'पुअर थिंग्ज्स' वयात येण्याची एक तिरपाकडी (परि)कथा

Submitted by अमितव on 19 March, 2024 - 10:33
पुअर थिंग्ज्स

पुअर थिंग्ज्स

व्हिक्टॉरिअन लंडन मधलं एक भलंमोठं नोकर चाकरांनी भरलेलं घर. कृष्णधवल पडद्यावर एक लहान मुलगी दिसते आहे. दिसायला अशी काही लहान वाटत नाहीये, पौंगडावस्थेतील असावी. पण तिच्या एकूण वागण्या-बोलण्यातून, बोलण्या-चालण्यातुन, शब्दसंग्रह, भाषेच्या वापरावरुन तिच वय, तिचं भावनिक वय लहानच वाटत आहे. कदाचित स्पेशल नीड असावी. तिची काळजी घ्यायला नोकर चाकरांची फौज आहे. पण कोणी तिला काही शिकवत नाही असं दिसतंय. ती जे काही वागेल, बोलेल त्यातुन जे काही पसारे होतील ते चकार शब्द न काढता आवरायचे. तिला काही इजा पोहोचत नाही ना इतकंच बघायचं, असं त्यांचं काम असावं असं दिसतंय. असं वाटण्याचं कारण म्हणजे, बहुतेक दृष्यांत असलेले तिचे वडिल किंवा वडिलकीच्या भूमिकेतंल पात्र. विक्षिप्त शास्त्रज्ञ. पण या सगळ्या परिस्थितीवर चांगलंच जरबेचं नियंत्रण असलेले दिसत आहेत.

चित्रपट चालू केल्यावर पहिल्या काही क्षणांत मला इतकं दिसलं, किंवा तसं असावं असं मी ताडलं. साधारण चित्रपट बघण्यापूर्वी अगदी संपूर्ण प्लॉट वाचला नाही तरी तो कशाबद्दल आहे, किमान ट्रेलर तरी बघुनच चित्रपट बघितला जातो. पण 'एमा स्टोनला' ऑस्कर मिळालेलं बघितलं आणि डिस्नीवर हा चित्रपट दिसल्यावर शुक्रवारी दुपारी काम अर्धवट सोडून बाकी काहीही न वाचता, कुठली मुलाखत वगैरे न बघता तो चालू केला त्यामुळे पुढे काय वाढलेलं आहे याची अजुन तरी मला अजिबातच कल्पना न्हवती.

तिचा बाप... बापच म्हणू आपण त्याला, ती त्याला गॉड (गॉडविन बॅग्स्टर - ) म्हणते...सर्जन आहे. त्याचा चेहरा बघितला की फ्रँकेस्टाईन आठवतो. चेहरा किमान सहा सात तुकड्यांत शिवलेला आहे. बाकी शरीरातील किती अवयव असे जोडलेले असतील कोण जाणे. तो शल्यचिकित्सा शिकवतो, आणि ते करतानाही शरीरातील अवयव काढून ते बदलणे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया तो करत असावा असं एकुण परिस्थिती वरुन वाटतंय. तर तो त्याच्या विद्यार्थ्यांपैकी एकाला मॅक्स मकॅन्डेल्सला (रेमी युसुफ) त्या मुलीच्या म्हणजे 'बेला बॅक्स्टरच्या' (एमा स्टोन्स) वागण्या बोलण्यात काय फरक पडतो आहेत याच्या नोंदी ठेवायला त्याच्याच घरी बोलावतो.

पुढचा चित्रपट ही कथा आहे एका 'वयात' येणार्‍या मुलीची. वयात येताना तिला जगाची.. आपल्या दृष्टीने चांगल्या, वाईट, झगमगत्या, कचकड्या जगाची... सफर घडवुन आणतो डंकन वेडर्बन (आपला मार्क रफेलो , बोलेतो हल्क.). हा या कथेत का आणि कसा येतो आणि काय काय करतो ते चित्रपटात समजेलच. म्हटलं तर मार्कचं पात्र अगदी खलनायकी नाही तरी गडद रंगाचं आहे. आपल्याला राग यावा असं, पण तरी नाळही जुळावी असं. ते मार्क रफेलोने साकारलं आहे म्हटल्यावर तो आवडण्याशिवाय गत्यंतरच रहात नाही. काय गुणी अभिनेता आहे! आता हा चित्रपट जवळ जवळ रोम-कॉम होऊ लागला आहे. पण बेला तिच्या निरागस, ज्ञानपिपासू आणि तर्कनिष्ठ जाणिवेतून आपल्याला एक एक धक्के देत राहते, आणि हसवतही.

बेला 'वयात' येण्यापूर्वी अशा काही परिस्थितीतून आलेली आहे की तिला काही पूर्वग्रह नाहीत. नाहीत म्हणजे अजिबातच नाहीत. ती सगळ्या जगाकडे, आपण ज्याला चांगलं वाईट म्हणतो, आणि हे वाईट आपल्या नजरेत अगदी घृणास्पद वाईटही असू शकेल, तर या सगळ्या पसार्‍याकडे संपूर्ण पूर्वग्रह विरहित आणि तरीही डोळस दृष्टीने बघते. त्या बर्‍या-वाईटाचे रसरसून अनुभव घेते. अगदी आकंठ म्हणू असे! आपल्या पांढरपेशा.. आता पांढरपेशाच कशाला... शरीर विकायला लागणे, हा कुणाहीसाठी वेदनादायकच अनुभवच.. तर इथपासून सगळ्या प्रकारचे अनुभव घेते. बुद्धीनिष्ठ तार्कीक अनुभव. मानवी भावभावना समजुन घेण्याचा, लैंगिकसुख अनुभवण्याला असोशीने सामोरी जाते. त्यातुन झरझर अनेक गोष्टी शिकते. त्यात हे रोकडे शरीर आले, हे सारं जग चालवणारा नियंता म्हणजे... पैसा आला, मेंदू जसा एकेक अनुभव घेतो तसा त्याच्यात काय आणि कसा केमिकल लोचा होतो ते आलं... सगळं शिकण्याच्या लालसेतून ती शिकत रहाते. एका परिस्थितीत आपल्याला यात एक विनोद दिसू लागतो. अगदी खळखळून हसू येईल इतका विनोद, जवळपास प्रत्येक दृष्यांत विनोद. खळकळुन हसुन झालं की त्याच विनोदावर टंग-इन-चीक हसुन विचारांची चक्र चालू करणारा विनोद. हे फार फार रोचक आहे. हा विनोद डार्क आहे, ट्विस्टेड आहे, परिकथा वाटेल असा निरागसही आहे, आणि शब्दांत मांडता येणार नाही असा ही आहे. पण कुठेही डोळ्यातुन पाणी वगैरे काढणारा नाही.

पण हे ती असं सगळं का करते? आपण तर असं वागत नाही ना? मग हे सगळं एक रुपक आहे का? तर अर्थतच आहे. यात अनेकोनेक एकावर थर असलेली रुपकं आहेत. अगदी खोर्‍याने आहेत. तिरपाकडी आहेत. एमा स्टोन आपल्या देहबोलीतून, आवाजातून, चालण्यातून, लकबीतून बेलाच्या जडण घडणीत होत जाणारे सूक्ष्म बदल अगदी मार्मिकपणे दाखवते. कथा पटकथा, संवाद, अभिनय, कपडे, कॅमेरा, दृष्यात्मकता आणि दृष्यांगणित बदलत जाणारं, आपल्या जाणीवेला समजेल असं बदलत जाणारं पार्श्वसंगीत. यॉर्गोस लॅटिमोस! ते म्हणतात ना 'द होल इज ग्रेटर दॅन सम ऑफ पार्ट्स'!

यॉर्गोस लँटिमोसच्या ह्या चित्रपटातील सगळ्याच गोष्टी विचारपूर्वक निवडलेल्या, विलक्षण आहेत. सुरुवातीची बेला, त्या बॅक्स्टर मँशन मध्ये गॉड सोबत रहाणारी बेला, संपूर्णपणे कृष्णधवल आहे. तिच्या अविरत अनुभव घेण्याच्या भुकेमुळे ती रफेलो बरोबर जगाची सफर करायला निघाल्यावर त्या दृष्यांत रंग भरू लागतात. रंग भरलेले सुंदर तर आहेतच, पण सगळे पेस्टल कलर. नवी पहाट दिसते ती पण पेस्टल रंगात. नंतर पॅरीस मधले प्रसंग, त्यात तिच्या भूतकाळाच्या आधीचा तिने जगलेला पण आठवणींतून समूळ नाश झालेला भूतकाळ. यासगळ्याला कोर्‍या पाटीने सामोरे जाणे, अगदी भिडणेच. यात अनेकदा फिश लेन्स वापरली आहे. त्यातुन नक्की काय फरक दाखवायचा आहे, ती नक्की कोणाची नजर आहे हे मला बघताना तरी समजलं नाही.

एकदा पाटी कोरी असेल आणि ही कोरी पाटी निव्वळ अनुभवांनी, शिक्षणाने, वाचनाच्या अभावाने कोरी नाही तर याव्यतिरिक्त आपण माणसामाणसातील परस्पर व्यवहारातून जे अतीप्रचंड ज्ञान मिळवतो, त्याच्या जोरावर आडाखे बांधतो, काळ्या पांढर्‍या करड्या रंगात माणसे रंगवतो, आपल्याला स्वतःला इतरांसमोर सतत सादर करत रहातो, लोक काय म्हणतील याचा सदैव मन:पटलावर नेणिवेत जयघोश चालू ठेवतो या सगळ्याचा अभाव एखाद्या व्यक्तीत असेल तर आपण त्याला लाज कोळून प्यायलेला वगैरे म्हणू, किंवा स्पेशल आहे म्हणून सहानुभूती देऊ... पण हे सगळं एका अतीव निरागसतेतून आलेलं बघणं विस्मयकारी आहे.

**** याच्या पुढे एक किंवा दोन स्पॉयलर असतील. बाकी हा काही सस्पेन्स थ्रिलर वगैरे सिनेमा नाही. सिनेमात स्पॉयलर असे काही नाहीत. ते दिले अथवा न दिले तरी दृष्य परिणाम, कथावस्तू आणि त्याची मांडणी इतकी अफाट परिणामकारक आहे की स्पॉयलरचा फरक पडू नये. शिवाय हे स्पॉयलर गॅहम नॉर्टन शो मध्ये एमा आणि मार्क रफेलो आलेले असताना त्यांनी सांगितले आहेत. चित्रपटातही ते पहिल्या अर्ध्यातासात समजतं. त्यामुळे फार काही बिघडणार नाही. तरी वाचयचं नसेल तर इथे थांबा. ****

आणखी एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. बेला हा एक गॉडचा प्रयोग आहे. फॅन्केस्टाईन प्रयोग आहे. ते सगळं शरीर बेलाचं आहे, पण मेंदू लहान बाळाचा आहे. ते कसं झालं काय झालं हे चित्रपटांत कळेलच पण ते फार महत्त्वाचं नाही. तर अशी ही 'अनुभवविरहीत प्रोसेसर आणि फॉर्मॅटेड मेमरी' जर पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीला लाभली तर.... आणि या तर पासूनच ही विलक्षण परिकथा चालू होते आणि आपल्या डोक्यात विचारांचे काहुर माजवुन संपते.

---------------------------------------------------------------------------------------
टीपा:
चित्रपटात नग्न आणि प्रणयदृष्ये खोर्‍याने आहेत.
ग्रॅहम नॉर्टन शो मध्ये एमा आणि मार्क.
एमा स्टोनचा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस ऑस्कर. किती लाघवी असावं कोणी!
ब्रॅडली कूपर आणि एमा स्टोनच्या गप्पा. यात ती लहान मुलीपासून प्रौढ महिले पर्यंत असणारा ग्राफ. त्यातील सुरुवातीचे आणि शेवटचे सीन्स एका लोकेशनला असल्याने ते आधी चित्रित करणे इ. बद्दल बोलली आहे. दोघांनी अगदी दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत आणि फारच छान दिसत आहेत. ब्रिलियंट गप्पा आहेत. नक्की बघा.

लेट शो वर स्टीव्हन कोलबेअर बरोबर.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy सुंदर लिहिले आहे. एमा स्टोन तर आवडतेच.

लोक काय म्हणतील याचा सदैव मन:पटलावर नेणिवेत जयघोश चालू
तर या सगळ्या पसार्‍याकडे संपूर्ण पूर्वग्रह विरहित दृष्टीने बघते. त्या बर्‍या-वाईटाचे रसरसून अनुभव घेते. अगदी आकंठ म्हणू असे!

>>>> हे काही तरी आकर्षक वाटलं. I am sold on this! वरवर स्पर्शून जाणाऱ्या कथांचा कंटाळा आला आहे, जाणीवेत सरळ कुऱ्हाड घालणारं बघायला आवडतं.

ट्रेलर बघितलं, आवडेल असा वाटतोय पण हुलूवर आहे फक्त.

>>> तिला काही पूर्वग्रह नाहीत. नाहीत म्हणजे अजिबातच नाहीत. ती सगळ्या जगाकडे, आपण ज्याला चांगलं वाईट म्हणतो, आणि हे वाईट आपल्या नजरेत अगदी घृणास्पद वाईटही असू शकेल, तर या सगळ्या पसार्‍याकडे संपूर्ण पूर्वग्रह विरहित दृष्टीने बघते
Interesting!
बघायचा आहेच.

Sounds interesting! जेव्हा ऑस्कर मिळालं तेव्हाच लिस्टीत अ‍ॅडलाय. पण पूर्ण वेळ देऊन व्यवस्थित बघायचा आहे. तुमचं परिक्षण वाचून अजूनच उत्सुकता आता!

एमा स्टोनला ह्यासाठी मिळालेले ऑस्कर हि परफेक्ट निवड आहे. भावनिकद्रूष्ट्या लहान असलेल्या एमापासून बुद्धीनिष्ठ तार्कीक अनुभव घेणार्‍या एमापर्यंत प्रत्येक फ्रेममधे ती निरागस वाटत राहते. रफेलो बरोबर ती सर्वात प्रथम डान्स करतो त्या सीनमधली तिची देहबोली नि अडखळत पण तरीही वाहवत जाऊन नाचण्याचा अभिनय थक्क करून टाकणारा आहे. मी निव्वळ त्या एका सीनसाठी तीला ऑस्कर देऊन टाकले असते Happy

अमित हे वयात येणे रुढार्थाने नसल्यामूळे "वयात" असे टाक रे Happy

असामी +१
तिचं पहिलं चालणं, बोलणं, नाचणं... आणि मग बदलत गेलेली बेला. तिने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे आधी त्या आर्कचे १० भाग केले होते. मग १० खूप जास्त वाटून ५ भिन्न स्टेजेस कल्पुन सगळी कंटिन्युईटी, त्या त्या वेळची भाषा, मॅनरिझम असा सगळा अभ्यास लकबी तयार केल्या. शूट करताना अर्थातच सलग शूट झालं नाही. बॅक्स्टर मँशन मधली स्टेज १ आणि ५ आधी शूट झाली कारण ते घर तितकाच वेळ उपलब्ध होतं. ती कायम निरागस, नवे अनुभव घ्यायला तहानलेली, त्यातुन शिकणारी आणि शिकलेलं विना आडपडदा बोलुन अंमलात आणणारी अशी छान दाखवली आहे.
अर्थात हे असं प्रत्यक्ष जीवनात येणंं भयानक असेल. आणि म्हणून ती परिकथा म्हणूनच मला ठीक वाटली. मला वाटतं चित्रपटातही ती परिकथा म्हणूनच दाखवली आहे. त्रयस्थ दृष्टीने तिच्याकडे बघताना मात्र आपलं, समाजाचं सगळंच हसू येत होतं.

बाकी अस्मिता, स्वाती, सामो, अंजली, मै.. बघा नक्की!

माझ्या पोस्ट मधे लिहिलेले हे वाक्य कस काय उडालं देव जाणे !

अमित तू एकदम परफेक्ट इसेन्स पकडला आहेस सिनेमाचा ह्या लेखात. परत अनुभवल्यासारखे वाटाले.

छान लिहिलं आहे रे.
<<स्पॉयलर>>
त्यात polite society बद्दल चे भाष्य वेगवेगळ्या पार्श्वभूमी वर आले आहे. त्यातले छोटे संदर्भ बेस्ट आहेत. तिला गरिबीची जाणीव होते तिथे काळा पुरुष घेतला आहे आणि त्या दुनियेत आणि ह्या दुनियेत एक जिना आहे तो पडलेला आहे.. तो सीन जिथे एमा ती मुले पाहून रडते तो मस्त केलाय तिने. पुन्हा तिथेच त्या बोटीवर ती म्हातारी म्हणते मी गेली वीस वर्षे कोणा पुरुषा सोबत झोपले नाहिये. म्हणजे झोपणे न झोपणे हा माझा निर्णय.. वेश्यव्यवसाय मध्ये पण आधी ची ती आणि नंतरची ती रासवट बाप्याना कसे हाताळते, ते मस्त घेतलय. मला मार्क रफेलो ह्यात एमा पेक्षा किंचित जास्त आवडला, अफलातून काम केलं आहे त्याने. खास करून जेंव्हा ती सज्जात उभी असते आणि तो खाली येतो तो सीन आणि जेंव्हा ती पहिल्यांदा त्याला सांगते की मी झोपले आणि पैसे मिळवले तो सीन Happy ह्यातले पुरुष तिचे वेगवेगळ्या पद्धतीने दमन करू पाहतात किंवा तिला बांधून ठेवू पाहतात पण ह्या प्रत्येकासाठीचे तिचे वन लायनर मस्त आहेत. आधीचे पेस्टल जाऊन बरेच ठिकाणी गडद रंगांचा वापर झालाय शेवटी शेवटी, जसे की लाल आणि निळा. Background la पण शेवटी पाईप्स चा ठळक वापर केलाय. हे सगळ असून मला आवडला की नाही हे सांगता येत नाहीये Happy शेवटी तिला मॅक्स पण हवाय आणि तुआनेत पण.. आणि मॅक्स च का?

लंपन, मस्त लिहिलं आहेस. धन्यवाद.
पॅरीस मधल्या वेश्यागृहातली मागची पेंटिंग्ज्स, बोटीतली व्हिज्युअल्स. ती तो नवा सूर्योदय सज्जातुन बघते तो प्रसंग, रुफलो स्नो मध्ये खाली उभा आहे आणि बेला वरती आहे तो तू वर लिहिलेला प्रसंग. या सगळ्यावेळी ऐकू येणारं संगीत यासगळ्याची मेंदूने थोडी फार नोंद घेतली पण लक्ष कथेत असल्याने अप्रिशिएट करता येईल असं झालं नाही. परत बघणार नक्की.
ती म्हातारी मी शय्यासोबत केली नाही म्हणते तेव्हा बेला, ती म्हातारी आणि ब्लॅक मुलगा यांच्या चेहर्‍यावर एक इलेक्ट्रिक हसू आहे. ते फारच काँटेजिअस आहे.
मार्क रफेलो बद्दल ही +१ फार छान काम केलं आहे. पण बेलाचा आर्क आणि तिच्यातला निखालस बदल यात डोळे दिपले माझे. Happy

तिला सगळेच अनुभव घ्यायचे आहेत. अ‍ॅल्फी आल्यावर त्याच्या बरोबर जाते, तिकडून आपली सुटका करुन घेते, त्याला ही इन्स्टंट कर्मा दाखवते. यम-नियमांच्या बाहेरची आहे ती.

परिचय-परीक्षण मस्तच लिहीले आहे अमीतव.
मी जवळपास अर्धे वाचून मुद्दाम थांबलो, चित्रपट बघायचाच म्हणुन. ( पण बघतोच का ते बघुया.) परिचयात स्पॉईलर नाही ये असे तुम्ही वाड्यावर लिहिले होते, पण पुढे अधिक न वाचता बघायला आवडेल. बघितल्यावर पुढचे वाचेन.

सुंदर परिचय! मीही काहीही पूर्व कल्पना नसताना हा चित्रपट पाहिला. सुरूवातीला हे नक्की काय चाल्लंय असे झाले.
But then it really grew on me.
हे सगळं एका अतीव निरागसतेतून आलेलं बघणं विस्मयकारी आहे.>>>>अगदी अगदी

सुंदर लिहिलं आहे. चित्रपट इंटरेस्टिंग वाटतो आहे.
लंपनची पोस्ट वाचताना गौतम बुद्ध आठवला.

अमित तुला कुठे तरी ह्यातले सगळे सेक्स सीन्स लाईफ मेटाफोर म्हणून आले आहे असे वाटलेले का तिच्या फ्रान्स मधल्या अनुभवांनंतर ?

तसा विचार न्हवता केला रे.
ती फ्रांस मधुन परत येते ते गॉडसाठी. तसं झालं नसतं तर ती परत आली असती का? कधी परत आली असती? तिने जीवनात पुढे काय केलं असतं? असं मात्र तेव्हा वाटलेलं. ती प्रवाहपतिताचं जीवन जगत होती. रादर टॉडलर, मुलं, टीन्स हे प्रवाहपतिताचंच जीवन बर्‍यापैकी जगतात. अगदी प्रवाहपतित नाही तरी वन डे अ‍ॅट अ टाईम. आपला मार्ग ठरवायचा असा काही निर्णय ती कदाचित शेवटी मॅक्सशी बोलताना घेते, पण शेवटी भलत्याच ठिकाणी जाते. एल्फी बरोबर जाते ते ही 'वन डे अ‍ॅट टाईमच' आहे. डिटरमिनेशन. पर्झव्हिअरन्स इ. इ. तिच्यात पुस्तकं वाचुन, जग बघुन येतील का? कधी?
अर्थात, लाईफ हॅपन्स! एखादी गोष्ट न घडती तर ... अशा एक्झरसाईझला कितपत अर्थ आहे हे ही आहेच.

चांगले लिहिले. विषय अर्थातच उत्तम पण तरीही प्रसंग झेपले नाहीत. पण पुर्ण पाहिला सिनेमा. तिने जबरदस्त काम केले आहे, फार गट्स हवेत असा रोल करायला व तरीही प्रेक्षकांचे लक्ष फक्त अभिनयाकडे खिळवुन ठेवायला. फारफार मस्त काम केले आहे एमा स्टोनने.

अस्मिता, वेटिंग फॉर युअर टेक ऑन धिस मुव्ही. नो प्रेशर. पण तुझा प्रतिसाद वाचण्याची खूप उत्सुकता आहे. मला कदाचित नवीन काहीतरी गवसेल.

माझा आक्षेप - मेंदूने इतक्या लहान मुलीबरोबर लैंगिक व्यवहार करण्याच्या प्लॉटबद्दल आहे. अर्थात सिनेमा खूपसा मॉरल/इम्मॉरल (नैतिक्/अनैतिक) बाउंडरीज तपासत रहातो.
मला किंचित डिस्टर्बिंग वाटला. माय प्रोजेक्शन कदाचित.

स्पॉयलर्स असतील, कदाचित.
बघितला.
लंपन, छान पोस्ट.
सामो Happy
---------

मला आवडला. पहिल्या अर्ध्या भागात ती कमी वेगाने उत्क्रांत होत जाते व शेवटचा अर्धा भाग झपाट्याने. त्यामुळे शेवटचा अर्धा भाग जास्त गुंगवून ठेवणारा वाटला. त्यामानाने ती दुसरी मुलगी फिलिसिटी कमी वेगाने शिकत जाते. बेलाचे 'मोटर स्किल्स' तिच्या चालण्यात व वावरण्यातून सुधारत गेलेले आहेत. जे मला ती हॅरी कडून फिलॉसॉफी शिकते, तेव्हा झपाट्याने सुधारल्यासारखे वाटले. मला हॅरी आणि मार्था असणारे सीन फारच आवडले. तेव्हा कथेचा वेग कमी होऊन खोली वाढल्या सारखी वाटली. डंकन तिला कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतो पण ती अशी पूर्वग्रहरहित आणि स्वतंत्र असल्यानेच त्याला आकर्षक वाटलेली असते हे तो साफ विसरतो. तो फार वयस्क वाटला आहे तिच्यासमोर ते मला खटकलं. मला इतका आवडत नाही तो. आयर्न मॅन समोर नेहमी 'आहे का तर आहे' वाटलेला आहे. Wink

फिश आय लेन्स, बॅगपाईपची किणकिण, हाय पिच गिटार साऊन्ड , ukulele , व्हायलिन आणि जलतरंग सुद्धा ऐकू आला.सुरवातीला एकच हाय पिच 'टुंग टुंग' आहे, हळूहळू ती जास्त शिकत जाते तसे पार्श्वसंगीतही एकापेक्षा जास्त भावना 'अनुसंधानत' जाते. अमित/लंपन/ हर्पा म्युझिकली इनक्लाईन्ड लोक नीट सांगू शकतील. हा प्रयोग नाविन्यपूर्ण वाटला आहे. प्रत्येक नात्यात ती जशी जगाबद्दल जाणून घेत गेली तसे ती स्वतःलाही ओळखत गेली. अंतर्बाह्य असे दोन प्रवास वाटले.

ती त्या नात्याला उच्च बिंदू वर सोडून गेली कारण ती 'आऊट ग्रो' झाली आणि नातं मात्र तिथंच राहिलं. मार्क/डंकन सोबत तर अक्षरशः I met you before my pick, so I got attracted to you, ( the sex might have clouded my memory) but I am not the woman I used to be असं व्यवस्थित डिफाईन केलं आहे.‌ तो तिच्या आयुष्यात आलेला पहिलाच पुरुष होता तसा. पळून जाणं, जग बघणं आणि शारीरिक सुख ह्या सगळ्यांचं ॲड्रेनेलिन ओसरलं ते त्या फिलॉसॉफीमुळे. पहिल्यांदा दुःखाची अनुभूती येते तेव्हा खरोखरच गौतम बुद्धासारखी उद्विग्नता आल्यासारखी वाटते.

ते जहाज, मागचं आभाळ, आभाळाचे रंग, समुद्राचे पाणी खूपच वेगळे दाखवले आहे. मृतबाळांना बघताना हॅरी तिला सामाजिक दरी बद्दल जे समजावतो ते फार चपखल आहे. त्या पायऱ्या त्या लोकांपर्यंत कधीही पोचू शकत नाहीत हे त्या पडलेल्या दाखवून सूचित केले आहे. वेश्याव्यवसाय करतानाही ती समाजशास्त्रात रस घेते व ती सगळं एक प्रयोग म्हणून करते. तिला तेव्हाच्या नीतिमूल्याशी फारसं देणंघेणं नसतं पण स्वतः च्या वाढीसाठी लागणारे शिष्टाचार तेवढे ती मनापासून शिकते.

शेवटीही ती नवऱ्याच्या घरी स्वतःला जाणून घ्यायला जाते. मला थोडी नाटकासारखी असलेली 'सेक्स कॉमेडी' किंवा 'गॉथिक कॉमेडी' वाटली. तिचे डोळे लहान बाळासारखे रिक्त आणि लकाकते (luminous) वाटले आहेत.

काही भाग क्रूर वाटला पण त्यांनी प्रेक्षकांसोबत सुरवातीपासून 'आम्ही काही तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही' हा टोन 'सेट' केला होता त्यामुळे खरोखरच अपेक्षांचा सेट असा नाही राहिला. या सिनेमाची खरी गंमत तीच आहे.

>>>>>पण त्यांनी प्रेक्षकांसोबत सुरवातीपासून 'आम्ही काही तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही' हा टोन 'सेट' केला होता त्यामुळे खरोखरच अपेक्षांचा सेट असा नाही राहिला. या सिनेमाची खरी गंमत तीच आहे.
अगदी मार्मिक!!

>>>>फिश आय लेन्स, बॅगपाईपची किणकिण, हाय पिच गिटार साऊन्ड , ukulele , व्हायलिन आणि जलतरंग सुद्धा ऐकू आला.सुरवातीला एकच हाय पिच 'टुंग टुंग' आहे, हळूहळू ती जास्त शिकत जाते तसे पार्श्वसंगीतही एकापेक्षा जास्त भावना 'अनुसंधानत' जाते.
वाह! असू शकेल असे.

Pages