विकास

Submitted by पॅडी on 6 March, 2024 - 23:19

गाव- पांदीत पायाचा , आता उमटेना ठसा
सांदीकोपऱ्यात उभा , गाव रडे ढसाढसा ...

ओढ आटली; जिव्हाळा, नात्यातला हरपला
अंगणातला पिंपळ, उभ्या उभ्या करपला...

रस्ते डांबरट झाले, वीज उजळते गाव
मिणमिण कंदिलास, कवडीचे मोल भाव...

लेकबाळ माहेराला, सणासुदीला पारखी
मायमाऊली सचिंत, लागे उचकी सारखी...

चिल्या-पिल्यांचा गलका, नाही पदराशी झोंबी
चिंचा आवळे सुकले, गेली करपून ओंबी...

गुरावासरांचा गोठा; नाही हंबरत गाय
डेअरीच्या दुधावर, मेली येईनाच साय...

घंटा-घुंगरांचा नाद, गेल्या बंड्या बैलगाड्या
दारापुढे झाकलेल्या, उभ्या चारचाकी गाड्या...

हरपल्या गप्पा-टप्पा, वड -पारंब्याचे झोके
विकासाच्या आरशात, दिसे गाव ओकेबोके..!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नाण्याची दुसरी बाजू?
कविता जरा निराशावादी वाटली. गावांचा विकास व्हायलाच हवा पण निसर्गाचेही जतन व्हावे.

गावचा विकास होत असताना कमी होत चाललेली मातीमधील ऊब ह्याची खंत शब्दबद्ध करण्याचा अल्पसा प्रयत्न.
प्रतिक्रियेबद्दल आभार.