
“११ वर्षाच्या मुलीला बलात्कारानंतर गर्भधारणा झाली होती. परंतु आता गर्भ ३१ आठवड्यांचा असल्यामुळे तिला गर्भपाताची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली”
(https://www.lokmat.com/national/the-high-court-denied-permission-to-an-1...).
नुकतीच ही जयपूरची बातमी वाचली आणि सुन्न व्हायला झाले. इतक्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेतून जे मातृत्व लादले जाते ते अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. या निमित्ताने या विषयाचा घेतलेला हा शास्त्रीय कानोसा.
2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या युनिसेफच्या अहवालानुसार सुमारे 13 टक्के मुलींवर अशा प्रकारचे मातृत्व लादले जाते. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाखालील देशांमध्ये तर हे प्रमाण 25% आहे; दक्षिण आशियात ते १०% आहे. अशा घटनांमध्ये सुमारे 20% घटना बाललैंगिक अत्याचार या सदरात मोडतात. त्यावरील वयोगटांमध्ये 33% प्रकरणांमध्ये बलात्कार हे मातृत्वाचे कारण असते.
अल्पवयीन मातृत्वाची सामाजिक कारणे
१. दैनंदिन पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण या मूलभूत सुविधा घरांपासून लांब अंतरावर असण्यातून येणारी असुरक्षितता.
२. शाळा घरापासून खूप दूर असणे आणि तिकडे जाण्याचा मार्ग असुरक्षित असणे. खुद्द शाळेच्या वर्गातील मुलग्यांकडून आणि शिक्षकांकडून देखील बलात्काराचे भय संभवते.
३. प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा दूरच्या अंतरावर असणे आणि तिथली अपुरी वैद्यकीय सुविधा
४. गरिबी हे तर अत्यंत महत्त्वाचे कारण. दारिद्र्यरेषेखालील पालकांकडून आपल्या मुलांच्या मूलभूत गरजा देखील पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांमधील काही मुली नाईलाजाने परिचयातील सधन पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवून त्या बदल्यात पैसे आणि इच्छित वस्तू मिळवतात.
५. विवाहवय कायदा अस्तित्वात असूनही अजूनही कित्येक प्रदेशांमध्ये बालविवाह सर्रास होताना दिसतात. युनिसेफच्या 2021च्या माहितीनुसार जगभरात मिळून सध्या हयात असलेल्या स्त्रियांपैकी सुमारे ६५ कोटी महिलांचा बालविवाह किंवा अल्पवयात लैंगिक संबंध झाला होता. त्याची जागतिक टक्केवारी खालील चित्रात पाहता येईल :
(चित्रसौजन्य : युनिसेफ)
(वेळीच गर्भपात न केल्यास) अशा प्रकारच्या मातृत्वातून संबंधित मुलींना काही गंभीर शारीरिक आणि सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. ते आता थोडक्यात पाहू :
शारीरिक दुष्परिणाम
१. गरोदरपणात उच्च रक्तदाब आणि फीट्सचा विकार होण्याची शक्यता
२. प्रसूतीपूर्व डॉक्टरी सल्लामसलतीकडे दुर्लक्ष आणि हेळसांड
३. मुदतपूर्व प्रसूती
४. प्रसूतीदरम्यान गंभीर अडथळा, सिझेरियन किंवा अन्य शस्त्रक्रियांची गरज
५. प्रसूतीनंतर होणारा fistula, अतिरिक्त रक्तस्त्राव, गर्भाशय अस्तराचा दाह. तसेच क्षयरोग आणि अन्य जंतुसंसर्ग
६. आधीच कुपोषणग्रस्त असल्यास तीव्र ऍनिमिया सुद्धा असतो
७. कमी वजनाच्या बालकाचा जन्म आणि/ किंवा जन्मानंतर लवकरच त्याचा मृत्यू.
सामाजिक दुष्परिणाम
१. शालेय शिक्षण थांबवावे लागणे
२. कुटुंब आणि आजूबाजूच्या समाजाकडून सतत दूषणे मिळणे; वेळप्रसंगी जवळच्या कुटुंबीयांकडून मारहाण
३. बलात्कारिता/ कुमारी माता हा आयुष्यभरासाठीचा कलंक लागतो.
४. गरोदरपणी योग्य वेळेत हस्तक्षेप न केल्यास जन्माला येणाऱ्या मुलांच्या पोषणाचा प्रश्न; अनाथालयांवरील बोजा वाढणे.
अशा प्रकारच्या शोषित मुलींच्या मुलाखती घेण्यात आल्या असून त्यांत त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. अशा समूहाकडून आलेल्या काही मागण्या अशा आहेत :
१. बलात्कारी पुरुषांना कठोर शासन करणे
२. पीडित मुलींना शाळेत पुन्हा घेऊन शैक्षणिक संधी देणे
३. या वयोगटातील मुलामुलींचे लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधन या विषयावर प्रबोधन व्हावे
४. शाळांमधील वातावरण सुरक्षित होणे आवश्यक असून त्याची हमी देण्यात यावी. या संदर्भात पालक व शिक्षकांचे समुपदेशन व्हावे
५. पीडीत मुलींकडे बघण्याच्या सामाजिक दृष्टिकोनातही बदल झाला पाहिजे
६. विवाहवय कायद्याची कठोर अंमलबजावणी
अल्पवयीन मातृत्वाचे जागतिक पातळीवर नोंदलेले न्यूनतम वय किती असेल याचा शोध घेतल्यावर खालील धक्कादायक माहिती मिळाली :
सन 1939मध्ये पेरू देशातील ही घटना. (https://en.wikipedia.org/wiki/Lina_Medina)
पाच वर्षे सात महिने वयाची मुलगी (Lina Medina) माता बनली. त्या बालकाला सिझेरियनने काढावे लागले.
या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मासिक पाळी येत होती (? Precocious puberty).
या बातमीची वैद्यकीय तसेच पत्रकारीय प्रांतात बरीच शहानिशा झालेली दिसते. त्यानंतर ही बातमी खरी असल्याचे दिसते आहे..
(https://www.snopes.com/fact-check/youngest-mother/).
अर्थात मातृत्वाचे इतके लहान वय हे अपवादात्मक मानावे लागेल.
या दुःखद विषयाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित देशांतील सामाजिक आणि आरोग्य यंत्रणांनी या संदर्भात योग्य ती पावले प्राधान्याने उचलणे महत्त्वाचे आहे.
*********************************************************************
( सर्व चित्रसौजन्य : युनिसेफ)
हेमंत सर तुम्ही क्लासेस सुरू
हेमंत सर तुम्ही क्लासेस सुरू करा आम्ही मुलांची नाव नोंदणी करतो
धन्यवाद डॉक्टर.
धन्यवाद डॉक्टर.
इंटरनेटवर ढीगभर माहिती आहे तरी पण शास्त्रशुद्ध प्रबोधन वर्गांची गरज आहेच.
मातृत्व या विषयावरील काही
मातृत्व या विषयावरील काही अवांतर ....
उतारवयातील मातृत्व यासंबंधीचे काही विक्रम :
१. नैसर्गिक मार्गाने गरोदर झालेली स्त्री : याचा 2017 च्या ‘गिनेस’ नोंदणीनुसार विक्रम, वय 59 असा दिसतो आहे.
२. कृत्रिम गर्भधारणेने गरोदर झालेली स्त्री : वय 73. ( ही भारतीय आहे ).
https://en.wikipedia.org/wiki/Pregnancy_over_age_50#:~:text=The%20oldest....
या वयात गर्भधारणा माता आणि
या वयात गर्भधारणा माता आणि बाळ दोघांसाठी सुरक्षित आहे का?
फक्त वैद्यकीय दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारतो आहे.
उतारवयातील गरोदरपण आणि
उतारवयातील गरोदरपण आणि बाळंतपण अर्थातच त्याच्यासोबत अनेक धोके घेऊन येते, जसे की :
1. या वयातील स्त्रीला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार काही प्रमाणात असण्याची शक्यता असते.
2. समजा, वरील काही नसेल तरी गरोदरपणा दरम्यानचा मधुमेह उद्भवू शकतो
3. संबंधित गर्भामध्ये गुणसूत्रांचे विकार (उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोम) : यांची शक्यता खूप वाढते
4. बाळंतपणादरम्यान सिझेरियन करण्याची शक्यता देखील बरीच वाढते. प्रसूतीपश्चात आरोग्य समस्या देखील वाढतात.
5. कृत्रिम गर्भधारणेतून हा प्रकार केला असेल तर जुळे, तिळे (किंवा त्याहूनही अधिक गर्भ) यांचे प्रमाणही वाढते.
6. गर्भपतन किंवा मृत बालकाचा जन्म
जास्त वयात मुल होवून देणे
जास्त वयात मुल होवून देणे ह्या बाबत फक्त प्रसूती सुरक्षित होईल की नाही इतकेच मोजमाप लावून चालणार नाही.
माणूस हा जींवत प्राणी आहे कोणते यंत्र नाही.
आई ल किती धोका आहे हा प्रश्न जितका महत्वाचा त्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे त्या मुलात जनुकीय दोष निर्माण होण्याची शक्यता वाढते का?
त्या मुलाला त्याच्या mature वयात म्हणजे २१ वर्ष होई पर्यंत.
पालकांचे छत्र लाभेल का?
पालक असणे ही मानसिक गरज पण असते मुलांची.
.त्याचे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी,त्याचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी पैसा जसा लागतो तसे पालक पण हयात लागतात.
७३ व्यां वर्षी मुलाला जन्म देण्याचा निर्णय हा त्या मुलावर अन्यायकारक च आहे..त्याच्या हक्काची पायमल्ली च आहे.
अशा गोष्टींना सरकार नी कायदा बनवून प्रतिबंध केलाच पाहिजे
अल्पवयीन मातृत्वाचे एक
अल्पवयीन मातृत्वाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुलींचे बालविवाह. राजस्थानमध्ये ही समस्या मोठी आहे. असे विवाह रोखण्यासाठी तिथे अनेक संस्थांनी एकत्र येऊन जागतिक स्तरावरील 'girls not brides' या नेटवर्कची स्थापना राजस्थानात केली आहे. सध्या या नेटवर्कमध्ये 28 संस्था आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून तिथले बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांना गती आली आहे :
https://www.weeklysadhana.in/view_article/A-report-Child-marriage-in-Raj...
समस्या गंभिर आहे . कुठलेही
समस्या गंभिर आहे
. कुठलेही बातमी पत्र उघडल्यावर बलात्काराच्या, बळजबरीच्या बातम्या वाचायला मिळतात. चीड येते, वाईटही वाटते.
काही दिवसांपुर्वीच जोगेश्वरीची १२ वर्षाची मुलगी आणि पाच नराधमांनी अत्याचार केल्याची बातमी वाचण्यात आली.
काही प्रकरणांत अनेक महिने अत्याचार होत असतात हे अजूनही धक्कादायक.
कधी ३-४ वर्षांची मुलगी असते किंवा जिला बोलताही येणार नाही, काहीच सांगता येणार नाही अशी केवळ दहा महिन्याचे बाळही असते.
https://www.ndtv.com/india-news/10-month-old-girl-kidnapped-raped-by-fam...
<< अल्पवयीन मातृत्वाचे एक
<< अल्पवयीन मातृत्वाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुलींचे बालविवाह. >>
विवाहा बाबत वयाचे कायदे आहेत पण तेही पाळले जात नाही.
--------- बाल विवाह वाईटच आहे.
बालविवाह का होतात ? आई- वडिलांना मुलगी हे बर्डन वाटते. मुलीच्या सुरक्षेची चिंता मनात घर करुन असते. कधी काही विपरीत झाल्यास? त्यापेक्षा लवकरांत लवकर विवाह आटोपून टाका असा विचार असतो का?
शिक्षण हा पण एक महत्वाचा घटक आहे असे वाटते. बिहार, राजस्थान, उ प्र आणि दक्षिणेकडच्या राज्यातली शैक्षणिक ( आणि म्हणून बालविवाहातल्या टक्केवारीतली) तफावत.
* शिक्षण हा पण एक महत्वाचा
* शिक्षण हा पण एक महत्वाचा घटक आहे >>> + ११
'साधना'तील लेखातला हा मजकूर महत्त्वाचा वाटला :
. . . राजस्थान कशाला? आपल्या महाराष्ट्रात भटक्यांतील गोपाळ जमातीत सरसकट बालविवाह होत असत. अशा वेळी लातूर जिल्ह्यातील अन्सारवाडा येथील भटक्या-विमुक्तांत काम करणारे कार्यकर्ते नरसिंग झरे यांनी श्रीदेवी बंडीधनगर या मुलीच्या पालकांची समजूत काढली आणि तिला शिकवले. ती आठवी पास झाली आणि मग तिच्यासाठी नवरा शोधायला सुरुवात केली, तर तिच्या वयाच्या सगळ्यांची लग्नं होऊन गेली होती. तिच्या पालकांनी नरसिंग झरे यांना खूप शिव्या दिल्या. शेवटी एका निरक्षर तरुणाशी तिचे लग्न लावण्यात आले. तेव्हा एखाद्या जमातीत मुलं शिकले तरच मुली शिकणे शक्य असते. अन्यथा लग्न होणे खूपच कठीण होऊन जाते. . . .
बालविवाह का होतात ? आई-
बालविवाह का होतात ? आई- वडिलांना मुलगी हे बर्डन वाटते. मुलीच्या सुरक्षेची चिंता मनात घर करुन असते. कधी काही विपरीत झाल्यास>>>>
मुली मुलांसोबत पळुन जातात्/फुस लावुन पळवल्या जातात. अशी परिस्थिती समोर दिसत असेल तर नामुष्की टाळण्यासाठी वय न पाहता लग्न लावुन देतात.
माझ्या बाईला, जी बंजारा समाजातील आहे, ४ मुली व १ मुलगा. (इथेही दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झाल्यावर तिला ऑपरेशन करायचे होते पण अजुन मुलगे हवेत ह्या घरच्यांच्या इच्छेमुळे अजुन दोन मुली झाल्या). तिला प्रत्येक मुलीला शिकवायचे होते. पण तिन मुलीनी १३-१४ ही वये ओलांडण्याआधीच मुलांशी संधाने बांधायला सुरवात केली. प्रत्येक वेळी बाईने समजावले, शिक्षणस्चे महत्व डोक्यात भरायचा प्रयत्न केला व शेवटी थकुन लग्न लाऊन दिले. मुलगा १७ चा असताना नवरा गेला. मुलाने शिक्षण सोडुन त्याची जागा घेतली, दोन वर्षात दारु प्यायला लागला, लग्नही केले. लग्न झाले की लगेच पोर हवेच. अशिक्षित गरिब घरांमध्ये अल्पवयीन मातृत्वाची समस्या मुख्यतः ह्या कारणांमुळे येते.
शेवटची मुलगी चांगली निघाली. दोन वर्षांपुर्वी पदवीधर झाली आणि आता नोकरी करतेय. तिला तिच्या समाजात पदवीधर मुलगा मिळणे कठिण आहे. पण बाई कुल आहे. शिक्षणाचे महत्व तिला माहित आहे.
Pages