कोरी पाटी !

Submitted by छन्दिफन्दि on 1 February, 2024 - 00:03

कोरी पाटी !
आज पगाराचा दिवस,लग्नानंतरचा पहिलाच पगार.
गेल्याच आठवड्यात तिने नवऱ्याला विचारून ठेवलेलं "अरे तू तर नाहीयेस इकडे, माझा पगार होईल पण मग मी घरी आईंना देऊ का पैसे ?" लग्नानंतर ते दोघे रिटायर्ड सासू सासऱ्यांबरोबर राहत होते.
"तू नको त्याची काळजी करू. मी बघतो." पण तिला स्त्री शिक्षण, स्वावलंबन, आत्मनिर्भरता इ . इ बरीच अस्मिता होती, त्यामुळे घरात असं काहीच काँट्रीब्युशन न देता राहणं तिच्या मनाला काही पटलं नाही. पण तो विषय तेवढ्यावरच राहिला. नवरा बाहेरगावी कामानिमित्त निघूनही गेला.
"काय बरं करावं ? घरी काहीच न देणं काही बरोबर नाही, तो काहीही म्हणू दे . पण जर पगार सासूबाईंच्या हातात दिला आणि त्यांनी मीनाच्या सासू-नवऱ्यासारखे सगळे पैसे घेऊन टाकले तर. मीनाचे किती हाल होतायत, लग्न झाल्या झाल्या सगळा पगार सासू-नवरा वेगवेगळ्या वस्तूंचे हफ्ते भरण्या साठी खर्च करून टाकतात. मीना पण काय ?? थोडे देणे वेगळे... पण सगळा पगार म्हणजे जरा अतीच झालं. . आधीपासूनच मर्यादा आखून घ्यावयात आणि द्याव्यात . तेच बरोबर आहे. पण मग एखादं बिल भराव का आपण ? अरे पण परवा ह्यांचं सहजच फोने बघितलं तर केव्हढं मोठं! आपल्या (तुटपुंज्या ) पगारात ह्यांची बिलं भागातील अस दिसत नाहीये. काय बरं करावं ??"विचारांच्या कल्लोळात घर कधी आलं कळलंच नाही . तिला एक आयडिया सुचली. घरी जाताना तिने गुलाबजाम घेतले होते, तिची नेहमीची सवय, पगाराच्या दिवशी काहीतरी स्पेशल घेऊन जायचं.
तिन्ही सांजेचा सासूबाईंनी देवाला दिवा तर लावलाच होता. हात पाय धुवून देवाला नमस्कार केला, पगारच पाकीट देवासमोर ठेवलं.
हळूच सासूबाईंना म्हणाली,
" आई , आज पगार झाला. गुलाबजाम आणलेत "
"हो का ! अरे वा वा !"
तिनं पुढे रेटल "मी घरात किती पैसे देऊ?"
स्वतःवरच खुश होती ती , 'वा वा आपण तर मध्य काढला, न जाणो उगाच (त्या मीनाच्या लोभी सासूसारखे ) सगळे पैसे घेतले तर , त्यापेक्षा हे बरे इंडिरेक्टली मी सगळा पगार हातात देणार नाही हे जाहीर झाले '
"अगं वेडी आहेस का ? काही नको देऊस . ठेव तुझ्याकडेच. तुला तो म्हणाला नाही का ?"
"हो तो म्हणाला पण मला बरोबर नाही वाटत असं . मी पण काही करायला पाहिजे" ती एकदम बॅकफूटवर.
"तू लग्न आधी काय करायचिस?"
"काही नाही थोडे मला हातखर्चाला ठेवायचे, बाकी आईने सांगितलं तस बँकेत ठेवायचे . "
"मग झालं तर, तसच कर "
"नाही पण ती गोष्ट वेगळी , आता कस चालेल असं " ह्या संभाषणा दरम्यान आईचं बोलणं परत परत आठवू लागलं.
लग्नाच्या आधीच आई म्हणालेली "तू त्या मीना आणि इतरांच्या गोष्टी ऐकून सासरी वागू नकोस. ही माणसं चांगली आहेत आपण माणसं नीट बघुनच पुढे जातो वगैरे वगैरे " आणि तेव्हाचं तिचं पुटपुटणं लख्ख आठवलं, "आईला ना सगळी दुनिया चांगली दिसते, आता जग इतकं बदललंय हिला काही गंध वार्ता नाही."
पाच एक मिनिटांनी सासूबाई आत आल्या आणि तिला हलकेच म्हणाल्या "अगं तुझे पैसे तू नीट जपून साठवून ठेव. उद्या तुमचा संसार सुरु झाला की लागतील. एखादी गोष्ट आपल्याला हवी असते, नवरा नको म्हणत असतो अशावेळी आपण हक्काने खर्च करू शकतो मनासारखा.
माहेरी भावा -बहिणीचं लग्न असेल तेव्हा तुला काही कारावस वाटलं तर हाताशी येतील."
अगदी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेला कानमंत्रच जणू , नात्यांच्या पलीकडचा !
अचंबित होऊन तो अनपेक्षित संवाद ती पचवत होती, आधीच्या (मनातल्या का होईना ) मुक्ताफळांची लाज लपवत होती आणि त्याच वेळी आईने लग्नाआधी दिलेला उपदेश कानात घुमत होता "कुठलीही किल्मिष मनात न ठेवता सासरी कोरी पाटी घेऊन जा!"

***
कोणतेही पूर्वग्रह न ठेवता नवीन सुरुवात केली तर, जर - तर चे मनातील वादळ सुरू होण्याआधीच शमलेले असते, नाही?

पूर्वप्रकाशित
***

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही आवडलं..
कोरी पाटी लॉजिक इतरही अनेक ठिकाणी लागू...

छान

अज्ञानी आणि आशु धन्यवाद!

सासू पण आपल्या सारखीच १ स्त्री असते.. तरी किती पुर्व ग्रह चिकटलेले असतात ह्या नात्या ला>>>आदरमोद