सोनाली खोलीत आली. बेडवर प्रिया गाढ झोपलेली होती. झोपेत ती अजूनच गोड, निरागस दिसत होती. तिच्या कडे पाहताना सोनालीच्या मनात वेदनेची बारीकशी कळ उठली. ' किती निरागस, निष्पाप मुलगी ! तिच्यासोबत असं का घडावं ? आधी वडील गेले. कशीबशी त्या दुःखातून सावरते न सावरते तोच असा अगम्य प्रकार समोर आला. बिचारीच्या नाजूक मनाला किती वेदना होत असतील." तिच्या मनात विचार आला ; पण मग तो खिन्न करणारा विचार बाजूला सारत ती तिच्या जवळ गेली. आता तिच्या चेहऱ्यावर नेहमीचं प्रसन्न हास्य झळकत होतं. हळूच बेडवर प्रिया जवळ बसून तिच्या खांद्याला हलकासा स्पर्श करत ती मृदू स्वरात म्हणाली -
" प्रिया. ए प्रिया. उठतेस का ? "
प्रियाने डोळे उघडले. शेजारी सोनालीला पाहून तिच्या ओठांवर हसू उमटलं. तसच क्षणभर आश्चर्यही वाटलं.
" सोनाली ताई, तुम्ही ? " तिने विचारलं. सोनाली जरा संभ्रमात पडली. उत्तरादाखल तिनं फक्त स्माईल केलं. पण लगेच प्रियाच्या लक्षात आलं की तीच श्रीच्या घरात होती. काल रात्रीचा प्रकार आठवताच तिच्या ओठांवरचं हास्य मावळलं. ती काही न बोलता हळूच उठून बसली. सहज घड्याळाकडे लक्ष जाताच ती अवाक झाली.
" सोनाली ताई. अगं साडेआठ वाजले. मला उठायला फार उशीर झाला. इतकावेळ कशी झोपून राहिले मी ? " प्रिया ओशाळून म्हणाली. " तू तरी उठवायला हवं होतं."
" कशाला ? रात्री किती उशीरा झोपली होतीस ! नीट झोप नको का व्हायला ? " सोनाली खोट्या रागाने दटावून म्हणाल्या.
" अगं पण असं तुमच्या घरात मी..." प्रिया. "
अगं ! तुझं नाही आहे का हे घर ? "
" तसं नाही गं ; पण...."
" ते पणबीण राहू दे. आता पटकन तोंड धुवून ये बरं. मी चहा टाकते." असं म्हणून सोनाली उठून गेली सुद्धा. प्रिया स्वतःशीच हसून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली.
•••••••
फ्रेश होऊन प्रिया हॉलमध्ये आली. हॉलच्या भिंतीवर प्रभू श्रीराम, सीतामाई, श्री लक्ष्मण अन् श्री हनुमंतांचा एकत्रित मोठा फोटो होता. फोटोसमोर उभी राहून प्रियाने भक्तीभावाने हात जोडले. तिची नजर श्रीरामांच्या प्रसन्न, सुहास्य वदनी, आश्वासक मुखमुद्रेवर खिळलेली होती. बघता बघताच एकदम तिच्या डोळ्यांत पाणी साचलं होतं. चेहऱ्यावरून मनातली वेदना स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात तिच्या दंडाला हलकासा स्पर्श झाला. वळून पाहते तर मागे सोनाली उभी होती. ती म्हणाली -
" प्रिया, अशी निराश होऊ नकोस. त्यांचं सगळ्यांवर लक्ष आहे. विश्वास ठेव. सारं काही ठिक करतील ते. त्यांच्या साठी काहीही अशक्य नाही."
प्रियाने हलकसं स्माईल करत सहमती व्यक्त केली.
किचनमध्ये चहा पिता पिता त्या दोघी एकमेकींशी गप्पा मारत होत्या. मध्येच प्रियाने विचारलं -
" सोनाली ताई, श्री दिसत नाहीये सकाळपासून कुठं ? कुठे आहे तो ? "
सोनाली जराशी गंभीर होऊन म्हणाली -
" तो आणि दळवी ( राजाभाऊ ) जरा बाहेर गेलेत "
" म्हणजे..."
" हो. तुझ्यापासून लपवायचं कारण नाही ? या प्रकरणाच्या संबंधीच ते काहीतरी करत आहेत."
" अच्छा."
" प्रिया, त्याने तुला इथेच थांबायला सांगितलं आहे. तुला घरून काही आणायचं असेल तर आपण चहा पिऊन झाल्यावर घेऊन येऊया " पुन्हा घरी जायच्या विचारानेच प्रियाच्या अंगावर काटा उभा राहिला ; पण एकदा जायलाच हवं होतं.
•••••••
सोनालीने हळूवारपणे दरवाजा लोटताच तो करकरत उघडला गेला. प्रकाशाची एक सरळ, अरूंद रेषा खालच्या फरशीवरून समोर दिसणाऱ्या भागावर पसरत गेली. प्रिया जागेवरूनच विस्फारीत डोळ्यांनी समोर पाहत होती. सोनालीने तिचा हात घट्ट पकडून एक आश्वासक स्मित केलं. शेवटी एक दीर्घ निःश्वास सोडून, सगळा धीर गोळा करत प्रियाने आत पाऊल टाकलं.
" प्रिया पटकन तुझ्या रूममध्ये जाऊन तुझं सामान घेऊन ये. खरंतर आता दिवसा ढवळ्या भीती नाही ; पण रिस्क घ्यायला नको. हं ? " सोनाली म्हणाली.
प्रिया चटचट पावलं उचलत आपल्या रूममध्ये गेली. काल घरी आल्यावर तिने बॅगमधून कपडे वैगेरे काढून ठेवलेले नव्हते. त्यामुळे बराच वेळ वाचणार होता. इतर जे काही छोट्या मोठ्या गरजेच्या वस्तू होत्या त्या सर्व पटापट गोळा करून ती बॅगमध्ये भरत होती ; पण मध्येच कसलीशी चाहूल लागल्याने ती थांबली. आणि तिने मागे वळून पाहिलं.
हॉलमधल्या खिडकीपाशी उभी राहून सोनाली बाहेर पाहत होती ; पण खरंतर तिच्या मनात प्रियाचेच विचार घोळत होते. एकदम तिच्या खांद्यावर हात पडल्याने ती दचकली ; पण मग त्या हातावर आपला हात ठेवून हसतच मागे वळाली. मागे अर्थात प्रिया उभी होती. दोघीही एक क्षणभर एकटक एकमेकींकडे बघत उभ्या होत्या. मग प्रिया स्माईल करत म्हणाली -
" चल सोनाली ताई."
" हो चल ना." तीही हसून उत्तरली.
प्रिया वळून चालू लागली. तिच्या मागून सोनालीही निघाली. त्या तीन चार पावलं पुढे गेल्या असतील नसतील तोच प्रियाने अचानक मागे वळून आपल्या हातातील बॅग सोनालीवर उगारली, मात्र सोनालीने पटकन झुकून मार चुकवला.
" प्रिया... काय करतीयेस ? " प्रियाचे हात धरून ती म्हणाली. प्रियाचे डोळे रागाने मोठे झाले होते. दातावर दात रोवले गेले होते. " प्रिया भानावर ये..." सोनाली ओरडून म्हणाली. तशी प्रिया दचकून भानावर आली.
" सोनाली ताई..." प्रिया आश्चर्याने सोनाली कडे बघत होती. " आधी बाहेर चल. नंतर बोलूयात." सोनाली खाली पडलेली प्रियाची बॅग उचलून तिला दाराकडे लोटत म्हणाली. दोघी घाईघाईने बाहेर पडल्या. सोनालीने कडी लावून घेतली.
तसं पाहता सोनाली पूर्णतः सामान्य स्त्री होती, पण श्री सोबत राहून तिला काही गोष्टी आपोआप कळायला लागल्या होत्या. मघाशी जेव्हा तिच्या खांद्यावर प्रियाचा हात पडला, तेव्हाच तो स्पर्श का कोण जाणे पण तिला जरा खटकला. नंतर प्रियाकडे तिने नीट पाहिलं, तेव्हा तिचे डोळे अगदी निराकार होते. तेव्हाच सोनाली जरा सावध झाली. तरी काही घडलं तर काय करायचं असा काही विचार तिने केला नव्हता ; पण देवाच्याच कृपेने प्रिया भानावर आली होती. सोनालीने मनोमन देवाचे आभार मानले. दोघी शांतपणे परत चालल्या होत्या. आणि.... तेव्हाच घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीच्या खिडकीवर दोन हात आपटले होते. आणि दोन क्रुद्ध डोळे त्यांच्याकडे पाहत होते.
क्रमश:
© प्रथमेश काटे
पुभाप्र
पुभाप्र
मस्त सुरुये कथा पु भा प्र
मस्त सुरुये कथा
पु भा प्र
थॅंक्यू @किल्ली आणि @नानबा.
थॅंक्यू @किल्ली आणि @नानबा. आणि काल रात्री जरा घाईघाईतच पोस्ट केली. त्यामुळे व्यवस्थित एडिट करता आले नाही. त्यासाठी क्षमस्व.
पुभाप्र
पुभाप्र
छान वातावरण निर्मिती जमतेय
छान वातावरण निर्मिती जमतेय तुम्हाला , लिहीत रहा, पुभाप्र. फक्त थोडे मोठे भाग टाकता आले तर पहा ही विनंती.
@अजिंक्य पाटील - धन्यवाद.
@अजिंक्य पाटील - धन्यवाद.
छान वातावरण निर्मिती जमतेय तुम्हाला , लिहीत
रहा >>> खूप आभारी आहे
छान चालुये. येऊ द्यात!
छान चालुये. येऊ द्यात!
मस्त सुरू आहे एकदम..
मस्त सुरू आहे एकदम..
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार