चॉप्ट

Submitted by मोहना on 19 February, 2024 - 08:12

"माणसात जायला लाग आता." लेकीला म्हटलं.
"म्हणजे कुठे?" चेहर्‍यावरची माशीही न हलवता तिने विचारलं.
"सुट्टी आहे ना. तुझी लसही घेऊन झाली आहे. कुठेतरी काम कर. तेवढाच माणसांशी संपर्क."
"दादा गेला नव्हता माणसात." लेक माणसात जायला तयार नव्हती.
"तू दादा आहेस का? तुलना करायची नाही असं तूच म्हणतेस ना?" या एका वाक्याचा परिणाम एक तीक्ष्ण कटाक्ष, तीन अर्ज आणि अर्ज केलेल्या ठिकाणी उमेदवाराची धडक मोहिम. आता काही झालं तरी माणसात जाणारच हा आवेश. पगाराचा ’भाव’ करत आमच्या घरातला सोळा वर्षांचा उमेदवार चॉप्टमध्ये कामाला लागलाही आणि काम सुरू केल्याकेल्या पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला निघालाही.
"सगळं करायला लावतात. भांडी घासा, फरश्या पुसा, कचरा काढा, भाज्या चिरा. मी राजीनामा देतेय."
"याचे पैसे देतात?" मी नवलाने विचारलं आणि तिला घरातच नोकरीची ’ऑफर’ दिली. तिने चॉप्टमध्ये राजीनामा द्यायचा विचार बदलला. चॉप्टचं भाग्य उजळलं.

लेक म्हणाला,
"तिथे जाऊन काहीतरी खाऊन या." मी म्हटलं,
"अरे, रोज घरी परत येताना तिथलंच तर आणते ती तुझ्यासाठी. काय उरलं असेल ते आण म्हणून तूच सांगतोस ना."
"ते वेगळं. तिथे जाऊन पैसे भरून खाऊन या. तुझ्या लेकीला बरं वाटेल." लेकाला एकदा तिथे जाऊन पैसे घालवून आल्याचं दु:ख होत असावं. आमचेही गेले की त्याला जरा बरं वाटलं असतं.
"तिथे काय वापरायचं? इमीग्रंट इंग्रजी की पॉलिश्ड?" लेकीसमोर तिच्या कामाच्या ठिकाणी जायचं या कल्पनेनेच घाम फुटला.
"बोल म्हणा बाऊल नको. तेवढं जमवा फक्त की झालं आणि उगाच तिथे फोटो काढत बसू नका." लेकाने नीट कसं वागायचं ते सांगितलं. आम्ही आज्ञाधारकपणे माना डोलावल्या. चॉप्टमध्ये पोचलो. सगळ्या टोपी घातलेल्या किशोरवयीन मुली लेकीसारख्याच वाटायला लागल्या. ही का ती करत बावचळल्यासारखे उभे राहिलो नंतर तू का मी, मी का तू करत आमच्याकडे टवकारून बघणार्‍या मुलीसमोर उभं राहिलो. इतकी टवकारून बघत असल्यामुळे ती आमचीच लेक असं वाटत होतं पण जवळ गेल्यावर वेगळी आहे हे कळलं.
"चिकन बोल." मी म्हटलं. चिकन बोलायला लागेल की काय असं वाटायला लागलं आणि उगाचच उच्चार चुकल्यासारखंही म्हणून परत म्हटलं.
"चिकन बोल, चिकन बोल." त्या मुलीला वाटलं दोन चिकन बाऊल. तिने एकाचवेळी दोन बाऊलमध्ये इथलं - तिथलं तिच्या समोरच्या भांड्यांमधलं काय, काय काढत टाकायला सुरुवात केली. नवर्‍याला म्हटलं,
"बहुतेक तुझ्यासाठीही ती तेच करतेय." नवरा एकदम सरसावला.
"मला सूप पाहिजे होतं पण तू बोल करत असशील तरी ठीक आहे. फक्त त्यात चिकन नको." आपल्या इंग्रजीला सूर कुठला लावायचा, स्थलांतरित की अस्खलित या विचाराच्या धुमश्चक्रीत आमचं बोलणं हिंदी बोलल्यासारखं व्हायला लागलं होतं. सुपाचं आणि बोलचं बराचवेळ चाललं. दोन्ही पक्ष माघार घेईनात. ती म्हणे, मी करते ना सूप, नवरा म्हणे मला चालेल ना बोल. या सगळ्या धांदलीत आमची लेक पैसे घ्यायला उभी आहे हे एकदम आमच्या लक्षात आलं. ती आमचा तिचा काही संबंध नसल्यासारखी दुसरीकडेच बघत होती. तिच्या बाबाच्या गोंधळाने अख्ख्या जोगळेकर कुटुंबाच्या इज्जतीचा फालुदा होत चालला होता. आता इंग्रजी मी हातात घेतलं आणि त्या गोर्‍या मुलीला ती स्थलांतरित आहे की काय वाटायला लागलं. लेक न बघता आमच्यावर डोळा ठेवून आहे हे कळत होतं तसं अवसान गळत होतं. गोरुलीने विचारलं,
"एव्हरीथिंग इन द बोल?"
"व्हॉट इज एव्हरीथिंग?" मी इतक्या जोरात विचारलं की अख्खं चॉप्ट माझ्याकडेच बघायला लागलं. मुलगी नोकरीच सोडून पळू नये म्हणून मी घाईघाईत म्हटलं.
"यस." तो जो यस मी ठेवला तो बोल घसरत, घसरत शेवटाला जाईपर्यंत. एकदा तिने विचारलं.
"साईड ऑर मिक्स?" मी म्हटलं,
"यस." नवरा म्हणाला,
"साईड." मी त्याला साईड दिल्यासारखी बाजूला झाले आणि लक्षात आलं बोलमधलं साईड होतं. मी पुन्हा साईड, साईड करायला लागले. अखेर आमचा बोल पैसे भरण्याच्या जागी पोचला आणि आम्ही अस्खलित इंग्रजी वापरायचं ठरवलं. तोंडं वेडीवाकडी करून काय घेतलं ते सांगितलं तर लेक म्हणाली,
"मराठीत बोला."
"नको. तुला लाज वाटायला नको. इंग्रजीच बरं." मी ठासून इंग्रजीतच सांगितलं.
"तुम्ही इंग्रजीत बोलताय म्हणूनच लाज वाटतेय. मराठीच बरं आहे तुमचं. हे घ्या." ब्रेडची दोन छोटी पाकीट तिने पुढे केली. आम्ही काही विचारायच्या आधीच म्हणाली,
"फुकट आहे." त्यानंतर तिने बोल असा काही आमच्यासमोर ठेवला की बाकी सगळं विसरून बोलाची काळजीच वाटली.
"अगं बाऊल, बाऊल." बोलचा बाऊल झाल्यावर इतकं बरं वाटलं ना. एकदम दडपणच गेलं. लेकीची वेगळी भाषा ऐकून सगळ्या टोपीवाल्या मुलींच्या लेकीबरोबर खाणाखुणा झाल्या. लेकीने घरात दुर्मिळ असलेलं गोड हसून आम्ही पालक असल्याचं सांगितलं असावं कारण एकदम तीन चार "ऑऽऽऽ" असे प्रेमळ आवाज ऐकू आले.

आम्ही म्हणजे मी गोंधळलेल्या, मंतरलेल्या अवस्थेत गाडीत बसले. चालवायला लागले. नवरोजी म्हणाले,
"लेकिला आपली लाज वाटलेली दिसली तरी नाही पण तू फार गोंधळ घालतेस बुवा." मी अजूनही बोल, अस्खलित इंग्रजी, ऑऽऽऽ यात गुदमरलेले. आता लेक घरी आली की चंपी असं म्हणत लाल दिव्यासमोर गाडी थांबवली आणि इतकी गडबड झालीच होती त्यात आणखी एक गडबड करून टाकली. गाडी चुकीच्या दिशेने वळवली.
"कम्माल." नवरोजींनी आता नाद सोडला.
"अरे, आपली मुलांना लाज वाटायला नको म्हणून नीट वागायला जातो आणि आणखीन गोंधळ घालतो आपण." चुकीच्या दिशेने नेलेली गाडी पुन्हा वळवत मी म्हटलं.
"आपण गोंधळ घालत नाही, तू घालतेस. एकदा का सुरू केलंस की मालिकाच करून टाकतेस." एरवी असले फालतू बाण मी लिलया परतवले असते पण आत्ता मन अजून चॉप्टमध्येच होतं त्यामुळे चुकून प्रेमळ स्वर लागला.
"तेच रे. तू काय नी मी काय. आपण दोघं एकच." विजेचा धक्का बसल्यासारखा नवरा बघायला लागला. चुकीच्या बाईशेजारी बसून गोंधळ घातला की काय म्हणून चालत्या गाडीतून उतरायला लागला. त्याला एका हाताने धरेपर्यंत फोन वाजला. लेकीचा फोन. परीक्षेत पास की नापास या नजरेने आम्ही दोघं एकमेकांकडे पाहायला लागलो. त्याचा एक फायदा झाला. नवर्‍याची शंका दूर झाली. आपलीच बायको आहे हे कळल्यामुळे नवर्‍याने आधी दरवाजा बंद केला आणि मुलीचा फोन घेतला.
"मी खूष आहे. सगळे म्हणत होते तुझे आई -बाबा किती गोड आहेत." चुकीच्या मुलीने चुकीच्या आई - बाबांना फोन केला की काय? तिला काही विचारायच्या आत तिने फोन ठेवला आणि तू गोड की मी गोड असा गोड वाद घालत आम्ही घराच्या दिशेने निघालो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त. गोड लिहिलेय Happy

लेकीने घरात दुर्मिळ असलेलं गोड हसून... >> हे फारच रिलेट झाले Happy

मस्त Lol
welcome back
परवाच तुमच्या सगळ्या कथा वाचून काढल्या.
किती छान लिहिता तुम्ही.
रिक्षावाला खूप आवडली.
( सगळ्या कथा वर नाही काढल्या पण Proud )
Please इथे लिहीत राहा.

सर्वांना धन्यवाद.
किल्ली, छान वाटलं वाचून. लिहित होतेच फक्त इथे फेरफटका मारला जात नव्हता त्यामुळे इथे टाकलं गेलं नाही. आता एकेक करून टाकते इथे.

जाम च गोड आहात तुम्ही & तुमचे अहो. सूपर मॉम च्या लिखाणा ची आठवण येते. मुलं ही अगदी जेन्झी
मस्त लिहिता, तुमचा ब्लॉग ही वाचला आहे.

सर्वांना धन्यवाद. धनुडी, बहिणींना पाठवलं आणि त्यांना आवडलं हे वाचून आनंद झाला. aashu29 गोड म्हटल्यामुळे खूषच व्हायला झालं Happy

छानच लिहिले आहे . पहिली काही वाक्ये वाचून संवाद माझ्यात आणि मुलीच्यात चालू आहे की काय वाटले !!! आपण काही बोलले की तीक्ष्ण कटाक्ष सगळ्या मुलींच्यात कॉमन आहे की काय ?

एकदम रीलेट झाले. " आपली मुलांना लाज वाटायला नको म्हणून नीट वागायला जातो" नि "लेकीने घरात दुर्मिळ असलेलं गोड हसून..." हे तर भारीच होते.