मोबाईल.....

Submitted by किरण कुमार on 16 February, 2024 - 12:24

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

" अबे, लेक्चरला यायलास काय तू “अविनाशने टेबलवर ड्रॉइंग शीट पूर्ण करत असलेल्या श्रीकांतला आवाज दिला.
" नाय रे, जाय तू, माझ्या मागं वेगळीच गनगन लागून राहिलीय, त्या प्रोफेसर कहाळेकरला सगळ्यांचे सबमिशन शीट चालतात, मी गेलो का परत काढ म्हणतो, साला खुन्नस ठेवून वागतो माझ्याशी " श्रीकांतने त्याची व्यथा मांडली. लेक्चरसाठी तयारी करत आरशात आपली टाय नॉड बांधणारा त्याचा धुळ्याचा मित्र वरुण मात्र श्रीकांतचे बोलणे नुसते कान देऊन ऐकतच नव्हता तर स्मित करुन त्याला खिजवित पण होता.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये घडणारे असे प्रसंग काही नवे नव्हते. श्रीकांत आणि मिनाक्षीच्या प्रेम प्रकरणाची चर्चा अगदी स्टाफ रुम मध्येही होऊ लागल्याने काही प्राध्यापक श्रीकांतला मुद्दाम वेठीस धरत होते हे सगळ्या स्थापत्य शाखेला माहिती होते. श्रीकांत तसा स्वभावाने मनमिळावू, थोडासा तापट, पण भेटेल त्याच्याशी गोड बोलणारा होता, सगळ्यांशी चांगले वागणे कधी कधी त्याच्या अंगलट जरुर यायचे.... पण त्यामुळे का होइना त्याची अनेक लोकांशी मैत्रीचे संबंध दृढ झाले होते. तशी श्रीकांतशी सर्वांची मैत्री असण्याचे अजून एक खास कारण होते ते म्हणजे होस्टेलच्या त्या मजल्यावर त्याच्याकडे असलेला एकमेव नोकीयाचा मोबाईल. तंत्रज्ञान विकसित होऊन फोनची जागा जरी मोबाईलने घेतली असली तरी ती सर्वांच्या खिशाला परवडणारी गोष्ट नव्हती. सन दोन हजार एकच्या त्या काळात त्याच्याकडे असलेला मोबाईल म्हणजे आजूबाजूच्या मित्रांसाठी झटपट संदेशवहन यंत्र झाले होते.
जुन्या दगडी बांधकामात उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा नमुना असलेले त्यांचे होस्टेल सुविधांच्या नावाने मात्र अगदीच जेमेतेम होते. आय ब्लॉकच्या रुम नं चारशे एक मध्ये धुळ्याहून शिकायला आलेले श्रीकांत आणि वरुण यांच्याबरोबर नगरचा अविनाशही रहायचा. ते तिघे ऑफीशियल राहत असले तरी अजून तिघे विद्यार्थी अनधिकृतपणे म्हणजेच पॅरासाईट म्हणून त्याच रुमवर पडीक असायचे. अध्ये मध्ये लोकल विद्यार्थीपण सबमिशन किंवा टाईमपास करायला तिथे यायचे, त्यामुळे रुम नंबर चारशे एक कायमच गजबलेली असायची. खरे तर जी काही बाहेरची मंडळी तिथे असायची ती प्रामुख्याने श्रीकांतच्या ओळखीने यायची. त्याचा स्वभाव मुळातच बडबडा आणि भेटेल त्याची विचारपूस करण्याची खोड असलेला. होस्टेल ते कॉलेज हे अंतर बाकी सर्व लोक चालत साधारण दहा मिनिटात कापत असत, श्रीकांत मात्र याला अपवाद होता. रस्त्यात भेटलेल्या विद्यार्थ्याना " हाय बाय, कसे चालले आहे? याचे, त्याचे काय झाले? " असे नाना प्रश्न विचारुन तो महापालिकेच्या बसप्रमाणे गल्लीबोळाचे स्टॉप घेत कॉलेजला पोहचायला अर्धा पाऊन तास घालवायचा. तसा हळव्या मनाचाच होता तो... कदाचित म्हणूनच मिनाक्षीचे आणि त्याचे प्रेमप्रकरण कॉलेजच्या पहिल्या वर्षातच जुळले असावे. दिवसभर लेक्चर, प्रॅक्टिकल करुन हा माणूस मिनाक्षीबरोबर सगळ्या पुण्यात हिंडायचा, कायम मित्रांच्या गराड्यात असायचा तरी परीक्षेत फस्ट क्लास कसा आणायचा हे मात्र त्याच्याबरोबर राहणाऱ्या जवळच्या मित्रांनाही कळत नव्हते. चांगले अक्षर आणि लेखनातील टापटीपपणा यामूळे त्याच्या सबमिशनच्या वह्या, जर्नल याला क्लासमधील मुलींकडून विशेष मागणी असायची. श्रीकांतचा स्वभाव थोडा वेंधळा असल्यामूळे कधी कधी त्यालाही अमूक अमूक वही नेमकी कोणाला दिली हे आठवत नसे. मग झाडून सर्वांना विचारत बिचारा कॉलेज, कँटीन आणि मुलींच्या होस्टेलवरही चकरा मारायचा.
मिनाक्षी मूळची खानदेशातली. तिचे लांबसडक केस, जरा आकाराने मोठे डोळे आणि सुरेख बांध्यामुळे सहज कुणाचीही नजर खिळावी अशीच ती होती. अभ्यासात जेमतेम असली तरी नृत्य आणि गायनात रुची ठेवणारी होती. श्रीकांत आणि ती दिवसातील खूप वेळ एकत्र घालवत असले तरी कुणी विचारल्यावर “आम्ही फक्त मित्र आहोत " हेच सामाईक उत्तर ते दोघेही ठामपणे द्यायचे.
आज मात्र श्रीकांतचे डोके ठिकाणावर नव्हते. एकच सबमिशन शीट तिसऱ्यांदा काढताना तो प्रोफेसरच्या नावाने शंख करत होता. त्याच्यामुळेच की काय आजचा मिनाक्षीबरोबर खडकवासला फिरायचा प्लॅन त्याने रद्द केला होता. ते एक शीट चे ड्रॉईंग पुर्ण करायला तब्बल साडे तीन तास लागले होते. दरम्यानच्या काळात त्याचा फोन पाच सहा वेळा वाजला होता. नेहमीप्रमाणे त्याने सर्वांशी बोलून तुमचा निरोप त्या त्या व्यक्तीकडे पोहचवतो असे खात्रीने सांगीतले होते. तसे त्याचे सर्व लक्ष कधी एकदा हे सबमिशन शीट प्रोफेसच्या तोंडावर मारतोय याकडेच लागले होते. त्याने आवरुन शीट गुंढाळून कंटेनरमध्ये ठेवले आणि तो कॉलेजकडे निघाला. एव्हाना दोन लेक्चर अटेंड करुन आलेले वरुण आणि अविनाश त्याला भेटले तसा तो ही थांबला आणि म्हणाला
" झाले का भाऊ लेक्चर, माझी प्रॉक्झी लावली ना "
" प्रश्न आहे का भाऊ, आपुण है ना तेरा दोस्त " वरुण उत्तरला.
" बरं ऐका रे गधडीच्यांनो. तुमच्या घरुन कॉल आले होते मघाशी "
“वरुण, तुझे वडील इकडे कलेक्टर ऑफिसला आलेत कसल्याशा कामासाठी, तिकडे तुला बोलवलय भेटायला. संध्याकाळी चार वाजता पोहच तिकडे, कोणी सटाणे म्हणून आहेत तिथे त्यांच्या केबिनला बसतो म्हणालेत. " आणि.......
अविनाशकडे नजर टाकत श्रीकांत उद्गारला " ऐ नगरी .... तुझ्या भावाने नविन गाडी घेतेली आहे होन्डाची... ती युनिकॉन का काय आली ना नविन, ती. त्याचे अभिनंदन कर फोन करुन " " चला मी पळतो कॉलेजला, त्या प्रोफेसरची ........ " श्रीकांत पुन्हा काही पुटपुटत तिथून निघून गेला. एवढी गडबड असली तरी कॉलेजला जाताना भेटणाऱ्या मित्रमंडळींना सवयीप्रमाणे हाय बाय करत विचारपूस कारायला त्याने टाळले आजही नाही .
कॉलेजच्या गेट वरच कादंबरी भेटली. कादंबरी ही मिनाक्षीची खास मैत्रीण होती त्यामूळेच ती अध्ये मध्ये श्रीकांतच्या संपर्कात असायची. सहसा प्रेमप्रकरणात निरोप पोहचवणारी एखादी व्यक्ती असते ना.... तशीच. ती फारशी बोलकी नव्हती. सगळ्या जगाचा भार डोक्यावर आहे की काय असेच तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटायचे. होस्टेलमध्ये श्रीकांतचे मित्र तिला जादू म्हणायचे कारण तिचा चेहरा 'कोई मिल गया' चित्रपटातील एलीयनसारखा होता असे त्यांना वाटायचे. ती आपल्याच तंद्रीत हातात एक नोटीशीचा एक कागद घेऊन तिच्या शाखेकडे निघाली होती.
" थांब गं, बरं झालं इथेच भेटली नाहीतर निरोप सांगायला तुझ्या होस्टेलवर यावे लागले असते " श्रीकांतने तिला थांबवले.
" कसला निरोप? “हातात असलेली नोटीस वाचता वाचता कादंबरीने श्रीकांतकडे नजर टाकत विचारले.
" तुझ्या घरुन फोन आला होता, उद्या तुझ्या ताईला बघायला पाहुणे येणार आहे घरी. बाकी नातेवाइक येणार आहेत, तुला यायला जमणार असेल तर ये म्हणाले आहेत “कादंबरीने उगाच विचार करणारा चेहरा करुन “बरं " एवढेच म्हटले. पेनाचे टोपण दाताने पकडून हातातल्या नोटीशीवर कसलीशी खूण केली आणि पुढे निघाली. ती फारशी काही बोलली नाही, श्रीकांतही गडबडीत असल्यामूळे त्यानेही इतर काही विचारले नाही. सरते शेवटी त्याने सबमिशन शीट प्रोफेसरकडे जमा केले, चक्क त्यानेही आज काही चुका न दाखवता ' बी प्लस ' शेरा मारुन जमा करुन घेतले. दिवस म्हणता म्हणता उतरणीला आला होता. सकाळपासूनच्या गडबडीत भूक मी मी म्हणत असतानाही त्याला थांबायला उसंत मिळाली नव्हती. आता होस्टेलच्या कँटीनमध्ये जाऊन एखादे ऑम्लेट खावे या विचाराने तो कॉलेजबाहेर पडला खरा पण त्याला आठवले अजून दोन निरोप द्यायचे बाकी आहेत. तसा तो होस्टेलच्या आय ब्लॉककडे वळला, रुम नंबर चारशे पंधरा मध्ये जाऊन त्याने सागरचा निरोप त्याच्या मित्राजवळ दिला “आज संध्याकाळी सात वाजता एम. आय. टी. कॉलेजमध्ये मध्ये ट्रेडीशनल डे साजरा होणार आहे तर तिकडे कुरता घालून ये म्हणाला आहे सागरचा एम. आय. टी. कॉलेजचा मित्र .... काय बरं नाव होतं त्या मित्राचे .... हम्म... ….. तू एवढा तर निरोप दे तो आल्यावर, त्याला कळेल बाकीचे “. निरोप देवून श्रीकांत कँटीनकडे वळला. तसा अजून एक निरोप पोहचवणे बाकी होते पण त्याला भूक आवरत नव्हती, शिवाय तो निरोप फार काही अर्जंट नव्हता. पुढच्या महिन्यात प्रसादचे सर्व कुटुंब साईबाबांच्या दर्शनाला जाणार होते प्रसादही त्यांच्याबरोबर यावा असे त्यांना वाटत होते म्हणून आताच निरोप धाडला होता. हा निरोप उद्या दिला तरी तसा काही फरक पडणार नव्हता. नाष्टा उरकून तो जरा होस्टेलबाहेर चक्कर मारायला गेला. नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आजही चार पाच बकरे त्याच्या हाताला लागल्यामुळे अजून दोन तास तो होस्टेलच्या बाहेरच रेंगाळत राहिला. अंधार दाट झाल्यावर पुन्हा आय ब्लॉकच्या आपल्या रुममध्ये आला. हुश्ss करुन गादीवर पहुडणार तोच अविनाश त्याच्यावर खेकसला ...
"तुला काय मीच भेटलो का आज खेचायला, उगा काही स्टोऱ्या बनवायलास आणि सांगायलास, काय तर म्हणे गाडी घेतली भावाने माझ्या. “मी तरी विचार करतोय आता कुठे एमआयडीशीत लागलाय कामाला, लगेच पैशाची उधळपट्टी करणारा नाही तो "
" अबे मी काय येडा म्हणून सांगतो काय... फोन येवून गेला ना बघ या लिस्ट मध्ये " श्रीकांतने त्याच्या मोबाईची कॉल हिस्ट्री पुढे उघडून दाखविली. त्यात ' अविनाश होम नगर ' असा नंबर स्पष्ट दिसत होता. " नंबर बरोबर आहे …पण गाडी नाय घेतली बे भावाने, मी आताच कॉईन बॉक्स वरुन कॉल लावला होता घरी, पुढच्या महिन्यात शिर्डीला जायचे आहे तर वेळ काढून ठेव सांगायला फोन केलता ....."
आता खरे तर अविनाश पेक्षा श्रीकांतच विचारात पडला, तेवढ्यात मोबाईल खणाणला ...
" श्रीक्या .... हरामी ... तुला प्रोफेसर त्रास देतो, त्याला मी हसतो म्हणून मुद्दाम पळवले ना मला " तिकडून वरुण वैताग करत ओरडून बोलत होता.
" ऐ, आता तुझं काय बे मधीच, आधीच हा अव्या डोक्याची मंडई करायला लागलाय " श्रीकांतने रागातच विचारले.
" अरे बांगड, इकडे आलो आहे मी कलेक्टर ऑफीसला, काय वडील वगैरे आले नाहीत माझे. तू सांगितले त्या सटाणेच्या केबिनला गेलो तर तिथे रामभाऊ नावाचा माणूस कुठल्या तरी कादंबरीची वाट बघत बसला होता "
" शेवटी वैतागून मी घरी फोन केला तो वडीलांनी उचलला तर मला म्हणातात कसे ‘काय डोक्यावर पडला काय तू, मी शाळेचा शिक्षक .... माझे काम फार तर तालूक्याला असते, तेही धुळ्याच्या, तिकडे पुण्याच्या कलेक्टरला मी कशाला भेटायला येईल. मी श्रीकांतला एवढ्यासाठी कॉल केलता बुआ... उद्या तायडीला बघायला पाहुणे येणार आहे तु पण आला असता तर बघितले असते पोराला, खाजगीच नोकरी हे. पण चांगला पगार आहे. ..". "काय राव श्रीक्या, तेंव्हाच सांगितले असते तर मी दुपारच्या ट्रॅव्हलने निघालो असतो ... आतापोतर नगरच्या पुढे पोहचलो असतो."
" आयच्या गावात ......, श्रीकांतच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले आणि त्याला काहीतरी गडबड झाल्याची जाणिव झाली. " " निरोपांची अदलाबदल झाली का काय? सकाळपासून ताप कमी होता की काय आता नविन गुंता उलगडायला लागणार “.
त्याने मोबाईलची कॉल हिस्ट्री उघडली, कुणाकुणाचे कधी कॉल आले आणि काय काय निरोप मिळाले हे जरी इतके स्पष्ट आठवत नसले तरी त्याने पुढे कोणाकोणाला काय काय निरोप दिले ते मात्र त्याला चांगले आठवत होते.
सगळ्यात आधी कादंबरीला थांबविण्यासाठी कसाही संपर्क केला पाहिजे म्हणून त्याने लागलीच मुलींच्या होस्टेलवर फोन केला “कादंबरीला फोन जवळ यायला सांगा मी दहा मिनिटाने कॉल करतो " हा निरोप ऑपरेटर कडे दिला. आय ब्लॉकच्या त्याच्या रुमचे दार सताड उघडे असल्यामुळे डोक्यावर फेटा, अंगावर कुरता चढवून गॉगल लावून रुबाब चढलेला सागर पायऱ्या उतरताना दिसला. आधीच गोंधळात असलेला श्रीकांत अजून काही गुंत्यात पडायच्या मूड मध्ये नव्हता. त्यामुळे त्याला बोलावून गप्पा मारण्याऐवजी त्याने लांबूनच हात दाखवला. दहा मिनिटाने पुन्हा मुलींच्या होस्टेलवर कॉल लावला तेंव्हा कादंबरी ऐवजी तिची रुम पार्टनर फोनवर आली होती. " कादंबरी थोड्या वेळापुर्वीच मंचरच्या गाडीत बसली शिवाजीनगरहून, तिच्या बहिणीला बघायला पाहुणे येणार आहे म्हणाली, त्या निमित्ताने घरी जाऊन सगळ्यांना भेटणार आहे. काही निरोप द्यायचाय का तिला, घरी पोहचल्यावर मला कॉल करणारच आहे ती होस्टेलच्या नंबरवर. "
आता काय निरोप देणार .... " जाऊ दे, मीच नंतर भेटून बोलेन परत आल्यावर, तिला सांग की श्रीकांतचा कॉल येवून गेला म्हणून ... “च्यायला आज सकाळी कुणाचे तोंड पाहिले आहे कुणास ठाउक? ', स्वत: शीच पुटपुटत श्रीकांत रुमबाहेर पडला तर समोर सुशील दिसला. " काय राव श्रीकांत निरोप तरी वेळेवर द्यायचा ना, उशीरा देवून मी कसा काय गेलो असतो ट्रेडीशनल डे साजरा करायला व्ही.आय. टी. कॉलेजला, बरे झाले माझ्या मित्राने नित्याच्यापण मोबाईल वर कॉल करुन सांगितले, चल निघतोय मी व्ही. आय. टी. ला, येतोय का ट्रेडीशनल डे आहे त्यांचा ... मस्त हिरवळ .... "
आता मात्र श्रीकांतचे काहीच डोके चालेना. "नको, .... तू जाउन ये मी जरा इथला गोंधळ निपटवतो .... आणि हो...."
" अबे.... ट्रेडीशनल डे चा निरोप तुझ्या मित्राचा होता आणि तोही व्ही.आय. टी. कॉलेजला ........ तर ते येड सागर एम. आय. टी. ला नटून थटून कुणाच्या लग्नात बेगाना अब्दुल्ला व्हायला गेलाय? "
" म्हणजे तू हा निरोप सागरला दिला की काय ते ही व्ही. आय. टी. चे एम. आय. टी. करुन ...धन्य आहे गुरु " सुशीलने दोन्ही हात कोपरापसून जोडत श्रीकांतच्या समोर वाकवले, मात्र पुढे एम. आय. टी. ला काय घडणार आहे याचे ओझरते चित्र आठवून दोघेही खिदळू लागले.
रागारागात केलेले सबमिशन, त्यात वाजलेले फोन आणि त्यांचे निरोप या सगळ्यांची झालेली सरमिसळ आता एखाद्या चित्रपटाला शोभेल एवढी रंगली होती. ' कादंबरीची आणि तिच्या वडीलांची भेट पुण्यात झाली नव्हती, वरुणला आता घरी जाणे शक्य होणार नव्हते, अविनाशच्या भावाने गाडी घेतली नव्हती, सागर फेटा कुरता घालून एम. आय. टी. ला पोहचला होता.... देवा… आज काय सगळा गोंधळ माझ्याच मोबाईलमध्ये टाकला का काय तू '
त्या रात्री दरवाजाची कडी घट्ट लावून दाराच्या मागे टेबल सारकवून श्रीकांत एकटाच आतून माफी मागत होता आणि बाहेरुन कुरता घातलेला सागर त्याच्या रुमपार्टनरसह दारावर जोर जोराने हात आपटून मोठ्याने बोलत होता “तू दार उघडच आज, बत्त्या देतो चांगल्या .... एवढा आवरुन सवरुन एम. आय. टी. ला गेलो तर सगळी पोर पोरी आणि मास्तर मी वेडा असल्यासारखे तुसड्या नजरेने माझ्याकडे बघत होते. माझ्या तिथल्या मित्राकडे गेलो तर तो स्वतःच अजून गावावरुन आलेला नव्हता. मग तुला हा निरोप कुणी दिला.
“हे कमी होते का काय म्हणून वरुण आणि अविनाश ही त्यांना जाऊन मिळाले. " दे त्याला चांगल्या दोन ठेवून... आम्हालाही दुसऱ्याच कुणाचेतरी निरोप देऊन गंडवले आहे त्याने आज."
" अबे हरामखोरांनो, मी काय मुद्दाम केले का, त्या मोबाईलमध्ये आज सगळ्यांचे एकदम कॉल आले त्यात माझे सबमिशनचे टेंशन, झाली बुआ चूक, माफ करा ना आता " श्रीकांतचा स्वर आता चढू लागला होता.
" च्यायला, एकतर तुमचे सगळ्यांचे निरोप द्या… वरुन तुमचे जोडे खायला कुणी सांगीतले आहे मला "
काही वेळाने का होईना, दार उघडले गेले, नावापुरते हलके दोन फटके देवून त्या मित्रांनी एकमेकांना मिठ्या मारल्या, “तू तो आपुन का भाई है ना, तेरे से क्या गिला शिकवा " सागरने श्रीकांतला जवळ ओढत म्हटले.
" ... चला पेनल्टी म्हणून आज माझ्याकडून चायनीजची पार्टी " श्रीकांतने हात वर करुन सर्वांना संबोधले. भूक लागलेली सर्व मंडळी श्रीकांतच्या मागे मागे मार्गस्थ झाली.
तिकडे कादंबरी घरी पोहचली होती. लँडलाइन शेजारी असलेल्या डायरीतील श्रीकांतचा नंबर पाहून पुन्हा पुन्हा डायल करत होती. रिंग सुद्धा वाजत होती.
श्रीकांतचे खोडकर मित्र " घे घे, कॉल घे तिचा " असा उपहासाने सल्ला देत जोरजोरात खिदळत होते.
" गप ना भौ ... बसल्या त्या लाथा कमी आहे का आजच्या, आता बघू ती परत आल्यावरच, काय विचार करायचा ते करु दे तिला... तसे मी तिच्या घरच्यांची भेट घडविली हे काय कमी पुण्याचे काम आहे का " श्रीकांतही मित्रांना टाळी देत हसतच उत्तरला. भरपेट खाऊन पुन्हा रुमवर आल्यावर रहावले नाही म्हणून अविनाशने विचारले " ते सगळे ठीक आहे पण नेमकी नविन गाडी कुणी घेतली?".
" अरे बाबा आता पाया पडू का तुझ्या , नको ना आता तोच विषय काढू, खरे तर मला पण आठवत नाही आता, ज्याच्या भावाने घेतली तो घरी गेल्यावर त्याला सरप्राईज मिळेल ना " श्रीकांतने खांदे उडवत हसतच आपल्या कृत्याचे समर्थन केले.
आय ब्लॉकच्या त्या रुममध्ये पुन्हा एकदा गलका सुरु झाला तो कधीही न थांबण्यासाठी.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- किरण कुमार

Group content visibility: 
Use group defaults