अपहरण - भाग ३

Submitted by स्मिताके on 21 February, 2024 - 11:50

भाग २: https://www.maayboli.com/node/84681

या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता.

"अमेरिकन नागरिकांसाठी जाहीरनामा.

आम्ही तुमच्या राष्ट्राध्यक्षांचं त्यांच्या पत्नीसहित अपहरण केलं आहे. खंडणी मिळेपर्यंत ते आमच्या ताब्यात राहतील. सरकारने खंडणी मंजूर करून ती सार्वजनिक ठिकाणी आमच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येईल. त्यांची सुटका झाल्यानंतर आम्ही हा देश सोडून जगात दुसरीकडे कुठेतरी शांततेत राहू इच्छितो. त्यासाठी आम्हांला अमेरिकन सरकारकडून आणि जनतेकडून कायमस्वरूपी संपूर्ण अभय मिळायला हवं. या दोन्ही गोष्टी मिळेपर्यंत त्यांची सुटका होणार नाही. आम्हांला दर आठवड्याला दर डोई दहा लाख डॉलर्स दयावे अशी आमची मागणी आहे. अपहरण झाल्यापासून मागणी पूर्ण होईपर्यंतचे सर्व आठवडे मोजण्यात येतील. या मागणीत कसलाही बदल होणार नाही. राष्ट्रप्रतिनिधींनी ही मागणी पूर्ण करण्याची इच्छा दर्शवली, की या वृत्तपत्रातून आम्ही पुढच्या सूचना देऊ. आता संपूर्ण जगासमोर अमेरिकेची निष्ठा आणि अभिमान पणाला लागला आहे, असं समजा. "

हा जाहीरनामा नव्हे, जनतेवर जणू डायनामाईटचा स्फोटच झाला. त्यात नुसतेच कडक शब्द नव्हते, तर एक प्रचंड धाडस होतं. पण म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवावा का? जनतेत दोन गट पडले. एका गटाचा यावर पूर्ण विश्वास बसला. तर दुसरा गट म्हणू लागला, हे काहीतरी कुभांड आहे, कोणीतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोडसाळपणा केला आहे.

आठवड्याला वीस लाख डॉलर्स! अमेरिकेसारख्या देशासाठी आणि त्यातही देशातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ही किंमत योग्यच म्हणायला हवी.

जाहीरनाम्यातलं हस्ताक्षर कसून तपासण्यात आलं. गुप्तहेरांच्या कलेत ज्या ज्या काही युक्त्या शक्य असतील, त्या सर्व वापरण्यात आल्या. पुढचे काही दिवस न्यू यॉर्कमध्ये अगदी सेंट पीटर्सबर्गच्या तोडीची गुप्तहेर कारवाई दिसून आली. पण शेवटी बायरन्स, पिंकरटन आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी शरमून आपला संपूर्ण पराभव कबूल केला.

लॉर्ड टेनिसनच्या काव्यात वर्णन केल्याप्रमाणे

अद्भुत सुंदर हात प्रकटला
शुभ्र रेशमी शेल्यामधला
हवेत परजून खङग अचानक
क्षणार्धात तो लुप्तच झाला.

अगदी तसाच, हे कृष्णकृत्य करणारा गुन्हेगार गायब झाला होता.

पण या जाहीरनाम्यामुळे राजकीय वर्तुळात सुटकेची भावना पसरली. राष्ट्राध्यक्षांना धरून ठेवलं आहे ते फक्त सोन्याच्या नाण्यांसाठी, ही बातमी जर खरी असेल, तर त्यात फारसा धोका नव्हता. म्हणजे निदान मारेकऱ्याची तलवार त्यांच्या गळ्याशी टेकलेली नव्हती. किंवा अध्यक्षपद स्वीकारतानाच्या भाषणात, देशभक्तीने भारावून जाऊन परक्या देशांवर त्यांनी केलेल्या टीकेचा बदला घेण्याचा हा डाव नव्हता. एखाद्या गुप्त राजकीय संस्थेने त्यांना ओलीस ठेवून, राष्ट्राच्या संपत्तीवर डल्ला मारून, आपली तिजोरी भरण्याचा कट तर रचला नसेल ना? असाही एक प्रश्न विचारण्यात येऊ लागला. अनेकांनी या घटनेचा संबंध आयर्लन्डच्या राजकारणाशी जोडला. अमेरिकेच्या तिजोरीत एकशे अठ्ठ्याहत्तर दशलक्ष डॉलर्सची वरकड रक्कम होती.त्यातून खंडणी मंजूर करून ताबडतोब पाठवून देण्यात यावी, अशा अर्थाची जनतेची पत्रं वॉशिंग्टनमधल्या प्रतिनिधींना येऊ लागली. तर इतर काही लोक याला विरोध करत होते. आपले गुप्तहेर या प्रकरणाचा लवकरच छडा लावतील. मग इतकी मोठी रक्कम वाया कशाला घालवायची? असा त्यांचा सवाल होता. राष्ट्राचे उपाध्यक्ष आता तात्पुरते प्रमुख झाले होते. त्यांनी ताबडतोब खंडणीची रक्कम मंजूर करण्याचे आदेश दिले. मग ती रक्कम किती का मोठी असेना. त्यांच्या डोक्यावर इतकं प्रचंड ओझं येऊन पडलं होतं, त्यापुढे जनतेच्या तिजोरीतल्या रकमेची काय तुलना? मग आठवड्यातले उरलेले दिवस गुप्त बैठकांमध्ये गेले. संतप्त चर्चा करण्यात बराच वेळ वाया गेला.
त्यातच अनेक तारा येऊन नवीन धागेदोरे हाती लागल्याच्या अफवांनी गोंधळ उडाला.

२२ जून उजाडला. अपहरणाला दोन आठवडे पूर्ण झाले होते. न्यू यॉर्क हेराल्डच्या कचेरीत पुन्हा त्याच हस्ताक्षरातलं पत्र पोहोचलं होतं, मात्र यावेळी त्यावर शिकागोचा पत्ता होता. "आमचा उदार प्रस्ताव सरकारने नाकारल्यामुळे आम्ही खंडणीची रक्कम वाढवून वीस लाख केली आहे."
पत्रात एकाच ओळीचा थंड, कुत्सित मजकूर होता, याहीवेळी खाली सही नव्हती. लेखकाची मग्रुरी मात्र तशीच होती. हे वाचल्यानंतर जनतेला कळून चुकलं, की आपल्याला वेठीला धरून हा खलनायक त्याची मागणी पूर्ण करून घेणार आहे. सर्वांची खात्री पटली, की ही पत्रं खरोखरच त्या अपहरणकर्त्याने लिहिली आहेत. भर उन्हाळ्यात ऐन दुपारच्या वेळी भाजून काढणाऱ्या रखरखीत उन्हासारखं हे रहस्य प्रत्येक नागरिकाच्या मानगुटीवर बसलं. हा कोणीतरी अज्ञात शत्रू आपल्यामध्येच कुठेतरी लपला आहे, आणि आपण कुठलाही प्रतिकार करू शकत नाही, अशा अनामिक भीतीने प्रत्येकजण गर्भगळित झाला. प्रत्येक घरातून, शाळेतून, चर्चमधून प्रार्थना करण्यात आल्या. देशाला त्रासदायक ठरलेल्या इतर कुरबुरी बंद पडल्या. सर्वत्र सहानुभूतीचं वातावरण होतं. जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी आपापली सुरक्षा वाढवली, पण तरीही भीतीने ते थरथर कापत होते.

अनेक चर्चा झडल्या. सरकारी बैठकांत नेहमी होतात त्याप्रमाणे भीती, संताप, धमक्या असे अनेक प्रकार झाले. शेवटी अल्पमतातल्या विरोधकांचं म्हणणं मान्य झालं. पैसे वाचवण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या पाच लाखांच्या बक्षिसाच्या आशेने इन्स्पेक्टर बायरन्सनी सुचवलं, की "आणखी थोडा काळ जाऊ द्यावा." त्यामुळे ताबडतोब खंडणी देण्याचा आदेश स्थगित झाला.

या सर्व भानगडीत अपहरणानंतरचा तिसरा आठवडा उजाडला. न्यू यॉर्क हेराल्डला पुन्हा त्याच हस्ताक्षरातलं पत्र आलं. पत्रावर यावेळी बॉस्टनचा शिक्का होता. या पत्राने परिस्थिती निर्वाणीला पोहोचली.
"या देशाचं प्रेम राष्ट्राध्यक्षांवर नसून, तिजोरीवर असल्याचं दिसतं आहे. आता खंडणीची रक्कम वाढवून साठ लाख डॉलर्स इतकी झाली आहे. ती सोन्याच्या नाण्यांत भरायची आहे. देशाची तिजोरी अजून आटलेली नाही, आणि आमची ताकदही. आम्हांला शोधून काढणं अशक्य आहे. आमची सुरक्षा व्यवस्था जबरदस्त आहे. तुम्ही चालवलेले प्रयत्न आम्हांला विनोदी वाटतात. कळवण्यास वाईट वाटते, की राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी आजारी आहेत."

आधीच धुमसत असलेल्या एका घटकाला या जाहीरनाम्यामुळे वाचा फुटली. देशातला महिलावर्ग एकजुटीने पुढे आला. त्यांनी खंडणीची रक्कम गोळा करण्यासाठी नव्या संस्था उभारल्या.घराघरांतून पैसाफंड उभा राहिला. महिलांनी शेकडो, नव्हे, हजारो डॉलर्स गोळा केले. दागिने, उंची कपडे, समारंभ यांचा त्याग करून देशासाठी पैसे दान केले. देशातल्या सर्व महिला संघटनांच्या प्रमुख वॉशिंग्टनमध्ये गोळा झाल्या. संपूर्ण राष्ट्राच्या तिजोरीच्या पन्नासावा हिस्सा भरेल, इतकीही खंडणी द्यायला विरोध करणाऱ्या नेत्यांची त्यांनी छी थू केली. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये जणू वावटळ उडवून दिली, आणि फक्त तीन दिवसांच्या अवधीत गोळा केलेले वीस लाख डॉलर्स नेऊन अक्षरशः व्हाईट हाऊसच्या पायऱ्यांवर ओतले.
राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीची - न जाणो त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल - सुटका झालीच पाहिजे ही त्यांची मागणी होती. त्या महिलांनी राष्ट्रप्रतिनिधींना गळ घातली, आणि अवर्णनीय अशा घटना घडून शेवटी खंडणी देण्याचा प्रस्ताव मान्य झाला.

३ जुलै. खंडणीची रक्कम तयार झाली. आता त्याबरोबर जनता आणि सरकारकडून गुन्हेगारांना माफीचं आश्वासन हवं होतं. विचारवंत अजूनही नाराज होते. गुन्हेगारांना न्यायाचा बडगा दाखवण्याऐवजी खंडणीची रक्कम द्यायची? हा कसला नामर्दपणा? याने देशाची अपकीर्ती पसरणार नाही का? या असल्या धाडसाला शिक्षा होणार नसेल, तर मग न्यायव्यवस्था, कोर्ट, तुरुंग काय कामाचे? आपल्या राज्यव्यवस्थेचा एखादा भाग कोलमडला आहे काय? कोणता? पण आता विचार करायला वेळ नव्हता. जनतेचा उत्साह शिगेला पोहोचला होता. खंडणीला एकमताने सरकारी मान्यता मिळाल्याची बातमी आल्यापासून लोक जणू ताप चढून शरीराचं तपमान १० अंशांनी वाढल्यासारखे उन्मादात वावरत होते. देशभक्त एकमेकांना भेटून आसवं ढाळू लागले. जणू वेड लागण्याचा एक वेगळा प्रकार अस्तित्वात आला होता. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या आजारी पत्नींसाठी शक्य ते सगळं देशाने एकजुटीने केलं होतं. आता अपहरणकर्ते त्यांचं वचन पाळतील काय? या आपत्तीपुढे राजकीय पक्ष आपापसातले भेदाभेद
विसरले होते. ४ जुलैच्या स्वातंत्र्यदिनी ठरलेल्या शोभायात्रा पुढे ढकलून, तो दिवस राष्ट्राध्यक्षांच्या सुखरूप सुटकेने साजरा व्हावा, असं ठरवण्यात आलं. त्यांच्या सुटकेचं रहस्य लवकरच उलगडलं. ताबडतोब न्यू यॉर्क हेराल्डला पुन्हा एकदा, आणि आता शेवटचाच असा एक जाहीरनामा आला. या खेपेला पत्रावर चक्क वॉशिंग्टनचा शिक्का होता. या धिटाईमुळे वॉशिंग्टनमधले लोक घराबाहेर पडायला घाबरू लागले. न जाणो, न भूतो न भविष्यति अशा त्या नराधमाशी गाठ पडली तर?

काय लिहिलं होतं या शेवटच्या जाहीरनाम्यात?

"अमेरिकन सरकार आणि नागरिकांनो,
आमच्या प्रस्तावाला तुम्ही उदारपणे दिलेला प्रतिसाद आमच्या ध्यानात आला आहे. आम्ही आमचा शब्द पाळण्यात कसूर करणार नाही. ६ जुलैला सकाळी ठीक आठ वाजता, वॉशिंग्टनपासून एका मैलावर असलेल्या माऊंट व्हरनॉन इलाख्यात आम्ही खंडणीची रक्कम स्वीकारून त्या बदल्यात आमचे कैदी तुमच्या हवाली करू. सरकारी जहाज घेऊन एक अधिकारी माउंट व्हरनॉनच्या नजरेच्या टप्प्यात हजर असला पाहिजे. आम्ही जमिनीवरून किंवा पाण्यातून इशारा म्हणून चार जपानी रॉकेट्स सोडू. चार पेटते पलिते समजा. ते पाहिल्यावर अधिकाऱ्याने बोट घेऊन त्या ठिकाणी यावं. मग शीळ घातल्यासारख्या आवाजाचे स्फोट होतील, आणि पहारा हटवला जाईल. राष्ट्राध्यक्षांना घेऊन येणाऱ्या तुकडीकडे झेंडा असेल. झेंड्यावर लाल काळे उभे पट्टे असतील, आणि मध्यभागी सोनेरी रंगाचा अर्धा गरुड असेल. खंडणी कशी द्यायची ते आता सांगतो. दर आठवड्याला प्रत्येकी दहा लाख डॉलर्स या हिशोबाने चार आठवड्यांची दोन कैद्यांच्या खंडणीची एकूण रक्कम ऐशी लाख डॉलर्स एवढी आहे. चामड्याच्या ऐशी बॅगांमधून ती दयायची आहे. प्रत्येक बॅगेत एक लाख डॉलर्सची सोन्याची नाणी असली पाहिजेत. सरकारने या रकमेची
हमी दिली पाहिजे. काही गडबड घोटाळा झाला, तर दोन्ही कैद्यांना आणखी महिनाभर पुन्हा कैदेत ठेवलं जाईल, आणि याच दराने आणखी खंडणी वसूल केली जाईल. आम्ही विश्वासाने हा व्यवहार करीत आहोत, पण ६ जुलै रोजी किंवा त्याआधी काही दगाफटका झाल्यास दोन्ही कैदी सुखरूप परत मिळण्याची आशा बाळगू नये. "

या क्रूर आणि कठोर संदेशात एक रोखठोक आव्हान होतं. त्यामुळे एक गोष्ट नक्की झाली, की सुटकेदरम्यान गुन्हेगाराला अटक करण्याचा प्रयत्न करणं हा वेडेपणा ठरला असता. राष्ट्राच्या तिजोरीतून सोन्याची नाणी काढली गेली. वॉशिंग्टन नावाच्या नव्याकोऱ्या वेगवान जहाजावर ती चढवण्यात आली. सुटकेनंतरच्या शानदार स्वागत समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली. ५ जुलैच्या रात्रीपासून शेकडो वार्ताहर माऊंट व्हरनॉनमध्ये पटांगणावर तळ ठोकून बसले.

गनबोट, स्टीमर, यॉट, शिडाच्या होड्या, आणि इतर ज्या ज्या कुठल्या प्रकारच्या खासगी बोटी असतील, त्या सगळ्या तिथे हजर झाल्या. बघे आणि शस्त्रधारी सैनिक सारख्याच संख्येने गोळा झाले. इतक्या गोंधळात, इन्स्पेक्टर बायरन्स स्वतःहून आणखी एक भर पाडत होते. त्यांनी एक हजार प्रशिक्षित सैनिकांकरवी भोवतालच्या पाच मैलांच्या परिसराची छाननी केली होती. पोटोमॅक नदीच्या मुखापासून ते वॉशिंग्टन शहरापर्यंतच्या प्रवाहातला इंच न इंच तपासला होता. शेवटच्या मिनिटाला गुन्हेगार पकडून आपण जगप्रसिद्ध होऊ, अशी त्यांची छुपी महत्त्वाकांक्षा होती.

एखादं शतक उलटून गेलं की काय, असं वाटून गेलं. शेवटी एकदाची ६ जुलैची पहाट झाली. अभूतपूर्व संख्येने लोक गोळा झाले. लोक संतापाने बिथरले होते, तसेच आशेने वाटही पाहत होते. सूर्योदयाचा इशारा झाला, की जमिनीवरच्या आणि पाण्यातल्या सर्व लोकांनी सर्व आवाज आणि गोंधळ थांबवून शांत राहिलं पाहिजे, असा आदेश होता.

सूर्योदय झाला. तोफांची सलामी झडली. त्याबरोबर सर्वत्र शांतता पसरली. प्रतिक्षेचे ते शेवटचे तास कसल्याच हालचालीशिवाय गेले. वातावरणात एक ताणलेली शांतता होती. आता तो पेटत्या पलित्यांचा इशारा कोणत्या दिशेने होणार? ती नराधमांची टोळी प्रथम कोणाच्या नजरेस पडणार?

(भाषांतर) क्रमश:
भाग ४: https://www.maayboli.com/node/84706

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच!!!!

उत्सुकता वाढली आहे आता.

अश्विनी११ , king_of_net, मी चिन्मयी, आबा. , किल्ली - प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

>>>>>>>>>>आठवड्याला वीस लाख डॉलर्स! अमेरिकेसारख्या देशासाठी आणि त्यातही देशातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ही किंमत योग्यच म्हणायला हवी.
इथे १० लाख हवे.

सामो ,
>>> आम्हांला दर आठवड्याला दर डोई दहा लाख डॉलर्स दयावे अशी आमची मागणी आहे.

म्हणून दोघांचे वीस लाख.