मुक्ती – (दोन घटना या लघु कथेचा चा पूर्वार्ध )

Submitted by Meghvalli on 18 March, 2024 - 04:13

CADRC -क्लिव्हलँड अल्झायमर्स डिसिज रिसर्च सेन्टर ,एक अल्झायमर्स डिसिज क्षेत्रात काम करणारी जगदमान्य संस्था . डॉ. जगन्नाथ सुखठणकर, वय वर्ष 45 , हे भारतीय वंशाचे तेथील नामांकित रिसर्च फेलो .
काल रात्रीपासूनच जगन्नाथाची तब्येत ढासळली होती .त्याला तातडीने आय.सी.यु त शिफ्ट केले होते . डॉ. इंगे गृन्दके हेड ऑफ न्यूरो -इम्युनोलॉजी स्वताः जातीने सर्व उपचार पाहत होत्या .

डॉ. इंगेंचा जगन्नाथ हा अत्यंत आवडता शिष्य आणि न्यूरो -इम्युनोलॉजी रिसर्च सहयोगी सुद्धा. डॉ. इंगें यांनी स्वताः २०० हुन अधिक संशोधन पर प्रभंध लिहिले होते . पण जगन्नाथ वर व त्याच्या प्रतिभेवर त्या खूप प्रभावित होत्या.

जगन्नाथ सुखठणकर २००९ जुलै ला भारतातून क्लिव्हलँड ला आला, न्यूरो -इम्युनोलॉजी आणि अल्झायमर्स वर त्याचे संशोधन पुढे नेण्या साठी आणि इकडचाच झाला. छोटेसेच कुटुंब होते त्याचे. तो, त्याची बायको मृण्मयी आणि त्यांचा लहान २ वर्षाचा मुलगा सौम्य .

आज ह्या गोष्टीला १० वर्ष उलटून गेली पण आजही इंगेला जणू हे काल झाल्या सारखे स्पष्ट आठवत होते . हळू हळू इंगे आणि सुखठणकर कुटूंबियांचे समंध घरच्या सारखे कधी झाले हे इंगे ला ही कळले नाही . इंगेला जणू तिचा गेलेला छोटा भाऊ आलबेर्ट च जगन्नाथ मध्ये दिसे आणि जगन्नाथ ला सुद्धा त्याला नसलेली मोठी बहीण मिळाली होती .

इंगे विचार मग्न होती . तिला आजही तो दिवस आठवत होता .११ ऑगस्ट २०११. जगन्नाथला जेमतेम दोनच वर्ष CADRC मध्ये पूर्ण झाली होती. त्याच्या न्यूरो -इम्युनोलॉजी मधल्या संशोदनाबद्दल आणि उल्लेखानीय कामा बद्दल त्याला डॉ. जावेन खाचात्युरीयन अवॉर्ड ने विभूषित करण्यात आले होते .वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी हा बहुमान मिळवणारा CADRC चा तो पहिलाच फेलो. आज या गोष्टीला ७ वर्ष होऊन गेली.त्या नंतर काही वर्षांतच जगन्नाथ च नाव अल्झायमर्स क्षेत्रांत खूप प्रसिद्ध झाले होते आणि काय हा दैव दुर्विलास म्हणावा की आज तोच जगन्नाथ अल्झायमर्स सारख्या रोगाशी स्वतःच्या जीवनासाठी लढत होता.

इंगेला मृण्मयी आणि सौम्य ची आठवण झाली. दोघेही काल रात्रीपासूनच हॉस्पिटलच्या रिसेपशन मद्ये बसून होते . अवघ्या बारावर्षाचा सौम्य बावरलेला होता .

आज २६ नोव्हेम्बर २०१९, मार्गशीर्ष अमावास्या ,रात्रीचे ११:४५ PM , उद्या पौष प्रतिपदा , २७ नोव्हेंबर 20१९ जगन्नाथाचा ४६ वा वाढदिवस .मृण्मयी हॉस्पिटल रिसेपशन च्या सोफ्यावर बसून विचार करत बसली होती .सौम्य तिच्या खांद्यावर डोके ठेवून काही वेळेपूर्वीच झोपला होता .

गेले जवळ जवळ सहा महिने जगन्नाथ CADRC हॉस्पिटल च्या बेड वर होता .सुरुवातीला तल्लख बुद्धीचा जगन्नाथ छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागला होता . मृण्मयीला वाटले कामाच्या व्यापात विसरत असेल .मग हळू हळू हा विसराळू पणा वाढत गेला . त्याची जागा कधी गोंधळाने घेतली हे लक्षातच आले नाही .

त्या दिवशी जगन्नाथचा ५ PM फोने आला तिला . तो सौम्याच्या शाळेतून कॉल करत होता.

"हॅलो मृण, दिझ गाईस आर सेयिंग दॅट सौम्यास कलचरल प्रोग्रॅम वास लास्ट इयर ! डिडन्ट यु रिमाईंड मी येस्टरडे टु कॅम डिरेक्टली फ्रॉम वर्क टुडे?"

दुसऱ्या दिवशी सकाळीच ते दोघे इंगे कडे दवाखान्यात गेले होते.संध्याकाळी प्रथम चाचणी रिपोर्ट्स आले होते . जगन्नाथ मद्ये अल्झायमर्स ची सर्व लक्षण होती.

सर्व साधारण पणे फर्स्ट स्टेज ते सिक्सथ स्टेज यायला ४ ते ६ वर्ष सहज निघून जातात. पण जगन्नाथ च्या अल्झायमर्स ने मात्र हा टप्पा डिड वर्षांतच पार केला होता . जगन्नाथच सर्वच त्याच्या सारखे फास्ट होत .सहा महिन्या पूर्वी जगन्नाथ ला खाण्या पिण्यास त्रास होऊ लागला . इंगेनी त्याला घरून हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करवले. ती त्याची जातीने काळजी घेत होती. गेल्या १० वर्षांत सुखठणकर कुटुंबाला तिचा खुपच आधार होता. अगदी राहायचे घर शोधण्या पासून ते सौम्य च्या स्कूल ऍडमिशन पर्यंत सर्व गोष्टीत. मृण्मयीला तर ती मोठी नणंद च नव्हे तर प्रेमळ सासु सारखिच वाटत होती. जणू काही शांतादुर्गाच इथे अमेरिकेत इंगेच्या रूपाने त्यांची काळजी घेत होती. जगन्नाथ इथे अमेरिकेत जरी स्थयिक झाला असला तरी त्याने मोठ्या पंचमी ची (कवळे - गोवा) शांतादुर्गेची रथयात्रा कधीच चुकवली नव्हती व ह्या आजारांत ही चुकवली नाही. अगदी गेल्या वर्षी ही ते सर्व दर्शनास गेले होते. इंगेही होतीच त्यांच्या बरोबर. गेली सात वर्ष न चुकता तीही त्यांच्या बोरोबर येत होती. जर्मन संस्कृतीत जन्मलेली आणि अमेरिकन संस्कृतीत मोठी झालेली इ॑गे गेल्या दहा वर्षांत सुखठणकरांच्या मराठ मोळया भारतीय संस्कृतीत अगदी सहजपणे सामावुन गेली होती. दिवाळ सण, भाऊ बीज , पाडवा नव -वर्ष , गणपती असे सर्व सण इंगेने त्यांच्या बरोबर मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने साजरे केले होते .कोणाचे ऋणानुबंध कसे असतात हा तो परमेश्वरच जाणो ! मृण्मयी च्या डोळ्या पुढुन हा काळ सरकत होता. ती डोळे बंद करून सोफ्यावर टेकली होती. शेजारी सौम्य तिला बिलगून शांत झोपला होता .

आय.सी.यु त एक अलिप्त शांतता होती . जगन्नाथ व्हेंटीलेटरव्हर होता .अधून मधून पाहायला येणारी नर्स व आजूबाजूला असणाऱ्या इंस्ट्रुमेंट्स चाच काय तो आवाज . बाकी सर्व शांत व थंडगार. इंगेचा मात्र गेले १८ तास डोळ्याला डोळा लागला नव्हता. ती केबिनच्या काचेतून एक टक जगन्नाथ कडे लक्ष्य ठेवून होती. तिचे डोळे भरून आले होते पण ती अश्रू येऊ देत नव्हती. गेली सहा महिने तिने आपले मन घट्ट करून अश्रू दाबले होते, फक्त मृण्मयी खचुन जाऊ नये म्हणून! ती मृण ला (जगन मृण्मयीला लाडाने मृण म्हणत असे) सतत धीर देत होती आपले दुःख बाजूला सारून. जगन मध्ये तिने आलबेर्ट लाच पहिले होते. आलबेर्ट तिचा धाकला भाऊ, हॅन्डसम, कुरळ्या केसांचा, उंचपुरा आणि बांधेसूद. एरफोर्स पायलट च्या पोशाखात तो किती रुबाबदार आणि उमदा दिसत असे. आलबेर्ट ला वेगाचे वेड होते. म्हणून तर तो एरफोर्स मध्ये जॉईन झाला होता. तो नेहमी वेगाशी पैजा मारायचा! एक दिवस हरला… जगन सुद्धा वेगवान, पण डोक्याने. त्याच्या विचारांची झेप आणि वेग असा काही होता की भल्याभल्यांची बोटे तोंडात जावी.

पण गेल्या दोन वर्षांत काय झाले, कुणाची नजर लागली जगन ला? त्याची ती झेप आणि वेग दोन्ही अल्झायमर्स ने खंडित केले. गेल्या सहा महिन्यात तर जगन चे हाल तिला बघवत नव्हते. स्वतःच्याच मल मुत्रांत तॊ खितपत पडला होता. मृत्यूच्या प्रतीक्षेत, तो मात्र काही केल्या येत नव्हता. आजून किती परीक्षा पाहणार होता तो त्याची! जगन च्या डोळ्यांत तिने ती आर्तता , तो आक्रोश , ती असाह्यता , ती व्याकुळता किती तरी वेळा पहिली होती . त्याचे डोळे मृत्यूला आळवत होते पण मृत्यू काही प्रसन्न होत नव्हता. इंगेनी मनातल्या मनात त्या शांतादुर्गेला विचारले, “आई अजून किती दिवस तु त्याला असे क्षणा क्षणाने मारणार आहेस? तुला तुझ्या मुलाची दया येत नाही काय? सोडव त्याला या जीवन नसलेल्या जीवनातून लवकर! त्याला मुक्त कर आई त्याला मुक्त कर”. इंगेच्या डोळ्यातून एक अश्रू कधी ओघळला तिचे तिलाच कळले नाही. तिने स्वताःला सावरले व एका निशाचयाने चैरवरून उठली.घड्याळांत सकाळचे ६:०० AM झाले होते . अरे आज २७ नोव्हेंबर 20१९, जगन चा ४६ वा वाढदिवस . दार वर्षी प्रमाणे ती या वर्षी पण त्याला गिफ्ट देणार होती.

जगन्नाथ शांत झोपला होता. वेळ आणि काळ याचे आता त्याला काहीच देणे घेणे नव्हते. फक्त आपण असल्याची जाणीव काय ती उरली होती. सर्वत्र शांतता व उबदार थंडपणा, घट्ट काळोख आणि कसला तरी आवाज इतकेच उमजत होते ….., असावे कदाचित. इतक्यात त्या काळोखांतून दुरून एक प्रकाशचा ठिपका जवळ येत असलेला त्याला जाणवला. हळू हळू तो शुभ्र सफेद प्रकाश मोठा होत चालला होता. समोर त्या सुंदर अगम्य प्रकाशांत प्रत्यक्ष शांतादुर्गा त्याला भेटायला आलेली होती. त्याच्या शरीरावर रोमांच उठले , अष्टभाव दाटून आले , डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असल्याची जाणीव त्याला झाली .अचानक शांतादुर्गेच्या जागी इंगे समोर उभी दिसली , तेच शांतादुर्गेचे विलोभनीय स्मित आणि मायेने व करुणेने भरलेले डोळे, पण ही तर इंगे! "इंगे शांतादुर्गा केव्हा नी कशी झाली अशी ?" त्याचे मन स्वतःलाच विचारत होते. सत्य काय आणि भ्रम काय हे त्याला कळत नव्हते. त्याने वाकून इंगेला नमस्कार केला. त्याच्या शरीरांतून त्याला एक ज्योत निघताना दिसली ती शांतादुर्गेत विलीन होत गेली. आता सर्व हलकं हलकं वाटत होत. एका कैदेतुन मुक्त झाल्या सारखे वाटत होते. तो उडत होता. सहज त्याची नजर खाली गेली. खाली एक सुंदर हिम प्रदेश पसरलेला होता , त्यात एक छोटं झोपडीवजा घर होत . सूर्य नारायण नुकताच उगवत होता. जगन ने त्या तेजाला नमस्कार केला.

इंगे ने सलाइन मधली सिरिंज काढून तिच्या पर्से मध्ये ठेवली . तिचा जगन मुक्त झाला होता. प्रतिपदेचा सौम्य सूर्य नारायण नुकताच उगवत होता. आता तिला अजून कणखर बनायचे होते, मृण साठी आणि सौम्य साठी . बरीच कामे पडली होती . सौम्य ला खूप खुप मोठा कारचा होता . जगन पेक्षा ही खूप मोठा .

अजय सरदेसाई (मेघ)
१८/५/२०२१ ७:२८ PM

meghvalli.blogspot.in

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरी संस्था, खरी माणसं वा खऱ्याच्या जवळ जाणारी नावं,
क्लिव्हलंडचीच स्कायलाईन, आणि खऱ्या व्यक्तीचा फोटो...

कल्पित कथा असताना हे का? हे निव्वळ योगायोग आहेत? तर मग अगम्य, आश्चर्यकारक आहे. कथेपेक्षा या गोष्टींनी अस्वस्थ झालो.

"मुक्ती" या लघु कथेवरचा तुमचा( Abuva) प्रतिसाद वाचून बरे वाटले. या कथानकाचा दुसरा भाग "दोन घटना" या लघु कथा लेखाच्या पहील्या कथेत आहे. खरं म्हणजे "दोन घटना" ही कथा पहीली लिहीली गेली.
नमस्कार