्त्यावरून डिलिव्हरी व्हॅन्स आणि ट्रक ये-जा करत होते. त्यातून टॅक्स्या वाट काढत होत्या. चहू बाजूंना अनेक स्क्रीन्स चमचमत होते. संवेदना बधीर व्हाव्यात असा रंग आणि प्रकाशाचा मारा होता.
सात वाजायला पाच-दहा मिनिटं कमीच होती. कॉन्फरन्ससाठीच्या बसेस अजून आल्या नव्हत्या. अर्जुनला अचानक आठवलं. इथेच कुठे तरी गुड मॉर्निंग अमेरिका या शोचं रेकॉर्डिंग होतं. त्यानं उलुपीला आठवण करून देऊन विचारलं, "शोधायचं का आपण?”
"येस, चल आहे थोडा वेळ. दोन-तीन ब्लॉक चालून येऊ. दिसलं तर उत्तमच.”
मोठमोठ्या ब्रॅन्ड्सची मोठमोठी दुकानं, त्यातच सुवेनिर्स विकणारी छोटी दुकानं, फास्टफूड जॉइंट्स, रस्त्यावर मांडलेले इट-आऊट्स, हे सगळं संध्याकाळी काय माहौल असेल याची जाणीव करून देणारं होतं. कोपऱ्यावरच एका ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती. तेच गुड मॉर्निंग अमेरिका स्टुडियोज होतं. शो सुरू व्हायच्या अगोदरची तयारी चालली होती. अर्जुन खूष झाला!
उलुपी त्याला म्हणाली, "आपण उद्या सकाळी येऊ या ना. आज आपल्याला कामै. चल जाऊ.."
अर्जुन भानावर आला. "हो, चल" म्हणाला.
परत हॉटेलजवळ येताना त्यांना बसेस दिसू लागल्या, आणि बाहेरच कॉन्फरन्सला आलेल्या गेस्ट्सची लाईन लागली होती!

चलो दिल्ली! हर हर महादेव..

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सायो, कथा असली तरी सत्य डोळ्याआड करता येत नाही. टाईम्स स्क्वेअरचे हॉटेल, हाऊ टू से, महाग असतं. दुसरं: मार्केटिंग कॉन्फरन्समध्ये डेव्ह टीम हा नेसेसरी इव्हिल असतो - असून अडचण, नसून खोळंबा. तिसरं: आपल्या पोरांना टाकता येतं एका रूममध्ये - युरोप अन् अमेरिकन मार्केटर्स? Lol
आणि तसंही तिघं एका घरात रहात आहेतच की!
असो.